लढाई आणि स्मारक

Submitted by ऋतुराज. on 29 March, 2021 - 05:56

लढाई आणि स्मारक

ही गोष्ट आहे जगातील एका मोठ्या जैविक आक्रमणाची व त्याच्या यशस्वी निर्मूलनासाठी लढल्या गेलेल्या लढाईची. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड व न्यू साऊथ वेल्स या भागात घडलेली फड्या निवडुंगाच्या उपद्रवी जैविक आक्रमणाची व त्याच्या निर्मूलनाची ही यशोगाथा.

प्रिकली पेअर (Prickly Pear) म्हणजे आपल्या फड्या निवडुंगाच्या (Opuntia) प्रजातीतील काही जाती. हा निवडुंग दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतील स्थानिक वृक्ष आहे. याला काटे (Prickle)असल्याने प्रिकली आणि याचे फळ पेअर सारखे दिसत असल्याने "प्रिकली पेअर" असे नामकरण. या प्रजातीतील फड्या निवडुंगाला पाने नसतात, याच्या पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते याचे हिरवे मांसल खोड हेच पानांचे व खोडाचे कार्य करते. प्रतिकूल परिस्थितीत व पाण्याच्या दुर्भिक्षातदेखील तग धरून वाढणारी अशी वनस्पती असल्याने याचा प्रसार झपाट्याने झाला.

Prickly Pear.jpg

सुरवातीला कॉचिनिअल या रंगद्रव्यासाठी (Dye) याची लागवड केली गेली. कॉचिनिअल हे रंगद्रव्य या निवडुंगावरील एका किड्यापासून मिळते. हे रंगद्रव्य मुख्यत्वे ब्रिटिश सैनिकांच्या गणवेशाला रंगविण्यासाठी वापरण्यात येत असे. या रंगद्रव्याचा उद्योग उभारून त्याची एक बाजारपेठ उपलब्ध करण्याचा मानस होता. ज्यावेळी ही लागवड केली त्यावेळी याच्या आक्रमक प्रसाराबद्दल काहीच माहिती उपलब्ध नव्हती. पण पाहता पाहता शेताच्या बांधावर व कुंपणासाठी म्हणून लावलेला हा निवडुंग शेते, कुरणे, मोकळी माळराने यावर बेफाम वाढू लागला. याची फळे, बिया पक्षी खात असल्याने याचा वेगाने प्रसार होत गेला. तसेच याच्या मांसल खोडाद्वारे देखील याचे पुनरुत्पादन सहज होत असल्याने याचा अधिकाधिक प्रसार झाला. यातील काही निवडुंग तर तीस फुटांहून अधिक उंच वाढले होते. १९२० पर्यंत या निवडुंगाने अक्षरशः लाखो एकर जमीन व्यापून टाकली.

PP Invasion.jpg
.
PP invasion 2.png

तेथील स्थानिक पिके, वनस्पती जवळजवळ नाहीशी झाली. अनेक जमिनी नापीक, पडीक बनू लागल्या. याच्या अश्या आक्रमक प्रसारामुळे त्याच्या निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यात काहीच यश आले नाही. हे निवडुंग मुळासकट उपटून जाळले, तोडून पुरले तरीही त्यांच्या प्रसारात काहीच फरक पडला नाही. नंतर आर्सेनिक पेंटॉक्साइड व यासारख्या घातक रासायनिक औषधांची फवारणी देखील करण्यात आली परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या निवडुंगाच्या निर्मूलनासाठी घसघशीत बक्षीस सुद्धा जाहीर केले. शासकीय पातळीवर या निर्मूलनासाठी एक समिती देखील नेमली. त्यातील तज्ज्ञांनी देशोदेशी जाऊन जिथे हा निवडुंग स्थानिक व वन्य आहे तिथे त्याचा सखोल अभ्यास केला. अनेक कीटक शास्त्रज्ञांनी दक्षिण अमेरिकेत या निवडुंगाच्या जैविक शत्रूंवर अभ्यास चालू केला. या निवडुंगावर अवलंबून असणाऱ्या अनेक कीटकांचा व त्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास चालू केला. या निवडुंगाच्या जैविक शत्रू असलेल्या जवळ जवळ १५० कीटकांच्या पुनरुत्पादनासाठी अनेक केंद्रे उभारली गेली. या केंद्रात निवडुंगाबरोबरच अनेक पिके, बागेतील वनस्पती व इतर अनेक वनस्पतीवर देखील या कीटकांचे प्रयोग करण्यात आले. निवडुंग सोडून बाकी कोणत्याही वनस्पतीवर याचा हानिकारक परिणाम होत नाही ना, हे पाहणे अतिमहत्त्वाचे होते. प्रयोगाअंती काही कीटकांच्या जाती निर्मूलनासाठी निश्चित केल्या गेल्या. या कीटकांवर ऑस्ट्रलियात आणल्यावरदेखील या सर्व प्रयोगांची पुनरावृत्ती करण्यात आली. काही कीटक हे स्थानिक वातावरणामुळे तर काही इतर अन्य कारणामुळे तग धरू शकले नाहीत.

