सोसायटीच्या प्रश्नात मदत हवी आहे

Submitted by एक-माबोकर on 11 April, 2021 - 07:59

नमस्कार. मी आणि माझे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही लोकांच्या वागणूकीमुळे त्रस्त आहोत.
समस्या अशी आहे की दर रविवारी ऑलमोस्ट दर रविवारी हे लोक खाली सोसायटीच्या ओपन पार्किंग भागात क्रिकेट खेळतात. आमच्या वाट्याला आलेले पार्किंग तिथेच आहे आणि त्यामुळे सारखं कोणीतरी वॉचमन ला पाठवून आम्हाला गाडी काढा म्हणून सांगायला येतात . सुरवातीला आम्ही सहकार्य केले काही दिवस आणि नवरा जाऊन दुसरीकडे तेवढ्यापूरते गाडी लावून यायचा. पण आता चार वर्षे झाली जवळपास इथे येऊन तीच कटकट अजूनही सुरूच आहे. आता काही दिवस कोरोनामुळे जरा काळजी घ्यावी म्हणून त्याना सध्या खेळु नका असे शांतपणे चांगल्या भाषेत सांगितले होते. पण काहीही फरक नाहीये.

या गोष्टीवरून आता वाद व्हायची वेळ आलीये. इतर काहीजण सुध्दा त्या लोकांना बोलले मागे की सध्या खेळु नका पण त्याउपर कोणी काही बोलत नाही . आणि याचं कारण म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी स्वत: त्यांना सामील आहे. त्याला कोणीही काहीही बोलत नाही उलट त्याचा सोबत खेळतात. हे वागणं म्हणजे मिळालेल्या पोझिशनचा गैरवापर करणे नाही का? आम्ही यांच्या पार्किंग मध्ये गाडी लावतो मग असे म्हटले तर तेही चालत नाही. काय करावे अशा लोकांना कसे समजवावे? स्वत:च्या च पार्किंग मध्ये गाडी लावणे गुन्हा आहे का? काय कायमस्वरूपी तोडगा काढावा यावर जेणेकरून ते लोक पुन्हा असे वागणार नाहीत. कृपया जेन्यूईन समस्या आहे, जेन्यूईन मदत हवीये. मी नियमित माबोकर आहे तेव्हा आताच स्पष्ट करते की हा जरी डुआयडी असला तरी धागा टीपी म्हणून काढलेला नाही. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चार वर्षे म्हणजे खूपच सोसलंय तुम्ही. मी असतो तर सोसायटीची मिटिंग बोलावून याचा सोक्षमोक्ष लावला असता. एकतर खेळायचं बंद करा नाहीतर मला दुसरी पार्किंग द्या. रविवारी सुट्टीच्या दिवशी वॉचमन घरी येणार त्रास द्यायला हे चालणार नाही.

तुम्ही पण खेळा..फक्त रविवार चा प्रश्न आहे, इतका त्रास कशाला करून घेताय..
कोरोना काळात बाहेर जाणे बंद आहे, सोसायटीच्या आत खेळतायत छान आहे...

टेक्निकली दर आठवड्याला दुपारी तुम्हाला तुमच्या हक्काच्या पैसे दिलेल्या पार्किंग मध्ये लावलेली गाडी उगीच काढून द्यावी लागते आहे.क्रिकेटर मुलांचा जो लीडर असेल त्याच्या बापाने, किंवा दर महिन्याला एकेका मुलाच्या बापाने तिथे गाडी लावून त्याच्या पार्किंगमधे तुम्ही कायम स्वरूपी लावणे हा योग्य पर्याय वाटतो आहे.किंवा मुलांना एक व्यवस्थित सोसायटी गार्डन पाहिजे, जिथे खेळता येईल.

आमच्या इथे पण यावरून बरेच वाद झाले.शेवटी 'तुमची मुलं क्रिकेट खेळण्या इतकी होतील तेव्हा तुम्ही काय करता आम्ही पण बघू' वगैरे.आता सोसायटी गार्डन चा एक भाग आहे त्यात झोके आणि लहान मुलांचा एरिया आहे.त्याच्या शेजारी छोटे लॉन आहे, तिथेच त्यात मुलं क्रिकेट खेळतात.बॉल बाहेर जाऊ नये म्हणून तिन्ही बाजूना कापडी हिरव्या जाळ्या लावल्या आहेत. कधीकधी पलीकडे खेळणाऱ्या छोट्या मुलांना बॉल लागतात, पण अश्या वेळा कमीच.(आता गेल्या दीड वर्षात हे सगळंच इतिहास झालंय.)
बाकी मुलं सायकल शिकताना गाड्यांवर पडून पोचे येणं, रोलर स्केटिंग चे रिव्हर्स चे स्टंट करताना रस्त्याला खड्डे पडणं वगैरे प्रकार होतात, ते प्रेमाने इग्नोर करावे लागतात सगळ्यांना.

