आईला काय आवडते / What Mom Likes

Submitted by अनिंद्य on 14 March, 2021 - 08:23

.... फार छान चव आहे ह्याची पण माझ्या आईसारखे नाही जमले... जगाच्या पाठीवर कुठेही हे वाक्य ऐकायला मिळू शकते. प्रत्येकाला आपल्या आईच्या हातची सर आणि चव जगात दुसऱ्या कुणाच्याही हाताला नाही असे हमखास वाटत असते. 'आईच्या हातचे जेवण' हळवा कोपरा असतो खरा. घर-नोकरी-करियर सांभाळून आपल्या मुलामुलींना उत्तम पदार्थ रांधून खिलवण्यासाठी भरपूर कष्ट उपासणाऱ्या, त्यांची हौस पुरवणाऱ्या आयाही सर्वत्र मुबलक दिसतात. रोज नाही जमले तरी बहुतेक कुटुंबात वाढदिवस / विशेष सिलेब्रेशन असले की 'आईच्या हातची' अशी एखादी खास डिश असतेच आणि कितीही धामधुमीत असल्या तरी तो पदार्थ करून सेलेब्रेशनला 'चार चांद' लावणाऱ्या आया (आईचे अनेकवचन हो) सगळीकडेच ! तीच तऱ्हा माहेरवाशिणी मुलींसाठी, दूरवर स्थायिक मुला-मुलींसाठी काय करू नी काय नको असे होणाऱ्या आयांची.

हे सगळे ठीक, आईचे काय? जुन्या काळी स्रियांच्या आवडीला फारसे महत्व नव्हते, मोठ्या कुटुंबात सगळे पुरुष आणि लहान मुले जेवली की शेवटच्या पंगतीत जे उरले ते खाणाऱ्या आज्या-आत्या-मावश्या-आया हे सामान्य चित्र. आता ते नक्की बदलले आहे. स्वयंपाकघरही एकट्या स्त्रीचीच जबाबदारी असे राहिले नाही. छोट्या कुटुंबामुळे, सुलभ मदतनीसांमुळे घरातील सर्वांच्याच आवडीनिवडीकडे लक्ष देणें शक्य आहे.पण तरीही आईला काय आवडते हा विषय तसा दुर्लक्षितच आहे.

तर मंडळी, 'आईला काय आवडते' यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

आईला काय आवडते? तिच्यासाठी तुम्ही खास कोणते पदार्थ करता किंवा करावेसे वाटतात? की तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीकडे कधी फारसे लक्षच गेले नाही ? खूप दिवसांनी आईला भेटल्यावर तिच्यासाठी स्वहस्ते खास तिच्या आवडीचे काय कराल ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड विषयावर धागा काढला आहे. अतिशय आवडला.
मला आई आणि बाबा दोघेही नाहीत Sad पण आई होती तेव्हा मी तिच्या आवडीची गवारीची भाजी नेहमी बनवायचे. आई येणार कळलं की स्वयंपाकाच्या मावशी गवार निवडुन ठेवायच्याच. हा पदार्थ मी नेहमी स्वतः कुक केला आहे. आणि बाबासाठी मुगडाळ घालून केलेली मेथीची भाजी.

धाग्याचा विषय खूप चांगला आहे.

माझ्या आईला पुरणपोळी फार आवडते. ती स्वतः सुगरण आहेच पण जेव्हा कधी कोणाकडेही पुरणपोळी असते त्यावेळी आवडीने जेवते.

ठेव बाजूला तुझ्यातला देव आई
जेवले आहेत सगळे, तू जेव आई..
ही वैभव जोशी ची कविता आठवली.
माझ्या आईला कुस्करलेल्या पोळीत कच्चा कांदा, तेल, मीठ, तिखट घालून फार आवडते .

दूध उतू जात असेल आणि आपण चपळाईने जाऊन गॅस बंद केला तर सगळ्या आई वर्गाला ते आवडते असा माझा एकंदर अनुभव आहे.

किती छान धागा!!
आम्ही लहान असताना परिस्थिती बेताची होती.. काही खास पदार्थ कधी बाहेरून आणला किंवा कधी बाहेर गेल्यावर ओली भेळ,वडापाव असं काही घेतले कि आई म्हणायची मला नाही आवडत...लहानपणी ते खरंच वाटायचं... समज आल्यावर कळलं..पैसे वाचावेत..आम्ही मुलांनी पोटभर खावं म्हणून आई असं म्हणायची...मग जसं कळायला लागलं तसं आधी आईला खा म्हणून मागे लागायचो आम्ही....
आईची कधी हौसमौज पण जास्त झाली नव्हती... लहान वयात लग्न झालेले तीचे...मला नोकरी लागल्यावर आईसाठी खरेदी, खाणे, फिरणे फार मज्जा केली....
आता आईला वर्षा-दोन वर्षांतून भेटणे होते...आईला माझ्या हातचं मी सासरच्या पद्धतीने बनवलेले नॉनव्हेज पदार्थ आवडतात...

