द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याने हॉटेल मध्ये सांगितलेले खरकट्याचे ऐकले नाही, कप चे ऐकले असतेच असे नाही.>>> ते आहेच. तिने तेव्हाच सॅारी न म्हणता आधी खरकटे उचलायची हिम्मत दाखव मग काय तो माज दाखव म्हणायला हवे होते. पण तो तिचा पिंड नव्हता.
काहींना सगळं जमतं, झेपतं आणि आहे ते हळूहळू बदलता पण येतं.
आमच्याकडे हे चालतं नाही, ते चालत नाही म्हणणाऱ्या घरात नवी सून आल्यावर १-२ वर्षात बरच काही बदलेलंही पाहिले आहे.

सगळेच प्रतिसाद उत्तम आहेत. शेंगा, कढीपाने आणि मिरचीचा उल्लेख अनेकदा झाला आहे. मला एक कळत नाही, हे अवशेष अगदी ताटाच्या बाहेरच टाकले पाहिजेत का? ते ताटामध्येच एका कोपऱ्यात ठेवणे इतके कठीण का वाटावे? ह्यामागे काही धार्मिक नियम वगैरे आहेत का?चित्राहुती पानाच्या बाहेर ठेवणे एक वेळ समजू शकते. (हे अवशेष सररास ताटाबाहेरच टाकले जातात हे अनेक ठिकाणी पाहिले आहे.) पण असे उष्टे खरकटे टेबलावरच्या उंची क्लॉथ वर टाकायालासुद्धा मागेपुढे पाहात नाहीत लोक उंची हॉटेल मध्ये.

हो ना.अत्यंत वाईट सवय.बरं ते काही विषारी नसतात की ताटाला त्याचा क्षणभरही स्पर्श नको.किंवा ते पानात बाजूला राहिल्याने पॅसिव्ह स्मोकिंग सारखे पॅसिव्ह कढीपत्ता कंझम्पशन किंवा पॅसिव्ह ड्रमस्टिक लेफ्टओव्हर कंझम्पशन चा रोग होणार नसतो Happy
(इंग्लिशबद्दल माफी.विनोद पॅसिव्ह स्मोकिंग बद्दल असल्याने बाकी इंग्लीशिकरण करावे लागले.)

पण ताटात ठेवले तरी शेवटी सगळी ताट उचलणारीलाच ऊष्ट काढावं लागतं की>> तेच तर!
दुसऱ्या बायकोने कप विसळायला सांगण्याबद्दल >>
कशाला बिचाऱ्याचं दुसरंपण लग्न मोडताय? Wink

तिने एकदा तरी सांगायला हवे होते कि काय थुकायचे-टाकायचे ते एक पेपर इथे ठेवते त्यावर करा. किती वर्ष त्या माऊलीने ते हाताने उचलायचे, मग त्या सासूलाही बरे वाटले असते. नाहीच ऐकलं तर मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी त्या उचलणार नाही म्हणायला मोकळी Happy

सिनेमातल बरच काही आवडलं
आणि इथले बरेच प्रतिसादही आवडले.

मला सिनेमा बघत असताना सुरवातीला नाही पण नंतर जाणवलेला एक थॉट आवडला तो फक्त नोंदवते बाकी गोष्टी आल्याच आहेत सगळ्यांच्या प्रतिसादात.

हा विचार मला वाटले मुद्दाम केला गेलाय एकतर लेखकाकडून किंवा दिग्दर्शकाकडून. सगळ्या बायका डोसे घालताना क्लॉकवाईज बॅटर पसरताना दाखवल्या आहेत आणि नायिका तेव्हढी ॲंटिक्लॉकवाईज फिरवताना दाखवलेय. मी अलमोस्ट प्रत्येक वेळी नोट केले हे सुरवातीला नकळत नोट झाले पण नंतर परत परत दिसत राहिले तेव्हा वाटले तिचे विचार प्रवाहाच्या विरूध्द दाखवायला हे मुद्दाम विचारपूर्वक कथेत आलेय. मला त्यामुळे हा छोटा तपशील लेखक किंवा दिग्दर्शक ज्याला कुणाला सुचला त्याच फार कौतुक वाटलं

