अनुवादित पुस्तकं

Submitted by पाचपाटील on 20 April, 2021 - 10:21

वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे, आणि ही यादी परिपूर्ण आहे, असा काही दावा नाहीये..
ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी नुसार
मोलाची भर पडू शकेल किंवा ह्यातल्या काही नावांची
निर्दयपणे काटछाटही होऊ शकेल..!

हा उद्योग करण्याचा हेतू असा की 'मायबोली'वर अनुवादित पुस्तकांच्या संदर्भातला काही वेगळा धागा मला सापडला नाही, हा एक..

शिवाय दुसरं म्हणजे, पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌
पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा
आपल्याला झेपतेय की नाही वगैरे.. कारण त्यापूर्वी एकदा असंच चुकून दोस्तोव्हस्कीला इंग्रजीतून हात घालून, होता नव्हता तेवढा आत्मविश्वास खच्ची करून घेतलेला होता, हे एक बॅकमाईंडला होतंच...

तर मग तडजोड म्हणून अनुवादित पुस्तकांकडं सरकत गेलो..

पण दुर्दैवानं त्याच सुमारास झालं असं की..
चोर-पोलीस टाईपच्या कादंबऱ्या ज्यातले नायक हमखास
तैलबुद्धीचे वकील, पत्रकार वगैरे असतात आणि
एफबीआय-सीआयएवाले एकजात बिनकामाचे,
फुकटपगारखाऊ वगैरे असतात..
आणि जगभरातील बिचाऱ्या भाबड्या मानवजातीला, अटळ विनाशापासून चुटकीसरशी वाचवण्याची जबाबदारी,
लेखकाने शेवटी एखाद्या अज्ञात जागी राहणाऱ्या नायकांवरच नेऊन टाकलेली असते वगैरे..
हे कमी म्हणून की काय, पाच-सहाशे वर्षांपूर्वींची मेलेली मढी उकरत, उदाहरणार्थ रोम वगैरे शहरांतली भुयारे धुंडाळत
कुठलीतरी गूढ कोडी सोडवत बसणाऱ्या..

तसेच भरल्या पोटी जगभर उंडारत उंडारत हरप्रकारची मजा मारणाऱ्या (ह्याच्यामध्ये आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, पण..) आणि पुन्हा तो सगळा सेक्सुअल मसाला 'आत्मशोधा'च्या नावाखाली दणकावून छापणाऱ्या वगैरे..

असल्या इंग्रजीतल्या कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून, तो
मराठीत आणून फेकायची जबरदस्त लाट आली होती,
तिच्या तडाख्यात मी आपसूकच सापडलो होतो..!

पण नंतर मग असंच कधीतरी गटांगळ्या खात खात किनाऱ्याला लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला
'गि-हाईक' बनवण्यात आलेलं आहे, त्याचंही दु:ख समजा एक वेळ सहन केलं तरीही, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये
फुकटचा वेळ जाऊन पैशांचीही बरबादी झालेली, हे त्याहून वाईट..

आणि म्हणून विचार केला की, त्यावेळी माझा जो प्रॉब्लेम होता, सेम तशाच प्रॉब्लेममधून कुणी जात असेल, आणि
शोधाशोध करत असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याकडच्या
शहाण्या लोकांनी, जगभरातल्या काही दर्जेदार पुस्तकांचे
माय-मराठीमध्ये सुंदर अनुवाद करून ठेवलेले आहेत...
ज्यातलं एखादं वाचून समजा एखाद्या वाचकाला, काहीतरी
सणसणीत वाचल्याचा थरथरता आनंद वैयक्तिक पातळीवर मिळाला तर, चांगलंच आहे की.. म्हणून ही यादी;

वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड- गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु.केशव सद्रे)

सीन्स फ्रॉम प्रोव्हिन्शियल लाईफ- जे. एम कोएत्झी
(अनु. 'गावातील जीवनदृश्ये',अवधूत डोंगरे)

मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर
(अनु. जयंत धुपकर)

द सेन्स ऑफ ॲन एंडींग- ज्यूलियन बार्न्स
(अनु. विलास साळुंखे)

कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा-
गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु. रंगनाथ पठारे)

व्हेन वुई वेअर ऑरफन्स- काझुऒ इशिगुरो
(अनु.सुश्रुत कुलकर्णी)

