लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !

Submitted by Dr. Satilal Patil on 7 May, 2021 - 13:41

नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे धावताहेत. सिलिगुडी - भूतान रस्त्यावरून बुलेटी पळवत आम्ही जयगावला आलो. जयगाव हे भूतानच्या सीमेवरील भारतातलं शेवटचं गाव. सीमेपलीकडे भुतानचं फुनसोलिंग. अगदी खुर्द-बुद्रुक सारखे ही दोन्ही गावं आंतरराष्ट्रीय घरोबा राखत एकदुसऱ्याचा शेजार एन्जॉय करताहेत. जयगावच्या शेवटच्या गल्लीला लागून असलेली कमान ओलांडली आणि भूतानमध्ये प्रवेश केला. ही कमान म्हणजेच बॉर्डर. अंगावर रोमांच उभं राहीलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोटारसायकल वरून देशाबाहेर पडलोय. भूतानच्या थंडगार हवेने हे रोमांच अधिकच गहिरं केलंय.

पूर्वेकडे हिमालयाच्या कुशीत लपलेल्या या देशाची लोकसंख्या आहे फक्त साडेसात लाख. म्हणजे आपल्याकडील एखाद्या तालुक्याच्या गावाएवढी. हा टिकलीएवढा देश भारत आणि चीनसारख्या महाकाय देशात सॅण्डविच होऊनसुद्धा ताठ मानेने बसलाय. ह्याला कारण आहे भूतानचं भारताशी असलेलं सख्य. मोठ्या भावाने लहान भावाच्या पाठीशी सावलीसारखा असावं अगदी तस्साच भारत १९४९ पासून भुतांनची पाठराखण करतोय.
bhutan-fi.jpg
फुनसोलिंग मधून बाहेत पडलो आणि 'थिम्पू' रोड ला लागलो. थिम्पू हे राजधानीच शहर. लोकसंख्या अवघी १.१५ लाख. रास्ता घाटाघाटातुन सापासारखा वळवळत वरती धावतोय. खाली, दरीच्या दौतीतुन नदीची स्वछ निळी शाई ओसंडतेय. हिमालयातील सूक्ष्म अन्नद्रव्य पोटात घेऊन पिकांचं पोषण करत ती जलजननी वाहतेय. या देशावर वरुणराजा जाम खुश आहे. 'मोगॅम्बो खुश हुआ' असं म्हणत वर्षभरात ३००० मिलीमीटर एवढा तो इथं कोसळतो. हिमालयातील खनिजांनी संपन्न माती, गाळ पावसामुळे दऱ्याखोऱ्यातील शेतात मुक्कामी येऊन बसलाय. त्यामुळे शेतं अजून सुपीक झालेत.

भूतानमध्ये ५५ टक्के लोकसंख्या शेतीव्यसायावर अवलंबून आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या गरज भागवण्यासाठी राबतो. शेतीलामाची निर्यात एवढी इथून होत नाही. पण गेल्या काही वर्षात संत्री आणि बटाट्यांची निर्यात जरा वाढलीय. भात आणि मका ही इथली मुख्य पीकं. याबरोबर थोडाफार भाजीपाला आणि फळपिकंही येतात. भुतानच्या 'जीडीपी'त म्हणजे 'राष्ट्रीय सकल उत्पन्नात' शेतीचा वाटा फक्त १५ टक्के आहे. इतर उत्पन्नाच्या मानाने तो तसा तोडकाच आहे. पण या आर्थिक 'जीडीपी' पेक्षा जास्त महत्व इथं दिलं जातं ते "ग्रॉस नॅशनल हॅपीनेस (जीएनएच)" म्हणजे "राष्ट्रीय सकल आनंदा"ला. डोक्यात प्रश्न चावतोय ना? थांबा, जरा इस्कटून सांगतो.

भूतान हा जगातला सर्वात आनंदी देशांपैकी एक . 'आनंद हे माणसाचं मूलभूत ध्येय आहे' हा मूलमंत्र 'युनो' म्हणजे संयुक्त राष्ट्रांसंघाने भूतान कडूनच घेतलाय. २०११ मध्ये भूतानचे तात्कालिक पंतप्रधान 'जिगमा थीनले' यांनी युनोचे सेक्रेटरी 'बाम कि मुन' ह्यांच्याबरोबर एक उच्चस्तरीय मिटिंग केली. ह्या भेटीदरम्यान भूतानची ही आनंदी आयडियाची कल्पना जगभरात राबवण्याची गळ घातली. मग ह्या आनंदी कल्पनेने आनंदलेल्या युनोने २० मार्च रोजी 'जागतिक आनंद दिवस' साजरा केला जाईल असं जाहीर करून टाकलं.
F1.large_.jpg
भूतान मधील ही "राष्ट्रीय सकल आनंद योजना" आहे तरी काय? आणि तीची अंमलबजावणी कशी करतात? यश कसं मोजतात? आपल्याकडे सकाळी-सकाळी डबा घेऊन नदीकाठी जाणाऱ्यां पासून मुक्तीची योजना जशी मोजतात तसेच हिचं मोजमाप करत असतील का? असे बरेच प्रश्न डोक्यात वळवळु लागले. मग उत्तरं मिळवण्यासाठी विचारपूस सुरु केली. त्याच असं आहे, की सरकारने ह्या योजनेचे चार मुखस्तंभ बनवलेत.

