" कथा, कविता, लेख लिहिण्याची उदासीनता!"

Submitted by चंद्रमा on 27 May, 2021 - 05:18

....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्‍या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार! असे असंख्य विचार मनाला स्पर्शून जातात मग एखादं काव्य महाकाव्य किंवा एखादी कल्पना कादंबरीचे मूर्तिमंत स्वरूप घेण्याचं राहूनच जातं.

.......प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक महान लेखक, कवी, कादंबरीकार लपलेला आहे. फक्त ते आपण स्वीकारायला हवं. प्रत्येक श्वासात एक 'वादळ' लपलेलं असतं. मातीच्या प्रत्येक कणात एक 'पहाड' दडलेला असतो तर प्रत्येक संमशेरीत एक भव्य 'सैन्य' आकार घेत असतं! ती प्रतिभा आपल्यामध्ये पण आहे फक्त आपल्या अंतर्मनाला ते कळायला हवं! कधी-कधी तुम्ही अनुभव घेतलेला असेल आपल्या मनात आलेला विचार आपण कागदावर उतरवतो नंतर ते प्रकाशित करायचं राहूनच जातं! काही दिवसानंतर ती कवितेची वही, ती कथा आपल्या दृष्टीस पडते आणि आपल्याला एक आश्चर्याचा धक्काच बसतो. खरच ही कलाकृती मी केलेली आहे‌. खरंच इतकी सुंदर कल्पना माझी असू शकते मग उगाच स्वतःला कौतुकाची थाप द्यावीशी वाटते की मी पण काहीतरी घडवू शकतो.‌ मी हे नाही म्हणत की तुम्ही लगेचच 'वि. वा. शिरवाडकर', 'वि. स. खांडेकर', 'आचार्य अत्रे', 'पु.ल.' किंवा 'केशवसुत', 'गोविंदाग्रज' यांच्या पंक्तीत जाऊन बसणार पण नाही कळसी तर पायथ्याशी तर आपण नक्कीच जाऊ शकतो.
........तसं बघितलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेल असं क्वचितच घडतं. प्रत्येकाला जे हवं ते आयुष्यात मिळेलच याची काही शाश्वती नसते. पण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न तर आपण करूच शकतो.
ख्यातनाम शायर 'निदा फाजली' च्या शब्दात सांगायचं झालं तर,

"कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता!
कहीं जमीन तो कहीं आसमान नहीं मिलता!!"

तर कंबर कसून सज्ज व्हा, आपण जे स्वप्न उराशी बाळगले आहे ते सत्यात उतरवणार! कल्पना करा की आपण व्यासपीठावरून स्वत:च्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं वाचन करीत आहात. आपल्या काव्याला, लेखनाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. टाळ्यांच्या कडकडाटाने सर्व हाल दुमदुमून गेला आहे.खरतर हे भविष्यात होणार म्हणजे मी साहित्यविश्वात एक आगळीवेगळी छाप सोडणार अशी कल्पना उद्या करण्याऐवजी ती आजच करा, हो मी आहे एक मोठा प्रसिद्ध कथा लेखक, कवी, कादंबरीकार!

तुम्हा सर्व प्रिय मायबोलीकरांचं यावर काय मत आहे ते नक्की कळवा ही नम्र विनंती!!!!

"अभी तो असली मंजिल पाना बाकी है,
अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है!
अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन;
सारा आसमां अभी बाकी है!!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरतर हे भविष्यात होणार म्हणजे मी साहित्यविश्वात एक आगळीवेगळी छाप सोडणार अशी कल्पना उद्या करण्याऐवजी ती आजच करा, हो मी आहे एक मोठा प्रसिद्ध कथा लेखक, कवी, कादंबरीकार!>> अशी कल्पना करणे वाईट नाही. पण बऱ्याच वेळा ही कल्पना खरी वाटायला लागते आणि मग आपण लिहिलेले साहित्य ही अत्यंत महान कलाकृती असते असा समज मनात रुजायला लागते. आपल्या सभोवतालच्या वर्तुळात आपल्या साहित्याचे कौतुकही होते. मायबोलीसारख्या ठिकाणीही जिथे अनेक रथीमहारथी मैदानात असतात तिथेही नवीन लेखक म्हणुन कौतुक होऊ शकते. पण मग जर प्रतिकुल प्रतिसाद आले तर ते स्विकारणे शक्य होत नाही.

प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक महान लेखक, कवी, कादंबरीकार लपलेला आहे. >>>> क्या बात है !
फक्त ते आपण स्वीकारायला हवं. >>> नेमकी हीच तर अडचण आहे. मायबोलीकर पळवून लावण्यासाठी (कु)प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेक (बाल)साहित्यिकांची भ्रूणहत्या होते इथे. विशाल म्हस्के, सतीश गावडे, देवपूरकर अशा साहीत्यिकांना ज्ञानपीठ मिळण्याआधीच पळवून लावले गेले.

योग्य विचार मांडलात आपण वीरू!
प्रत्यक्षात मला जाणून घ्यायचे होते की मायबोलीकर आपल्या कलाकृतीबद्दल काय विचार करतो!
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

आभारी आहे 'पारंबीचा आत्मा' आपल्या प्रतिसादाबद्दल!
आपल्या विचारांचं योगदान दिल्याबद्दल धन्यवाद!

