कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सिनेमातला वाटेल पण प्रत्यक्ष घडलेला किस्सा आहे. माझ्या आत्तेभावाच्या मित्राला मुली बघत होते. त्याला एका आडगावातली मुलगी सांगून आली आणि त्या गावात संध्याकाळी कांदेपोह्यांचा कार्यक्रम ठरला. त्याने मुलगी आधी बघितली नव्हती फक्त फोटो पाहिला होता. त्याचाही फोटो मुलीकडे पाठवला होता आणि फोटोवरून तरी पहिली पसंती आली होती. त्याला आपला प्रेमविवाह व्हावा, सिनेमातल्यासारखी नायक नायिकेची चोरून एकांतात भेट व्हावी असं खूप काय काय वाटायचं पण घरचे जरा जुन्या पध्दतीचे असल्याने तसं जमण्याचा चान्स नव्हता. घरचे या कार्यक्रमाला काही कारणाने जाऊ शकत नसल्याने त्यांनी त्याच्या बरोबर काका, आत्या आणि आत्तेभावाला आणि आम्ही अजून १-२ भावंडे आत्याकडे त्यावेळी असल्याने आम्हालाही पाठवले.

गावात आम्ही दुपारी तसे खूप लवकर पोचलो. काय टाईमपास करावा असा विचार करत होतो. आत्या, काका तिथल्या देवळात कीर्तन आणि अजून काही कार्यक्रम चालले होते ते बघायला गेले. मित्राच्या डोक्यात जमल्यास मुलीला संध्याकाळच्या आधी एकट्याने भेटायचा विचार आला! आम्ही मग तिच्या घरासमोरच्या चहाच्या टपरीवर थांबलो, घरातून कोणी बाहेर पडतय का त्यावर लक्ष ठेवून Happy थोड्या वेळाने खरंच मुलगी बाहेर आली आणि निघाली..बहुतेक दुकानांकडे चालली होती. आम्ही अंतर ठेवून तिच्या मागे Happy मग आजूबाजूला रस्त्यात इतर कोणी नाही हे बघून धीर करून मित्र रूबाबाने तिच्याजवळ गेला " मी xxx. खूप वाट पाहात होतो आजची. आपण आत्ता एकट्याने जरा गप्पा मारायच्या का?" त्याने विचारलं. त्या मुलीने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं आणि ती अचानक "गुंड मवाली" म्हणून किंचाळायलाच लागली!! मित्र भयानक घाबरला. २-३ लोकं आरडाओरडा ऐकून आले आणि त्याला दम देऊ लागले. आम्ही मित्राच्या मदतीला धावलो.कोणीतरी तिच्या घरच्यांना घेऊन आले. मग काका आत्याही घाबरून धावत आले.

मग शेवटी उलगडा झाला की मित्र जिच्याशी सलगीने बोलायला गेला होता ती मुलीची जुळी बहीण होती Happy ती शिकायला दुसर्‍या गावात होती आणि आज बहिणीला बघायला येणार म्हणून घरी आली होती! तिने मुलाचा फोटो अजून बघितलाच नव्हता त्यामुळे आपल्याला कोणीतरी मवाली छेडतोय असा तिचा समज झाला!

सगळ्यांना कुठे तोंड लपवू असं झालं होतं कांदे पोह्याच्या कार्यक्रमात मित्राने आणि मुलीने एकमेकांशी चकार शब्दही काढला नाही, कसाबसा आटपून आम्ही तिथून पळालो! नंतर 'योग नाही' असं दोन्हीकडून उत्तर आलं आणि संपर्क संपला Happy

