अर्थाअर्थी -(भाग-०१) : टिंडर भेट

Submitted by अ'निरु'द्ध on 25 May, 2021 - 14:30

WaterColour Painting by my Daughter..

अर्थाअर्थी -(भाग-०१) : टिंडर भेट

कॅफे बर्डसाँगच्या दारापासून नचिकेत जरा लांबच बसला होता.
मागे रेलून, मजेत आणि इकडेतिकडे पहात. एकदम फुरसतीत.
ती घाईघाईत कॅफेच्या दारातून आत शिरल्यावर त्याला कळलं.. हिच ती.

तसा प्रोफाईल फोटो पाहिला होता त्याने. पण हल्ली फोटो एडिट ॲप्समुळे प्रोफाईल आणि प्रत्यक्ष व्यक्ती यांच्यात घोड्या गाढवाचा फरक असतो. (इति त्याचा एक पोळलेला डेटिंग स्पेशालिस्ट मित्र)

आत शिरल्यापासून टेबला टेबलावर तिची नजर भिरभिरत होती. आणि तोही मजेत तिचं त्याला शोधणं एंजाॅय करत राहिला. इथेतिथे पाहून जेव्हा तिची शोधक नजर त्याच्यावर पडली तेव्हा मात्र हलकेच हात उंचावून त्याने हाय केलं.
ती लगबगीने त्याच्या टेबल जवळ आली.
नचिकेत…??
त्यानं मान हलवली..
रेवा… राईट..??
आधीच पंधरा वीस मिनिटं उशीर झाल्यामुळे रेवाला थोडं गिल्टी वाटत होतंच. म्हणूनच अगदी कसानुसा चेहेरा करुन आणि मनापासून साॅरी म्हणत रेवा समोर बसली.
तो मात्र तिची ही लगबग, हे साॅरी म्हणणं अगदी मस्त एंजाॅय करत होता. त्यावेळेचे तिचे चेहेऱ्यावरचे विभ्रम तर त्याला आवडून आवडले. फिदाच झाला तो त्यावर.

रेवा जरा स्थिरस्थावर झाल्यावर नचिकेतने
तिला विचारुन ऑर्डर दिली आणि विचारलं : काय, कसा काय गेला आजचा दिवस ?

एकदम गडबडीचा. नाॅट सो गुड.
कामं संपतच नव्हती.
शिवाय निघायलाही उशीर झाला. मग रस्ताभर इथे वेळेवर पोहोचणार नाही याचं टेन्शन.
त्यात पुन्हा समोरची अनोळखी व्यक्ती कशी असेल याची अँक्झायटी.
रेवाने तिचा आख्खा दिवस घडाघडा त्याच्या समोर ओतला.
अनोळखी व्यक्तीच्या अँक्झायटी बद्दल तु मला एवढ्या मोकळेपणाने सांगतेयस म्हणजे मी अपेक्षेएवढा वाईट नाही निघालो, असा अर्थ धरायचा का ? नचिकेत हलकेच हसत म्हणाला.
नाही तर काय. तीन चार वेळा मी मॅट्रिमोनीअल साईट वरच्या मुलांना भेटलेय. तिथे असलेली माहिती आणि वस्तुस्थिती बरीच वेगळी असायची. फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्ती यात तर जमीन अस्मानाचा फरक. एकदमच अपेक्षाभंग.

एनीवेज. तुझा दिवस कसा काय होता..?

माझा..? मस्त. सकाळपासूनच कामाची भयंकर गडबड होती.
त्यात संध्याकाळी आपली ही पहिलीच भेट असणार होती, त्याची उत्सुकता होतीच. अनोळखी व्यक्ती बरोबरची डेट.. म्हणजे सरप्राईज एलिमेंट. तो ही एक फील गुड फॅक्टर दिवसभर होताच.
भेटायला उशीर होऊ नये म्हणून मी पटापट कामं आटपत होतो त्यामुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही.
त्या नादात कामं उरकताना सगळ्या कामाची अशी मस्त लिंक लागली की मी सोमवार, मंगळवारच्या लिस्टमधली दोन तीन महत्वाची कामंही बरीचशी पार पाडलीत.
म्हणजे माझ्या पुढच्या आठवड्याची सुरुवातही कंफर्टेबल असेल.
आणि म्हणून माझा हा विकेंड आता मस्तच जाईल.