सरळ वकिलामार्फत नोटीस पाठवा. नोटीस पाठवण्यासाठी ओपन पार्किंग तुमच्या नावावर कायदेशीररित्या आहे याचा पुरावा जोडला की बास. नोटीस लागल्याबरोबर सोसायटीचा सेक्रेटरी पाय धरायला येईल. अर्थात यामुळे तुमच्यासोबत त्या लोकांचं कायमचं वाकडं होईल (ज्यामुळे तुम्हाला फार काही फरक पडणार नाही), पण प्रश्न मिटेल हे नक्की.

@बोकलत , हेच त्यांना खूपवेळा सांगून झाले आहे आतापर्यंत. आणि मिटींग ठरवणार तरी कोणाशी? जो स्वत:च त्रासदायक वागतोय त्या चेअरमन कम सेक्रेटरी सोबत? तोच तर पुढाकार घेऊन खेळतो. आणि बोलणारे फक्त आम्हीच आहोत बाकी कुणाला हा प्रॉब्लेम नाहीये आणि हाच तर मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. आमच्या शेजारी जे काही थोडेफार पार्किंग आहेत तिथे बहुधा कोणी राहत नाही किंवा ते काढत असतात त्यांच्या गाड्या गुपचूप. कारण परत तेच की याला कोण बोलणार. पण आम्ही आता अजिबात सहन करु शकत नाहीये.

वकिलाची नोटीस सेक्रेटरी आणि चेअरमनच्या नावाने काढा>>> तेच करावे वाटतेय आता पण एवढ्या टोकाला जाऊ नये असंही सभ्य मनाला वाटते.

mi_anu तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण हे मुलं नाहीत मुलांचे बाप आहेत सगळे हीच तर डोकेदुखी आहे ना. हे असं असूनही immaturity दाखवताय . हे सगळे आणि आम्ही पण ओनर आहेत अनु . मुलं नाहीत.

क्रिकेटर मुलांचा जो लीडर असेल त्याच्या बापाने, किंवा दर महिन्याला एकेका मुलाच्या बापाने तिथे गाडी लावून त्याच्या पार्किंगमधे तुम्ही कायम स्वरूपी लावणे हा योग्य पर्याय वाटतो आहे. >>> हो हाही पर्याय सुचवला होता पण तेही तर नकोय कोणाला उलट उध्धटासारखे अरे मग तर तुम्ही उद्या आमचा फ्लॅट पण मागाल असे उत्तर मिळाले Angry . म्हणजे गरज यांची आणि तरी हे असं वागणं. चोर तर चोर वर शिरजोर. फार मनस्ताप होतो. काय सांगावं आता.

कोणता ट्वीस्ट प्रणवंत ? मी वर लिहिलेय लोकं असे. मुले लहान आहेत सगळीच फारच. क्रिकेट खेळण्याएवढे मोठे नाहीत.

ही दांडगाई आहे. सोसायटीचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप असेला त्यावर आधी सभ्य भाषेत लिहा. ती तुमची जागा आहे हे स्पष्ट लिहा. तुमचा हक्का नाही हे ही लिहा. प्रकरण थांबले नाही तर कायदेशीर कारवाईची धमकी तिथेच द्या.

तुम्ही सांगितले की नाही हा तुमचा हक्क नाही म्हणून ? उद्या फ्लॅट मागाल असे म्हणणा-याला आमच्या पार्किंगवर तुम्ही अतीक्रमण केलेय तर तुमच्या फ्लॅटवर करावेच लागेल असे ठणकावून का नाही सांगितले ? तिथे काय अ‍ॅडमिन नसतात हो, आमच्याकडे तक्रार करा थेट उत्तर देऊ नका नाहीतर आयडी उडेल असे नियम बनवायला.

मला आधी वाटले मुले क्रिकेट खेळतात पण नंतर कळाले ते नसून त्यांचे पालक आहेत. मी नीट नसेल वाचले त्यामुळे असा ट्विस्ट वाटला.