रिमेन्स ऑफ द डे- काझुऒ इशिगुरो
(अनु. आश्लेषा गोरे)

क्रॉक ऑफ गोल्ड —जेम्स स्टीफन्स
(अनु.- 'सोन्याचे मडके'—जी ए कुलकर्णी)

द लॉर्ड ऑफ फ्लाईज-- विल्यम गोल्डींग
(अनु. जी ए कुलकर्णी)

शेविंग ऑफ शॅगपट- जॉर्ज मेरेडीथ
(अनु. 'एक अरबी कहाणी', जी ए कुलकर्णी)

द लाईट इन द फॉरेस्ट- कॉनराड रिक्टर
(अनु. 'रानातील प्रकाश, जी ए कुलकर्णी)

'गाव', 'शिवार'- कॉनराड रिक्टर (अनु. जी ए कुलकर्णी)

द फांऊटनहेड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)
ॲटलास श्रग्ड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)

द सेकंड सेक्स- सिमॉन द बोव्हुआर
(अनु. करुणा गोखले)

शब्द- जॉं पॉल सार्त्र (अनु. वा.द.दिवेकर)

द चिप्स आर डाऊन - जॉं पॉल सार्त्र
(अनु. 'तेथे चल राणी', वसंत कानेटकर)

मेटॅमॉर्फोसिस-- फ्रांझ काफ्का
(अनु. 'पिसुक', जयंत कुलकर्णी)

द ट्रायल- फ्रांझ काफ्का
(अनु. 'महाभियोग', जयंत कुलकर्णी)

निवडक काफ्का- अनु./संपादन नीती बडवे

ॲनिमल फार्म- जॉर्ज ऑरवेल (अनु. तुषार बापट)
नाईंटीन एटी फोर- जॉर्ज ऑरवेल (अनु. अशोक पाध्ये)

डार्कनेस ॲट नून-ऑर्थर कोसलर
(अनु.- 'भरदुपारच्या अंधारात'- वसंतराव नारगोलकर)

द ग्रेप्स ऑफ रॅथ- जॉन स्टाईनबेक
(अनु. मिलिंद चंपानेरकर)

मून इज डाऊन-- जॉन स्टाईनबेक
(अनु. गणेश जोशी)

अ टेल ऑफ टू सिटीज- चार्ल्स डिकन्स
(अनु. सुशील परभृत)

ब्लाईंडनेस-- जुझे सारामागु
(अनु. भास्कर भोळे)

माय नेम इज रेड-- ओरहान पामुक
(अनु. गणेश विसपुते)

द टाईम्स ऑफ असासीन्स - हेन्री मिलर
(अनु-'विनाशवेळा'- महेश एलकुंचवार)

द बुक थीफ - मार्कस झुसॅक
(अनु.'पुस्तकचोर', विनीता कुलकर्णी)

मॅन्स सर्च फॉर मिनींग- डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल
(अनु.-'अर्थाच्या शोधात', डॉ. विजया बापट)

शांताराम- ग्रेगरी रॉबर्ट्स (अनु. अपर्णा वेलणकर)
सोल मांउटेन- गाओ झिंगजियान (अनु. मधु साबणे)
द प्रॉफेट- खलील जिब्रान (अनु. जे के जाधव)

रिल्केची दहा पत्रे - अनिल कुसुरकर

२१ व्या शतकासाठी २१ धडे- युवाल नोआ हरारी
(अनु. सुनील तांबे)

अ न्यू अर्थ - एकहार्ट टॉल
(अनु. 'एक अवनी नवी', नीलिमा जोशी)

द कॅचर इन द राय- जे डी सॅलिंजर (अनु. संजय जोशी)

कॉन्वेक्स्ट ऑफ हॅपिनेस- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'सुखी माणसाचा सदरा')

अनपॉप्युलर एस्सेज- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'नाही लोकप्रिय तरीही')

रीयुनियन- फ्रेड उल्मान (अनु. मुग्धा कर्णिक)

आफ्टर दि क्वेक- हारुकी मुराकामी
(अनु. निशिकांत ठकार) कथासंग्रह

लस्ट फॉर लाईफ- आयर्विंग स्टोन (अनु. माधवी पुरंदरे)

रावण आणि एडी, दि एक्स्ट्राज- किरण नगरकर
(अनु. रेखा सबनीस)