हे डोसा दिशेचं मला नव्हतं लक्षात आलं.
ती आधीच्या पिरीयड ला आलेली शेजारीण किती कूल असते. आणि नंतरच्या महिन्यात आलेली आत्या तब्येतीचा विशेष विचार न करता ऑर्डर्स सोडत असते स्सतरंजीवर झोप, सगळे कपडे स्वतः धुवून पिळून नदीत डुबकी मारुन कोणाच्या कपड्याला हात न लावता घरी ये' वगैरे. ती आत्या ज्या प्रकारे दणकट पणे खपत असते त्यात 'बाईच्या जातीला हे असले त्रास व्हायचेच,त्यात काय, उगीच नाजूक साजूक लाड नाही करायचे' असे अविर्भाव दिसतात.

सिनेमातल्या सारखे बेशिस्त , इन्सेन्सिटिव्ह, गलिच्छ पुरुष असलेल्या फॅमिलीज माझ्या ओळखीत नाहीत त्यामुळे रिलेटेबल वाटला नसला तरीही सिनेमाचं स्टोरी टेलिंग आवडलं !
सगळेच अ‍ॅक्टर्स ग्रेट आहेत , सिनेमा पाहतोयसं वाटत नाही, कोणाच्या तरी घरी हिडन कॅमेरा लावावा इतका रिअल तरीही बोरिंग न होता एंगेजिंग दिसतो सिनेमा , फुल्ल क्रेडिट टु डिरेक्टर !

फुल्ल क्रेडिट टु डिरेक्टर !>> अगदी. चेहरे किंवा पुर्ण व्यक्ती कॅमेरात न घेता फोकस पदार्थ रिसीपी करण्याची पद्धत आणि ते करणारे हात अशी ठेवल्याने हातामागच्या चेहऱ्याचे दुय्यम असणेही अधोरेखीत करायला मदत झाली. काही गोष्टी माझ्या आजूबाजूला न घडणाऱ्या असल्या तरी कुठे तरी घडत असतील ठिपक्या ठिपक्यात इथे तिथे. इथे सगळे एकत्र आणलेत ठिपके त्यामुळे ठिके ते ॲक्सेप्ट होतं

तरी प्रश्नं आलाच मनात कि मॉडर्न घरात वाढलेली सधन मुलगी एकदमच चुलीवर /पाट्यावर स्वयंपाक करत असलेल्या जुन्या पध्दतीच्या पारंपारीक घरात मुळात लग्नं करून गेलीच कशी .. असो.. बेनिफिट ऑफ डाउट !

तितकं लक्षात आलं नसेल. घरं पाहता मुलाकडचे जास्त श्रीमंत वाटतात. घरात वॉशिंग मशिन्/मिक्सर/ आधुनिक सोयी आहेत इतकंच पाहिलं असेल. हे सर्व असूनही लोक पाट्यावरचीच चटणी. चुलीवरचाच भात, हाताने धुतलेलेच कपडे रोज मागतील अशी कल्पना नसेल. (खूपदा खूप डायरेक्ट प्रश्न विचारता येत नाहीत, एकमेकांशी बोलायला वेळ कमी दिला जातो.)
हे सर्व नीट स्पष्ट हवं हे मात्र खरं.

कदाचित दोन्हीकडून आपापल्या घरी जे चालत तेच कॉमन आहे असा समज असेल म्हणून त्यावर मुद्दाम चर्चा झाली नसेल. (कदाचित म्हणून शेवटी दुसरी पत्नी साडीत दाखवली असेल म्हणजे आधीच्यावेळच्या गृहितकांवरुन आत्ता अजून चौकट स्पष्ट करण्याचा प्रकार. ती हि जर कधी परत लग्नाचा विचार करेल तर आधीच्या लग्नात जे खटकले ते नाही ना याचा फिल्टर लावेल)

