सिझेरियन जन्मकुंडली

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 April, 2021 - 00:26

खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. पण तेव्हा प्रसूती ही नैसर्गिक होत असे.फार तर एखादी सुईण अडलेले बाळंतपण सुकर करण्याचा प्रयत्न करीत असे.पण सिझेरियन हा वैद्यकीय हस्तक्षेप नव्हता. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता ज्योतिषांनी मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. गर्भाची पूर्ण वाढ होउन मूल जन्माला येण्याचा सर्वसाधारण काळ हा 9 महिने 9 दिवस मानला जातो. त्या अलिकडे वा पलिकडे देखील नैसर्गिक प्रसूती होत असे. बाळंतपणानंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो अशी कल्पना समाजात होती. कारण बाळंतपणात होणारे स्त्रीच्या मृत्यूचे प्रमाण ही काही नगण्य नव्हते. वैद्यकीय संशोधन जसे जसे प्रगत झाले तसे बाळंतपण सुरक्षित होण्याचे प्रमाण वाढले तसेच सुरक्षिततेच्या मर्यादेत राहून मूल जन्माला कधी घालायचे हे ठरवणे सी सेक तंत्राने वैद्यकशास्त्राच्या हातात आले. एखाद्या उपद्रवी माणसाचे वर्तन समाजात त्रासदायक ठरते त्यावेळी कुठल्या मुहुर्तावर हा जन्माला आला कोण जाणे? असे वाकप्रचार आपण ऐकत असतो. याचा दुसरा अर्थ एखाद्या सुमुहुर्तावर जन्माला आला असता तर चांगला माणुस झाला असता अशी काहीशी मान्यता वा समज आपण बाळगून असतो.जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का? असा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्याला आपण जर समजा उलट प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल? जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.तुमच्या जन्मवेळी तुमच्या जन्मस्थळावरून दिसलेली ग्रह-राशींची स्थिती दाखवणारा सांकेतिक पद्धतीचा आराखडा म्हणजे तुमची जन्मकुंडली. तर अशा या जन्मवेळेवर फलज्योतिषाचा डोलारा अवलंबून आहे. तीच जर डॉक्टरांच्या हातात आली तर सुमुहूर्तावर मूल जन्माला घालून त्याचे भविष्य आपण बदलू शकतो का? आपल्या वाहनाचा पसंतीचा नंबर मिळण्यासाठी सुद्धा आरटीओला पैसे द्यावे लागतात. तेव्हा विशिष्ट मर्यादेत तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमाचा नंबर मिळू शकतो. मग इथे तर आख्या आयुष्याचा प्रश्न आहे. मागे एका ज्योतिषाला मी हा सिझेरियन जन्मकूंडलीचा प्रश्न विचारला तेव्हा अशी कुंडली ही नैसर्गिक नसल्याने तिथे भविष्य बरोबर येत नाही असे त्यांनी सांगितले. आता तर बर्‍याच प्रसूती या आधुनिक तंत्रानेच होतात. सन 2008 मधे आम्ही हुषार मुलांच्या कुंडल्या व मतिमंद मुलांच्या कुंडल्या गोळा करुन ज्योतिषांना यातले शक्यतेच्या नियमापेक्षा किती जास्त सांगता येते हा प्रयोग केला होता. जयंत नारळीकर, नरेंद्र दाभोलकर, पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे प्रा.सुधाकर कुंटे व मी फलज्योतिष चिकित्सक या नात्याने प्रकल्पाचा समन्वयक. मुलांच्या आईवडिलांनी दिलेल्या जन्मवेळेनुसारच मी कुंडल्या तयार केल्या होत्या. त्यांनी लिहून दिलेली जन्मवेळ खरी कि खोटी हे तपासण्याचे काही साधन नाही. दवाखान्यात जन्म किती व घरी जन्म किती ही आकडेवारी पण उपलब्ध नव्हती.
खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, जत्रच्या टायमाला, ऐतवार व्हता तव्हा, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" सवसांच्या टायमाला अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते. आमच्या शाळेत पोराला घालताना गुरुजी मुलाला डोक्यावरुन डाव्या हाताने उजवा कान पकडायला सांगायचे. हात लागला कि शाळेत प्रवेश मिळायचा. मग त्याची जन्मतारीख 1 जून अमूकतमूक. वर्गातल्या आम्ही दोन तीन अपवाद सोडले तर सगळ्यांच्या जन्मतारखा त्याच. साध गणित असायच. 6 वर्षे पुर्ण झाली की मुलाचा हात कानाला लागतो या परंपरागत ज्ञानाच्या टेस्टवर त्याची जन्मतारीख ठरायची. 6 वर्षे पुर्ण झाली कि शाळेत प्रवेश मिळायचा.जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारखेच्या नोंदी सुद्धा जिथ विश्वासार्ह मिळणे अवघड तिथे ज्योतिषाचा मूलभूत आधार व हत्यार असलेल्या जन्मकुंडलीची विश्वासार्हता काय असणार आहे? मग अशावेळी अशा जन्मकुंडलीच्या आधारे भविष्य सांगणे याला काही अर्थ आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो >>> माझे आडनाव आधी ढेरपोटे लेडीकिलर होते. पण ते माबोजोशींनी बदलायला सांगितले म्हणून मारितो केले. आता भटजी म्हणाले की लेडीकिलरचे मारीतो होत नाही म्हणून घायाळकर केले आहे. तर आता पुराणिकबाई हसायला लागल्या आहेत.
मी कुणाकडे जाऊन आडनाव निश्चित करू ?

