३. माझी मुशाफिरी!.... आसामच्या चहाचे चाहते !

Submitted by Dr. Satilal Patil on 30 April, 2021 - 11:51

(ड्रीमर अँड डूअर या पुस्तकात समावेश करू न शकलेल्या पर्यावरण आणी शेती संबंधी अनुभवा वर आधारीत लेखमाला- भाग: ३)
Presentation1_0_0.jpg
भर्रर्र s s असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या काचेवर आदळत होता. आजूबाजूला जिकडे नजर जाईल तिकडे जंगलच जंगल होतं. काळ्याशार चकचकीत मक्खन रस्त्यावर आमच्या बुलेटी माधुरी सारख्या "धक धक" गाणं गात आसाम मधून धावत होत्या. सिंगापूरच्या ओढीने निघालेले बायकर्स आता लवकरच भारताची सीमा ओलांडणार होते. जंगल संपलं आणि समोर मानवनिर्मित हिरवं जंगल दिसू लागलं. हो, नजर जाईल तिथवर चहाचे मळे. कडक थंडीत एखाद्याने हिरव्यागार नक्षीची गोधडी पांघरावी तशी ही हिरवी पानगोधडी ओडून धरतीमाता पहुडली होती. एखाद्या मुलाच्या केसाचा न्हाव्याने बारीक कट मारावा तसे काटेकोर मोजमापातले चहाचे मळे, नजर पोहोचेल तिथवर दुतर्फा पसरले होते. डोळ्यावर हिरवा स्क्रीनसेव्हर चिकटवल्याचा फील येत होता.

रस्त्याच्या कडेला चहाची टपरी दिसली. पी s पी s असा हॉर्न वाजवत बाकीच्या बायकर्स ना "चहा पियू या रे ! असा इशारा केला आणि पाचही धडधडणाऱ्या माधुरी रस्त्याच्या कडेला थंडावल्या. वा ! काय योग आहे? चहाच्या माळ्याच्या बांधावर आठ मराठी आसामी या आसामी चहाचा अस्मानी आनंद घेऊ लागले. कडक चहाच्या माउस ने स्वादग्रंधींना स्पर्श केल्याकेल्या डोळ्यावरचा हिरवा स्क्रीनसेव्हर जाऊन, ईशान्य भारतातली चहाची स्टोरी फ्लॅशबॅक मध्ये डोळ्यासमोर तरळून गेली.

चहापानाच्या उगमाच्या बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात. ४७३७ वर्षांपूर्वी शेनॉन हा चिनी राजा म्हणे गरम पाणी पीत होता. अचानक आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीने जवळच्या झाडाची काही पाने त्याच्या पेल्यात येऊन पडली. 'जिसमे मिलाये वैसा' या नियमाला जागत पाण्याचा रंग बदलला. त्याची चव घेऊन पाहिल्यावर राजा या रंगीत पाण्याच्या प्रेमातच पडला. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार राजा औषधी गुणधर्म शोधण्यासाठी वेगवेगळ्या झाडाझुडुपांची चव घ्यायचा. त्यात चुकून विषारी वनस्पती चावल्या जायच्या. दारुडे जसा उतारा घेतात ना, तसाच हा राजा उतारा म्हणून चहाची पाने चघळायचा. ह्यासारख्या अजूनही काही कथा प्रसिद्ध आहेत.

