वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे, आणि ही यादी परिपूर्ण आहे, असा काही दावा नाहीये..
ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी नुसार
मोलाची भर पडू शकेल किंवा ह्यातल्या काही नावांची
निर्दयपणे काटछाटही होऊ शकेल..!
हा उद्योग करण्याचा हेतू असा की 'मायबोली'वर अनुवादित पुस्तकांच्या संदर्भातला काही वेगळा धागा मला सापडला नाही, हा एक..
शिवाय दुसरं म्हणजे, पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..
पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा
आपल्याला झेपतेय की नाही वगैरे.. कारण त्यापूर्वी एकदा असंच चुकून दोस्तोव्हस्कीला इंग्रजीतून हात घालून, होता नव्हता तेवढा आत्मविश्वास खच्ची करून घेतलेला होता, हे एक बॅकमाईंडला होतंच...
तर मग तडजोड म्हणून अनुवादित पुस्तकांकडं सरकत गेलो..
पण दुर्दैवानं त्याच सुमारास झालं असं की..
चोर-पोलीस टाईपच्या कादंबऱ्या ज्यातले नायक हमखास
तैलबुद्धीचे वकील, पत्रकार वगैरे असतात आणि
एफबीआय-सीआयएवाले एकजात बिनकामाचे,
फुकटपगारखाऊ वगैरे असतात..
आणि जगभरातील बिचाऱ्या भाबड्या मानवजातीला, अटळ विनाशापासून चुटकीसरशी वाचवण्याची जबाबदारी,
लेखकाने शेवटी एखाद्या अज्ञात जागी राहणाऱ्या नायकांवरच नेऊन टाकलेली असते वगैरे..
हे कमी म्हणून की काय, पाच-सहाशे वर्षांपूर्वींची मेलेली मढी उकरत, उदाहरणार्थ रोम वगैरे शहरांतली भुयारे धुंडाळत
कुठलीतरी गूढ कोडी सोडवत बसणाऱ्या..
तसेच भरल्या पोटी जगभर उंडारत उंडारत हरप्रकारची मजा मारणाऱ्या (ह्याच्यामध्ये आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, पण..) आणि पुन्हा तो सगळा सेक्सुअल मसाला 'आत्मशोधा'च्या नावाखाली दणकावून छापणाऱ्या वगैरे..
असल्या इंग्रजीतल्या कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून, तो
मराठीत आणून फेकायची जबरदस्त लाट आली होती,
तिच्या तडाख्यात मी आपसूकच सापडलो होतो..!
पण नंतर मग असंच कधीतरी गटांगळ्या खात खात किनाऱ्याला लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला
'गि-हाईक' बनवण्यात आलेलं आहे, त्याचंही दु:ख समजा एक वेळ सहन केलं तरीही, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये
फुकटचा वेळ जाऊन पैशांचीही बरबादी झालेली, हे त्याहून वाईट..
आणि म्हणून विचार केला की, त्यावेळी माझा जो प्रॉब्लेम होता, सेम तशाच प्रॉब्लेममधून कुणी जात असेल, आणि
शोधाशोध करत असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याकडच्या
शहाण्या लोकांनी, जगभरातल्या काही दर्जेदार पुस्तकांचे
माय-मराठीमध्ये सुंदर अनुवाद करून ठेवलेले आहेत...