कायदेशीर नोटीस पाठवा. तरिही नाही बधले तर DDR (Deputy District Registrar) ऑफिसकडे लेखी तक्रार करा. थोडे पैसे जातील पण पुन्हा त्रास देणार नाहित.

वरच्या वर्णनावरून केवळ तुम्हाला त्रास देण्याकरता ते खेळत आहेत असे वाटत नाही. त्यांना केवळ क्रिकेट खेळायचे आहे. आठवड्यातून एकदा गाडी दुसरीकडे लावावी लागणे हा काही फार मोठा त्रास नाही. पाहिजे तर शनिवारी रात्रीच हलवू शकता. तरीही हे नको असेल तर चेअरमन स्वतःच यात असेल तर त्याला सांगून वेगळे पार्किंग मागून घ्या. काही महिने हा त्रास असेल. एकदा नेहमीचे रूटिन सुरू झाले की त्यांनाही दर रविवारी जमणार नाही.

तेवढेच सोसायटीतील काही ढेर्‍या कमी होणाच्या आड न येण्याचे श्रेय मिळेल Happy

अरे मग तर तुम्ही उद्या आमचा फ्लॅट पण मागाल असे उत्तर मिळाले >> वाचून मनातल्या मनात मी "आमच्यात उकीरडा मागत नाहीत" म्हणाले...

अवांतर जाऊ दे, तुमच्याच पार्किंग मध्ये तुम्हाला गाडी ४ तास लावता येत नाही, म्हणून अन्यत्र पार्क करायला फी पडते. ४ तासाइतकी पार्किंग फी (तुमच्या एरियात जी काही असेल ती) इतकी सूट तुमच्या मंथली मेंटनन्समध्ये मागू शकता का?

वरच्या वर्णनावरून केवळ तुम्हाला त्रास देण्याकरता ते खेळत आहेत असे वाटत नाही. त्यांना केवळ क्रिकेट खेळायचे आहे. आठवड्यातून एकदा गाडी दुसरीकडे लावावी लागणे हा काही फार मोठा त्रास नाही. पाहिजे तर शनिवारी रात्रीच हलवू शकता. तरीही हे नको असेल तर चेअरमन स्वतःच यात असेल तर त्याला सांगून वेगळे पार्किंग मागून घ्या. काही महिने हा त्रास असेल. एकदा नेहमीचे रूटिन सुरू झाले की त्यांनाही दर रविवारी जमणार नाही. >>>>
प्रश्न अरेरावीचा आहे. तसेच हक्क असल्यासारखे वागण्याचा आहे.
हे कुणाचे तरी पार्किंग आहे. त्यांनी गाडी काढलीच पाहीजे या विचारसरणीचा आहे.
त्यांनी सुरूवातीला सौजन्य दाखवले आहे. पण चार वर्षे ?
त्यांनाही काहीतरी जाणिव आहे असे दिसायला हवे होते.
पण गाडी पार्क करायला तुमचे पार्किंग द्या हा लॉजिकल प्रश्न विचारल्यावर "उद्या आमचे घरही मागाल " हे उत्तर उर्मटपणा पण दर्शवते आणि बेफिकीरीही.

या ही स्थितीत त्यांनी स्वतःहून सौजन्य दाखवावे का ?

ते पुढे लिहीलेले "चार वर्षे" हे हुकले वाचताना आधी. कारण सुरूवातीला "काही महिन्यांपासून" असा उल्लेख आहे - त्यामुळे मला वाटले हे सगळे लॉकडाउन च्या काळातील आहे - हो चार वर्षे म्हणजे जास्त होतात. तुमचे बरोबर आहे. आवर्जून सौजन्य दाखवण्याची जबाबदारी यांच्यावर नाही. पण स्वतःपुरते हे क्लिअर असावे की या सगळ्या लोकांच्या विरोधात जाउन तेथे राहायचे आहे की थोडीफार तडजोड करून सर्वांना सोयीचे होईल असे काहीतरी काढावे.

आपल्याला होणार्‍या गैरसोयीची कल्पना दिली तर लोक सहसा रिझनेबल असतात. पण हे शेजारी आठमुठेच आले असतील आणि आपलीही ताणायची तयारी असेल तर मग वरचे मार्ग आहेतच. पण तेवढी वेळ आली नाही तर बरे. किंवा आधी नोटिस देउन आपण ते करू शकतो हे दाखवावे आणि मग तडजोड करावी.