ककल्ड- किरण नगरकर
(अनु.- 'प्रतिस्पर्धी', रेखा सबनीस)

द ब्लाइंड लेडी'ज डिसेंडंट्स-अनीस सलीम
('आंधळ्या बाईचे वंशज', अनु. श्यामल चितळे)

व्हॅनिटी बाग- अनीस सलीम
(अनु. योगिनी वेंगुर्लेकर)

वॉल्डन- हेन्री डेव्हिड थोरो (अनु.जयंत कुलकर्णी)

द व्हाईट फॅन्ग- जॅक लंडन ('लांडगा', अनु. अनंत सामंत)

रसेलचे निवडक लेख- भा. ज. कविमंडन

द स्टोरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी- विल ड्युरांट
(अनु. 'पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी' अनु. साने गुरुजी)

डॉन क्विझोट(भाग १,२)- सरव्हॅंटीस
(अनु. दा. न. शिखरे)

आणि खालच्या मूळच्या रशियन कादंबऱ्या, ज्या दीडशे वर्षे मुरलेल्या व्होडक्यासारख्या जालीम असल्यामुळे,
हळूहळू बेताबेतानं, निवांतपणे एकेक घोट रिचवत रिचवत वाचण्यासाठी आहेत... उदाहरणार्थ..

ॲना कॅरेनिना- लिओ टॉलस्टॉय
(अनु. कवली ललितागौरी)

ब्रदर्स करमाझोव- दोस्तोव्हस्की
(अनु.- करमाझफ बंधु', खंड १+२, भाऊ धर्माधिकारी ')

द गॅंबलर - दोस्तोव्हस्की ('जुगारी'-अनु. जयंत दिक्षित)

नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड - दोस्तोव्हस्की
(अनु.अनिल आंबीकर 'भूमिगताची टिपणे')

क्राइम ॲंड पनिशमेंट- दोस्तोव्हस्की
('गुन्हा आणि प्रायश्चित्त', अनु.- काशिनाथ कोनकर)

द हाऊस ऑफ डेड्स- दोस्तोव्हस्की(अनु. 'मेलेल्यांची गढी',अनु.- विश्राम गुप्ते)

डॉ. झिवागो- बोरिस पास्तरनाक (अनु. आशा कर्दळे)

ॲंड क्वाएट फ्लोज द डॉन- मिखाईल शोलोखोव्ह
('डॉन संथ वाहतेच आहे',भाग१,२- अनु. नरेंद्र सिंदकर)

आणि शेवटी जाताजाता, हिंदीतून मराठीच्या अंगणात आलेली उदाहरणादाखल दोन :

हाक आणि प्रतिसाद- निदा फाझली
(अनु. इब्राहिम अफगाण)
राग दरबारी— श्रीलाल शुक्ल
(अनु. श्रीपाद जोशी)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही यादी दिल्याबद्दल धन्यवाद. सध्याच्या नकारात्मक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी चांगलं वाचायला घेतलं पाहिजे.

चांगली यादी.

हेन्री डेंकन - फिजीशियन्स
अनुवाद(रुपांतर): द्वंद्व - अनंत मनोहर

चांगली यादी!

यात मुलांसाठी काही पुस्तकांची नावे देत आहे.

ज्युल व्हर्नच्या कादंबर्‍या - भा. रा. भागवतांचे अनुवाद, मस्त शैली आहे. काही काही तर मला मूळ पुस्तकांपेक्षाही जास्त आवडल्या.
Hans Anderson च्या परीकथा - सुमती पायगावकर , सुरेख अनुवाद आणि चित्रे!
जंगलराणी एल्सा, Born Free चा अनुवाद - लेखिका आठवत नाही.

यादीसाठी धन्यवाद! यापैकी तुम्ही आधी अनुवाद आणि मग मूळ पुस्तक वाचलं असेल तर त्याबद्दलही लिहा.

छान यादी! जमल्यास प्रकाशन पण द्याल का अनुवादित पुस्तकाचं (ही मेहता पब्लिशिंग ची नसणार बहुतेक!)
मी कदाचित इंग्रजीतली मूळ वाचेन. रशियन मात्र मराठीत वाचण्याचा मोह होतोय.
काही भर -
जुनं आहे पण छान आहे The yearling (Marjorie Kinnan Rolling - पाडस अनु. राम पटवर्धन
Roots (Alex Haley) - रूट्स हेच नाव आहे बहुतेक लाल रंगाची झाडाची जाड मूळं असं दाखवणारं चित्र आहे मुखपृष्ठावर. मला अनुवादकांचं नाव आठवत नाहीये पण.