त्याही पेक्षा मला प्लंबरला कॉल लावण्यासाठी नवऱ्यावर का अवलंबून रहावे लागले तिला हे नाही समजले. म्हणजे ती ज्या प्रकारच्या घरातून आलेय, ती जशी आहे त्यावरून ती हे सहज हॅंडल करु शकेल स्वतः असे वाटले. अर्थात सिनेमात लेखक दिग्दर्शकाला काही चौकटी स्पष्ट करायच्या आहेत कथेच्या माध्यमातून म्हणून तसे दाखवले असावे असे म्हणून मी दिले सोडून तो भाग

लहान गावात प्लंबर सहज उपलब्ध होतो असं नाही. ती तिथे नवीन आहे, त्यामुळे फारशी माहिती नाही हेही कारण असू शकेल.
तुम्ही कुणी शेफाली छाया (शाह)ची ज्यूस नावाची शॉर्ट फिल्म पाहिली आहे का? पाहिली नसेल तर नक्की पहा!
https://youtu.be/R-Sk7fQGIjE

When woman from the home is told (whether mildly or not) to stay indoors and produce kids only, why should she take responsibility of calling plumbers etc? The masters of the house who think they are wiser than women should do this.. she told repeatedly to call plumber to which husband just shrugged shoulders...

She opened her laptop to apply for job.. if she starts doing work like calling plumber etc, tomorrow that too will get added to her responsibilities... like that idiot father in law who says he has not yet brushed because nobody gave brush n paste in his hands....

There are two type of people, one are those who do things without knowing that they are doing wrong..

recently saw one short film or read here on Maayboli one story, don’t remember exactly.. where the woman always faces this issue of not getting due credit for her work.. she keeps suffering silently till she musters courage to raise her voice one day.. the male bosses realise at that time the mistake they were making and they change their ways of work.. these type of people can be corrected... like many women have written above how they have corrected men in their homes..

There is second type who strongly believe that what they are doing is right... such people cannot be corrected..

in the movie, when father in law says he was not given brush n paste, daughter in law talks to her husband about it, but she is told that it’s ok to give brush in his hand, he is like father.. totally ignoring that if her father was also needed giving brush in hand, she wouldn’t hv complained, she would hv accepted this as normal behaviour. Mother in law too tells husband on phone to start eating cooker rice but old man doesn’t listen.. and he doesn’t create scene or shouts.. he tells daughter in law nicely that his clothes should be handwashed or rice should be cooked on wooden stove.. these people are not correctable....

At divorce table, wife must hv mentioned what all things she found hard to adjust.. husband must hv heard all that but his behaviour doesn’t change.. he is same with second wife..

त्याही पेक्षा मला प्लंबरला कॉल लावण्यासाठी नवऱ्यावर का अवलंबून रहावे लागले तिला हे नाही समजले. म्हणजे ती ज्या प्रकारच्या घरातून आलेय, ती जशी आहे त्यावरून ती हे सहज हॅंडल करु शकेल स्वतः असे वाटले.
<<
Oh yes , even for sanitary pads ,she requested her husband to get it !
Wondering if she was not allowed to/had access to go to medical stores!

idiot father in law who says he has not yet brushed because nobody gave brush >>> होना. अगदी बबड्याच आठवला.

When she gets period first time after m-I-l departure, husband calls maid to houseWork... f-I-l must hv realised then that d-I-l is not following rules seriously.. so second time his sister is called to ensure that everything is done properly... else snake will bite Happy Happy snakes don’t spare gulf returnees.. Happy Happy

खाणं चौकशी:
त्यात ती गॅसवर सोर्‍या सारखा उंच उभा प्रकार ठेवते आणि टेबलवर थेट त्या सोर्‍यातून बंदूकीसारखे काढून लोकांना काहीतरी वाढते ते काय होते? वेगळ्या प्रकारचा भात का?

अनु..तो पुट्टु असावा.सोर्यासारख्या पात्रात बनवतात.
(मी सिनेमा पाहिला नाहीये पण इथे चर्चा वाचतेय)

ओह अच्छा. म्हणजे उसळ भात.
आणि ते आधी एकमेकांबरोबर् शिरवळ्या/इडियाप्पम आणि अंडा करी की असे काहीतरी वेगळे कॉम्बीनेशन खात असतात ना?
(खाणार कसं दोन्ही एकमेकांबरोबर?)