१. शाश्वत आणि न्याय्य सामाजिक, आर्थिक विकास,
२. पर्यावरण संवर्धन ,
३. सांस्कृतिक जतण व प्रसार आणि
४. सुशासन.
ह्या चार स्तंभांना परत नऊ कसोटींवर घासून पाहिलं जात.

यातील पहिल्या कसोटीत देशातील लोकांचं मानसिक स्वस्थ कसं आहे हे बघितलं जात. भूतानी लोकांचं 'मन चंगा' असल्याने, 'कटौती' त आनंदाची गंगा सदैव वाहतेय. नंतर नंबर लागतो तो शारीरिक स्वास्थ्याचा. लोकांचं शरीरस्वास्थ कसं आहे? ते निरोगी आणि तंदुरुस्त आहेत ना? हे पाहिलं जात. भूतानमध्ये जनतेचा वैद्यकीय खर्च सरकार करतं. म्हणजे आजारी पडलं की सरकारी पाहुणा व्हायचं. दारूं-दवाखान्याचा सारा खर्च शासनाकडे. म्हणून डॉक्टरांशी, दवाखान्याशी साटंलोटं करून लोकांना अव्वाच्या सव्वा औषधें विकणाऱ्या मेडिकल वाल्यांची सद्दी संपली. तसंच हॉस्पिटलं सरकारी असल्यामुळे ऍडमिट झालेल्या बकऱ्याच्या मापानुसार त्याला कापायचा किंवा शिक्षणादरम्यान मेडिकल कॉलेजला ऍडमिशन साठी टेबला मागुन दिलेल्या भरगच्च डोनेशन वसुलीचा डॉक्टरी डाव ही फसला. या मेडिकल माफिया पासून इथल्या लोकांची सुटका झाली म्हणायची.

तिसरा मुद्दा, लोकं त्यांच्या वेळेचा उपयोग कसा करतात हा आहे. लोकांचा वेळ हा इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडिया यावर वाया जातो की खेळ, छंद, मित्र, नातेवाईक, समाज आणि कामात जातो हे पाहिलं जातं. त्यानंतरचे मुद्दे आहेत, शिक्षण, सांस्कृतिक विविधता, आनंदी वृत्ती, सुशासन, सामाजिक चैतन्य, पर्यावरण, लोकांचं जीवनमान आणि त्याचा दर्जा.

या मापदंडानुसार उदाहरण द्यायचं झाल्यास, समजा एखाद्या माणसाकडे चांगल्या पगाराची नोकरी किंवा व्यवसाय आहे. त्यातून तो चांगले पैसेही कमावतोय. पण कुटुंब, समाज, नातेवाईक, छंद यासाठी त्याच्याकडे वेळ नाहीये. त्याला कमी गुण. तो या भूतानी परीक्षेत नापास. याच्या उलट एखाद्याकडे तुलनेने कमी पगाराची नोकरी किंवा व्यवसाय आहे. पण तो मित्र, नातेवाईक, कुटुंबीय ह्यांना वेळ देतो, छंद जोपासतो, समाजात मिसळतो, लहानसहान गोष्टीतही खुश असतो, भूतानी शासकीय चाचणीत त्याला जास्त मार्क, तो जास्त आनंदी. हा पप्पू पास झालाच म्हणून समजा !. शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार येथील लोकांच्या आचरणातील गौतम बुद्धांच्या 'मध्यम मार्गाच्या' शिकवणीमुळे लोकं जास्त आनंदी आहेत.

या आनंदी योजनेला, पंचवार्षिक योजनेबरोबर संपूर्ण देशात राबवलं जातं. वरील मापदंडानुसार सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह सर्वे केला जातो. लोकं जर एखादया ठिकाणी कमी पडत असतील तर त्यांची दाखल घेऊन सरकार पावलं उचलत. जनतेला आनंदी ठेवन्यासाठी झटणाऱ्या सरकारला सलाम !

अश्या या आनंदमयी वातावरणात बुलेट चालवत आम्ही निघालो. नकळत गाणं गुणगुणू लागलो... 'आनंदाचे डोही.. आनंदे तरंग... !'


या लेखमालेतील इतर भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:

लेख-१: माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर! https://www.maayboli.com/node/78689
लेख-२: . माझी मुशाफिरी!.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती! https://www.maayboli.com/node/78696
लेख-३: . माझी मुशाफिरी!..... https://www.maayboli.com/node/78744
लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !..... https://www.maayboli.com/node/78839

…… लेखक हे ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. भुतानच्या 'सकल आनंद योजना ' बद्दल वाचलेले आहे. तुम्हाला आलेले अजून अनुभव वाचायला आवडतील.

छान.