नारी घायाळकर काय वाईट आहे? आपल्या एक आठवडा एक दिवस या माबो वयावरुन कुंडली काढणारे अनुभवी भविष्यवेत्ते लोक असतीलच इथे Lol Lol

तेच तर म्हणायचेय. डिजीटल वर अ‍ॅक्युरेट असते. त्यावरून अचूक भविष्य काढा.

ज्योतिषांनी पण डिजीटल उपकरणे बनवून नेमके वय काढायला काय हरकत आहे ? किंवा उपकरणे म्हणजे विज्ञानाचा आसरा नको असेल तर नाडीवरून वय किंवा हस्तसामुद्रिकावरून वय का काढता येऊ नये ? गणित मांडून होळीच्या आदल्या सांजेला असं उत्तर आलं की त्या दिवशीचे नक्षत्र मांडून नक्षत्र बलदण्याच्या वेळा निश्चित करून भविष्य स्थिर असण्याच्या वेळेत कुठे कुठे मुले जन्माला आली हे गणित मांडून पहावे. त्यात अक्षांश रेखांश अचूक आले तर स्थिर नक्षत्रकालातले भविष्य अक्षांश रेखांशाच्या सहाय्याने सांगावे. नाहीतर नक्षत्र बदलण्याच्या वेळातली बालके तपासावीत. अशा रितीने हळूहळू अचूक जन्मवेळ निश्चित करता येईल.

जर हॉस्पिटलमधे डॉक्टरांना सिझेरीअन जन्माची वेळ, आणि अजून किती काळाने जन्म व्हायला हवा होता ती वेळ जर नोंदवणे कंपल्सरी केले तर भविष्य सांगणे सोपे जाईल. बाळंतपणाच्या ओटीत एक ज्योतिषी देखील तैनात असावा.

