परफेक्ट हक्का नूडल्स - बाय संजीव कपूर

Submitted by स्वप्ना_राज on 2 June, 2021 - 10:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४०० ग्रॅम नूडल्स, मीठ, ४-८ फरसब्या, १ मध्यम कांदा, पाव छोटा कोबी, ३ टेबलस्पून तेल, १ मध्यम गाजर, पाव टीस्पून मीरपूड, १ टेबलस्पून सोया सॉस, १ मध्यम हिरवी सिमला मिरची, अर्धा कप मोड आलेले मूग (बीन स्प्राउटस), १ टेबलस्पून व्हिनेगर.

क्रमवार पाककृती: 

माझ्या चायनीज खाण्याची सुरुवात लहानपणी वरळीच्या फ्लोरापासून झाली. तिथल्या चिली चिकन, प्रॉन फ्राईड राईस, क्रॅब कॉर्न सूप ह्या माझ्या खूप आवडीच्या डिशेस होत्या. मोठेपणी एकदा तिथे गेलो होतो पण ती चव आता नव्हती. तो शेफ नोकरी सोडून गेला असेल कदाचित. ती चव मी पुढे अनेक हॉटेलातल्या चायनीज खाण्यात शोधली पण कुठे मिळाली नाही. कोण तो शेफ होता कोण जाणे. काही वर्षांपूर्वी फ्लोरा बंद होणार म्हणून पुन्हा गेलो तर त्या डिशेससुध्दा नव्हत्या मेनूत. खूप वाईट वाटलं.

आता झोमॅटो किंवा स्विगीवरून जेवण मागवायला नको वाटतं इतका चायनीज आणि नॉर्थ इंडियन जेवणाचा सुळसुळाट झालाय. बदल म्हणून घरीच चायनीज करावं तर ते हॉटेलातल्यासारखं लागत नाही. तेव्हा संजीव कपूरने जेव्हा परफेक्ट हक्का नूडल्स बनवूया म्हटलं तेव्हा मी जरा नाक उडवलं. येऊन जाऊन तोच सोया सॉस, तेच व्हिनेगर, तोच चिली सॉस आणि तीच कॉर्न स्टार्चची पेस्ट. काय वेगळं बनवणार बाबा तू?

पण त्याने डिश बनवून दाखवली. फार काही वेगळं हाती लागणार नाही असं वाटलं कारण रेसिपी अगदीच साधी. पण करून पाहिली आणि आवडली की. आता हक्का नूडल्स बाहेरून आणायला नकोत. ही चायनीज पदार्थांची सिरिज शाकाहारी असल्यामुळे (का ते एक संजीव कपूर जाणे आणि दुसरा सर्वशक्तिमान देव!) ही रेसिपीसुध्दा शाकाहारी आहे. पण आवडीनुसार चिकन किंवा प्रॉन्स घालू शकता. मग बघू यात का कश्या करायच्या ह्या परफेक्ट हक्का नूडल्स?

गाजर, सिमला मिरची, कांदा, कोबी ह्या सगळ्या भाज्यांचे पातळ लांब तुकडे करा. फरसबीचे तिरपे तुकडे करा.
नूडल्स शिजवून घ्या. (टीप पहा)
तेल गरम करून त्यात कांदा, फरसबी, गाजर, कोबी घाला. परता. त्यात नूडल्स घाला. त्यावर थोडे तेल घाला. मीठ, सोया सॉस घाला. सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घाला. मिक्स करा.
सिमला मिरचीचे तुकडे घाला. बीन स्प्राउटस आणि व्हिनेगार घाला. मिक्स करा.

नूडल्स आज बनवल्या नसल्याने प्रचि टाकता आले नाही. क्षमस्व.

अधिक टिपा: 

नूडल्स शिजताना एकमेकांना चिकटू नयेत म्हणून संजीव कपूरने एक टीप दिली. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवायचं. त्यात एक चाळणी ठेवून त्यात नूड्ल्स घालून शिजू द्यायच्या. शिजल्या की दुसर्‍या भांड्यात गार पाण्यात (बर्फाच्या नव्हे!) काढून ठेवायच्या. अजिबात चिकटत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर, फूड फूड चॅनेल, हाऊ टू कुक शो
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मोकी फ्लेवर हवा असेल तर तेल गरम करायचे त्यात वाळक्या मिर्च्यांचे तुकडे टाकायचे. मग त्यात भाज्या टाकून परतायच्या.
यात १-२ चमचे चिंग्सचा शेजवान सॅास टाकूनही नूडल्स मस्त लागतात.
मी कांदा नाही घालत पण भाज्यांपैकी ब्रोकोली, स्नॅप पीज, गाजर, सि. मिर्ची, ब्रुसेल स्प्राउट यापैकी जे असेल ते घालते. जेव्हढ्या नूडल्स तेव्हढ्या किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या हव्याच नाहीतर नुसता मैदा खाण्यात मजा नाही येत.

