कैफ माझा

Submitted by गणक on 26 May, 2021 - 23:07

कैफ माझा

ठरविले होते तसा जगलोच नाही !
जीवनाला मी कधी पटलोच नाही !

ऐकली जी हाक मी होती सुखाची ,
मी अभागी, ऐकूनी वळलोच नाही !

भूतकाळाचीच दुःखे गात होतो ,
मी उद्याचे गीत गुनगुनलोच नाही !

वेदना होत्याच माझ्या सोबती अन् ,
आसवांना मी कधी मुकलोच नाही !

त्या किनाऱ्याचेच सारे क्षार अंगी ,
ज्या किनारी मी कधी भिजलोच नाही !

काल होतो मी जसा आहे अताही ,
साज खोटे चढवूनी सजलोच नाही !

मांडला त्याने जरासा "सार" माझा ,
तेवढाही त्यास मी कळलोच नाही !

शेवटी मज भेटण्या सारेच जमले ,
शोधले, पण मी कुठे दिसलोच नाही !

ऐकण्या आतूर जग हे पण अता मी ,
कैफ माझा सांगण्या उरलोच नाही !

वृत्त - मंजुघोषा ( गालगागा ) × 3

Group content visibility: 
Use group defaults

गणक, गझल सुंदरच आहे.
पण मला ज्या दोन गोष्टींत सुधारणा आवश्यक आहे असे वाटते आहे, त्याबद्दल बोलेन मी.

१. गुनगुनलोच --> गुणगुणणे असा शब्द आहे! त्याला दैनंदिन वापरात "गुणगुणले" असे वापरता येते. आणि म्हणूनच ""गुणगुणलेच नाही" असेही
चालेल. पण गुणगुणलोच नाही हे मला जरासे बळजबरीने आल्यासारखे वाटत आहे. (शुद्धलेखनाची दुरुस्ती अपेक्षित आहेच)

२. सार ---> हा नपुसकलिंगी शब्द आहे. "ते सार" असा उल्लेख केला जातो. म्हणून "मांडला त्याने जरासा "सार" माझा" --> "मांडले त्याने जरासे
"सार" माझे " असे घ्यायला हवेस असे वाटते आहे.
(बाकी सर्व गजल उत्तम आहे. आणि बाकी जाणाकार लोक प्रकाश टाकतीलच यावरती)

1.गुणगुणणे (वर गुनगुनणे असे लिहिले गेले आहे. त्याबद्दल माफी )
हे क्रियापद आहे.त्यात कर्त्यानुसार बदल होईल.जसे- ती गुणगुणते . तो गुणगुणतो. ते गुणगुणतात . मी गुणगुणतो

आता गुणगुणणे ऐवजी बोलणे हे क्रियापद घेतल्यास ती बोलते . तो बोलतो. ते बोलतात. मी बोलतो.
प्रश्न . तू आता काय बोललास ?
उत्तर . मी काही बोललोच नाही.
इथं (इथे )आपण मी काही बोललेच नाही. असं (असे) म्हणत नाही.
त्याप्रमाणे मी काही गुणगुणलोच नाही. हे मला योग्य वाटतं(वाटते).

2.सार- हा शब्द पु. व न. लिंगी दोन्ही अर्थाने वापरतात.
(वर तो एकवचनी म्हणून वापरला आहे.)
सार म्हणजे अर्क (पु.)
म्हणून माझा अर्क (माझे अर्क नाही )
सार म्हणजे गाभा(पु.)
म्हणून माझा गाभा (माझे गाभा नाही )
तसेच सार म्हणजे कलंक (पु.)
म्हणून माझा कलंक (माझे कलंक नाही )

म्हणूनच सार ऐवजी "सार"असं(असे) लिहिलं (लिहिले) आहे.

अनेक मोठे व नामवंत गझलकार शब्दांचा ऱ्हस्व दीर्घात बदल करून वापरतात. तेवढी सूट सर्वच घेतात. आणि गझलेनेही ती दिलीच पाहिजे.

तरीदेखील जाणकारांनी मार्गदर्शन करावे .
(काही चुकल्यास प्रगल्भ माफी असावी.)
धन्यवाद !

गणक गझल सुंदर झाली आहे..
मांडला त्यांनी जरासा "सार" माझा
पण कुणाला मी पुरा कळलोच नाही
हे जास्त व्यापक वाटतय का बघा

सुंदर गझल.
तुम्हाला विपू केलेली आहे. चेक कराल का?