या ज्योतिषाच काय करायच?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 10 March, 2013 - 01:42

सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.

मग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती?

वैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत? हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते.

समजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय? एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय? हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही.

फॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी ... या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय? रामसे बंधूंच्या भयपटांचे 'थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना.

भविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का? हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्योतिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला.

भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.

मटका ज्योतिष
मटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का? हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर? सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना! ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब! ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला?

असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!

(पुर्व प्रकाशित ब्लॉग http://faljyotishachikitsa.blogspot.com/ )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता या धाग्याच काय करायचं? असा प्रश्न मला पडला आहे. कारण इथे किती वाचने झाली आहेत हे इथे समजत नाही. इथे कुठलीही प्रतिक्रिया आली नाही यावरुन मी खालील शक्यता गृहीत धरतो.
१) हा विषय दखलपात्र नाही किंवा याचे इतके चर्वण झाले आहे कि त्याची आता दखल घ्यावीशी वाटत नाही
२) यात नवीन काय लिहिलय? जे लिहिलय ते मान्य आहे/मान्य नाही.
३) कशाला प्रतिक्रिया देउन विषयाला फाटे फोडा/ महत्व द्या.
४) धागा लिहिणारी व्यक्ती परिचयातील नाही/ कंपूतील नाही मग कशाला प्रतिक्रिया द्या!
५) मायबोलीवर कितीतरी धागे असे आहेत की त्यावर दंगा करता येतो. इथे काय दंगा करता येणार?
.
.
.
अवांतर- चला या निमित्त लोकांच्या माथी ब्लॉग मारला. Happy Happy

प्रकाशजी मला एवढे खोलवर समजत नाही, पण एकदंरीत अनूभवावरुन सांगते, की फलज्योतिष्याचा खूप सखोल अभ्यास करावा लागतो. सकाळमध्ये भविष्य लिहीणारे श्रीराम भट यांचे आडाखे कधीच खरे ठरत नाहीत, परंतु विजय केळकरांचा मात्र बर्‍याच जणांना चांगला अनूभव आहे.

नेट व्यतीरीक्त इतर वाचन जास्त ठेवा. आणी दैनंदिन अनूभवातुनच शिका. कृपया हलके घ्या. कारण तुम्ही लिहीलेले सगळ्यांच्या डोक्यावरुन पसार झालेले आहे.

प्रकाश घाटपांडे,

आपला लेख वाचला. एक शंका आहे.

>> काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते
>> व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते.

एखादी गोष्ट वस्तुनिष्ठ नसेल तर थेट भंपक असण्यापेक्षा व्यक्तिनिष्ठ असलेली बरी, नाही का? हा प्रश्न विचारायचं कारण असं की वस्तुनिष्ठतेच्या नेमक्या वैज्ञानिक कसोट्या या घडीला अस्तित्वात नाहीत. आधुनिक विज्ञानात मर्यादानिश्चिती हे न सुटलेलं कूट आहे.

मला वाटतं की ज्योतिषाचा संबंध जातकाच्या संकल्पाशी आहे. जातकाने ज्योतिषास विचारून जिथे ग्रहबल कमी असेल तिथे स्वप्रयत्नाने उणीव भरून काढावी.

आ.न.,
-गा.पै.

छान लेख.

प्रकाशजी नाउमेद होउ नका. असे लेख वाचून कळत-नकळत वाचकांवर परिणाम होत असतो. कधीकाळी या थोतांडावर माझा विश्वास होता. नंतर गंमत म्हणून रोजचे राशीभविष्य वाचत असे. नंतर थोडसं वाचन वाढल्यावर, अनेक अनुभव घेतल्यावर मला आता ज्योतिषांचा राग येतो. Happy

गामा पैलवान
<<एखादी गोष्ट वस्तुनिष्ठ नसेल तर थेट भंपक असण्यापेक्षा व्यक्तिनिष्ठ असलेली बरी, नाही का? >>
भंपकपणा देखील व्यक्तिसापेक्षच आहे ना! Happy
बाकी वैज्ञानिक तत्वज्ञानातील मर्यादानिश्चिती हा मुद्दा कळीचा आहेच.