छान यादी .. धन्यवाद !
माझ्या मते काही पुस्तकं मूळ भाषेत वाचण्याचा आनंद वेगळाच आहे..
उदा. Atlas Shrugged आणि Fountainhead चा मराठी अनुवाद मला अगदीच काहीतरी वाटला. अर्थात मी आधी इंग्लिश पुस्तकं वाचले आणि नंतर अनुवादित बघितले..

पहिल्या की दुसऱ्या महायुध्दा दरम्यान एका जर्मन सैनिकाच्या पलायनाच्या कथेचा मराठी अनुवाद वाचण्यात आला होता. पुस्तकाचे नाव कोणाला माहित असेल तर सांगा.

या वर्षी मायबोलीवर एकही प्रतिसाद लिहायचा नाही असे ठरवले होते. पाचपाटील तुम्ही मला माझा पण मोडायला भाग पाडले.

कुठे होतात इतकी वर्षे? अहो इथे लिहिलेली पुस्तके रत्ने आहेत रत्ने. ही रत्ने माझ्या मराठीत अनुवादीत झाली आहेत हेच माहिती नव्हते.
कॉलेजात असताना मिरजेत एक बायसिंगर लायब्ररीत मिळतील ती पुस्तके हेच विश्व होते. मराठी लेखकांच्या पुस्तकात या व इतर अनेक विदेशी लेखकांच्या कृतींचे उल्लेख असत. पुण्यात कधी गेलो तर तेव्हा इंटरनॅशनल बूक स्टोरमध्ये तासनतास घालवत असे. तिथे ही रत्ने दिसत. सार्त्रेचे बिईंग अँड नथिंगनेस, काम्युचे स्ट्रेंजर, काफ्काचे मेटॅमॉर्फॉसिस, मार्केझचे हंड्रेड इयर्स, दस्तोवस्कीचे क्राइम अँड पनिशमेंट. पण त्या पुस्तकांवर पेन्सिलिने लिहिलेल्या किमती देण्याची ऐपत नव्हती. मग बाहेर लकडी पुलावर जुन्या पुस्तकांच्या ढिगार्‍यात काही पुस्तके मिळत. तिथे घेतलेले एक जीर्ण शीर्ण ब्रदर्स कारमॉझॉव्ह कित्येक वर्षे माझ्याकडे होते.
पण ही अशी जुनी पुस्तके मिळाली तरी ती वाचण्याची क्षमता नव्हती, तितके इंग्रजी समजतच नसे. फार फार तर गॉडफादर समजण्याची कुवत होती. कॅचर इन द राय वाचताना ओल्ड फोएबे (ओल्ड फिबी) असे तो त्याच्या धाकट्या बहिणीला म्हणतो तेव्हा तिचे नावही नीट वाचता येत नसे ना ओल्ड हे लाडिकपणे म्हणतो ते ही.

१९८४चा अशोक पाध्यांनी केलेला अनुवाद वगैरे माणके बायसिंगर लायव्रीत होती. ती वाचल्यावर अरे हे साहित्याचे जग काय झळाळून टाकणार्‍या प्रतिभावंतांनी भरलेले आहे हे उमजत असे. जणू माणसे अरभाट मधले दशांश चिन्हच. पण ती झळाळणारी रत्ने मात्र दूर कुठेतरी गुहेत माझ्या परिघाच्या लांब होती. खूप लांब.

मराठी वाचन सुद्धा कुपमंडुक होते. हे फार नंतर समजले. कारण पुस्तकांच्या माहितीचा मुख्य स्त्रोत वडिल ज्यांचे वाचन हे मुख्यत्वे सत्यकथा/माणूस यातल्या व त्या आसपासच्या (६० ते ९०) च्या दशकातल्या कादंबर्‍या हेच होते. जरी जीए, गोखले, पानवलकर, प्रभुदेसाई ते दळवी, पेंडसे, भाऊ पाध्ये, तेंडुलकर, माडगुळकर, पाटील असा मोठा पट वाचता आला. भारत सासणे, राजन खान हे देखील वाचनात आले. पण ९०/२०००च्या दशकात उभी राहत असलेली नवी लेखक पिढी मात्र राहून गेली. त्याबद्दल तुमच्या दुसर्‍या धाग्यावर लिहितो.