ऑफिसमधल्या कलीगने सांगितलेला किस्सा. त्याच्यासाठी मुली पाहायला सुरुवात झाली तेंव्हाची गोष्ट. त्याच्या काकाला आठवले कि आपल्या मित्राची मुलगी लग्नाची आहे. त्या मित्राने पूर्वी एकदा सांगितले होते कि कोणी चांगला मुलगा असेल तर सुचव. काकाला ते आठवले. मुलगी खूपच चांगली होती. त्यामुळे पुतण्याचे लग्न ठरवून क्रेडीट घेण्यासाठी काका उतावळा झाला. पण मुलगी पाहण्याचा कांदापोहे कार्यक्रम करावा कि नको यावर मुलाचे आईवडील आणि हा काका यांच्यात एकमत होईना. कारण, मुलगी पाहून आल्यानंतर कोणत्याही कारणाने जर मुलाने नकार दिला तर मैत्रीमध्ये कटुता येईल असे त्याला वाटत होते. म्हणून काकाचे मत होते कि पुतण्याला सोबत घेऊन सहजपणे मित्राच्या घरी जायचे आणि मुलगी पाहून जर त्याला पसंत पडलीच तर मग नंतर कांदापोहे कार्यक्रम करायचा. पण अशा रीतीने मुलगा मुलीला आधीच पाहून गेला आहे हे त्यांना लक्षात येणारच, आणि पसंत आहे म्हणून आता केवळ औपचारिकता म्हणून अजून एकदा बघायला आलेत असे त्यांना वाटू शकते, असे मुलाच्या आईवडलांचे मत होते. त्यापेक्षा आताच सर्वजण जाऊन कांदापोहे कार्यक्रम करून मुलीला पाहून येऊ असे त्यांचे म्हणणे होते.

यावर त्यांच्यात एक दोन दिवस खूप वैचारिक काथ्याकुट झाल्यावर अखेर काका जिंकला. पुतण्याला घेऊन त्याने मित्राचे घर गाठले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मित्राला विचारले, "तेजस्विनी काय करते? कुठे आहे?". तर मित्र म्हणाला, "आहे कि. कालच आली आहे" असे म्हणून त्याने, "तेजू, अगं जरा बाहेर ये. बघ कोण आलंय" म्हणून मुलीला बोलावले. कुठून कालच आली आहे? असा विचार काका-पुतणे करतात न करतात तोच तेजस्विनी हातात बाळाला घेऊनच बाहेर आली. म्हणाली "अय्या, काका किती वर्षांनी? कसे आहात? तुम्ही लग्नाला का नाही आलात?". तेजस्विनीचे लग्न होऊन दिड-पावणे दोन वर्ष झाली होती.

मग? मग काही नाही. हवा पाण्याच्या गप्पा मारून काका-पुतणे तिथून बाहेर पडले. आणि कोपऱ्यावर वळून मित्राचे घर नजरेआड होताच दोघांनी गाढवासारखे बेफाम हसून घेतले Happy

भारी आहेत किस्से. मानव यांचे किस्से तर विचित्र लोकांचे नमुने आहेत. टक लावून बघणारे काका Proud त्या मुलीने आधी काकालाच पाठवायचे भेटायला, लोकांचा वेळ कशाला फुकट घालवायचा. IT ची दहा पंधरा वर्षांपूर्वी फारच चलती होती. पॅकेज बघून लोकांचे डोळे पांढरे होत होते.

साधारण पणे मुलगी पहायला जायच्या आधी निदान कल्पना असते की कधी, कुठे आणि किती वाजता जायंच. शनिवार , रविवार म्हणजे आपले फिरायचे दिवस. आम्ही सर्व मिञ हरिश्चंद्र गडावर गेलेेलो. परत येताना संध्याकाळ झालेली आईचा फोन आलेला मामा भेटेल घोटी मध्ये, त्या सोबत जा. मला माहीत नाही कुठे जायंच नी मामाला माहीत नाही की माझा अवतार कसा असेल तो बिचारा मुलीच्या वडिलांसोबत उभा माझी वाट पाहत नी मी हाफ पँट, टी शर्ट ते एकदम मवाली अवतारात हजर झालो. जागेवर नकार भेटला वरुन मला मामा रागावला ते वेगंळच...