शिवाय ह्या कॅफेचा माहौलही मस्त आहे. छान आधुनिक सजावट, आजूबाजूला उत्फुल्ल तरुणाई आणि सर्वत्र पसरलेला हा वेगवेगळ्या काॅफीज् चा अरोमा..
इन शाॅर्ट, तु येईपर्यंत मस्त वेळ गेला माझा.

आणि तूही छानच निघालीस की साईटवर दिसतेस त्यापेक्षा. सो अ नाईस अँड प्लेझंट सरप्राईज, इन फॅक्ट..

आणि माझाही मॅट्रीमोनीअल साईटवरच्या आधीच्या तीन जणींचा अनुभव तुझ्यासारखाच होता. साईटवर वेगळ्या आणि प्रत्यक्षात वेगळ्या.
म्हणून तर मी ह्या डेटिंग ॲपवर शिफ्ट झालो.
या ॲपचा माझा हा पहिलाच अनुभव खरंच छान आहे.

अरे म्हणजे मी इथे थोडी उशिरा पोहोचले आणि तू थोडासा लवकर, हे सोडलं तर दोघांचा दिवस जवळ जवळ सारखाच गडबडीचा गेला की..
हो ना.
मग मी का अशी कावलेली आणि तू का असा मजेत..?

वो तो नज़रिये नज़रिये की बात है, मेमसाहिबा..

ती स्वतःशीच खुदकन हसली. नकळत स्वतःच्या विचारात गढून जात, मान हलवत दोन्ही Situations तिने बहुतेक मनाशीच तोलून मापून पाहिल्या.

दोघांच्या दृष्टीकोनातला फरक, नजरिया तिने आता तटस्थतेने पाहिला म्हणून तिला जाणवला आणि जाणवला त्याच्या विचारातला साधेपणा, सकारात्मता आणि त्यातून असणारा त्याचा मनमौजीपणा.

किती सोपं आहे हे सगळं असा विचार करत आणि पुन्हा एकदा स्वतःशीच मान हलवत मग हसऱ्या चेहेऱ्याने रेवाने वर पाहिलं.
एखाद मिनिट गेलं असेल यात फारफार. पण हे सगळं अनिमिष नजरेने पहाता पहाता नचिकेत खुळावला..

काॅफी आणि वॅफल्सचा आस्वाद घेता घेता अजून अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर नचिकेत घड्याळ पहात म्हणाला.. अजून गप्पा मारायला आवडेल मला, पण मग तुला घरी जायला जास्त उशीर होईल.
त्याचं हे सांगणही तिला आवडलं.

ती म्हणाली, नचिकेत, आजची भेट छानच झाली. यावेळी पहिल्यांदा अशा भेटीत मी काहीतरी वेगळं बोलले. अगदी सहजपणे. अवघडून नाही, काही मॅनिप्युलेशन नाही, कॅल्क्युलेटीव्ह उत्तरं नाहीत, अंदाज घेत, उत्तराच्या परिणामांवर विचार करत बोलणं नाही.
जस्ट अ फ्रेंडली टाॅक. खरंच खूप बरं वाटलं.

नाहीतर एरवी.. तुमच्या आवडीनिवडी काय, छंद कोणते, नोकरीत प्राॅस्पेक्टस काय, घरी कोणकोण हेच प्रश्न.
अगं हो. पण काय गरज आहे हे पहिल्या भेटीत बोलायची आणि एकमेकांच्या आवडीनिवडीच्या याद्या एक्स्चेंज करण्याची ?
आपल्या आवडीनिवडी, छंद आपल्या वागण्या बोलण्यात डोकावतातच की. अगदी सगळेच आणि प्रत्येक भेटीत असंही नाही. पण हळूहळू उलगडत जातीलच की ते.
पहिल्याच भेटीत ते जुन्या पध्दतीने पहाणं बिहाणं व्हायला पाहिजे किंवा नवीन पध्दतीने मॅच मेकिंग, कंपॅटिबिलीटी चेकींग तपासायला पाहिजे, असं थोडंच आहे ?
खरं तर पहिल्याच भेटीत हे असं विशिष्ट कुठलंतरी उद्दिष्ट न ठेवता सहज, मजेत एकमेकांशी बिन अजेंड्याच्या विषयांवर साधंच काहीतरी बोललं तर तेच बरं नाही का ?