मी पण हे नेहमी करत असे. माझ्या भाज्या : कॅप्सिकम, कोबी, गाजर , मटार, कॉर्न किंवा बेबीकॉर्न कापून, वरून कांदा पात हे तर आहेच.

बोनलेस चिकन बारके तुकडे आधी तेलात तळून घ्यायचे. म्हणजे स्टर फ्राय व मग नंतर मिसळले की चिकन नूडल्स होतात.

बरोबरीने सेम भाज्या अजून एक लोड कापून त्याचाच व्हेज फ्राइड राइस करायचा. व नॉर चे सूप म्हणजे एक पूर्ण जेवण बेत होतो.

व्हिनेगर मध्ये बारीक कापलेल्या मिरच्या व काकडी चे तुकडे पण बरोबर द्यावे

दोन अंड्याचे आमलेट वेगळ्या तव्यावर करून घ्यायचे व बारीक पट्ट्या करून भातावर पॅटर्न करायचा आणी मधून केचप चे ठिपके द्यायचे.
हे म्हणजे पार्टी असली की. छान दिसते.

सपना खुप दिवसानी मायबोलीवर. Happy सिमला मिरची परतली जाते का नंतर वरून घातल्यावर ?.

मी सिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची लांबडी आणि पातीचा कांदा लांब लांब चिरते. कधी पातीचा कांदा नसेल तर पांढरा कांदा अगदी थोडा पातळ काप घेते. आल लांब चिरून. तेलात मोठा गॅस करुन भाज्या ,आल परतायच्या. अगदी १ ते दिड मिनिट.सोया सॉस घालायचा . आणि शिजलेल्या नुडल्स घालून परतून घ्यायच. हक्का नूडल्स ला सगळ्यात काय महत्वाच आहे तर वॉक किंवा कढई अस बर्‍याच रेसीपी नंतर लक्षात आलय. रेसीपी खरतरं फारस काहीच नाहीये. भाज्या किती शिजवायच्या आणि नुडल्स कसे परतता त्यावर अवलंबून आहे अस लक्षात आल. कढई किंवा वॉक असेल तर ते परतण व्यवस्थित होत आणि हक्का नुडल्स परफेक्ट होतात हे १८३६४८४३ प्रयोग झाल्यावर मग कळल. Uhoh

>>आलं लसूण पेस्ट नाही का टाकली त्याने? आणि बाकी सॉसेस?

नाही ना. तीच तर गंमत आहे. मलाही वाटलं होतं की ही कसली रेसिपी, काही सॉसेस नाहीत आणि काही नाही. पण छान वाटली.

>>जेव्हढ्या नूडल्स तेव्हढ्या किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या हव्याच नाहीतर नुसता मैदा खाण्यात मजा नाही येत.
अगदी अगदी

>>मी पण हे नेहमी करत असे. माझ्या भाज्या : कॅप्सिकम, कोबी, गाजर , मटार, कॉर्न किंवा बेबीकॉर्न कापून, वरून कांदा पात हे तर आहेच.
बोनलेस चिकन बारके तुकडे आधी तेलात तळून घ्यायचे. म्हणजे स्टर फ्राय व मग नंतर मिसळले की चिकन नूडल्स होतात.

हो कांदा पात बारीक चिरून घालू शकतो. चिकन नुसतं तळून घालण्यापेक्षा तळताना थोडी मीरपूड घातली तर जास्त छान चव येईल.

>>सिमला मिरची परतली जाते का नंतर वरून घातल्यावर ?.
मला सिमला मिरची अर्धवट शिजलेली आवडते खायला. 'हक्का नूडल्स ला सगळ्यात काय महत्वाच आहे तर वॉक किंवा कढई अस बर्‍याच रेसीपी नंतर लक्षात आलय' हे अगदी बरोबर. आणि नूडल्स एकमेकांना चिकटल्या नाहीत की अर्धी लढाई जिंकली.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.