तुम्ही तुमची टीम घेऊन त्यांच्या पार्कींगमधे जा क्रिकेट/इतर काहीही खेळायला. तुमची गाडी हलवायला आले की त्यांना आधी त्यांची गाडी हलवायला सांगा.

एक सांगू का कितीही वाटलं तरी आपल्या हक्काची वस्तू वापरायला देऊ नये, समोरच्याला तो स्वतःचा हक्क वाटू शकते. मुळात पहिल्याच दिवशी गोड शब्दात सॉरी आमच्या जागेतून गाडी नाही काढू शकत अस सांगायला हवे होते. जगात भिडस्त स्वभाव नाही कामाचा.
आताही स्पष्ट नाही सांगा नाही शक्य म्हणून.

सोसायटीच्या जीबीएममध्ये हा मुद्दा काढा. >>>> +१.तसेच रोटटिंग पार्किंग होत असल्यास त्याबाबत आग्रह धरा.
आमच्या सोसायटीत दर सहा महिन्यांनी पार्किंग स्लॉट बदलतो.त्यासाठी लॉटरीचीपद्धत वापरतात.

सोसायटीच्या जीबीएममध्ये हा मुद्दा काढा. >>>> +१.तसेच रोटटिंग पार्किंग होत असल्यास त्याबाबत आग्रह धरा.
आमच्या सोसायटीत दर सहा महिन्यांनी पार्किंग स्लॉट बदलतो.त्यासाठी लॉटरी पद्धत वापरतात.

ते त्रास देण्याकरता खेळत नाहीत आणि त्यांनी रोज चोवीस तास खेळले तरी आम्हाला घंटा फरक पडत नाही. पण आमचं पार्किंग वगळून खेळावे किंवा दुसरे पार्किंग द्यावे एवढी मिनीमम अपेक्षा आहे. तुम्ही पण खूश आम्ही पण खूश. पण दुर्दैवाने चित्र एवढं साधं नाहीये.

पूर्वी शनिवार रविवार जास्ती नसायचोच घरी तेव्हा त्यांची सोय आपोआपच व्हायची. पण आता सध्याच्या परिस्थितीत घरीच राहणे आलेय कुठे येणं जाणं नाही म्हणून हे प्रसंग पुन्हा पुन्हा येताय त्यामुळे नवऱ्याची चिडचिड होतेय आणि अर्थात माझी पण. शेवटी माणूस आहे, काही दिवस समजून घेतो पण एवढ्या वर्षांपासून बघतोय हे नेहमीचे झाल्यावर संयम सुटणारच. शिवाय एवढे दिवस त्यांच्या कलाने घेऊनही कोणालातरी आपल्यामुळे त्रास होतोय याची साधी जाणीवही नसणे हे दुर्दैव. आणि आता सांगते जास्ती राग का येतोय कारण बिल्डिंग मध्ये पेशंट्स वाढत आहेत म्हणून सध्या खेळण्याला विरोध आहे तरीही बेफिकिरीचे वागणे आहे चेअरमनचेच आणि तो वरचा फ्लॅट वाला डायलॉग त्याचा च्च आहे. सरळ सरळ आमच्या संयमाचा आणि त्या पदाचा गैरफायदा घेतोय तो म्हणून चीड येते. बाकी जण कोणी त्याला बोलत नाही फक्त बघ्याची भूमिका घेताय.

तरी बघू सध्या काही दिवस सरळ इग्नोर करायचं ठरवलं आहे. आज तर हाकलून लावले सरळ. गेलाच नाही गाडी हलवायला. नंतर कोणी आलं नाही परत.

सीमंतिनी, चांगला ऑप्शन आहे पण फी वगैरे लागत नाही. नाहीतर सुचवला असता. माणूस आपल्या पार्किंग मध्ये गाडी लावून निर्धास्त होतो आणि दर सुटीच्या दिवशी तुम्ही येऊन ती मन:शांती घालवता याला आक्षेप आहेच.

तसेच रोटटिंग पार्किंग होत असल्यास त्याबाबत आग्रह धरा.
आमच्या सोसायटीत दर सहा महिन्यांनी पार्किंग स्लॉट बदलतो.त्यासाठी लॉटरीचीपद्धत वापरतात.>>> ओके. हा मुद्दा मांडून बघतो. धन्यवाद.