माझा आजचा दिवस थोडा गडबडीत पण मस्त गेला होताच, आता तर ही संध्याकाळही तुझ्या बरोबर छानच गेली.

आता तुलाही मला भेटुन जर बरं वाटलं असेल तर भेटुच परत कधीतरी ठरवून.
हां हां, पण तो आजचा, रादर आत्ताचा विषय नाही.

घरी जा. शांतपणे विचार कर. आवडली असेल आजची भेट तर पुन्हा ठरवून भेटुच.

फक्त निघण्यापुर्वी एक जरा वैयक्तिक प्रश्न विचारतो. चालेल ना..?

रेवाने मान हलवली.

तू तुझ्या पगाराचं काय करतेस…?

रेवाने थोडसं चमकूनच उत्तर दिलं. मी काहीच नाही करत. पुर्वीच्या ऑफिसमध्ये सॅलरी चेकने मिळायची. तो बाबांकडे द्यायचे. आता ह्या ऑफिसमधे तो थेट बँकेतच जमा होतो.
बाबाच बघतात ते सगळं.

हम्म. नचिकेतने मान डोलावली.

रेवाला खरं तर त्या प्रश्नाचा अर्थच कळला नव्हता आणि संदर्भही. आजच्या भेटीच्या तुलनेत एकदमच अनपेक्षित वाक्य होतं ते.
ती विचार करत असताना तोच पुढे म्हणाला.. चला तर मग निघायचं..?

ओक्के. बाऽऽऽय
बाय.

दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

नचिकेत तिचा विचार करत घरी गेला…

आणि रेवा, नचिकेतच्या त्या विचित्र प्रश्नाचा.

(क्रमशः)

पुढील भाग : अर्थाअर्थी -(भाग-०२) - चाय पे चर्चा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरुवात...!!

कथा वाचताना वाटलं की, माझ्या आयुष्यात घडलेलाचं प्रसंग लिहिलायं जणू .. मॅट्रोमोनी site वरचे फोटो आणि माहिती पाहून भेट घेण्याची इच्छा होऊन , नंतर प्रत्यक्ष कॉफी हाऊसमध्ये भेट घेणं... पुढे दिड तास एकमेकांशी गप्पा मारणं .. एकमेकांना पहिल्याच भेटीत पसंत करणं... आता लग्नाला १३ वर्षे झाली.... कथा पुढे वेगळया वळणाची असेल, पण कथेची सुरुवात वाचताना माझ्या आयुष्यात घडलेल्या पहिल्या भेटीचा प्रसंग अगदी डोळ्यांसमोरून तरळून गेला.

कथा आवडतेय. सध्या तर damsel इन डिस्ट्रेस अँड प्रिन्स इन शायनिंग आर्मर प्रकरण वाटतेय, पुढे कुठले वळण घेतेय ते बघायचे.

बाकी डेटिंग साईटवरून फक्त एक कप कॉफीसाठी लोक भेटतात हे माहीत नव्हते. माझा डेटिंग साईटबद्दल भलताच समज झाला होता असे वाटतेय. Lol

छान सुरुवात.
का बरं पगाराचं विचारले असेल ? कळेल पुढच्या भागात. Happy
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

हो, पहिल्याच भेटीत पगाराबद्दल डिटेल्स विचारले. प्रश्नाचा विचार करू नका, कटवा लवकर ह्या उमेदवाराला.
(मात्र कॉफी, वॉफल्सचे बिल त्याने भरले असेल तर दुसरी भेट घ्यायला हरकत नाही. हो, सच्ची दोस्ती खर्च आधा आधा. त्याला एक कॉफी-वॉफल्स देऊन मग नकार द्या! Wink )

कथेचे शीर्षक अर्थाअर्थी म्हणजे अर्थव्यवहार निगडित बहुतेक.
नायिका स्वतःच्या आयुष्यात किती स्वयंपूर्ण आहे ते जोखायचे असेल नायकाला.
किंवा तो CFA असावा Happy

ओह्ह... "सुंबरान गाऊ चला" ऐवजी "टिंडरान गाऊ चला" प्रकार आहे काय! भेटीत पगार विचारणारा तर मिठीत चेकच मागायचा ... नकोच!
उत्सुकता वाढवणारे लेखन आहे. पुढचा भाग लवकर द्या.