प्रश्न तिला प्लम्बर बोलवता येत नाही का हा नसून इतरांनाही तो बोलवता येतो पण सोयिस्कर पणे विसरले जाते, हा आहे.
हल्लीच्या स्त्रियांनी केलेल्या बर्याचश्या सो काॅल्ड प्रगत्या या " घरच्या (महान) पुरूषाला कशाला अशा क्षुल्लक गोष्टीत गुंतवायचे? बाईनेच चटचट करून टाकले पाहिजे" या मिसोजिनीस्ट विचारातून झाल्या आहेत. ठळक उदा म्हणजे दुचाकी चालवणे व त्यावरून भाजी-मुलांची ने-आण करणे, सिलिंडर जोडणे, मोबाईलवरून प्लम्बर-इलेक्ट्रिशन बोलवणे वगैरे. आता फोनवर मुलांचे क्लासेस add झाले त्यात.
मुवीमधली ती तसं तर बरंच काही करू शकण्याइतकी समर्थ आहे पण प्रत्येक छोटी गोष्ट विचारतेच ना घरच्या लोकांना. तसंच हे प्लम्बर पॅड वगैरेही. दिवसभर राब राब राबल्यावर हे एक छोटेसे काम दुसरं कोणी करू शकत असेल (म्हणजे त्यांची महान सौस्कृती तसं करू देत असेल) तर तिथेही तिनेच आपापलं बघून घ्यावं अशी अपेक्षा का?

प्रश्न तिला प्लम्बर बोलवता येत नाही का हा नसून इतरांनाही तो बोलवता येतो पण सोयिस्कर पणे विसरले जाते, हा आहे.
हल्लीच्या स्त्रियांनी केलेल्या बर्याचश्या सो काॅल्ड प्रगत्या या " घरच्या (महान) पुरूषाला कशाला अशा क्षुल्लक गोष्टीत गुंतवायचे? बाईनेच चटचट करून टाकले पाहिजे" या मिसोजिनीस्ट विचारातून झाल्या आहेत.
<< तसं नाही, आय मिन बेसिक गोष्टीसाठी तिला अजिबात घरातून बाहेर पडता येत नाही/ अत्यावश्यक गोष्टींसाठी अवलंबून असणे प्रकाराचे नवल वाटले, कंप्लिट हाउस अरेस्ट लाइफस्टाइल वाटली तिची !
बाकी तुमचा मुद्दा बरोबर आहे.

मिसोजिनी नाही. आपले प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे - स्त्री असो की पुरूष. स्कूटरचे चाक पंक्चर झाले तर नवरा तिच्यावर अवलंबून आहे का? नाही. तो प्रश्न सोडवायला आवश्यक वेळ, पैसा, सत्ता त्याला आहे. (इथे सत्ता म्हणजे मोकळीक, माहिती इ सर्व घटक). सिंक तुंबल तर त्याचा थेट त्रास तिला होतो मग तिला तो त्रास दूर करण्यासाठी आवश्यक तो पैसा, वेळ, इ तिला उपलब्ध पाहिजेच. त्या घरात असे कोणते घटक आहेत की जे तिला तिच्या तिच्या अडचणी दूर करण्यास अकार्यक्षम करतात हे विचारायलाच हवे. ह्यात मिसोजिनी काही नाही.
आता विचाराल घर त्याचेही नाही का, मग त्याच्याकडून प्लंबरला निरोपाइतकी पण का अपेक्षा ठेवत नाही? तो माणूस सैपाकघरात कधीही काम करत नाही. सिंक बिघडल्यावर तो तातडीने काही करेल ही अपेक्षा करणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे. इथे वर अनेकींनी लिहील्याप्रमाणे लावू तशा सवयी लागतात. मुलीला त्या घरातील लागतात, त्यांना मुलीने लावलेल्या लागतात. तेव्हा वेळीच योग्य पावले हवी.

Pages