या सर्वात सरस ठरला तो म्हणजे कॅक्टोब्लास्टस नावाचा पतंग (Cactoblastis cactorum). खास अर्जेंटीनाहून आणलेला हा पतंग या निवडुंगावर खरंच रामबाण उपाय ठरला. या पतंगाची मादी, मिलनानंतर या निवडुंगावर त्याच्या काट्याशेजारी अंडी घालते. ही अंडी एकावर एक अशी चिकटून घातल्यामुळे त्याची एक काडी / दांडी सारखी रचना तयार होते. लांबून ते निवडुंगाचे काटेच वाटतात. एकदा का या अंड्यांतून अळ्या बाहेर आल्या की मग त्या निवडुंगाचा पार फडशा पाडतात. कालांतराने याच्या पुढची अवस्था, म्हणजे त्यांचे कोष तयार होतात. त्यातून पतंग बाहेर पडतात व पुन्हा हे जीवनचक्र चालू राहते. सुरवातीला काही केंद्रावर अशी पंतंगांची पैदास करून ही अंडी गोळा केली जात असत. ती एका सुरळीसारख्या वेष्टनात घालून मग ज्या व्यक्तींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात या निवडुंगाच्या आक्रमणामुळे प्रभावित झाल्या आहेत अश्या जणांना वाटली जात. ह्या अंड्यांच्या सुरळ्या एकदा का निवडुंगाच्या काट्यांना खोचल्या की मग त्यापुढील काम त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या लीलया करत. प्रभावित क्षेत्रामध्ये निवडुंग मुबलक असल्याने खूप वेगाने या पतंगाचे संक्रमण घडून येई, व निवडुंगाचे समूळ उच्चाटन होई. लवकरच या आक्रमक निवडुंगाची संख्या कमी होऊ लागली आणि हळूहळू ती काही ठिकाणाहून ती पूर्णतः नाहीशी झाली. या जमिनीवर आता स्थानिक गवते उगवू लागली, जमीन उपलब्ध झाल्याने त्यात आता बटाटा, मका, गहू अशी पिके घेतली जाऊ लागली. स्थानिक झाड झाडोरा व त्याच्याशी निगडित जैवविविधता पुन्हा प्रस्थापित होऊ लागली. काही वर्षातच या आक्रमक निवडुंगाचे पूर्णतः उच्चाटन झाले.

CC Moth.jpg
-
CC Eggs.jpg
-
CC Larvae on Opuntia.jpg
-

बरीच वर्षे स्थानिकांची अक्षरशः डोकेदुखी ठरलेला हा निवडुंग नाहीसा झाला हे पाहून येथील लोकांनी क्वीन्सलँडमधील डाल्बी भागात या कॅक्टोब्लास्टस पतंगाचे एक छोटेखानी स्मारक बांधले. तसेच बुनार्गा येथे "कॅक्टोब्लास्टस स्मारक सभागृह" बांधले. त्या इवल्याश्या किड्याप्रीत्यर्थ आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे त्यांचे हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. येथील स्थानिक सरकारने या आक्रमक तणाच्या निर्मूलनाची यशोगाथा एका माहितीपटात चित्रित केली आहे.

Monument.jpg
-
CactoblastisHall.jpg
-
तर अशी ही एक अनोखी लढाई आणि अनोखे स्मारक.

सध्या अनेक ठिकाणी वनीकरणासाठी किंवा वृक्षारोपणासाठी बेसुमार विदेशी किंवा अस्थानिक वृक्ष लावले जातात. बरेचदा यांचा इतका प्रसार होतो की नंतर त्यांची संख्या आटोक्यात आणणे अशक्य बनते. उंदीरमारी / गिरीपुष्प, सुबाभूळ हे वनीकरणासाठी वापरलेले काही वृक्ष. गुलमोहर, सोनमोहर, टॅबेबुईया, पर्जन्य वृक्ष आणि अनेक विदेशी/ अस्थानिक वृक्ष रस्त्याशेजारी लावले गेले. गाजरगवत, जलपर्णी व सोनकुसुम (Cosmos) यासारखी अनेक तणे ही आपल्या येथील स्थानिक वनस्पतींना व जैवविविधतेला धोकादायक ठरली तर आहेतच तसेच शेतकऱ्यांसाठीसुद्धा डोकेदुखीची ठरली आहेत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी किंवा वनीकरणासाठी आजूबाजूच्या जैवविविधतेचा योग्य अभ्यास करून शक्यतो देशी किंवा स्थानिक झाडेच लावावीत.