तर या उपरोल्लेखित पुस्तकांकडे वळू. मराठीत ही हाताशी आली नाहीत. मग थोडे इंग्रजी सुधारू लागले. उच्च महाविद्यालयात भारतभरची मुले होती. एक मल्लू मुलगा रुममेट आणि जीवाभावाचा दोस्त झाला. त्याच्याकडे पिंक फ्लॉइड या सांगितिक कवींची ओळख झाली हे एक माझे सुदैव. पण त्याचबरोबर एक लूत भरलेल्या कुत्र्याचे चित्र असलेले पुस्तक दिसले. ते नेटाने वाचले - ते होते कोएट्झीचे डिस्ग्रेस. त्याने एक वेगळेच दालन उघडले. मग इंटर्न्सशिप करताना फोर्ट मध्ये जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांकडे पुस्तके घेतली, ती वाचूही लागलो. थोडे पैसे खिश्यात मिळू लागले होते. हैद्राबादला नोकरी लागली आणि रविवारी कोटी या भागात जुन्या पुस्तकांच्या रस्त्यावरील बाजारात पुस्तके घेऊ लागलो. विक्रेतेही ओळखू लागले, पुस्तके बाजूल ठेवू लागले.

पण या सगळ्यात या पुस्तकांची ओळख मराठीत थोडी आधी झाली असती तर काय बहार आली असती ही बोच कायमच राहिली. क्राइममधला घोडा उताणा पडण्याचा प्रसंग वाचून जरीलातला तसाच प्रसंग आठवला. कोएट्झी सगळा वाचला. काम्यु वाचला. पण याचबरोबरीने प्रवासवर्णने पण किती विविध असतात ते समजले. इथे आंतरजालावर चिन्मय दामल्यांसारख्या सजग वाचकांनी अजून नव्या पुस्तकांची ओळख करून दिली.

इथे वरदा म्हणून एक जण लिहित असत. त्यांनी इथे नमूद केलेली मराठी पुस्तके वाचून समजले की मायमराठीत सुद्धा मोठा साठा होता. प्रयत्न केले असते ते तर ग्रंथपालांच्या मागे लागून ती पुस्तके मिळवताही आली असते. पण अशी पुस्तके आहेत हेच माहिती नव्हते.

आता इथे हे सर्व का लिहिले तर मेहताच्या फॅक्टरी बाहेरही इतक्या उत्तमोत्तम पुस्तकांचे अनुवाद होत आहेत ही अत्यानंदाची बाब आहे. ही पुस्तके सर्व वाचनप्रेमींनी वाचावीच या लायकीची आहेत. यांनी उघडणारी कवाडे तुम्हाला अद्भुतरम्य जगात घेउन जातील.

पुन्हा एकदा, पाचपाटील तुमचे आभार!

पाचपाटील, धन्यवाद
यादीतील बरीच पुस्तके माहीतही नव्हती.
प्रतिसादातील माहिती सुद्धा मस्त.
टवणे सर, आपला प्रतिसाद प्रेरक
अजून किती काय वाचायचय त्याची यादी करायला हवी.

जॅक लंडन ह्यांच्या कथांचे मराठीत उत्तम अनुवाद झालेले आहेत.
५५-६० वर्षांपूर्वी मौज ने मुद्रित केलेले आणि परचुरे प्रकाशन ने प्रसिद्ध केलेले हे अनुवाद म्हणजे मराठी भाषेचे एक लेणे आहे. मला वाटते पुरुषोत्तम आत्माराम चित्रे ( बडोदेवाले, अभिरुचीवाले आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांचे वडील) ह्यांनी हे अनुवाद केले आहेत. सर्व खंडांचे अनुवादक एकच होते किंवा कसे ते आता आठवत नाही. पण जबरदस्त आहेत.
त्यांच्या आणखी एक दोन पुस्तकांचे मराठी अनुवाद झालेले जालावर दिसत आहेत.

अनुवादित पुस्तकाचा विषय असेल तर शांताबाई शेळके यांनी अनुवाद केलेलं "चारचौघी".
नंतर छोटी English versions पण आली , Little Women, चे पण शांताबाईंचे शब्द , तोडच नाही. सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांचा अनुवाद ही छान आहे... पण त्यांचे original Eng पुस्तकांची भाषा पण हलकीफुलकी आहे.