एकदम करेक्ट आहे, नारी! ओ.टी. मध्येच काय, मी तर म्हणते सोनोग्राफी करतानाच ज्योतिषी पाहिजे. म्हणजे दिसल्याच हाताच्या रेषा तर जे काही भाग्य असेल त्याला संतुलन करणारी जन्मवेळ लगेच काढता येईल. Happy

ज्योतिष वर्तुळात एक किस्सा सांगितला जातो. एक ज्योतिषी मुलगा होईल कि मुलगी सांगण्याबाबत विख्यात होते. लोक त्यांच्याकडे जात तेव्हा ते मुलगा होईल असे तोंडी सांगत पण लिहुन ठेवताना मात्र मुलगी लिहित. समजा मुलगी झाल्यावर कुणी नंतर आलाच जाब विचारायला तर त्याला सांगायच बघतो रेकॉर्ड मग दाखवायच अहो मुलगी सांगितल होत हे बघा. तुमच्या ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असेल. Lol Lol

सन 2008 मधे आम्ही हुषार मुलांच्या कुंडल्या व मतिमंद मुलांच्या कुंडल्या गोळा करुन ज्योतिषांना यातले शक्यतेच्या नियमापेक्षा किती जास्त सांगता येते हा प्रयोग केला होता. जयंत नारळीकर, नरेंद्र दाभोलकर, पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचे प्रा.सुधाकर कुंटे व मी फलज्योतिष चिकित्सक या नात्याने प्रकल्पाचा समन्वयक. मुलांच्या आईवडिलांनी दिलेल्या जन्मवेळेनुसारच मी कुंडल्या तयार केल्या होत्या. >>
या प्रयोगाचे निष्कर्ष काय निघाले तेही लिहिलंत तर बरं होईल.

अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो.>>

हे नक्की कुठे आणि कसे सिद्ध झाले आहे, अचूकपणाचे निकष नेमके काय आहेत, हेही लिहिल्यास बरे होईल.

जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
>>

फलज्योतिष हे शास्त्र नाही असं अनेक अभ्यासकांचं मत वेळोवेळी वाचनात आलं आहे. फलज्योतिषाला शास्त्र म्हणून मान्यता कधी आणि कुणी दिली आहे हेही लिहिलंत तर बरं होईल.

दुसर्‍या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून
- कधीही कसलीच ठाम भूमिका न घेणार्‍या लोकांचं कौतुक वाटावं की कीव करावी याबद्दल मला ठाम भूमिका घेता येत नाहीए.

या प्रयोगाचे निष्कर्ष काय निघाले तेही लिहिलंत तर बरं होईल. >>>>
फलज्योतिष चाचणी समन्वय
फलज्योतिष चाचणीचा अहवाल
फलज्योतिष हे शास्त्र नाही असं अनेक अभ्यासकांचं मत वेळोवेळी वाचनात आलं आहे. फलज्योतिषाला शास्त्र म्हणून मान्यता कधी आणि कुणी दिली आहे हेही लिहिलंत तर बरं होईल.>>>>>> ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद
अधिक व विस्तृत माहिती साठी वरील लिंक्स वाचाव्यात.
तसे फलज्योतिष चिकित्सा मंडळ हा माझा ब्लॉग ही वाचावा.

प्रश्नोत्तरांतून सुसंवाद लिंकवर स्पष्ट लिहिलेलं दिसलं की फलज्योतिषाला शास्त्र म्हणता येत नाही.
प्रयोगाचे निष्कर्ष तुम्हीच थोडक्यात इथे लिहिलेत तर जास्त बरं होईल. पण एकंदरीत ते निष्कर्ष फलज्योतिषाला विज्ञान ठरवण्याच्या विरुद्धच आहेत ना?

मतिमंद व हुषार मुलांच्या कुंडल्यां मधून ज्याला काहीही ज्योतिष कळत नाही अशा माणसाने जरी एखादी कूंडली उचलली तरी ती मतिमंद मुलाची वा हुषार मुलाची निघण्याची शक्यता पन्नास टक्के. इथे प्रयोगात ज्योतिषांची हे ओळखण्याचे सरासरी प्रमाण फक्त 46 टक्के आले. ज्योतिष हे विज्ञानाच्या निकषांमधे बसत नाही हे उघडच आहे.
पण या ज्योतिषाच काय करायचं? मधे मी काही मुद्दे मांडले आहेत.