रुपाली विशे-पाटील,
छान योगायोग. प्रतिसादाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातली मस्त घटना आम्हाला कळली. Happy
पहिल्या आणि छान प्रतिसादाबद्दल आभार.

च्रप्स, टिंडर हे मॅट्रीमोनीला नक्कीच समर्थ पर्याय नाही. मॅट्रीमोनी सिंगल पर्पज आहे. टिंडर आणि तत्सम अन्य डेटिंग साईट्स आधुनिक आणि मल्टीपर्पज. अर्थात अशा डेटिंग साईट्सचा प्रमुख आणि लोकप्रिय वापर हीच त्यांची सु(कु)प्रसिध्दी आणि ओळख.
इथे मात्र त्याचा उपयोग तुलनेने अलोकप्रिय म्हणजे Serious Relationship या वापरासाठी केला आहे.
मॅट्रीमोनी साईटपेक्षा जरा फ्रेश, आधुनिक (More Updated) प्रोफाईल्स मिळतील यासाठी त्यांनी ट्राय केलाय.

@ बन्या, << प्रत्यक्ष टिंडर वापरलेल्यांना समजेल मी काय म्हणतोय. >>
बरोबर आहे. टिंडर वापरणारे बहुतांशी लोकं एकाच उद्दिष्टासाठी ते वापरतात. त्यामुळे Tinder आणि Oyo हे खरं तर समीकरणच झालं आहे.
मग याच्या रसभरित चर्चा, कहाण्याही साहजिकच वेगाने पसरतात. आणि त्याच उद्देशाचे अजून अजून लोकं मग त्यात सामिल होतात.
पण म्हणूनच बऱ्याचशा फिमेल आयडीजना त्यांच्या प्रोफाईलमधे No Hookups हे विशेषत्वाने नमूद करावसं वाटतं.
पण असं डेस्परेशन, ती हुकअप्सची आशा नसलेले,
Serious Relationship हा उद्देश असलेलेही काही लोकं आहेतच.

वेगळे विचार किंवा 'जैसे जिसकी सोच' म्हणायला लागेल फारात फार.

वावे, mi_anu, मृणाली, आसा प्रतिसादाबद्दल आभार.

@ साधना, तूमचा डेटिंग साईटबद्दलचा समज अजिबात चुकीचा नाही. फक्त 'सब घोडे बाराटक्के' यातले हे दोघं नाहीत.

@ सीमंतिनी <<पहिल्या भेटीत पगार विचारणारा तर मिठीत चेकच मागायचा ... नकोच!>>

आयडिया बुरी नही है. कहानीमे ट्विस्ट लाना पडेगा. Wink

एस, तो CFA नाही. बाकी Happy

सीमंतिनी, च्रप्स, प्रभुदेसाई… पुढचा भाग पोस्ट केलाय.

WaterColour Painting by my Daughter थंबनेल म्हणून ॲड केलंय..

WaterColour Painting by my Daughter थंबनेल म्हणून ॲड केलंय>>>>
फारच सुंदर. देवाची देणगी आहे ही. जपून ठेवा.आणि वाढवा.

सुरेख आहे. कला आहे हातात.

(इथे बर्डसाँग कॅफे मग नंतर मॉकींग बर्ड, नचिकेत रेवाला पब्लिक डिमांड खातिर कधी चायनीज खायला एखादं दि हिडन टायगर किंवा उडपी खायला कुठलंस डोसा किंग इ जागी पण पाठवा की!!)

प्रभुदेसाई आणि सीमंतिनी : _/\_ _/\_

@ सीमंतिनी : पाठवणार, पाठवणार... सजेशन्स देत रहा. स्विकारली जातील.
फिरु दे की त्यांना जरा या दिवसात..