<'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं',>
<आपल्याला 'गि-हाईक' बनवण्यात आलेलं आहे, त्याचंही दु:ख समजा एक वेळ सहन केलं तरीही, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये फुकटचा वेळ जाऊन पैशांचीही बरबादी झालेली, >

नेमकं लिहिलं आहे. हे लक्षात येतं तेव्हा वाचक म्हणून ग्रोथ सुरू होऊ शकते. अर्थात त्यासाठी वाचक म्हणूनही रूथलेस व्हावं लागेल. कारण बहुतेक लेखक प्रकाशक रूथलेस होऊ शकत नाहीत.

टवणे सर,
आवर्जून आणि एवढ्या भरभरून दिलेल्या प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.. Happy _/\_
कॉलेजात असताना मिरजेत एक बायसिंगर लायब्ररीत मिळतील ती पुस्तके हेच विश्व होते. मराठी लेखकांच्या पुस्तकात या व इतर अनेक विदेशी लेखकांच्या कृतींचे उल्लेख असत. पुण्यात कधी गेलो तर तेव्हा इंटरनॅशनल बूक स्टोरमध्ये तासनतास घालवत असे. तिथे ही रत्ने दिसत. सार्त्रेचे बिईंग अँड नथिंगनेस, काम्युचे स्ट्रेंजर, काफ्काचे मेटॅमॉर्फॉसिस, मार्केझचे हंड्रेड इयर्स, दस्तोवस्कीचे क्राइम अँड पनिशमेंट.... पण त्या पुस्तकांवर पेन्सिलिने लिहिलेल्या किमती देण्याची ऐपत नव्हती. मग बाहेर लकडी पुलावर जुन्या पुस्तकांच्या ढिगार्‍यात काही पुस्तके मिळत. तिथे घेतलेले एक जीर्ण शीर्ण ब्रदर्स कारमॉझॉव्ह कित्येक वर्षे माझ्याकडे होते. >>>
हे सगळं जसंच्या तसं मला रिलेट होतंय.. फक्त मिरजेच्या ऐवजी कराडातली 'टाऊन हॉल'ची जुनी लायब्ररी.. कराडला कॉलेजात असताना तिथं जवळपास दिवसाआड राऊंड व्हायचे, नंतर मग 'पुणे नगर वाचन मंदिर'... ह्या दोन्ही लायब्रऱ्यांमुळे फारच उत्तम,नवी-जुनी, दुर्मिळ पुस्तकं/ त्यांचे अनुवाद वाचायला मिळाले...

पण त्याचबरोबर एक लूत भरलेल्या कुत्र्याचे चित्र असलेले पुस्तक दिसले. ते नेटाने वाचले - ते होते कोएट्झीचे डिस्ग्रेस. त्याने एक वेगळेच दालन उघडले.>>
डिसग्रेसही केव्हाच आलीय मराठीत... आणि कोएत्झीच्या 'बॉयहूड', 'यूथ' आणि 'समरटाईम' अशा तीन कादंबऱ्यांचा मिळून, 'गावातील जीवनदृश्यं' असा एक फारच उत्कृष्ट अनुवाद अवधूत डोंगरेंनी केलाय गेल्याच वर्षी.. आठ दहा दिवसांची निश्चिंती होईल असा चांगला सणसणीत जाडजूड ठोकळा आहे...!!!
मार्केझही अगदी आत्ता आत्ता यायला लागलाय मराठीत..

पण त्या पुस्तकांवर पेन्सिलिने लिहिलेल्या किमती देण्याची ऐपत नव्हती. मग बाहेर लकडी पुलावर जुन्या पुस्तकांच्या ढिगार्‍यात काही पुस्तके मिळत>>> ++११
लकडी पुलावर 'क्राईम ॲंड पनिशमेंट'ची जुनी प्रत फक्त पन्नास रूपयांना मिळाली होती.. त्यातला रॉसकॉल्निकोव्ह अजूनही पिच्छा सोडायला तयार नाही..
तसेच काफ्काच्या, रसेलच्या निवडक लेखांचे अनुवादही बाजीराव रोडवरच्या फूटपाथवर असेच नगण्य किंमतीत मिळाले होते, तेव्हा फारच गुदगुल्या झाल्या होत्या.. Happy

