द ग्रेट इंडिअन किचन

Submitted by मेधावि on 1 February, 2021 - 07:00

गेल्या दहा दिवसांत तीन सिनेमे पाहीले.
1. इज लव्ह इनफ ? "सर"
2. द लास्ट कलर
3. द ग्रेट इंडिअन किचन.

पहिले दोन सिनेमे आवडले ...

तिसरा सिनेमा.. (Neestream -मल्याळी भाषेतला इंग्रजी सबटायटल्सवाला) पाहून मात्र त्रास झाला. एक सण्णसणीत मुस्काटात बसली. हा चित्रपट संपत नाही. तो मानगुटीवर बसतो आणि छळतो. "अगदी फ्रंट ऑफ द माईंड" छळत रहातो. स्वैपाकघर आणि स्वैपाक ह्या विषयातले बारीक सारीक तपशील टिपून त्यावर एका पुरुषानं हा सिनेमा बनवलाय,त्याला साष्टांग प्रणाम.

Spoiler alert - ज्यांना पहिल्या  धारेचा सिनेमा बघायचाय त्यांनी इथून पुढे वाचू नये. पण लवकर बघा...

(एक डिस्क्लेमर - मी अजिबातच स्त्रीवादी नाही. स्वतः राबून घर सजवणं, स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, छान छान पदार्थ बनवून दुस-याला खाऊ घालणं हे मला आवडतं. मी माझ्या आवडीसाठी ते करते, तरीसुद्धा सिनेमा पाहून मी गोंधळले आणि भांबावले आहे)

लास्ट अॅलर्ट!!!
ह्यापुढचं लेखन प्रचंड उत्कट असेल. ते कदाचित  असंबंद्धही होईल, पण विचारांचं घोंघावीकरण न थोपवता आणि त्याचं अजिबात सुबकीकरण न करता ते जसे येतील तसे ते इथे येतील.

एखाद्या व्यक्तीला कोणी सपासप आसूडाचे फटके मारत असेल तर त्याच्या वेदना पाहून बघणाराही कळवळतो.  पण ती व्यक्ती जर खूषीत ते फटके खात असेल तर? .... आनंदानं हे फटके खाणं म्हणजेच आपल्या आयुष्याची सार्थकता, कृतार्थता, परीपूर्णता असं तिला आणि तिच्या सर्व जिवलगांना वाटत असेल तर ?

आणि....... मीही त्यातलीच एक असेन तर?????
मीच काय,  निरक्षर ते डाॅक्टरेटपर्यंत शिकलेल्या, गरीब ते गडगंज श्रीमंतीत लोळणा-या माझ्या परिचयायल्या सर्वच्या सर्व  स्त्रिया दिसतायत् मला आत्ता डोळ्यापुढे. हे सगळं आमच्या, आपल्या  हाडीमाशी इतकं रुजलंय आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या प्रचंड प्रचंड भीषण वर्णव्यवस्थेला किती सहजपणे आत्मसात केलंय...आणि आणि "आज" एक पुरुष बोलतोय त्यावर..हॅट्स ऑफ टू हिम.

हा सिनेमा  पितृसत्ताक पद्धतीतल्या "स्त्री" ह्या सो काॅल्ड  "देवीच्या" कर्तव्यांवर, तिच्या अधिकारांवर, सुखी आणि संपन्न आयुष्याच्या  परंपरेनं रुजवलेल्या कल्पनांवर, व्याख्यांवर आणि "घरगुती हिंसाचाराच्या प्रकारांवर बोलतो. चित्रपट पहाताना एकापाठोपाठ एक एक सण्णसणीत कोरडे बसत रहातात अंगावर खण्णं..खण्णं..खण्णं करत  !!!!   पण तो थांबत नाही, वेगवान बनतो आणि बोलतच रहातो, बोलतच रहातो. मी ..पहातच रहाते....कण न् कण् एका क्षणी  "पेटत" असतो आणि पुढल्या क्षणी "विझत" असतो. एक मोठ्ठी  हतबलता साचून रहाते. हे सगळं बदलण्यासाठी आपण फार फार दुबळे आहोत असं वाटतं.  पटो...न...पटो.... मी तीच वाट पुढे चालणार असते.

हा चित्रपट फार महत्वाचा आहे. पहायलाच हवा असा.  रोजच्या जगण्यातल्या ब-याच बेसिक गोष्टींचं भान देतो तो. मानवता शिकवतो. आपल्या मायेच्या माणसांच्या आणि प्रेमाच्या कल्पना, जेवणाचे, वागण्याचे  मॅनर्स, म्हातारपणापर्यंत बाळगलेल्या आणि  कौतुकानं जोपासलेल्या  नाठाळ आणि त्रासदायक सवयी आणी चवी-ढवी ह्या सगळ्यावर प्रश्न उभे करतो.