चंद्रकले नुसार समुद्रात भरती ओहोटी येते. मानवी शरीरही सत्तर टक्के पाण्याने बनले आहे. त्याप्रमाणे चांद्रकलेचा मानवी शारीरिक v मानसिक परिणाम होत असावा

ज्योतिष हे विज्ञानाच्या निकषांमधे बसत नाही हे उघडच आहे.
>> मग कृपया वरच्या लेखातला 'शास्त्र' हा शब्द काढता का?

अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो.>>

हे नक्की कुठे आणि कसे सिद्ध झाले आहे, अचूकपणाचे निकष नेमके काय आहेत, हेही लिहिल्यास बरे होईल. >>
याबद्दल वाचायला आवडेल.

मग कृपया वरच्या लेखातला 'शास्त्र' हा शब्द काढता का? >>>>>>>>> ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ५ - फलज्योतिष शास्त्र , प्रवाद ,समजुती मधून उधृत
प्राचीन काळापासून आपल्याकडे शास्त्र हा शब्द फार सैलपणे वापरला गेला आहे. कोणत्याही विषयावरच्या ग्रंथगत माहितीला शास्त्र म्हटले जात असे. आपापल्या मताला शास्त्राचा आधार आहे हे दाखवण्याची धडपड चालत असे. शास्त्र म्हणजे काय तर आधीच्या लोकांनी लिहून ठेवलेला एखादा बहुजन-मान्य ग्रंथ. विधवांच्या पुनर्विवाहाला शास्त्राधार आहे का नाही, किंवा संन्यास घेतल्यावर पुन: संसार करण्यास शास्त्राधार आहे का नाही याची चर्चा करणाऱ्या पंडितांनी आधार म्हणून कोणती शास्त्रे घेतली असावीत ? आणि मुळात त्या शास्त्रांना आधार कशाचा होता ? हा विचार केला म्हणजे आमचा मुद्दा लक्षात येईल. सायन्स या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्श्नरी मध्ये दिलेला अर्थ निरिक्षण आणि पडताळा यातून प्राप्त होणारे ज्ञान, विज्ञान, शास्त्र, असा आहे. शास्त्र आणि विज्ञान या शब्दांच्या सुस्पष्ट अर्थांबाबत मतभिन्नता आहे. तरीपण आपण विज्ञान म्हणजे फिजिकल सायन्स या अर्थाने फलज्योतिष हे विज्ञान आहे का नाही? असा प्रश्न जर विचारला तर त्यास नाही हेच उत्तर द्यावे लागेल.
अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो.>>

हे नक्की कुठे आणि कसे सिद्ध झाले आहे, अचूकपणाचे निकष नेमके काय आहेत, हेही लिहिल्यास बरे होईल. >>
याबद्दल वाचायला आवडेल.>>>>>>>>>> मला वाटत वर दिलेल्या लिंक्स तुम्ही गांभीर्याने वाचल्यास तुम्हाला या समजुती उलगडत जातील. ती अर्थातच वेळखाउ प्रकिया आहे.

कधीही कसलीच ठाम भूमिका न घेणार्‍या लोकांचं कौतुक वाटावं की कीव करावी याबद्दल मला ठाम भूमिका घेता येत नाहीए.>>>>>>>>भरत, यावर एखादा धागा काढा ना! पण अनिल अवचटांना जेव्हा काही लोक असे प्रश्न विचारतात तेव्हा ते म्हणतात की प्रत्येक बाबतीत आपले काही ठाम मत असलेच पाहिजे असे काही नाही . Lol
अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे- अनिल अवचट वाचा

मला वाटत वर दिलेल्या लिंक्स तुम्ही गांभीर्याने वाचल्यास तुम्हाला या समजुती उलगडत जातील. ती अर्थातच वेळखाउ प्रकिया आहे.>> हरकत नाही. त्यापैकी नेमकी कुठली लिंक ते सांगाल का? माझा प्रश्न परत एकदा स्पष्ट करते. कुंडली अचूक असेल तर अचूक भविष्य सांगता येतं हे कुठल्या प्रयोगाने सिद्ध झालं आहे का? (जसं वर तुम्ही उल्लेख केलेल्या अभ्यासात हे सिध्द झालंय की ज्योतिषांना कुंडलीवरून ती व्यक्ती मतिमंद आहे की बुद्धिमान हे अचूकपणे सांगता आलेलं नाही)

