ओळख वेदांची - भाग २

Submitted by शीतल उवाच on 28 February, 2021 - 01:19

ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.

यजुर्वेदातील मंत्रांना ‘यजु’ असे म्हणतात हे मंत्र गद्यात्मक आहेत. यजुर्वेदातले पद्यात्मक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. यज् या संस्कृत धातूपासून यजु शब्द तयार होते. यज् याचे तिन अर्थ१ पाणिनी सांगतो. देवाची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी व यजुंनी यज्ञ अशा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात२ आढळते.
यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक/ पुरोहीत असतो त्याला ऋत्विज असे म्हणतात. ऋत्विजांची वेदानुसार नावे अशी –
ऋग्वेद – होता (हे नाव आहे), यजुर्वेद – अध्वर्यु, सामवेद – उद्गाता, अथर्ववेद – ब्रह्मा. अध्वर्यु ज्या वेद मंत्रांचा प्रयोग करतात तोच यजुर्वेद म्हणून यजुर्वेदाला ‘अध्वर्युवेद’ असेही म्हणतात.

शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात. शुक्लयजुर्वेदात केवळ मंत्र आहेत तर कृष्णयजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहीती आहे.
कृष्णयजुर्वेदाच्या निर्मितीची एक कथा आहे. वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना वेदाचे शिक्षण दिले. परंतु दोघांमध्ये वेदार्थनिर्णयावरून काही वाद निर्माण झाला. वाद वाढल्यावर संतप्त झालेल्या वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवलक्यांनी ते ज्ञान ओकून टाकले. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी तित्तिर पक्षाचे रुप घेऊन ते ज्ञान ग्रहण केले. वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना जे ज्ञान दिले ती मूळ संहिता म्हणजे शुक्लयजुर्वेद तर तित्तिर पक्षांनी ग्रहण करून जे स्वीकारले ते ज्ञान म्हणजे कृष्ण यजुर्वेद असे मानतात. नवे व जुने ज्ञान आणि त्यांचे संपादन यामुळे यजुर्वेदाच्या काही शाखा आणि त्यांच्या संहिता निर्माण झाल्या जसे वाजसनेयी, तैत्तिरीय इ. याच्या अधिक तपशीलात न जाता आपण दोन्ही मिळून यजुर्वेदाची ओळख करून घेउ यात.

काय आहे यजुर्वेदात?…..
यजुर्वेदाची रचना अध्यायात केली आहे. एकूण ४० अध्याय आहेत. त्यात मुख्यत्वेकरून यज्ञासंबंधी माहिती आहे.

यज्ञ– यज्ञासाठी वेदी, कुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवन, हवनसामग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. गाईचे दूध काढणे, पाणी आणणे येथपासून ते यज्ञकुंडाची जागा, वेदी उभी करणे, यज्ञसाहित्य निवडणे, वेगवेगळ्या आहुति देणे येथपर्यंत प्रत्येक बारीक सारीक कृतींची माहीती यजुर्वेदात येते.
आपल्या ऐकण्यात विशेषकरून येणारे ‘अश्वमेध’ आणि ‘राजसूय’ (युधिष्ठिराने महाभारतात केलेला) हे यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. याखेरीज दर्श पूर्णमास (अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे याग/यज्ञ), अग्निष्टोम (पाच दिवसांचा मिनि यज्ञ), चातुर्मास्य, काम्येष्टी, वाजपेय, नक्षत्रेष्टि अशा अनेक छोट्या मोठ्या यज्ञांचा अंतर्भाव यजुर्वेदात होतो.

यजुर्वेदातील माहितीचा परीघ किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी यज्ञ ही काय संस्था होती हे पाहिले पाहिजे. त्याकाळातील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘यज’ याचा एक अर्थ एकत्र येणे असाही होतो. त्यामुळेच यज्ञ हा एक प्रकारचे सामाजिक समारंभ (मराठीत सोशल गॅदरींग) असे. यात विविध विधींसह अनेक मनोरंजक खेळ किंवा स्पर्धाही असत. जसे सामगायन असेल, रथांची शर्यत असेल, वाद्य वादन असेल अगदी पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींच्या नृत्यापासून ते रस्सीखेच सारख्या खेळांपर्यंत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम यज्ञात होत. यज्ञ हे संपुर्ण समाजाचे एकत्रिकरण करणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्यात एकी आणि समभाव वाढवणे आणि त्यांचे सर्वांगिण कल्याण साधणे अशी उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे साधन होते. हिलेब्रॅन्ट (Hillebrandt) सारखा विद्वान या खेळांची तुलना थेट ऑलिम्पिकशी (प्राचीन) करतो ३.

अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ करणारा राजा आहुति देताना म्हणत असे
आ ब्रह्म॑न् ब्राह्म॒णो ब्र॑ह्मवर्च॒सी जा॑यता॒मा रा॒ष्ट्रे रा॑ज॒न्यः शूर॑ इष॒व्योऽतिव्या॒धी म॑हार॒थो जा॑यतां॒ योगक्षे॒मो न॑: कल्पताम् ।।यजुर्वेद मा.वा संहिता अ २२.२२ ।।
संपूर्ण मंत्र मोठा आहे पण याचा अर्थ असा की – ‘ब्रह्मतेजाने संपन्न आणि शूर असे वीर आमच्या राष्ट्रात उत्पन्न होवोत, आमचा योगक्षेम (निर्वाह) उत्तम चालो.’

गोष्टी – यजुर्वेदाचा प्रमुख विषय यज्ञ असल्याने ऋग्वेदाइतक्या गोष्टी यजुर्वेदात नाहीत. पण निरनिराळ्या विषयांवरील काही आख्यायिका यजुर्वेदाच्या चर्चेत येतात. इंद्राने वायुदेवतेच्या मदतीने देवांच्या भाषेचे व्याकरण लिहिले अशी एक आख्यायिका४ यजुर्वेदात आहे. पुर्वी देव जी भाषा बोलत असत ती काहीशी नियमविरहीत किंवा व्याकरणरहीत होती. देवांच्या विनंतीवरून इंद्राने वायुदेवतेच्या सहाय्याने त्या भाषेला नियमबद्ध व व्याकृत केले असा उल्लेख यजुर्वेदात आहे.यजुर्वेदात मांडलेल्या विषयांचा विस्तारही यातून लक्षात येतो.

यजुर्वेदात आपल्या परीचयाचे काय आहे?…..

खुप काही…
आपण निरनिराळ्या वेळी ऐकलेला आणि वापरलेला –
भूर्भुव॒: स्व॒: तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।धियो॒ यो न॑: प्रचो॒दया॑त्। हा गायत्री मंत्र यजुर्वेदातला आहे. (अध्याय ३६, मंत्र ३)

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑ति हवामहे। हा अजून एक माहितीतला मंत्र यजुर्वेदातीलच आहे. (अध्याय२३-मंत्र १९)

आपण घरी किंवा महादेवाच्या देवळात ऐकलेले ‘रुद्र पठण’ हे यजुर्वेदातील आहे. (अध्याय १६)

भाषेतील चमत्कृती म्हणून सांगायचे तर वाजपेय या यज्ञात सहभागी असणारे किंवा तो यज्ञ करणारे म्हणून ‘वाजपेयी’ हे नाव रुढ झाले.

हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला हे ही जाता जाता सांगायला हरकत नाही.

तत्त्वज्ञान –
वैदिकांच्या कर्मकांडाचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि त्याचे व्यापक तत्त्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व म्हणजे ४० अध्यायात येतेच. विशेषतः आपल्याला माहिती असलेला भाग म्हणजे ‘ईशावास्योपनिषद’ जे यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा ४० वा अध्याय आहे.
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।
या प्रसिद्ध मंत्रातून परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने संग्रह न करता आवश्यकतेनुसार पदार्थांचा उपभोग घ्यावा असा उपदेश केला आहे.

अशाप्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद… अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली (मराठीत वर्क लाईफ बॅलन्स) शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे.