माहितीचे स्रोत:
आंतरजाल
The prickly pear story
माहितीपटाचा दुवा :
https://www.bing.com/videos/search?q=the+conquest+of+prickly+pear&docid=...

सर्व फोटो आंतरजालावरून घेतले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२, मामी, mi_ anu
धन्यवाद..
इतका स्ट्राँग असेल तर आम्हाला पण एक फांदी हवी. रुटिन मध्ये कमीत कमी लक्ष देऊन झाड जगेल.>>> आपल्याकडेही याच्या अनेक जाती स्थानिक नाहीत, परंतु त्या अजून एवढ्या आक्रमक झाल्या नाहीत

निवडुंग आणि त्याचा नायनाट करण्यासाठी केलेला उपाय, छान माहिती सांगितली आहे ऋतुराज.
विशेष म्हणजे ज्ञानात एका वेगळ्या माहितीची भर पडली.
नेहमी पेक्षा काही तरी वेगळे वाचायला बरे वाटले.

डॉ सचिन पुणेकर हे Movement Against Biological Invasions (MABI) ही जैविक आक्रमणविरोधात उभारलेली चळवळ खूप यशस्वीरीत्या राबवत आहेत.
जैविक आक्रमणाविषयी व्याख्याने, मार्गदर्शन, तण होळी असे अनेक कार्यक्रम चालू असतात.

छान माहिती... आपल्याकडे काँग्रेस गवत म्हणून एक गवत उगवत... त्याचसाठी काहीं उपाय आहे का available?
हा प्रतिसाद राजकीय नाही, कृपया फाटे फोडू नये __/\__

नवीन माहिती मिळाली लेखातून. हे पूर्वी कधी वाचनात आले नव्हते. आपल्याकडे (महाराष्ट्रात) निवडुंग पूर्वी खूप दिसत. आता ते फारसे दिसत नाहीत. नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत का? बाकी, नैसर्गिक स्थिति पूर्वपदावर आणण्यासाठी बाहेरच्या देशांतून किटक आयात करणे, यावरून चीन मधले उदाहरण आठवले. चीनमध्ये माओ च्या काळात चिन्यांनी चिमण्यांना अत्यन्त क्रूरपणे मारून चीन मधील जवळपास सर्व चिमण्या नष्ट केल्या होत्या. कारण काय? तर त्या धान्य खातात म्हणून! पण त्यामुळे निसर्ग समतोल बिघडून नंतरच्या काळात टोळधाडी वाढल्या आणि चिन्यांना अभूतपूर्व अशा दुष्काळाला सामोरे जावे लागले. करावे तसे भरावे. मग त्यांनी बाहेरच्या देशांतून (रशिया वगैरे) ट्रक्स च्या ट्रक्स भरून चिमण्या आयात केल्या होत्या म्हणे.

धन्यवाद,

सीमंतिनी, रागीमुद्दे, सुखी१४, अतुल

आपल्याकडे काँग्रेस गवत म्हणून एक गवत उगवत... त्याचसाठी काहीं उपाय आहे का available?>>>> हे गाजर गवत Parthenium hysterophorus सर्व भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरलं आहे. या गवताच्या निर्मूलनासाठी सध्या Mexican beetle (Zygograma) या भुंग्याच्या जातीचा वापर करावा का यावर प्रयोग चालू आहेत. जैविक कीड नियंत्रण संचनालयानुसार इतर पिके यापासून सुरक्षित आहेत, हे भुंगे व त्यांच्या अळ्या फक्त गाजर गवत खातात व गाजर गवत नसल्यास जमिनीत सुप्तावस्थेत जातात.
परंतु यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, अथवा रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होऊ शकते.
तूर्तास अश्या प्रकारची सर्व तणे फुले, फळे येण्याआधी उपटून नष्ट करावीत.

मस्त माहिती! प्रिकली पेअर (Prickly Pear) इथे वेगासमध्ये बरेच दिसते. मेक्सिकन सुपर मार्केटमध्ये हटकुन.
याचा हे़ज म्हणुन उपयोग होतोच पण वाळवंटातील घुबड आणि हमिंगबर्ड याचा मध पितात. प्रिकली पेर काटे काढले की एकदम टेस्टी
लागते याशिवाय त्याच्या पानांची भाजी पण करतात आणि लोकल इंडियन्स बरेचदा सॅलेडपण मस्त करतात.
एका ठिकाणचे अत्यंत गुणी झाड दुसरीकडे किती त्रासदायक ठरु शकते!