माझा प्रश्न परत एकदा स्पष्ट करते. कुंडली अचूक असेल तर अचूक भविष्य सांगता येतं हे कुठल्या प्रयोगाने सिद्ध झालं आहे का?>>>>>> याच उत्तर नाही असे आहे. पण वरील लिंक http://mr.upakram.org/node/777 या सामान्यजनांच्या ज्योतिषी व ज्योतिषशास्त्रा बाबत काय समजूती आहेत त्याचा धांडोळा प्रश्नांतून घेतला आहे.हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.

माझा प्रश्न परत एकदा स्पष्ट करते. कुंडली अचूक असेल तर अचूक भविष्य सांगता येतं हे कुठल्या प्रयोगाने सिद्ध झालं आहे का?>>>>>> याच उत्तर नाही असे आहे. >>
धन्यवाद!

मी लहान होतो तेव्हा एक माणूस पोपट घेऊन आला होता. तो पोपट पिंजऱ्यातून बाहेर यायचा एक कार्ड उचलायचा आणि परत पिंजऱ्यात जायचा. तो खूपच हुशार पोपट होता. तसा पोपट विकणारा कोणाच्या माहितीत असेल तर सांगा. मला घ्यायचा आहे.

अभिनंदन ! वावे
आपण शेवटी निःसंदिग्ध उत्तर मिळवण्यात यशस्वी झालात !

तो खूपच हुशार पोपट होता>>>>त्या कार्डवर लिहिले होते कि तुम्हाला तुमचे शाळेतले मित्र तात्या नावाने हाक मारायचे. बरोबर ना बोकलत? Biggrin

>>>>अंधश्रध्दाळूंची निर्भत्सना करणं क्रूर आहे- अनिल अवचट वाचा

उत्तम मुलाखत.

माझा प्रश्न परत एकदा स्पष्ट करते. कुंडली अचूक असेल तर अचूक भविष्य सांगता येतं हे कुठल्या प्रयोगाने सिद्ध झालं आहे का?>>>>>> याच उत्तर नाही असे आहे >>>>>>>>> असे असेल तर 'अचूक वेळ समजल्यास अचूक भविष्य सांगता येते' हे गृहीतकच सपशेल कोसळते. जर मुळातच जन्मकुंडलीवरून भविष्य हे विश्वासार्ह ठरत नसेल, तर त्यात नैसर्गिक जन्म काय आणि सिझेरियन काय!

रानभुली सिजेरियन भविष्य मध्ये कंगना रनाऊत कशी? >>> कंगना नाही. तिचा मूवी. त्याची रिलीज डेट आणि वेळ माहीत असेल तर भविष्य सांगता येईल का ?

असे असेल तर 'अचूक वेळ समजल्यास अचूक भविष्य सांगता येते' हे गृहीतकच सपशेल कोसळते.>>>> ही गृहीतके म्हणजे ज्योतिषशास्त्राबाबत लोकांच्या समजुती आहेत.
जर मुळातच जन्मकुंडलीवरून भविष्य हे विश्वासार्ह ठरत नसेल, तर त्यात नैसर्गिक जन्म काय आणि सिझेरियन काय!>>>>> बरोबर! अगदी तर्कशुद्ध. पण मग फलज्योतिष हे थोतांड आहे त्याची दखल कशाला घ्यायची अशी एका वाक्यात वाट लावता येते. उपक्रमावर मी जे पुस्तक लेखमाला स्वरुपात लिहिले व त्यावर प्रतिक्रिया घेतल्या व प्रतिसाद दिले त्यात माझी भुमिका मनोगतात व काही प्रतिसादात दिलेली आहे. जिज्ञासू वाचक ते वाचतात असा माझा अनुभव आहे.