आईला काय आवडते / What Mom Likes

Submitted by अनिंद्य on 14 March, 2021 - 08:23

.... फार छान चव आहे ह्याची पण माझ्या आईसारखे नाही जमले... जगाच्या पाठीवर कुठेही हे वाक्य ऐकायला मिळू शकते. प्रत्येकाला आपल्या आईच्या हातची सर आणि चव जगात दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाही असे हमखास वाटत असते. 'आईच्या हातचे जेवण' हळवा कोपरा असतो खरा. घर-नोकरी-करियर सांभाळून आपल्या मुलामुलींना उत्तम पदार्थ रांधून खिलवण्यासाठी भरपूर कष्ट उपासणाऱ्या, त्यांची हौस पुरवणाऱ्या आयाही सर्वत्र मुबलक दिसतात. रोज नाही जमले तरी बहुतेक कुटुंबात वाढदिवस / विशेष सिलेब्रेशन असले की 'आईच्या हातची' अशी एखादी खास डिश असतेच आणि कितीही धामधुमीत असल्या तरी तो पदार्थ करून सेलेब्रेशनला 'चार चांद' लावणाऱ्या आया (आईचे अनेकवचन हो) सगळीकडेच ! तीच तऱ्हा माहेरवाशिणी मुलींसाठी, दूरवर स्थायिक मुला-मुलींसाठी काय करू नी काय नको असे होणाऱ्या आयांची.

हे सगळे ठीक, आईचे काय? जुन्या काळी स्रियांच्या आवडीला फारसे महत्व नव्हते, मोठ्या कुटुंबात सगळे पुरुष आणि लहान मुले जेवली की शेवटच्या पंगतीत जे उरले ते खाणाऱ्या आज्या-आत्या-मावश्या-आया हे सामान्य चित्र. आता ते नक्की बदलले आहे. स्वयंपाकघरही एकट्या स्त्रीचीच जबाबदारी असे राहिले नाही. छोट्या कुटुंबामुळे, सुलभ मदतनीसांमुळे घरातील सर्वांच्याच आवडीनिवडीकडे लक्ष देणें शक्य आहे.पण तरीही आईला काय आवडते हा विषय तसा दुर्लक्षितच आहे.

तर मंडळी, 'आईला काय आवडते' यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

आईला काय आवडते? तिच्यासाठी तुम्ही खास कोणते पदार्थ करता किंवा करावेसे वाटतात? की तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीकडे कधी फारसे लक्षच गेले नाही ? खूप दिवसांनी आईला भेटल्यावर तिच्यासाठी स्वहस्ते खास तिच्या आवडीचे काय कराल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनिंद्य.

एफ. वाय. नंतर सातच्या कॉलेजला जाताना, पहाटे साडेपाचला बाबा मला उठवायचे. मी कॉलेजला चालत जायचे, रहायचो ते एक टोक, कॉलेज दुसऱ्या टोकाला, अर्धा तास तरी लागायचा चालायला. मी कधीच सकाळी खात नाही काही. चहा, दुध पीत नाही पण कॉफी पिते, कॉलेजला निघताना मला हवी तशी कॉफी करून माझ्या हातात बाबा आणून द्यायचे, मला हवी तशी नेसकॉफी करणे फक्त त्यांनाच जमायचं, ती पिऊन मी निघायचे. आई अर्थात बाबांचा डबा करण्यात बिझी असायची. मला नेहेमीचं आईच्या बरोबरीने सकाळी काही कामं स्वत:हून आमच्यासाठी करणारे बाबा आठवतात. सर्वात आधी उठून सर्वांसाठी चहा करणारे आणि मला निघताना कॉफी देणारे.

मी काही गोड करून नेलं किंवा कोकणातले काही विशिष्ट प्रकार करून नेलेकी खूप खुश होतात ते, कालच केळफूल भाजी नेलेली, मागच्या आठवड्यात फणसाची दिलेली. हे सर्व ओगले products रेडीमेड मिळते त्याचं केलं. आईसाठी वडे वगैरे करून पाठवले किंवा रेडीमेड आणलं तर आवडतं तिला तसेच महाशिवरात्रीला उपासाचे भाजणीचे वडे पाठवले होते.