ज्यातलं एखादं वाचून समजा एखाद्या वाचकाला, काहीतरी
सणसणीत वाचल्याचा थरथरता आनंद वैयक्तिक पातळीवर मिळाला तर, चांगलंच आहे की.. म्हणून ही यादी;
वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड- गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु.केशव सद्रे)
सीन्स फ्रॉम प्रोव्हिन्शियल लाईफ- जे. एम कोएत्झी
(अनु. 'गावातील जीवनदृश्ये',अवधूत डोंगरे)
मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर
(अनु. जयंत धुपकर)
द सेन्स ऑफ ॲन एंडींग- ज्यूलियन बार्न्स
(अनु. विलास साळुंखे)
कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा-
गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु. रंगनाथ पठारे)
व्हेन वुई वेअर ऑरफन्स- काझुऒ इशिगुरो
(अनु.सुश्रुत कुलकर्णी)
रिमेन्स ऑफ द डे- काझुऒ इशिगुरो
(अनु. आश्लेषा गोरे)
क्रॉक ऑफ गोल्ड —जेम्स स्टीफन्स
(अनु.- 'सोन्याचे मडके'—जी ए कुलकर्णी)
द लॉर्ड ऑफ फ्लाईज-- विल्यम गोल्डींग
(अनु. जी ए कुलकर्णी)
शेविंग ऑफ शॅगपट- जॉर्ज मेरेडीथ
(अनु. 'एक अरबी कहाणी', जी ए कुलकर्णी)
द लाईट इन द फॉरेस्ट- कॉनराड रिक्टर
(अनु. 'रानातील प्रकाश, जी ए कुलकर्णी)
'गाव', 'शिवार'- कॉनराड रिक्टर (अनु. जी ए कुलकर्णी)
द फांऊटनहेड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)
ॲटलास श्रग्ड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)
द सेकंड सेक्स- सिमॉन द बोव्हुआर
(अनु. करुणा गोखले)
शब्द- जॉं पॉल सार्त्र (अनु. वा.द.दिवेकर)
द चिप्स आर डाऊन - जॉं पॉल सार्त्र
(अनु. 'तेथे चल राणी', वसंत कानेटकर)
मेटॅमॉर्फोसिस-- फ्रांझ काफ्का
(अनु. 'पिसुक', जयंत कुलकर्णी)
द ट्रायल- फ्रांझ काफ्का
(अनु. 'महाभियोग', जयंत कुलकर्णी)
निवडक काफ्का- अनु./संपादन नीती बडवे
ॲनिमल फार्म- जॉर्ज ऑरवेल (अनु. तुषार बापट)
नाईंटीन एटी फोर- जॉर्ज ऑरवेल (अनु. अशोक पाध्ये)
डार्कनेस ॲट नून-ऑर्थर कोसलर
(अनु.- 'भरदुपारच्या अंधारात'- वसंतराव नारगोलकर)
द ग्रेप्स ऑफ रॅथ- जॉन स्टाईनबेक
(अनु. मिलिंद चंपानेरकर)
मून इज डाऊन-- जॉन स्टाईनबेक
(अनु. गणेश जोशी)
अ टेल ऑफ टू सिटीज- चार्ल्स डिकन्स
(अनु. सुशील परभृत)
ब्लाईंडनेस-- जुझे सारामागु
(अनु. भास्कर भोळे)
माय नेम इज रेड-- ओरहान पामुक
(अनु. गणेश विसपुते)
द टाईम्स ऑफ असासीन्स - हेन्री मिलर
(अनु-'विनाशवेळा'- महेश एलकुंचवार)
द बुक थीफ - मार्कस झुसॅक
(अनु.'पुस्तकचोर', विनीता कुलकर्णी)
मॅन्स सर्च फॉर मिनींग- डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल
(अनु.-'अर्थाच्या शोधात', डॉ. विजया बापट)
शांताराम- ग्रेगरी रॉबर्ट्स (अनु. अपर्णा वेलणकर)
सोल मांउटेन- गाओ झिंगजियान (अनु. मधु साबणे)
द प्रॉफेट- खलील जिब्रान (अनु. जे के जाधव)
रिल्केची दहा पत्रे - अनिल कुसुरकर
२१ व्या शतकासाठी २१ धडे- युवाल नोआ हरारी
(अनु. सुनील तांबे)
अ न्यू अर्थ - एकहार्ट टॉल
(अनु. 'एक अवनी नवी', नीलिमा जोशी)