माझ्या आईला पूर्वीपासून आईस्क्रीम आणि चाॅकोलेट आवडते. त्यामुळे जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा मी तिला आईस्क्रीम खायला नक्की नेते... पूर्वी कराडच्या महेश कोल्ड्रिंक मधे खूप वेळा जायचो दोघी. आता चिंचवड च्या शर्मा च्या दुकानात. तिला आईसक्रीम खाताना पाहून खूप आनंद वाटतो.

"आईच्या हातचं" हे स्पेशल असतंच, पण जे पदार्थ फक्त आईच मस्त करते ते मुद्दाम शिकून तिला करून खाऊ घातले तर ती मनापासून खूष होईल. निदान एक तरी पदार्थ हरकत नाही.

फक्त आईच नाही तर बाबाही आम्हाला छान छान करून खायला घालायचे, काही पदार्थ बाबांच्या हातचेच हवे असायचे. बाबा धिरडी फार छान करायचे आणि सर्वांना खायला घालून स्वत: शेवटी खायचे. तसेच तेल, तिखट, मीठ, कांदा घालून जाडे पोहे फार सुंदर करायचे, कच्चेच सर्व कालवायचे. आईचा बऱ्याच गोष्टीत हातखंडा होताच, काही वर्षांपूर्वीपर्यंत तर भाजणी आणि गोडा मसाला, चहाचा मसाला स्वहस्ते करून आम्हाला द्यायची. आता दोघेही वयस्क आहेत त्यामुळे आम्ही तिघेही भावंडे त्यांना काय हवं नको ते, आवडणारे करत असतो. दोघांनीही आमच्यासाठी खूप केलंय. बाबांना गोड हवं असते, तसंच दोघांना चमचमीत पण हवं असते. फक्त आता जास्त जात नाही.

आईला भारी आवड व नेहमीचे तिचे स्वप्न की, सुट्टीच्या दिवशी, मी ९ च्या ठोक्याच्या आत अंघोळ करून तयार होवून सुंदर कपडे घालून बसलेले असावे. लहानपणी आणि अगदी आतासुद्धा मी आईच्या घरी गेली की तिच भुणभुण.. तिची शिस्त काही कमी नाही झालेली.
मी सुट्टीच्या दिवशी उशीरा केलेली अंघोळ = मी तिची लाज घालवली( घरात येणार्‍या कामवालींसमोर) असे तिचे समीकरण.
त्यावरून वाद अजुनही होतात.
मी लहान असताना, सरळ बाथरूमात घेवून पाणी ओतायची. आजकाल करु शकत नाही म्हणून बडबडत बसते. Happy

खायला, तिला स्वतःला सर्व इंदोरी पदार्थ. तिचे बालपण इंदोरला गेले असल्याने कचोरी चाट( नुसती कचोरी नाही, इंदोरी कचोरी चाट), पाणीपुरी ( अगदी जीव), हे बाहेरचे खाईल , नाहितर कधीच खात नाही सहसा बाहेरचे. ते सुद्धा तिच्या ओळखीत असलेल्या नेहमीच्या दुकानातून.

घरचे पदार्थात, गोडात मोदक( पातळ कळीचे), पुरणपोळी, जलेबी-मट्ठा, शीरा हे मुख्य करून पण जे काही श्रावणात गोड पदार्थ होतात ते सर्वच कोकणातले पदार्थ.

चहाबरोबर = पातळ घावणे आणि गुळाचा आलं घालून चहा नाहितर
आंबोळी-रस मग त्यावर फक्त दूधाचा कडक वेलची चहा. ह्यात आलं नसलं पाहिजे.
ती खुष झालीच पाहिजे. बरं, हे सर्व घरचेचे केले तर पसंद.
ह्यातले घरगुती पदार्थ मला, तिला आवडतील असे लेवलचं येत नसल्याने, मी जरी तयारी करून दिली तरी खुष.
तिला एखादा पदार्थ आवडला की समजायचं, तो चांगलाच आहे.

खूप छान बाफ. मातृदिनाला काढायला हवा होता. माझ्या आईला पहिल्या वाफेचा गरम भात फार आवडायचा. म्हण जे स्वयंपाक झाला की स्वतःपुरता गरम भात लावून घ्यायची. बरोबर अर्थात साजूक तूप आमटी, पिठले हुलग्याची उसळ अन काय काय.

लसूण घालून केलेला लाल तिखट लावलेला फोडणीचा भात. आणि पोळ्या करताना हात पालथा करून फुलपात्रात पाणी पिणे.

आई फारच लहान पणी म्हणजे आठव्या वर्शी स्वयंपाक संभाळू लागली. घरी शेती होती. भाक र्‍या लवकर बनवून द्याव्या लागत.

माझ्या मम्मीला मी केलेले breakfast and snacks items खुप आवडतात. गोडाचा शिरा तर खुप आवडीचा. जेवण्याच्या वेळी खुपदा तोच बनवायला लावते, पुर्ण जेवण बनलं असलं तरी.