मी जेव्हा अमानवीय धाग्यावर लिहायचो तेव्हा माझ्यावर खूप टीका झाली पण नंतर हळूहळू सगळे माझे दोस्त बनले.

मी जेव्हा अमानवीय धाग्यावर लिहायचो तेव्हा माझ्यावर खूप टीका झाली पण नंतर हळूहळू सगळे माझे दोस्त बनले.
>>>>>>

काय टिका व्हायची आणि का?
अनुभव लिहा ना..

मी कधी आयचो नाही त्या धाग्यावर.. उगाच नको ते विचार मनात म्हणून

मी जेव्हा अमानवीय धाग्यावर लिहायचो तेव्हा माझ्यावर खूप टीका झाली पण नंतर हळूहळू सगळे माझे दोस्त बनले.
>>>>>>

काय टिका व्हायची आणि का?
अनुभव लिहा ना..

मी कधी आयचो नाही त्या धाग्यावर.. उगाच नको ते विचार मनात म्हणून

मी जेव्हा अमानवीय धाग्यावर लिहायचो तेव्हा माझ्यावर खूप टीका झाली पण नंतर हळूहळू सगळे माझे दोस्त बनले.
>>>>>>

काय टिका व्हायची आणि का?
अनुभव लिहा ना..

मी कधी आयचो नाही त्या धाग्यावर.. उगाच नको ते विचार मनात म्हणून

पहा. बोकलतनी ऋन्मेऽऽष वर जादू टोणा केला. थोडक्यात निभावले नाहीतर मायबोली ह्या एका प्रतिसादाने दुथडी भरून गेली असती

'बोकलत','प्रणवंत','भरत','ऋण्मेश','प्रभूजी' आपण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल आभारी आहे!
खरतर जितके विरोधक असतील तेवढी चर्चा तुमची असेल आणि आपल्या यशाचे रहस्य हे आपले विरोधकच असतात.टिकाकारच आपल्याला सुचवतात की आपली दिशा कोणती ते,त्यामुळे लिखाणाला स्वच्छंद पाखराप्रमाणे उंच भरारी घेऊ द्या.कोण काय विचार करेल किंवा इतरांचा काय प्रतिसाद असेल या चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा हा चक्रव्यूह तोडून मनसोक्त भ्रमण करा या साहित्यविश्वाच्या आसमंतात!

प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक महान लेखक, कवी, कादंबरीकार लपलेला आहे.
>>> मला नाही वाटत... प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक चांगला टीकाकार मात्र लपलेला आहे.

सगळेच लिहायला लागले तर वाचणार कोण?

कोण काय विचार करेल किंवा इतरांचा काय प्रतिसाद असेल या चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा हा चक्रव्यूह तोडून मनसोक्त भ्रमण करा या साहित्यविश्वाच्या आसमंतात!>> खुपच छान‌, पण अशी सन्यस्तवृत्ती मोजक्याच लोकांजवळ असते.

प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक महान लेखक, कवी, कादंबरीकार लपलेला आहे. >>> तुम्ही खरंच इतके इनोसन्ट असाल तर हेवा वाटतो तुमचा.

सगळेच लिहायला लागले तर वाचणार कोण?
>>>
लिखाणाची भूक आणि आवड आपल्याजागी तर वाचनाची भूक आणि आवड आपल्याजागी.
आपण बनवलेले अन्न जसे आपली पोटाची भूक भागवते तसे आपले लेखन आपली वाचनाची भूक नाही भागवू शकत.

रियालिटी पिल ची गरज आहे...
सगळेच कोडींग चांगले करू शकतात का?
सगळेच छान पेंटिंग करू शकतात का?
सगळेच छान नाचू शकतात का?
सगळेच छान गाऊ शकतात का??
मग सगळेच छान लिहू शकतात.. प्रत्येक मायबोलीकरामध्ये एक महान लेखक, कवी, कादंबरीकार लपलेला आहे हे कसे शक्य आहे???

आभारी आहे आपल्या अभिप्रायाबद्दल 'बन्या','रानभुली'
माझा हेतू एवढाच होता की मायबोलीकरांचं यावर काय मत आहे! आणि खरच चर्चा घडून येत आहे.तुमच्यातला लेखक,कवी,कांदबरीकार जागा झालेला आहे.खरच मी काही खास आहे हे कसं असू शकतं असा प्रतिप्रश्न तुम्हाला पडलेला आहे.हीच तर ती लपलेली प्रतिभा आहे जी डोकावू पाहात तुमच्या अचेतन मनात! तुमच्या सुप्त गुणांना बहरण्याची संधी द्या। मग बघा जादू! रविची प्रत्येक किरण तुम्हाला हवीहवीशी वाटेल!

तुमच्यातला लेखक,कवी,कांदबरीकार जागा झालेला आहे.खरच मी काही खास आहे हे कसं असू शकतं असा प्रतिप्रश्न तुम्हाला पडलेला आहे.
>> लोल

Pages