तुमच्या ह्या धाग्यामुळे दोघांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करता आली, परत एकदा धन्यवाद.

माझ्या दोन्ही आईंनी, म्हणजे ए आणि अहो, दोघींनीही माझे बेक्कार लाड केले आहेत. गेली 3 वर्षे भावाच्या बदलीमुळे ए आई माझ्याबरोबर आहे, त्यामुळे तिचे लाड करायची संधी मिळाली, अहो आईचे लाड करायला मी त्यांना माझ्याकडे बोलावते किंवा डबा घेऊन जाते.कोरोनामुळे सध्या दुदर पर्याय जास्त वापरला जातो.
ए आईला ताकाची कढी, कैरीची आमटी, कोलंबी भात, ओल्या काजूची / फणसाची भाजी, सगळी लोणची
अहो आईंना सुक्का अंडा मसाला, चिकन बिर्याणी, वाटाणे भात, हळदीचे लोणचे, थालीपीठ भाजणी
मी केलेल्या स्वयंपाक किंवा पदार्थांचे त्यांनी केलेल्या कौतुकाइतका दुसरा काही आनंद नाही !

माझ्या आई ला पाणीपुरी खूप आवडते पण तिला पाणीपुरी च्या स्टॉल वॉर उभं राहून खायला लाज वाटते. त्या भैया समोर उभं राहून तोंडाचा आ करणं शोभत का वगैरे वगैरे Happy
जेव्हा जेव्हा मी सोबत असते तेव्हा मी तिला मुद्दाम घेऊन जाते, आता हळू हळू संकोच कमी झालाय.

माझ्या आईला मासे फार आवडतात . पण मला माशांचा स्वयंपाक करता येत नाही .
पण बाहेरून कधी जेवण मागवलं किन्वा कुठे बाहेर जेवायला गेलो तर चांगले मासे मिळतील असं नक्की बघतो .
तिने आवडीने , पोटभरून खाल्ले की मग आम्हाला बरं वाटतं .

चितळेची तुपात तळलेली मऊ जिलेबी, मऊ, तुपकट मैसूरपाक, साय घातलेला चहा, गरम गरम पातळ तव्यातल्या पोळ्या, मटणाचे अळणी, बिर्याणी आणि ओले बोम्बील अगदी जीव कि प्राण

छान धागा!

@ rr38
... मी केलेल्या पदार्थांचे त्यांनी केलेल्या कौतुकाइतका दुसरा काही आनंद नाही !...... नक्कीच Happy

@ सियोना
@ अथेना
@ स्वस्ति
@ अन्जू
@ ऑर्किड
@ ए_श्रद्धा

छान अनुभव आणि पदार्थांची यादी.

जय हो !

@ mrunali.samad

मनमोकळे शेयरिंग आवडले. पूर्वी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असे होतच असावे. हौसमौज आधी लहानांची. मोठी माणसे - विशेषतः आई वर्ग मागे राहत असे. आता त्यांची हौसमौज आपण करण्यात असलेला आनंद वेगळाच आहे, तुम्हाला तो लुटता येत आहे हे फार आवडले Happy सगळे असे भाग्यवान नसतात.

@ मीरा..
स्वतः कुक करणे महत्वाचे. आई मंडळींनीसुद्धा आपल्याला आवडणारे पदार्थ कुठूनतरी शिकूनच घेतले असतात ना Happy
आईचा सहवास फारच कमी मिळाला, ती गेली तोवर जेमतेम चहा करायला शिकलो होतो मी आणि धाकट्या बहिणी.

@ प्रज्ञा९

....."आईच्या हातचं" हे स्पेशल असतंच, पण जे पदार्थ फक्त आईच मस्त करते ते मुद्दाम शिकून तिला करून खाऊ घातले तर ती मनापासून खूष होईल. निदान एक तरी पदार्थ .....