पुन्हा एकदा धन्यवाद Happy

शांताबाईंचं चौघीजणी ना?
मी अजून एकदोन धाग्यांवर लिहिलं आहे पूर्वी या पुस्तकाबद्दल. पर्ल बकच्या 'द गुड अर्थ' चा भारती पांडे यांनी केलेला अनुवाद, 'काळी'

चिन्मय_१
माझ्या मते काही पुस्तकं मूळ भाषेत वाचण्याचा आनंद वेगळाच आहे..>> ++११

'फाऊंटनहेड'चे दोन अनुवाद आहेत.. एक मोहनतारा पाटील यांनी केलाय 'शिखर' ह्या नावाने.. तो खास नाही...
पण मुग्धा कर्णिकांचे अनुवाद चांगले वाटलेले मला.. Happy

जिज्ञासा,
काही भर -
जुनं आहे पण छान आहे The yearling (Marjorie Kinnan Rolling - पाडस अनु. राम पटवर्धन
Roots (Alex Haley) - रूट्स
>>
रिकमंडेशनसाठी आभारी आहे Happy
अक्षरधारा मध्ये ही दोन्ही पुस्तकं पाहिल्यासारखं आठवतंय.. आता पुढच्या वेळी जाईन तेव्हा आवर्जून बघेन.. Happy

आणि ह्यातलं क्वचितच एखादं पुस्तकं 'मेहतांचं' असेल..
ते ज्या प्रकारची पुस्तकं छापतायत सध्या, ती काही वाचवत नाहीत... Sad :
कॉंटीनेंटल, डायमंड, कॉफी हाऊस पब्लिकेशन, प्रफुल्लता प्रकाशन, Eka, मधुश्री, रोहन, मनोविकास, राजहंस, मंजुळ पब्लिशिंग हाऊस.. अशा प्रकाशनांची आहेत ह्यातली बरीचशी..

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.. Happy _/\_

अनुवादित पुस्तकांच्या यादीत नाव घ्यायलाच हवे ते नॅशनल बूक ट्रस्टचे.

त्यांनी इतर भारतीय भाषांतील अनेक पुस्तकांचे मराठी (तसेच इतर भारतीय भाषांत) अनुवाद प्रकाशित केले आहेत. वर लेखात उल्लेख केलेले राग दरबारी हे श्रीलाल शुक्लांचे पुस्तक नॅशनल बूक ट्रस्टनेच आणलेले आहे. त्याचबरोबर शिवराम कारंथ वगैरे दिग्गजांचीही पुस्तके आहेत.
मल्याळम, तमिळ, तेलुगु, ओडिया, बंगाली वगैरे भाषातील निवडक लघुकथांचे मराठी अनुवाद संग्रहही प्रकाशित केले होते.
इथे मराठी कॅटलॉग मिळेल. https://www.nbtindia.gov.in/writereaddata/attachment/thursday-march-25-2...
पान ३७ पासून पुढे १५-२० पाने बघा - त्यात मराठीत अनुवाद केलेल्या इतर भारतीय भाषातील कथा तसेच कादंबर्‍यांची यादी आहे.

काळी आई - पर्ल बक (वर उल्लेख झाला आहे).

पुलंनी केलेले एका कोळियाने हे ओल्ड मॅन अँड सी चे रुपांतर.
तसेच मी वाचले नाहिये मात्र मी_अनु यांनी एनिथिंग कॅन हॅपन या पुस्तकाच्या पुलंनी केलेल्या अनुवादाबद्दल लिहिले होते.

मंटोच्या कथा सर्वप्रथम श्री ज जोशी (की श्रीपाद जोशी?) यांनी मराठीत अनुवाद केलेल्या वाचल्या होत्या. पुढे बहुतेक मंटोच्या साहित्याचे बरेच अनुवाद मराठीत आले.

रात्र वैर्‍याची आहे हे जी एंनी केलेले अजून एक भाषांतर (आय सर्वाइव्ड हिटलर्स अवन या पुस्तकाचे).
पैलपाखरे (?) मध्ये जीएंनी ५-६ दीर्घकथांचे भाषांतर केले आहे. त्यात डी एच लॉरेन्सची मॅन व्हू डाइडचे भाषांतर आहे.