मानवदादा, म्हाळसा आणि चिकू, फार भारी किस्से आहेत तुमचे! +1

माझं लहानपण एका पाच भाडेकरू असलेल्या वाड्यात गेलं. त्यामुळे तिथल्या सगळ्या तायांचे दाखवायचे कार्यक्रम आमच्या माडीत व्हायचे. माझ्या आतेबहिण व मावसबहिण एका वयाच्या होत्या तर आधी हिला एक मुलगा दाखवायचे मगं नकार आला की दुसरीला.. असे back to back कार्यक्रम खूप वेळा झालेत. आम्हाला बरे कपडे घालून गप्प बसवायचे खाली.. आम्ही उगाच खाली वर करायचो. बोलाचाली वगैरे पण व्हायची देण्याघेण्याचे ठरायचे. आजोबांच्या शब्दाला फार मान होता त्यामुळे लोक कार्यक्रम कुठेतर "दिवानजींच्या बैठकीत" .. साबुदाण्याचा चिवडा , कांदेपोहे , उन्हाळ्यात पन्हं काय कायं ... कधी कधी बोलाचालीत लग्न मोडायचं मगं एक कुणीतरी उतरून तरातरा निघून जायचं... कुणीतरी खुसफूस करून आजोबांच्या कानात सांगायचं .. मगं ते समजावून पत्रिका वगैरे बघून शक्यतो मोडू द्यायचे नाही. रूसून गेलेल्यांना आम्ही बोलवायला जायचो.
मुलाकडच्यांसोबत आलेली मुलं आम्हाला तुच्छ लेखायची Lol आम्ही त्यांना वरवर करावे ही अपेक्षा असायची. सारखं आमचा टिव्ही लावायची , आम्ही मगं थापा मारायचो खराब झाला आहे .दिवसभर पाहिल्याने तापला आहे. आता लावला तर फ्यूज उडेल. Wink ... आम्ही कुणाचे कुणी नसताना सुद्धा मला नि भावाला खूप ड्रामा पाहता आला आहे.

भावाला मुलगी पहायला गेले होतो तर मुलीची आई नागिणी सारखी जिभ आतबाहेर करत होती. त्यांची ही तिसरी मुलगी होती .. पहिल्या मुलीच्या सासूला आईसमोर नाव ठेवत होती. काही कळत नाही वगैरे... हे जिभ लांब आतबाहेर करत ....... मी म्हटलं इच्छाधारी नागिण असेल Lol

मध्यस्थ प्रकरण १९७० पर्यंत होतं. नंतर स्थळाविषयी माहिती देणाऱ्या मासिकांमुळे कमी झालं.

एका ठिकाणी स्टेशनला रिक्षा केल्यावर पत्ता सांगितला तेव्हा रिक्षावाल्याने ओळखले मुलगा पाहिला चालले आहेत. " मी नेतो तिकडे पण तो दारुड्या आहे. " सांगून सावध केलेले माझ्या नातेवाइकाला.