अभ्यासपूर्ण माहिती

वर अनिंद्द ह्यांनी विचारलेल्या जलपर्णी साठी काही उपाययोजना आहे का ?

खूप सुंदर आणि रोचक माहिती, ऋतुराज. आपल्याकडे अजूनही देशी झाडांचं महत्त्व पुरेसं ठाऊक नाही. जागरूकता वाढायला हवी.

जबरदस्त! काय योगायोग आहे पहा. आमच्या घराच्या कौलावर एक २इंच उंचीचा निवडुंग उगवला आहे. त्याचं काय करावं, कसा काढावा ह्या विचारात असताना मी दोन घरे पलीकडच्या छपरावर नजर टाकली तर तिथे अगदी तुम्ही चित्रात दिलेल्याच फड्या निवडुंगाचं रान माजलं आहे आणि त्यावर ती लाल फळे देखील आहेत. घरातल्या लोकांनी फिकीर केलेली नसावी! मी सध्या साऊथ ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. म्हणजे इतर राज्यातून इथेही ह्या निवडुंगाचा शिरकाव झालेला दिसतोय!

धन्यवाद,
मंजुताई
निलिमा
प्रणवंत
निलुदा
हरचंद पालव
शंतनू

नीलिमा, लिंक खूपच माहितीपूर्ण, किती उत्पादन, किती प्रकार.

वर अनिंद्द ह्यांनी विचारलेल्या जलपर्णी साठी काही उपाययोजना आहे का ?>>>>> सध्या तरी याचा जैविक शत्रू ऐकिवात नाही, हे खाद्य म्हणूनही कोणी खात नाही. रासायनिक तणनाशके वापरून नियंत्रित करता येते पण त्यामुळे जलस्रोत अधिक दूषित होण्याचा संभव व परिसंस्थेला घातकही.

आपल्याकडे अजूनही देशी झाडांचं महत्त्व पुरेसं ठाऊक नाही. जागरूकता वाढायला हवी.>>>>> सहमत, बरेचदा विदेशी झाडांना देशी नावे देऊन वा ती प्रदूषण नियंत्रण करतात अशी जाहिरात केली जाते

शंतनू,
उत्तम निरीक्षण
या विषयी आजूबाजूला अधिक माहिती मिळाल्यास कळवा

हे आमच्या छपरावर -
cactus1.jpg

आणि हे पलिकडच्या घराच्या छपरावर माजलेले रान. तो निवडुंग बघा - अगदी तसाच आहे. लाल फळे दिसतील. दुरून फोटो घेतल्यामुळे स्पष्ट आलेला नाही. -
cactus3.jpg

आपल्याकडे जलपर्णीबद्दल असे नियोजनबद्ध निर्मूलन तातडीने व्हायला हवे आहे, भारतात अक्षरशः लाखो जलाशय आणि शेकडो नद्या-ओढे या एकाच वनस्पतीने गिळंकृत केले आहेत>>>>>> अनिंद्य, पुण्यातील जिवीतनदी या संस्थेमार्फत जलपर्णी विषयक हा उपक्रम
https://youtu.be/PLxtI3AS89k

छान धागा व विषय. हे झालं वनस्पतींबाबत मात्र ऑस्ट्रेलियात अशाच प्रकारचा उंटांचा देखील त्रास आहे असे ट्रॅक नावाच्या चित्रपटात पाहिलं होतं. पुढे काही फार शोधाशोध केली नाही त्यामुळे खोलात काही ठाऊक नाही.

ह्यात लोकल बाहेरचा , हा मुद्दा असेल असे वाटत नाही

10 वर्षांपूर्वी कोल्हापुरात उसावर लोकरी मावा नावाचा रोग आला होता , सगळा ऊस बरबाद होत होता,

कालांतराने तो मावा खाणारे कीटक कुठूनतरी आले , त्यांनी तो खाऊन टाकला , 3,4 वर्षे हा प्रश्न सुरू होता.

टेक्निकल माहिती जास्त माहीत नाही , शेतकरी लोक सांगू शकतील. तिकडचे कीर्तनकार तेंव्हा हे कीर्तनात सांगत होते , आधी अन्न निर्माण होते , मग ते खाणारा उपजतो
----

अजूनही कुठे कुठे असतो , ही 2016 ची बातमी

लोकरी मावा खाणारी मित्र कीड विकसित केल्याने शेतकऱ्यांना लोकरी माव्याच्या आस्मानी संकटानंतर ऊस शेतीत सुगीचे दिवस आले

https://www.loksatta.com/vruthanta-news/sugarcane-manufacturer-industria...

Pages