स्टोऱ्या काहीही असोत, पण चहाला खरी रंगात आली ती गोऱ्या साहेबांची घारी नजर चहावर पडली तेव्हा. प्राचीन काळी जपान आणि चीनमधून चहाची ब्रिटन आणि पोर्तुगीज मध्ये निर्यात केली जायची. नंतर मात्र जपानने चहाची निर्यात बंद केली आणि चीनच्या ताब्यात हे तरतरीत मार्केट आलं. एखादया सुग्रण गृहिणीने आपल्या सुग्रास स्वैयंपाकाचं राज लपवून ठेवावं, तसं चहाच्या निर्यातीतून मलिदा खाणारा चीन चहापिकाचं गुपित बाहेर पडू देत नव्हता. जभरातुन चोरीमारी करून, लुटीचा माल गोळा करण्यात पटाईत गोऱ्या साहेबाने, हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी जंग जंग पछाडलं. शेवटी गोरा चोर, या नकट्या मोरावर शिरजोर ठरला. व्यापाऱ्याचं सोंग घेऊन स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ चीनमध्ये घुसला आणि चहाची रोपं पळवली. मग ही रोपं भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. जसं मधुचंद्राच्या जोडप्यांना मानवतं तस्संच या चिनी रोपांना दार्जिलिंगच वातावरण मानवलं आणि ती इथं बहरली. अगदी चीनच्या चहापेक्षाही भारी चव आणि सुगंध त्याला आला. आंतरराष्ट्रीय बाजारात तिला "शॅम्पेन ऑफ टी" असा बहुमान मिळाला.

ह्याच काळात ब्रिटिशांद्वारे आसाममध्ये हे पीक घेण्याचे प्रयोग सुरु होते. पण चीनचा नाजूक वाण आसामच्या गरम वातावरणात तग धरत नव्हता. शेवटी इथल्या जंगलात आढळणाऱ्या स्थानिक जंगली जाती पासून बेणं तयार करून चहापिक वाढवायचा प्रयोग यशस्वी झाला. आसामच्या भूमिपुत्रागत ती इथं फुलली-फळली. १८२३ मध्ये आसमाधील चहा पहिल्यांदा लंडनच्या बाजारात विक्रीसाठी पाठवला गेला. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी पिऊन तरारलेलं चहाच पीक देशाच्या इतर भागातही पसरू लागलं. अगदी दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकापर्यंत ते पसरले.

भारतात चहापानाचे संदर्भ १२ व्या शतकापासून सापडतात. डच प्रवाशी 'जान हुगेन वॅन लिशोन' च्या नोंदीनुसार आसामी चहाची पाने भाजीपाला म्हणून, लसूण आणि तेलाबरोबर खाण्यासाठी आणि पेय म्हणून वापरली जायची. इंग्रज आणि डच रेकॉर्ड नुसार भारतात चहाचा वापर पोट शुद्धीसाठी आणि पाचक म्हणून केला जायचा.

१९४७ मध्ये भारतमातेच्या मानगुटीवर बसलेलं गोरं भूत उतरलं आणि चहाच्या या इस्टेटी कायद्याने भारतात आल्या. सरकारने साहेबाच्या या शाही पिकाला सामान्य शेतीचा दर्जा देऊन कृषी खात्यात समावेश न करता त्यासाठी "टी अँड कॉफी बोर्ड" ची स्थापना करून वेगळं बिऱ्हाड मांडलं. स्वातंत्र्यानंतर बरीच दशकं चहापिक हे नैसर्गिकरित्याच वाढतं आणि त्याची शेती करणं सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात नाही असा (गैर) समज होता. पण भारतीय शेतकऱ्यानं, ही साहेबी शेती यशस्वीरीत्या विकसित करून दाखवली. आसाममध्ये लाखो लहानसहान चहामळे आहेत. येथील "स्मॉल टी ग्रोवर असोसिएशन" मोठमोठ्या चहा इस्टेटींच्या खांद्याला खांदा लाऊन चहा पिकवताहेत. चहापिक हे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. एकट्या आसाम मध्ये ६५ लाख मजूर चहाच्या मळ्यात राबताहेत.