तुर्रमखान
मी मायबोलीचा जुना मेंबर असलो तरी इथे फारसा रुळलो नाही त्यामुळे परिचित नाही. माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे पुस्तक लेखमाला स्वरुपात उपक्रम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याकडे मायबोलीकरांचे लक्ष वेधून घ्यावे हा सुप्त हेतु मनात आहेच. एखादे पुस्तक वाचायचे की नाही हे त्या पुस्तकाच्या परिक्षणावरुन साधारण पणे ठरवता येते.
लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण http://mr.upakram.org/node/1080 इथे उपलब्ध आहे.
मी ज्योतिषांना आपला शत्रू मानीत नाहि. त्यांचा मला रागही नाही. फक्त ज्योतिषातल्या अंतर्विसंगती व अपप्रवृत्ती याकडे लक्ष वेधायचे आहे. हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.

प्रकाश घाटपांडे,

ज्योतिष (किंवा कुठलाही दृष्टीकोन) भंपक असण्यापेक्षा व्यक्तीसापेक्ष असलेल बरं. कारण की ज्योतिषी पारंगत असेल तर त्याला ज्योतिषाच्या मर्यादा बरोबर ठाऊक असतात. इथे पारंगत म्हणजे कार्यकुशल व अध्यात्मिक साधना करणारा असा घेतला आहे.

वरील विधानाचं कारण की ज्योतिष जे वेदांगापैकी एक आहे. वेदांची निर्मिती मानवाला मूळ स्वरूप (म्हणजे आत्मज्ञान) प्राप्त करून देण्यासाठी झाली आहे. साहजिकच ज्योतिषाचा उपयोग साधनेसाठी व्हायला हवा. ते सोडून जर कोणी ऐंद्रिय सुखांच्या प्राप्तीसाठी ज्योतिष वापरू लागला तर निकाल भलतेच लागण्याची शक्यता आहे.

म्हणूनच ज्योतिषाचा उपयोग ग्रहबळातील त्रुटी जाणून त्याच्याशी सुसंगत असे मानवी प्रयत्न करण्यासाठी व्हावा.

मात्र आज या क्षेत्रात भोंदू लोकांची चालती आहे हेही सांगायला हवं. त्यामुळे खरा ज्योतिषी कोण ते ओळखायला जातकाला स्वत: साधना करायला हवी. तीस पर्याय नाही. भर साधनेवर हवा. ज्याला कुणाला साधना मान्य नाही त्याला ज्योतिष थोतांड वाटणार. तसं मत बाळगण्याचा त्या मनुष्याचा अधिकार अबाधित आहे. मात्र ज्या जातकाला ज्योतिषाचा लाभ उठवायचा आहे त्याने साधना करणे इष्ट.

आ.न.,
-गा.पै.

बाकी सगळ राहू दे... अम्हाला ज्योतिषाचा अनुभव चान्गला येतो. आणि येत नसेल तरी आमचा त्या वर विश्वास आहे, तुम्ही कोण आम्हाला उपदेश करणारे? पैसे आमचे, ते ज्योतिशान्ना दक्षीणेसाठी द्यायचे का त्याची दारू प्यायची का बायकोला त्या पैशातून neckless घेउन द्यायचा हा आमचा प्रश्न आहे.... तुम्हाला खाज असेल तर आमच्या साठी पण पैसे कमवा आणि आम्हाला घरबसल्या आणून द्या मग सान्गा की हे पैसे ज्योतिशावरती खर्च करायचे नाहीत.

प्रकाशराव, ज्योतिष काय अंतर्मुख होउन वाचणार? माझ्या माहितीतल्या सगळ्या जोतिषांना हे थोतांड आहे हे अप्रत्यक्षपणे माहितच असते. पण त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो. ते स्वतः याच्या आहारी जाउन निर्णय घेत नाहीत. देउळमधली केश्याची आई देवळात बाकीच्या भक्तांना अडचण नको म्हणून दर्शन न घेता बाहेर दुकान लाउन बसते. तसच आहे हे.