अजून एक.. आमचा प्रवास मोठा असल्याने मुलीकडच्यानी जेवण बनवून ठेवलं होतं. पसंती प्रत्यक्ष न भेटता आधीच झाल्यात जमा होती, औपचारिकता म्हणून पाहण्याचा कार्यक्रम होता. रात्रभर प्रवास करून सकाळी त्या शहरात पोचल्यावर आम्ही नाश्ता केला होता. जेवण असणार हे माहीत होतं, शिवाय पाहायचा कार्यक्रम म्हंटल्यावर जेवायला उशीर झाला असता म्हणून बऱ्यापैकी खाऊन घेतलं आधीच.त्यांच्या घरी आम्ही पोचल्याबरोबर आधी प्लेटभर पोहे, चिवडा, सफरचंदाच्या फोडी आणि एक लाडू दिला गेला. आलं ना संकट! प्लेट मध्ये काही न टाकण्याची सवय असल्याने आणि ते बरे दिसणार नाही असा विचार करून मी सारं काही संपवलं.. मग चहा आला.. तो देखील संपवला.. पण मुलगी काही दिसायला तयार नव्हती! मग शोप सुपारी घेऊन मुलगी आली. पाहिलं, दोघे एकमेकांना न लाजता बघत होतो. बरे आमच्या मराठवाड्यात अजूनही ऑर्थोडॉ क्स लोक आणि परंपरा आहेत त्यात मुलीने असं मान वर करून मुलाच्या डोळ्यात डोळे घालून पाहणं सर्वांसाठी नवीन होतं. मुलीला विचरल्या गेलेल्या प्रश्नांकडे तिचं फार लक्ष नव्हतं. पण मला आवडली! थोड्या वेळाने जेवायला बसलो तर पूर्ण ताट भरून जेवण. म्हणजे ३ वेळा वाढल्यावर जेवढं खाल्लं जाईल तेवढं एकाच वेळी वाढलेलं.. परिणामी आमच्या सोबतच्या बऱ्याच लोकांनी पानात भजे वगैरे उष्ट सोडलं. मी मात्र पूर्ण ताट स्वच्छ करत बसलो तर मुलीचे मामा मला फार भूक लागली असावी समजून वाढतच राहिले आग्रह करून करून.. शेवटी एकदाचं पूर्ण ताट स्वच्छ करून उठायला गेलो तर उठताच येईना.. पायाला मुंग्या आल्या होत्या. कसंबसं इज्जत सांभाळत उठलो. आमचा मामा माझ्याकडे रागाने बघत होता. घराबाहेर बोलायला म्हणून आलो तर मामा झाडायलाच लागला मला. एवढं खातात का? अधाशी असल्यागत खाल्लं वगैरे वगैरे!

धमाल आहे हा धागा.
म्हाळसांचा तेरा नंबर, अतुलचा 'तेजस्विनी' किस्सा, अजिंक्यचा तीन वेळचं जेवण किस्सा- खूपच हसवणारे आहेत सगळेच किस्से.

एकदा नाशिकला मुलगी पाहायला गेलो होतो.. चाळीसगावाहून दादा वहिनी आले होते आणि सोबत माझा जावई (भाचीचे मिस्टर) ते नाशिकलाच राहतात. आधी त्यांच्या घरी उतरून मग तिथूनच जायचं ठरलं होतं.. अचानक दादाची तब्येत बिघडली म्हणून आता तिघांनीच जायचं ठरलं..

तर मी विचारलं कसं जायचं तर म्हणाले स्कूटीवरून जाऊ.. मला हे ऑडच वाटलं पण ते म्हणाले दुपारी बसेस मिळणार नाहीत आणि रिक्षावाले खुप जास्त पैसे घेतील..आता जावई म्हटल्यावर मला त्याला काही बोलताही येईना.. मग कसंबसं एका गाडीवर मी आणि वहिनी दुसर्या गाडीवर तो असा आमचा लवाजमा निघाला...मुलीच्या घराबाहेर पोहचलो तर "ही" त्यांची फॅमिली काय विचित्र माणसं आहेत अशा नजरेने पाहत होती..

ओळख करुन देताना जावई सासरे असा सबंध सांगितल्यावर अजुनच त्या विचित्रपणात भर पडली..

मुलगी बरी होती.. स्वतःहून प्रश्न विचारत होती.. मी फार विचारलंचं नाही ( आता असं गेल्यावर कुठली मुलगी हो म्हणेल ही शंका)

काहीतरी विचारायचं म्हणून मी वाचायला आवडतं का म्हणून विचारलं तर तिने हो सांगितलं... मग आवडतं पुस्तक विचारल्यावर तिची भंबेरी उडाली.. दहा मिनिटे स्मशान शांततेत गेली मग फार विचार करुन तिने "श्यामची आई"
हे उत्तर दिलं...