काळाच्या ओघात आघाडीवर असलेली ही चहाची शेती खऱ्या अर्थाने वेळेआधी आहे. नाही समजलं ना ? सांगतो ! घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या कर्मचाऱ्यासारखा आसाममधला सूर्य संध्याकाळी पाचलाच मावळतो. पण भारतात इतरत्र तो साडेसहा-सात पर्यंत ओव्हर टाइम करतो. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी ही वेळ अडचणीची होती. हा तासा-दोनतासांचा फरक भरून काढण्यासाठी ब्रिटिशांनी एक नामी उक्ती शोधून काढली. भारतीय प्रमाण वेळेला बाजूला ठेऊन त्यांनी "टी गार्डन टाइम" सुरु केला. त्यालाच "बागान टाइम" असंही म्हणतात. संपूर्ण भारत जेव्हा चार वाजलेले असतात तेव्हा आसामच्या चहामळ्यात पाच वाजतात. भारतीय वेळेच्या तुलनेत तो एक तास पुढे आहे. आहे का नाही गम्मत !

गोरा साहेब गेला पण चहा इस्टेटीच्या मॅनेजरचा साहेबी रोब अजूनही कायम आहे. कडक साहेबी पोशाख, डोक्यावर गोल टोपी ठेऊन मॅनेजर साहेब आपल्या जीपने गोऱ्या साहेबासारखे ऐटीत फिरत असतात. ह्या मॅनेजर लोकांसाठी भलामोठा क्लब असतो. सुट्टीच्या दिवशी क्लब मध्ये इंग्रजी पार्ट्या झोडणं, पोलो खेळणं अशी त्यांची साहेबी लाईफस्टाईल असते.

२०१४ मध्ये ग्रीनपीस संस्थेनं चहाच्या पेल्यातलं वादळ उठवलं होतं. भारतातल्या ४९ चहा ब्रॅण्डच्या नमुन्यांची तपासणी केली असता ६७ टक्के नमुन्यात डीडीटी आणि काहींमध्ये मोनोक्रोटोफॉस हे रासायनिक कीटकनाशक सापडले. १९८९ मध्ये बंदी घातलेलं डीडीटी चहा पावडरीत येण्याची जादू कशी साधली? ह्याचं स्पष्टीकरण देतांना 'टी बोर्ड' आणि चहा निर्मात्या कंपन्यांची त्रेधा तिरपीट उडाली. पण बॅन झालेल्या कीटकनाशकांना जैविक चा मुलामा देऊन विकणाऱ्यांच्या कृपेनं ही किमया साधली होती हे फारच कमी लोकांना ठाऊक होतं.

........ टपरीतून आसामी चहाचा कप मिळाला. वाफाळलेला चहा ओठांजवळ नेला. ह्यात डीडीटी चे रेणू वळवळत तर नाही ना ह्या शंकेने एक नजर टाकली. मग गेले उडत असं म्हणत, एका फुंकरीने डीडीटी आणि शंका उडवून लावत, कप ओठाला लावला.


या लेखमालेतील इतर भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:

लेख-१: माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर! https://www.maayboli.com/node/78689
लेख-२: . माझी मुशाफिरी!.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती! https://www.maayboli.com/node/78696
लेख-३: . माझी मुशाफिरी!..... https://www.maayboli.com/node/78744
लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !..... https://www.maayboli.com/node/78839

…… लेखक हे ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

sneha1, तेजो, सामो, वेका, जिज्ञासा, रात्रीचे चांदणे, मानव पृथ्वीकर आणि Srd,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद Happy

शरदजी आणि संदीपजी ,
ग्रुपने किंवा एकटे जाऊन स्थानिक लोकात बिलकुल मिसळता येत. भाषा येत नसली तरी स्थानिक लोक खूप मदत करतात. मी सिंगापूर ते पुणे असा १०००० किमीचा प्रवास एकट्याने केलाय. छोट्याछोट्या खेड्यापाड्यात, भाषा येत नसतांना लोकांच्या घरी मुक्काम केलाय. छान अनुभव येतात. तुम्ही नक्की जा. काही माहिती हवी असल्यास बिनधास्त पणे मला संपर्क करा.

हो, अतुल.
चुकून दोनदा पोस्ट झालाय. डिलीट करायचा प्रयत्न केला पण जमले नाही:)