सोसायटीच्या जीबीएममध्ये हा मुद्दा काढा. तत्पूर्वी लेखी तक्रार देऊन ठेवा.>>> हो वावे हा मुद्दा झाला आहे पण नो सोल्यूशन आता पर्यंत तरी. काही जण म्हणताय की तुम्ही तुमचे शेड बांधून टाका आणि विषय संपवा पण ते ज्यांचे सगळ्यांचे तिथे पार्किंग आहेत त्यांच्याशी बोलून ठरवावे लागेल एकत्रित पणे बांधायला. सध्या तेच करावे वाटतेय.

पिन्की ८० , खरंय तुम्ही म्हणता ते. आता स्पष्ट नाहीच सांगितले आहे.

तुम्ही तुमची टीम घेऊन त्यांच्या पार्कींगमधे जा क्रिकेट/इतर काहीही खेळायला. तुमची गाडी हलवायला आले की त्यांना आधी त्यांची गाडी हलवायला सांगा.>>> हो मेधावि Lol तेच करतो आता. पण आमची दोघांचीच टीम आहे Sad

जरा हसलात तर एक अवांतर पण उपयोगी प्रतिक्रिया देते - Lol तुम्ही फार प्रेमळ काकू दिसता... आमच्या सोसायटीत कुणी दादा लोक असे काही सांगायला आले असते तर काकू लोकांनी "आलाच आहेस तर तो वरचा डबा काढून दे रे" "आळूवडी करायला घेतली नि मेथी संपली बघ, जा बर मेथी आण पटकन" असली काही कामे मागे लावून दिली असती. नाहीतर "तुम्ही आता खेळणार मग माळे आवरणं, इडलीचं वाटणं सगळं सुषमावरच पडणार का? असं करू नये रे. बिचारी बघ कशी राबते"... असले उपदेश ऐकवले असते... चार वर्ष मग कुणी आले नसते.....

बाप्पाने माझ्यासारख्या कडकलक्ष्मी बहिणी भिडस्त मंडळींना द्याव्यात म्हणजे पहिल्याच फटक्यात जागेवर येतील असे लोक.

त्यांनी रोज चोवीस तास खेळले तरी आम्हाला घंटा फरक पडत नाही >> एखाद्या पुरुषाला शोभावा असा डायलॉग, म्हणजे तुम्ही नक्कीच फार भिडस्त वगैरे नसावेत. तरीही चार वर्षे हे सहन केलेत खूपच आहे. त्यामुळे आता ते सोकावलेत आणि प्रॉब्लेम मोठा झालाय. पहिल्याच फटक्यात, म्हणजे दोनचारदा अनुभव येताच तेव्हाच याचा सोक्षमोक्ष लावला असता तर हे आतासारखे जड गेले नसते. आता ते लोकं तर सहजी ऐकणार नाहीतच पण आता वाद वाढेल तसे तो कंपू आणखी चार फ्लॅट ओनर्समध्ये तुम्ही कसे त्रासदायक रहिवाशी आहात सांगून तुमची बदनामी करून एकटे पाडायला बघतील. त्यामुळे आधी ज्यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत अश्या फ्लॅट ओनर्सचा एक स्वतःचा कंपू बनवा आणि जमल्यास त्यांना सोबत घेऊनच या वादावर तोडगा काढायला जा. झाल्यास तिथे आणखी कोणी ओपन पार्किंग वाला हा त्रास झेलत असेल त्यालाही सोबत घ्या. पण चर्चाच करा, वाद घालू नका. शेवटी तुम्हालाही तिथेच राहायचे आहे. चर्चेने प्रश्न सुटला नाही तर मात्र भांडण्यापेक्षा कायदेशीर कारवाईच करा. त्याने वचक राहतो आणि पुढेही कोणी त्रास द्यायला येत नाही. समोरचा माणूस पोलिस स्टेशन वा कोर्टाची पयरी चढणारा आहे हे समजले की असली नाठाळ लोकं नरमतात. ईथे पोरांना खेळायला जागा नसते हल्ली आणि हे बाप्ये कसले खेळताहेत..

आणि हो, तक्रारही सगळ्याच लोकांची करून त्यांची एकी वाढवू नका. तो चेअरमन की सेक्रेटरी आहे त्याची एकट्याचीच करा. आणि बाकीच्यांशी अगदी समजूतदारपणेच बोला.

Pages