एएससीएचाआयजी
सपोर्टिंगची उदाहरणे व्यवहारात आढळतात म्हणजे एखाद्या आजारावर अ‍ॅलोपॅथी चे वैद्यकीय उपचार चालू आहेत तरी जोडीला आयुर्वेद वा होमिओपॅथी चालू असते. उपचार तर चालू द्यात पण अंगाराही राहू द्यात नुकसान तर काही नाही ना?
वरील एक आकडी लॉटरीच्या उदाहरणात ५२ आठवड्याचे मागील रिझल्ट चे पंचांग घेउन काही सूत्र सापडतय का हे पहातान मनाने कल दिला की समजा अमूक एक लाईन सुद्धा नाकारता येत नाही किंबहुना त्या लाईनला कल हा द्यावाच तेव्हा तो आकडा सपोर्टिंग म्हणुन खेळला जातो. एखाद्या कपड्याच्या दुकानात साड्या ठरवताना जशा बायका प्रत्येक साडीला काही प्राधान्यक्रम देतात. तसा काहीसा प्रकार.

या ज्योतिषाच काय करायच?
कोण कसले काय करणार?

वर्षानुवर्षे, लाच खाणारे, बलात्कार करणारे, गुंडगिरी करणारे लोक उजळ माथ्याने फिरताहेत, त्यांच्याबद्दल कुणाला काही करता येत नाही. मग कशाला काही करण्याच्या गोष्टी करता?

काय बोलावे, लिहावे असे लिहा. मग बरेच लोक येतील तुमच्या बीबी वर.

चला या निमित्त लोकांच्या माथी ब्लॉग मारला
ही काय भानगड आहे...
आपल्या सुविचारांना आपणच असा सुरुंग का लावत आहात...

आपण काहीच करायची गरज नाही. परिस्थिती सगळे करते.
सुखात माणूस सोनारा कडे जातो आणि दुख्खात भविष्य वाल्याकडे जातो.
अर्थात याच दुख्खाचा फायदा घेणारे लोक आहेत. ( त्याची फी एका प्रश्नाला काहीशे रुपडे असते म्हणे)
पण समाजात वाईट इतके तग धरून आहे तर चांगले किती असेल ? असा विचार करा.
यापुढे जाऊन, गामा पैलवान म्हणाले ते, "ज्योतिषी पारंगत असेल तर त्याला ज्योतिषाच्या मर्यादा बरोबर ठाऊक असतात" याचा सखोल विचार हवा.
पत्रिकेचा आधार घेऊन समुपदेशन करणारे हि लोक आहेत. मी जर उद्या आपल्याला "अमुक अमुक गोष्ट कर अथवा करू नको असे सागितले, तर का? कशासाठी असे प्रश्न तयार होतील आणि आपणास ते पटणार हि नाहीत. जर तो सल्ला कुंडली च्या आधारे/ ग्रहमाना च्या आधारे प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन दिला गेला तर तो जास्त relate होतो. असा माझा अनुभव आहे. ( इथल्या बर्याच लोकांना ज्योतिष समुपदेशन, ज्योतिष मार्गदर्शन आणि भविष्य सांगणे या तीन गोष्टीतला फरक हि माहित नसावा. एवढा सुज्ञ मी आहेच. पण स्वतचे भविष्य हे स्वत च्या मनगटाने बनवावे लागते हेच खरे.)
ज्योतिष थोतांड आहे असे म्हणणारे लोक उद्या सायकोलोजी पण थोतांड म्हणतील. पण हीच लोक १० ज्योतिष फिरून आलेली असतात. ( आणि जर नसतील आली तर त्याविषयी आपणास ज्ञान नाही. आणि तिथे अक्कल पाझळू नये असे माझे वयक्तिक मत आहे. )
त्यामुळे तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे !

@ शशिकांत
अहो या निमित्त लोकांचे लक्ष ब्लॉग व ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... कडे जावे एवढा माफक हेतु. लोक पटेल ते घेणार बाकी सोडून देणार.
@ सुज्ञ माणुस
समुपदेशन व मानसिक आधार या मुळे ज्योतिष टिकून आहे.

'पर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही' - अगदीच पटले! जोपर्यंत ध्वनी आहे तोपर्यंत संगीताला मरण नाही - या अर्थाने हे घेतो.

रेव्यु यांची एका ज्योतिष धाग्यावर प्रतिक्रिया वाचल्यावर हा धागा मला वर काढावासा वाटला. बघा आमचं भाकित खर आहे की नाही?