@ आंबट गोड

.....ठेव बाजूला तुझ्यातला देव आई
जेवले आहेत सगळे, तू जेव आई.....

खूप सुंदर ओळी आहेत. अगदी मनातल्या Happy

अनिंद्य...ho अगदी मनातल्या ओळी..किंबहुना मी तर म्हणेन की..
ठेव बाजूला तुझ्यातिल देव आई,
येतील तेव्हा घेतील सगळे..तू जेव, आई!..

Happy

.... येतील तेव्हा घेतील सगळे..तू जेव, आई!....

बरोब्बर !

सगळ्या मखरातल्या देवांनी नैवेद्य आपापला आपणच घेऊन खावा, वाट कसली बघायची त्यात Happy

माझ्या आईला आणि बाबांना माझ्या हातची मटण बिर्याणी आवडते. दर भारतवारीत मी आवर्जून बिर्याणी करते. त्याशिवाय माझ्या हातचे आचारी चिकन, छोले, सांबार हे पदार्थ आईला विशेष आवडतात. स्नॅक्समधे माझ्या हातची कोल्ड कॉफी , बटाटेवडे आणि पावभाजी आवडते. मात्र आईला खाऊपिऊ घालायचा योग तसा दुर्मिळ, ३-४ वर्षांनी होणार्‍या भारतवारीत येतो. तेव्हा आईला आम्हाला खाऊ घालायचे असते आणि मला आणि नवर्‍याला आईबाबांना खाऊपिऊ घालायचे असते. कधी कोण काय बनवणार याचा तक्ताच करावा लागतो. Happy

@ स्वाती२,

दोन्ही बाजूंनी problem of Plenty होतो हे फार आवडले.

@ ऑर्किड,

तुमची यादी छानच आहे, कैरीचे कोयाड म्हणजे काय ?

छान धागा. आईला माझ्या हातच्या रस्साभाज्या आवडायच्या ..
अनिंद्य, मधे समदा चा दिवाळी अंक वाचला. त्यामधे एक भीषण शुंदोर भोजन नावाचा एक लेख आहे, त्यातला काही भाग तुमच्या कलकत्त्याच्या खाद्यजीवनाबद्दलच्या लेखातून घेतला आहे असे वाटते.

@ बोकलत

.....दूध उतू जात असेल आणि आपण चपळाईने जाऊन गॅस बंद केला तर सगळ्या आई वर्गाला ते आवडते...

Bang on Happy

@ सियोना
@ जिद्दु
@ देवरूप
@ रीया
@ फलक से जुदा
@ धनवन्ती
@ Srd

सर्वांचे पदार्थ छान. स्वतः करून आईला दिल्यास त्यांची लज्जत अजून वाढेल यात शंका नाही Happy

@ अमा,

... खूप छान बाफ. मातृदिनाला काढायला हवा होता. ... हो, तेंव्हा सुचले नाही.

माझी आई सुद्धा सर्वात शेवटी जेवायची. ऐनवेळी झटपट केलेले भात आणि हैदराबादी 'खट्टी दाल' किंवा भात आणि कोरडी लसूण चटणी (खास आंध्रा स्टाईलची जहाल तिखट) हे दोन तिचे अत्यंत आवडते पदार्थ. पूर्ण जेवण झालेले असूनही मला नेहेमी पुन्हा तिच्या ताटात जेवावे वाटायचे Happy

@ sumitra

... गोडाचा शिरा ... मला स्वतःला जे मोजकेच पदार्थ चांगले करता येतात त्यापैकी हा एक. मी भरपूर देशी तूप असलेला गुरुद्वारा स्टाईल 'कडाह प्रशाद' करतो. माझ्या 'अहो आईंना' फार आवडणारा Happy

माझ्या आईला सुरळीची वडी, ओल्या नारळाची करंजी( ती पण फक्त जोशी स्वीटस मधलीच), आळूची वडी, पाणी पुरी, ओली भेळ जाम आवडायची.

मला फार काही स्वयंपाक येत नाही.

मी केलेले सॅलड्स आवडीने खायची. तिला माझ्या हातचा सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे हाॅट काॅफी. ...

@ कुमार१,

आभार.

@ अन्जू,

आईसोबत तुमचे बाबाही उत्तम पदार्थ करतात ही तर दुप्पट आनंदाची बाब आहे. तुम्ही तीन भावंडं त्यांच्या आवडीनिवडी जपत आहात, सो गुड !

@ झंपी,

...पदार्थ तिला आवडतील असे लेवलचं येत नसल्याने ... हो अनेकदा हा प्रॉब्लेम पण असतो, विशेषतः आई खूप सुगरण असल्यास Happy

@अनिंद्य आई सुगरण असली की खरच तिला तिच्या एक्सपर्ट लेवल चे काय खाऊ घालावे प्रश्न असतो. माझ्या घरी आई आली की मी तिला ताजे जेवायला वाढले तरी ती माझ्यासाठी जेवायची थांबते. आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत.

Pages