तळटीप
१. यज देवपूजा – संगतिकरण – दानेषु (अष्टाध्यायी ३.३.९०)
२. यजुर्भिः सामभिः यत् एनम् ऋग्भिः शंसन्ति यजुर्भिः यजन्ति सामभिः स्तुवन्ति ।निरुक्त १३.७।
३. Alfred Hillebrandt एक जर्मन विद्वान त्याच्या Vedische Mythologie (१, २४७) या पुस्तकात हा उल्लेख आढळतो.
४. तैत्तिरिय संहिता ७/४

Copyright https://sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

मूळ लेखाची नवीन लिंक - https://sheetaluwach.com/ved2m/

Group content visibility: 
Use group defaults

दोन्ही लेख कमाल
किती ओघवत्या भाषेत सोपं करून लिहीत आहात आपण

ब्लॉगवर हा लेख वाचला आहे पण इथे पुन्हा एकदा वाचला. उत्तम आणि पुन्हा वाचावे असे लिखाण आहे. पुभाप्र!

छान झालाय भाग.

प्रत्येक लेखात मागच्या भागांची लिंक देता येइल का लेखाच्या शेवटी?

वाचताना उत्कंठा वाढतेय.
हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला
यातुन काही निष्पन्न झाले होते काय हे जाणुन घ्यायला आवडेल. ते अशासाठी की फिक्शन असलेले "संभवामी युगे युगे" वाचल्यावर अस होणं (कदाचित) शक्य नाही तरी घडेल की काय कधी भविष्यात अस वाटत रहातं.

@जेम्स बॉन्ड - एका मोठ्या यज्ञाचा समग्र शास्त्रीय प्रयोग त्याच्या ध्वनीचित्रणासह करणे हा उद्देश समोर ठेऊन १९५५ सालचा वाजपेय पुण्यात केला गेला. मी सुदैवाने तो व्हिडिओ पाहिला आहे.

शीतल तुमचे लेख उत्तम आहेत. आत्ता हे यज्ञ किती रिलेवंट आहेत वगैरे शंका नेहमी यायच्या. पण तुमच्या लेखातील यज्ञ हे त्या काळचे सामाजिक समारंभ होते हे वाक्य पटले. काही यज्ञ उदा. अश्वमेध वगैरे मला विस्तारवादी वाटतात. म्हणजे एका प्रामाणिक आणि खरोखर कल्याणकारी असणार्या राजाने केवळ लष्करी दृष्ट्या प्रबळ नसल्याने दुसर्या एखाद्या राजाचे मांडलिकत्व का स्वीकारावे? या विषयी शास्त्रांमधे काही नियम आहेत का यावर तुमच्या लेखात माहिती वाचायला आवडेल. हा जर आत्ताच्या लेखमालेचा विषय नसेल तर नंतर कधीतरी.

यज्ञ हा एक समारंभ होता. सर्वांनी एकत्र येऊन थोडे चिंतन, थोडी निसर्ग प्रार्थना आणि करुणा भाकणे आणि पुष्कळशी मौजमजा , खाणेपिणे वगेरे.
अवेस्त्यातला ' यस्न' हा यज्ञ ह्या शब्दाचा cognate आहे असे मानतात. अर्थात दोघांच्या विधींमध्ये थोडा फरक आहे. यज्ञ ही अग्नि उपासना तर यस्न ही जलोपासना आहे. पण पुढे कालांतराने पहलवीत आणि पर्शियन मध्ये ह्या यस्ना चे जश्न मध्ये रुपांतर झाले. मूळ कल्पना तीच म्हणजे एकत्र येऊन chill out करण्याची राहिली. सहनाववतु, सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावहै ही प्राचीन लोकांची संस्कृतीच होती, आजही एकत्र येऊन मौजमजा करण्याची ही रीत आपण हुरडा पार्टी, पोपटी, उंबाडीयु, शेकोटी इत्यादी प्रकार करून पाळतोच.
मोठ्या प्राण्यांना विधीपूर्वक बळी देऊन यज्ञाग्नीत भाजून खाणे आणि सोमप्राशन ही एकेकाळी खरोखरीच मोठी आनंदाची गोष्ट राहिली असेल.

@MazeMan - भारतीय संस्कृतीत यज्ञ ही संज्ञा अनेक अर्थाने वापरली गेली आहे. कर्मकांडातील यज्ञ हा त्या व्यापक संकल्पनेचा केवळ एक भाग होतो. त्याविषयी सविस्तर लेखन पुढील भागात येईलच.

उत्तम लेख व माहिती.

जेम्स बॉण्ड, संभवामि युगे युगे ही प्रदीप दळवींची कादंबरी म्हणताय का? मी पण ती वाचली आहे.