रशियन कथांच्या अनुवादाची पुस्तके बरीच होती. आता नावे/अनुवादक आठवत नाहीत. "एका शेतकर्‍याने चार जनरलांना खाऊ घातले" वगैरे अनुवादीत शीर्षके आठवतात. ही एका शेतकर्‍याने खाऊ घातले कथा अभिजात आहे.

भीष्म साहनींची तमस.
यशवंत चित्ताल (कानडी) यांची शिकार ही कादंबरी. खूप आवडली होती.

भैरप्पांच्या काही कादंबर्‍या आवडल्या होत्या. आता पुन्हा वाचल्या तर आवडतील का नाही माहिती नाही. पर्व वाचल्यापासून भैरप्पांचे पुस्तक हातात घेण्याची इच्छा संपली.

मेहता प्रकाशनाने भैरप्पांच्या पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणलेत ते सगळे मला आवडलेत. उमा कुलकर्णी.
उमा कुलकर्णींनीच पूर्णचंद्र तेजस्वींच्या 'कर्वालो' कादंबरीचा अनुवाद केलाय तो मात्र मला आवडला नाही. अनिल अवचटांनी कुठेतरी तेजस्वींबद्दल भरभरून लिहिलेलं वाचलं त्यामुळे मी कर्वालो विकत घेतलं. पण नाही आवडलं. दुसरं एखादं बघायला हवं.मूळ कन्नड वाचण्याइतकं अजून कन्नड वाचता येत नाही.

पुलं नी अनेक पुस्तकांचे अनुवाद, रूपांतरे केली आहेत. रवींद्रनाथ ठाकूर यांचे पोर वय या मराठी नावाने अनुवादित झालेले एक छान पुस्तक त्यांनी अनुवादित केले आहे. गेल्या शतकात बंगालीतून मराठीत बऱ्याच प्रमाणात अनुवाद झालेले आहेत. संपूर्ण बँकिंग चंद्र, संपूर्ण शरच्चंद्र मराठीत आले आहेत. यात मामा वरेरकर आघाडीवर. काका कालेलकर यांनी गीतांजलीचा अप्रतिम अनुवाद केला आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अशोक शहाणे यांचे कार्यही भरीव आहे.

शिवराम कारंथ, यू आर अनंतमूर्ती, पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या अनुवादित कथा वाचलेल्या आहेत... फार पूर्वी 'सकाळ'च्या दिवाळी अंकात यायच्या..
'पैलपाखरे' संग्रही आहे..
'वैऱ्याची एक रात्र' आणि 'काळी', 'चारचौघी' पहायला पाहिजे आता..

भीष्म साहनींची तमस ... अमृता प्रीतमच्या रसीदी टिकट, रिकामा कॅनव्हास.. !

शिवाय पुलंनी केलेला मनोहर माळगावकरांच्या 'कान्होजी आंग्रे'चा अनुवाद पण चांगलाय..

भैरप्पांच्या पुस्तकांनी एक मोठा काळ व्यापला होता ... 'काठ' च्या तर बरेच दिवस प्रेमात होतो.. डॉ. अमृता आणि सोमशेखर.. ही लव्ह स्टोरी त्या वेळी खूपच आवडलेली.. Happy
आणि उमा कुलकर्णींनी चांगली कन्नड पुस्तकं मराठीत आणून मोठं काम केलंय..

लिंक्स साठी धन्यवाद Happy

वैऱ्याची एक रात्र' आणि 'काळी', 'चारचौघी' पहायला पाहिजे आता.. >>
चारचौघी शोधाल तर मिळणार नाही, शांता शेळकेंच 'चौघीजणी' शोधा Happy वर बहुतेक चुकून चारचौघी लिहिलं गेलंय.

काठ - चाळल होत, घ्यावं की नाही चक्रात राहून गेलं.

यात मुलांसाठी काही पुस्तकांची नावे देत आहे.

ज्युल व्हर्नच्या कादंबर्‍या - भा. रा. भागवतांचे अनुवाद, मस्त शैली आहे. काही काही तर मला मूळ पुस्तकांपेक्षाही जास्त आवडल्या.
Hans Anderson च्या परीकथा - सुमती पायगावकर , सुरेख अनुवाद आणि चित्रे!
जंगलराणी एल्सा, Born Free चा अनुवाद - लेखिका आठवत नाही.
Submitted by चीकू on 20 April, 2021>>

ही पुस्तके कुठे मिळतील?

Pages