You got it totally !

@ sneha1

.... अनिंद्य, मधे समदा चा दिवाळी अंक वाचला. त्यामधे एक भीषण शुंदोर भोजन नावाचा एक लेख आहे, त्यातला काही भाग तुमच्या कलकत्त्याच्या खाद्यजीवनाबद्दलच्या लेखातून घेतला आहे असे वाटते....

मी तो अंक नाही बघितला. माझा लेख मी ज्यांच्यासाठी लिहिला होता त्यांनी व्यवस्थित नावासकट छापला आणि मानधन पाठवले. एका अन्य संपादक भगिनीने तो लेख फोनवर परवानगी घेऊन तिच्या दिवाळी अंकात पुनःप्रकाशित केला, मला अंक आणि मानधनाचा चेकही पाठवला. माबो आणि मिपावर मी स्वतःच प्रकाशित केलाय आणि काही हजार लोकांनी वाचलाय. त्याउप्पर कोणी कन्टेन्ट ढापले असेल तर its a shame ! किंवा इमिटेशन इज द बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी म्हणायचे Happy

किती छान धागा. माझ्या आईला मी केलेले रवा बेसन लाडू फार आवडतात तसेच गोडाचा शिरा आणि पास्ता पण माझ्या हातचा आवडतो. तीला sugar आहे पण. सो बेसिकली सगळे गोड पदार्थ आवडतात Lol
मातोश्रींचा बर्थडे होळीच्या दिवशी असतो त्यामुळे पुरणपोळी तर होतेच पण यंदा अजून काहीतरी तिच्या आवडीचे करेन Happy . एवढा एकच दिवस आहे जेव्हा तिला तिच्या आवडीचे खायला आमची मुभा असते Wink ( पथ्यामुळे )

.. खूप छान बाफ. मातृदिनाला काढायला हवा होता. ... हो, तेंव्हा सुचले नाही.
>>>>>
बरे झाले तेव्हा काढला नाही. उगाच ते दिड दिवसाचा गणपती पुजल्यासारखे झाले असते. आईच्या आवडीवर बोलायला मातृदिनाचा मुहुर्त कश्याला हवाय. फार आवडला धागा. त्यामिनित्ताने जे लोकं आईच्या आवडीचा मुद्दाम विचार करत नसतील ते देखील करू लागतील.

@ टॉपिक, आमच्याकडे लहानपणापासूनच तीनचार लोकांचे छोटे कुटुंब. त्यामुळे एकत्रच टोप मांडून जेवायची पद्धत असल्याने आणि लिमिटेड पदार्थ आपण कमी घेत दुसर्‍याला जास्त वा ज्याला तो आवडतो त्याला जास्त मिळावा हे बघितले जात असल्याने खाण्यापिण्याच्या एकमेकांच्या आवडी जपल्या जातातच. उदाहरणार्थ कोलंबी असली की आईला लहान साईजच्या आवडत असल्याने आपल्या ताटातील बारक्या बारक्या कोलंबी वेचून आईच्या ताटात सरकावणे, तसेच चिवडा वाटीत घेतला की त्यातील आईच्या आवडीचे शेंगदाणे काढून आईच्या हातावर प्रसादासारखे ठेवणे अश्या गोष्टी सहज घडतात. मला स्वयंपाक येत नसल्याने मुद्दाम तिला काही करून घातले असे होत नाही, पण बाहेरून ऑर्डर करताना तिलाच पहिले काय खाणार विचारले जाते, स्पेशली ती बरेच वार पाळत असल्याने ती नॉनवेज खाणार नसेल तर मला वर्षाचे ३६५ दिवस नॉनवेज चालत असूनही वेजच मागवले जाते. कारण आई आवडीने नॉनवेज खाणारी असूनही जर वारामुळे वेज खाणार असेल तर आपल्यालाही नॉनवेज ऑर्डर करून खाण्याची मजा कशी येणार..