द कॅचर इन द राय- जे डी सॅलिंजर (अनु. संजय जोशी)
कॉन्वेक्स्ट ऑफ हॅपिनेस- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'सुखी माणसाचा सदरा')
अनपॉप्युलर एस्सेज- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'नाही लोकप्रिय तरीही')
रीयुनियन- फ्रेड उल्मान (अनु. मुग्धा कर्णिक)
आफ्टर दि क्वेक- हारुकी मुराकामी
(अनु. निशिकांत ठकार) कथासंग्रह
लस्ट फॉर लाईफ- आयर्विंग स्टोन (अनु. माधवी पुरंदरे)
रावण आणि एडी, दि एक्स्ट्राज- किरण नगरकर
(अनु. रेखा सबनीस)
ककल्ड- किरण नगरकर
(अनु.- 'प्रतिस्पर्धी', रेखा सबनीस)
द ब्लाइंड लेडी'ज डिसेंडंट्स-अनीस सलीम
('आंधळ्या बाईचे वंशज', अनु. श्यामल चितळे)
व्हॅनिटी बाग- अनीस सलीम
(अनु. योगिनी वेंगुर्लेकर)
वॉल्डन- हेन्री डेव्हिड थोरो (अनु.जयंत कुलकर्णी)
द व्हाईट फॅन्ग- जॅक लंडन ('लांडगा', अनु. अनंत सामंत)
रसेलचे निवडक लेख- भा. ज. कविमंडन
द स्टोरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी- विल ड्युरांट
(अनु. 'पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी' अनु. साने गुरुजी)
डॉन क्विझोट(भाग १,२)- सरव्हॅंटीस
(अनु. दा. न. शिखरे)
आणि खालच्या मूळच्या रशियन कादंबऱ्या, ज्या दीडशे वर्षे मुरलेल्या व्होडक्यासारख्या जालीम असल्यामुळे,
हळूहळू बेताबेतानं, निवांतपणे एकेक घोट रिचवत रिचवत वाचण्यासाठी आहेत... उदाहरणार्थ..
ॲना कॅरेनिना- लिओ टॉलस्टॉय
(अनु. कवली ललितागौरी)
ब्रदर्स करमाझोव- दोस्तोव्हस्की
(अनु.- करमाझफ बंधु', खंड १+२, भाऊ धर्माधिकारी ')
द गॅंबलर - दोस्तोव्हस्की ('जुगारी'-अनु. जयंत दिक्षित)
नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड - दोस्तोव्हस्की
(अनु.अनिल आंबीकर 'भूमिगताची टिपणे')
क्राइम ॲंड पनिशमेंट- दोस्तोव्हस्की
('गुन्हा आणि प्रायश्चित्त', अनु.- काशिनाथ कोनकर)
द हाऊस ऑफ डेड्स- दोस्तोव्हस्की(अनु. 'मेलेल्यांची गढी',अनु.- विश्राम गुप्ते)
डॉ. झिवागो- बोरिस पास्तरनाक (अनु. आशा कर्दळे)
ॲंड क्वाएट फ्लोज द डॉन- मिखाईल शोलोखोव्ह
('डॉन संथ वाहतेच आहे',भाग१,२- अनु. नरेंद्र सिंदकर)
आणि शेवटी जाताजाता, हिंदीतून मराठीच्या अंगणात आलेली उदाहरणादाखल दोन :
हाक आणि प्रतिसाद- निदा फाझली
(अनु. इब्राहिम अफगाण)
राग दरबारी— श्रीलाल शुक्ल
(अनु. श्रीपाद जोशी)
not without my daughter.. by
not without my daughter.. by Betty Mahmoody.. मराठी अनुवादित पुस्तक वाचलयं.(मेहता पब्लिकेशन)
खूपच छान आहे.
मी वाचलं आहे.
मी वाचलं आहे.
कधीकधी गंमत वाटते.नॉट विदाऊट डॉटर, व्हेल्ड किंगडम सारखी पुस्तकं एकीकडे आणि स्वप्नाळू रोमँटिक (अमका रुबाबदार अरेबिक प्रिन्स अमेरिकन बाईच्या प्रेमात पडला, ते सुखाने राहिले, बाईला सर्व रिस्ट्रीक्षन्स या राजकुमारासाठी(आणि इतर श्रीमंती साठी ) मनातून आवडायला लागले वगैरे अमेरिकन बायकांनीच लिहिलेल्या रोमँटिक कथा(कधी वाटतं की सत्य या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठंतरी असेल)
Pages