माझ्या लग्नाची गोष्ट पण फार मजेशीर आहे नंतर लिहतो..

भारी किस्से आहेत एकेक! माझा स्वतःचा एकही अनुभव नाही. पण वाचायला मजा येतेय.
म्हाळसा, जुळी बहीण, भरपेट जेवण, आणि एकंदरीत सगळेच महान किस्से आहेत.

>> एकदम मवाली अवतारात हजर झालो. जागेवर नकार भेटला

Lol

>> मानवदादा, म्हाळसा आणि चिकू, फार भारी किस्से आहेत तुमचे!

+१११
@म्हाळसा... तेरा नंबर Lol
@विशे - पाटील यांनी सांगितेली आठवण पण रम्य आहे.
@पृथ्वीकरांचे किस्से वाचून मी अक्षरश: दीर्घ श्वास घेतला. खरेच, काय एकेक लोक भेटतात (विशेषतः चेहरा वाचून स्वभाव, आणि पोलिसांची धमकी वाले किस्से)

@अस्मिता.
>> बोलाचालीत लग्न मोडायचं मगं कुणीतरी उतरून तरातरा निघून जायचं... मुलाकडच्यांसोबत आलेली मुलं आम्हाला तुच्छ लेखायची

कस्सलं जिवंत वर्णन केलंय! खरंच आहे हे. लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतले मला अज्जिबात न आवडणारे प्रकार. पण अशीच मानसिकता असते आपल्याकडे. किती कटू असले तरी सत्य हेच आहे Sad

>> उठायला गेलो तर उठताच येईना.. पायाला मुंग्या आल्या होत्या.

Lol

>> फार विचार करुन तिने "श्यामची आई" हे उत्तर दिलं...

Lol

>> मध्यस्थ प्रकरण १९७० पर्यंत होतं. नंतर स्थळाविषयी माहिती देणाऱ्या मासिकांमुळे कमी झालं.

कमी झालं असेल कदाचित, पण मध्यस्त आहेत अजूनही. पाच-सहा वर्षे झाली. एका मित्रासाठी मुलगी पाहायला म्हणून सोबत गेलो होतो. इतरही कोण कोण होते. हे स्थळ त्याला ज्या मध्यस्त मार्फत आलेले होते तो सुद्धा होता. खरे तर त्यांची जबाबदारी असते अशावेळी कारण दोन्ही बाजूंची माहिती असणारा तोच एक असतो. पण हा मध्यस्त बिचारा साधासुधा पण जरा वेंधळा होता. मुलासोबत कोण कोण आले आहेत त्यांची नाती त्याने नीट लक्षात ठेवली नाहीत. आणि मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात एका जोडप्याची ओळख करून देताना "या यांच्या पत्नी" असे न म्हणता "या यांच्या मातोश्री" म्हणाला. पत्नीची ओळख आई म्हणून करून दिली. तरी नशीब कि तो मनुष्य स्वभावाने मिश्कील होता. वाद केला नाही. तो म्हणाला "अहो हि माझी बायको आहे. हां आता कधीकधी मी तिला ए माझे आये म्हणतो पण तो भाग वेगळा" Happy