बाकी आईला आईस्क्रीम भयंकर आवडते, भले ते बोलून तिने कधीच दाखवले नाही. पण मध्यरात्रीही तिला आईसक्रीम खाणार का विचारले तर विचार केल्यासारखे करून, "दे थोडीशी" असे म्हणते. त्यानंतर मी मोठा वाडगा भरून दिला तरी तो मस्त साफ करते. मग मी अजून अर्धा भरतो तो सुद्धा स्वाहा होतो Happy
बाकी तिचे नेहमीचे जेवण किती आहे हे ठाऊक आहे. त्यामुळे कुठला पदार्थ असल्यावर ती जास्त जेवते याची कल्पना आहे. स्पेशली बाहेरून काही ऑर्डर करतो तेव्हा सर्व्ह करणे ही माझीच ड्युटी असल्याने लक्षात येते.

@ भाग्यश्री१२३,

मधुमेह असला की गोड जरा जास्तच आवडायला लागते Happy

@ रेणु,

सुरळीच्या वड्या आणि उंधीयू - एकदम गर्वी गुजरातला पोहोचलो मनानी Happy

@ ऋन्मेऽऽष,

...त्यानिमित्ताने जे लोकं आईच्या आवडीचा मुद्दाम विचार करत नसतील ते देखील करू लागतील....

तथास्तु !

तुमचा 'थोडेच' आईस्क्रीम खाण्याचा किस्सा मस्त आहे Happy

प्रतिसादात काहींनी सुचवल्यानुसार आज मातृदिनानिमित्त धागा वर काढत आहे Happy

माझ्या आईला गुलाबजाम आणि मी केलेला मसालेभात खूप आवडतो
आणि अहो आईंना मी केलेल्या भाकरी खूप आवडतात
आमरस हा दोन्ही आयांचा आवडता पदार्थ आहे

माझ्या आईला उशिरापर्यंत झोपायला आवडतं.. जशी तीने नोकरी सोडली तशी ती ९ः३०च्या आधी उठलेली कधी आठवत नाही , अगदी सणालाही फार काही वेगळं नसतं.. माझा बाबा पण तीला उठवायला जायचा नाही त्यामुळे आम्हीही तीला हवं तितकं मनसोक्त सकाळी झोपू देतो

आईला विविधभारती लावून गाणी ऐकणे अतिप्रिय होते. तिच्या डिमेन्शियातही मी बाबांना म्हणे गाणी लावून ठेवत जा. तिच्या स्मृती नक्की गाण्यांशी दाटपणे निगडीत असतील. काही नाही तर तिला गाण्यांचे शब्द तरी आठवतीलच.
ती विशेष आस्तिक नव्हती पण संध्याकाळी पोळ्या करताना - रामरक्षा म्हणे.
रामाची धूपारती पाठ होती तिला. 'धूपदीप झाला आता कर्पूर आरती| छत्रसिंहासनी बैसिले जानकीपती बैसिले अयोध्यानृपती'
-------------
भडंग, चिवटसा पोह्यांचा चिवडा, कांदेपोहे, दडपे पोहे आवडत तिला. मी ते केले असते आज. साडेतीन-चार वाजता, चहा लागेच. उन्हात कुठे बसस्टॉपवरती उभे राहीलो की ती मला तिच्या सावलीत उभी करत असे.

<<उहात कुठे बसस्टॉपवरती उभे राहीलो की ती मला तिच्या सावलीत उभी करत असे>>>
अगदी अगदी... आणि आता मी देखील नकळतपणे माझ्या मुलीला असेच करते.

>>>>>बाकी आईला आईस्क्रीम भयंकर आवडते, भले ते बोलून तिने कधीच दाखवले नाही. पण मध्यरात्रीही तिला आईसक्रीम खाणार का विचारले तर विचार केल्यासारखे करून, "दे थोडीशी" असे म्हणते. त्यानंतर मी मोठा वाडगा भरून दिला तरी तो मस्त साफ करते. मग मी अजून अर्धा भरतो तो सुद्धा स्वाहा होतो Happy

हाहाहा मलाही आईसक्रीम अतिप्रिय!!

माझ्या आईला आंबे खूप आवडायचे . इतकं की जूनच्या शेवटापर्यंत ती आंबे खायचे सोडत नसे.
दुसर एक म्हंजे तिला व्हिक्टोरियन पद्धतीची घरे खूप आवडत. आमचं घरही तसेच सजवल होत तिने

भारीच ! माझ्या आईला veg manchurian खूप आवडतात. खूप वर्ष आईला काय आवडतं हेच माहिती नव्हतं कारण ती सतत आमचाच विचार करायची आमच्याच आवडीनिवडी बघायची पण आता आम्ही दोघं मोठे झालो आणि त्यांच्या आवडीनिवडी जपायला लागलो. आई वडील दोघांना शुगर आहे, एकदा नवऱ्याने दोघांना amul चे sugarfree icecream आणले तेव्हाचा त्यांचा आनंद खूप सुखावून गेला.

@ आईची_लेक
तुमच्या सदस्यनामातच तुमचे मातृप्रेम दिसून येत आहे Happy
मसालेभात आणि भाकरी दोन्ही पदार्थ आई मंडळीला आवडण्याइतपत लेव्हलचे जमणे म्हणजे सुग्रणपणाचे लक्षण. ब्रावो.

@ म्हाळसा

खरे आहे. 'मनसोक्त झोप' हा सुद्धा दुर्लभ वस्तूंमध्ये मोजण्याचा आयटम झालाय.
लकी आहेत तुमच्या आईसाहेब. नॉक ऑन द वूड.

@ सामो
@ मनिम्याऊ,

आईची सावली, 'मातृ-छत्र' हे शब्द उगाच नाहीत आपल्याकडे Happy

'जिंदगी धूप तुम घना साया' ह्या ओळी मला आईसाठी लिहिलेल्या वाटतात.

लहानपणी आईला काय आवडतं हे विचारलंच नाही.... ती नोकरी आणि दोन मुलं एका हाती वाढविण्यातच बिचारी थकुन जायची. पण नंतर माझं लग्न झाल्यावर तिला मी केलेले बटाटे वडे, सोलकढी खूप आवडते हे न सांगता माझ्या लक्षात आलं.... एकंदरीतच तळलेले चटपटीत पदार्थ तिला आवडतात पण वयपरत्वे आता जास्त खात नाही. पण गंमत म्हणजे खूप वेळ साग्रसंगीत एखादी रेसिपी करण्यात गुंतले असेल तर तिला आवडत नाही. झटपट काय ते आटपावं या पठडीतली ती आहे!

@ सान्वी
खूप वर्ष आईला काय आवडतं हेच माहिती नव्हतं...
@ abhishruti
लहानपणी आईला काय आवडतं हे विचारलंच नाही....

हे आपल्यापैकी अनेकांचं होत असावं.
आईमंडळी स्वतःहून सांगतील ही शक्यता कमीच.

आता तुम्ही आईची खास आवड लक्षात ठेवून पुरवत आहात हे फार आवडले. मे युअर ट्राईब ग्रो !

माझ्या आईला काय आवडत हे लक्षात येण्याएवढी मी नक्कीच मोठी होते ती गेली तेव्हा ,पण त्यावेळी ही अक्कल नव्हती, तो विचार नव्हता , maturity नव्हती. त्यामुळे आपल्या आईला काय आवडत होतं हा मी विचार करते ( म्हणजे ह्या धाग्यासाठी नाही एरवी ही हा विचार मनात येतो कधी कधी ) तेव्हा मी एक ही गोष्ट सांगू शकत नाही , आपल्या आईला काय आवडत होत हे आपल्याला जरा ही माहीत नाही ह्या विचाराने मी जास्तच उदास होते , अपराधी पणाची भावना मनात दाटून येते.

तरुण मुला मुलींनो , आपल्या आईच्या आवडी निवडी लक्षात घ्या आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी देऊन तिला आनन्द द्या आणि तुम्ही ही आनंदित व्हा.

Pages