अलीकडेच भारतातील एक नातेवाईकांच्या मुलीसाठी स्थळ बघत आहेत त्यांनी सांगितलेला किस्सा.
एका मुलाच्या आईने अप्रोच केलं. मुलगा 'नामांकित कंपनीत' 'चांगल्या पोस्ट'वर आहे असं सांगितलं. मग हल्लीच्या प्रथेप्रमाणे मुलांना परस्पर एकमेकांशी बोलू दे असं ठरलं. त्यानुसार मुलगा मुलगी फोनवर संपर्कात होते. कोविड पसरलेला असल्याने अजून प्रत्यक्ष भेटले नव्हते. तर एक दिवस मुलाने सांगितलं की मी ती 'नामांकित कंपनीतील' नोकरी सोडून दिली आहे. आता काय करणार तर म्हणे sabbatical घेणार आणि food start up सुरू करणार. म्हणजे काही स्विगीसारखी कंपनी काढणार नव्हता तर असंच स्विगीवरून ऑर्डर घ्यायच्या- केक किंवा बिर्याणी किंवा हाका नूडल बनवून द्यायचे 1टाईप.
ते ऐकल्यावर मुलीच्या आईने लगेच नकार कळवला.
हा तर पिढीतला संघर्ष झाला. चांगली नोकरी उगाचच सोडणं आधीच्या पिढीला कळत नाही. हल्ली पुण्यात श्रीखंड बनवून देणारं पण 'स्टार्ट अप व्हेंचर' असतं हे तर मलाही कळत नाही.

लोकांना स्टार्टअप च्या स्टोरी भुरळ पाडतात.काहीजण तितके पुढे जातातही.सगळेच नाही.
संसाराची सुरुवात इतक्या शेकी प्रकारे करायची तर माणूस अगदी चांगल्या ओळखीचा, विश्वासाचा झालेला हवा.म्हणजे थोडक्यात कायम संपत्तीत खेळलं पाहिजे अश्याच ठिकाणी मुलगी द्या असं नाही, पण कठीण परिस्थितीत सर्व एकमेकाना कॉम्प्लिमेंट करतील,साथ देतील, विचार जुळतील इतपत तरी ओळख झालेली हवी.

माझी पद्धत अशी आहे की ओळखीपाळखीतून कोणी स्थळे आलीतर तर आधी चॅट आणि विडिओकॉलवर प्राथमीक चर्चा होते आणि त्यातून एकमेकांना बरे वाटलो तरच घरचे मुलीला पाहायला जातात. हा थोडा गंभीर विषय असल्याने तशा गमतीशीर आठवणी काहीच नाहीत. त्यातल्या त्यात मजेशीर प्रसन्ग चॅट करताना आधीची लफडी होती का आणि किती यावरच आहेत जी इथे देता येणार नाहीत पण अजून एक किस्सा आहे वेगळा. एक मुलगी म्हणाली, "मी थोडी एक्सट्रा हायजिन कॉन्शिअस असल्याने मला स्वतःचे वेगळे बाथरूम-वॉशरूम वापरायला आवडेल" तर म्हटलं, "आमच्या सगळ्या घरांना प्रत्येक रूमला अटॅच बाथरूम-वॉशरूम आहेत तरी त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही पण बेडरूम आणि बेड एक चालेल ना तुला ? "

मला चार पाच मुली बीए संगीत शिकलेल्या आल्या होत्या. दिसायला (फोटोत) छानच. पण रेडिओ वगैरे बंद करता येतो, गाणारीचं काय करणार? नाही सांगितलं.

एकदा बासुंदी ( केशरी दूध)वगैरे पोह्याबरोबर होते. पण मुलगी का बासुंदी यांपैकी एकालाच न्याय द्यावासा वाटत होतं. पण बासुंदी आवडीने पिऊन नकार कसा देणार? मग नाहीच.

त्या हायजीन कॉन्शस मुलीला मुळात 'ऍटॅच बाथरूम असलेली खोली आहे ना आपली' विचारायचे असेल ते तिने थोड्या इंडायरेक्ट वे ने विचारले.

एकमेकांच्या घरांबद्दल आधीच कल्पना असल्याने तसे नव्हते ते. तिने उद्या बेडरूमचे बाथरूम ताब्यात घेतल्यावर मला बाहेरचे वापरावे लागेल ते जमेल का ? असा होरा होता तिचा. म्हणूनच मग विचारले की बेड-बेडरूम शेअर केलेली चालेल का ?

Pages