चित्रपटाची सुरुवात.. , केरळमधल्या एका गावात एक लग्न ठरतंय. मुलगी काळीसावळी, स्मार्ट, हसरी, टिपिकल दाक्षिणात्य सुंदर काळेभोर बोलके डोळे आणि दाट कुरळे केस. तशी पहिल्यांदा पाहताना ती सुंदर वगैरे नाही वाटत पण हसली की फार गोड दिसते. नृत्याची आवड आहे तिला. नैपुण्यही आहे त्यात. हसरी, खेळकर फुलपाखरी आयुष्य जगणारी ही मुलगी.  बघायला येणारं स्थळही  तालेवार असावं. मुलीची आई भरपूर उत्साहानं राबते आहे, गोड आणि तिखट असे भरपूर तळीव पदार्थ (घरातच) बनवते आहे. सुंदर मोठ्ठा "आधुनिक" आणि कलात्मक पद्धतीनं सजवलेला दुमजली बंगला आहे त्यांचा. संपन्नता जाणवते सगळीकडे. वडील गल्फमधे नोकरी करत असल्याचं गप्पांमधून समजतं.  नातेवाईक, हास्यविनोद, गप्पा........ छान आनंदाचं वातावरण आहे.

बघण्याचा कार्यक्रम पार पडतोय. दोन्ही बाजूंचे लोक सधन वाटतात आणि खुशीत दिसतायत्. मुलामुलीला एकट्यानं एकमेकांशी काही बोलायचं तर बोला अशी परवानगी देऊनही  घरच्या सगळ्यांनी फिल्डींग लावली आहे. अशा परिस्थितीत संकोचल्यामुळे मुलामुलीचा फार संवाद होतच नाही. स्वभाव, विचार-आचार जाणून घेणं वगैरे काही घडताना दिसत नाही. पण दोघंही एकमेकावर अनुरक्त वाटतात. 

छान थाटामाटात लग्न होतं. हुंड्यात मिळालेली एक अलिशान कार ही दिसतेय दारात.  लाजत मुरडत नव्या नवरीचा कौतुकाचा गृहप्रवेश. प्रेमळ व शांत स्वभावाचे सासूसासरे आणि नवरा.  सासरचं घर किती सुंदर!!! वडिलोपार्जित असणार. टुमदार, कौलारू, खूप मोठ्ठं पण जुन्या पद्धतीचं.  दोन मजली, मागेपुढे भलं मोठ्ठं अंगण, जुन्या पद्धतीची कडी-कोयंडे असलेली लाकडी दारं,  शिसवी लाकडाचं फर्निचर, पितळी मोठी मोठी छान छान भांडी, मागेपुढे भरपूर झाडं. स्वैपाकघर  मोठ्ठं, मात्र अंधारं आणि साधं आहे. तिथं माॅड्युलर किचन नाहीये. साधा कडप्याचा ओटा, अॅल्युमिनीयमची भांड्यांची मांडणी, भिंतीवरचं ताटाळं, फळीवरचे डबे. स्वैपाकघरातच अजून एका भिंतीशी अजून एक ओटा आहे आणि त्यावर चक्क एक ढणढणती चूल आहे. वर वखारीची लाकडं रचलेली दिसतात.  चुलीवर (केरळमधे) भात शिजवतात ते भाताचं डेचकं. इतर भांडी आणि भात ढवळायचा मोठा डाव. बाकी स्वैपाक गॅसच्या शेगडीवर होतो पण भात मात्र अजूनही चुलीवरच शिजतो. मिक्सर आहे, पण वाटण मात्र पाट्यावरच होताना दिसतं. कायमचा फिक्स केलेला एक मस्त मोठ्ठा पाटा दिसतो.

मुलीच्या संसाराचा पहिला दिवस. नवरा चांगला वाटतो. सासूही प्रेमळ, शांत आणि कामसू आहे. मुलीला हळूहळू रुळूदे. लगेच कुठे कामं सांगायची? सासराही शांत आहे. घरात फारसा बोलतही नाही.

भांडी घासणं, उष्टं खरकटं काढणं, केरवारे, फरशी, अंगण झाडणं, पुसणं , भरपूर भाज्या, निवडणं, चिरणं, फोडणीस टाकणं....मोठ्या अलीशान पाट्यावर भरपूर नारळ वाटणं, चटणी, सांबार बनवणं. मांसाहारी पदार्थ बनवणं. वेळेवर डायनिंग टेबलवर सगळं अन्न मांडणं, गरमागरम सर्व्ह करणं.... विविधरंगी, विविध चवींचा, सुग्रास, तृप्त करणारा स्वैंपाक.. गृहलक्ष्मीनं, अन्नपूर्णेनं घर सांभाळावं, सजवावं, ते उबदार ठेवावं, कुटुंबाला छान खाऊ पिऊ घालून सुखात ठेवावं.  जेवताना स्वैपाकाचं आवर्जून कौतुक करणारी घरची माणसं.  पुरुषाच्या ह्दयाचा मार्ग पोटातूनच तर जातो ना....ह्या संसारला सुखी संसारच तर  म्हणतात ना?  

रोज सकाळी बिडाच्या तव्यावरचे गरमागरम डोसे, इडिअप्पम, पुट्टु आणि कडला करी, सांबार, पदार्थाला लाल मिरच्या, उडीद डाळ, भरपूर कढीपत्याची खमंग फोडणी. दुपारच्या जेवणातल्या वेगवेगळ्या भाज्या, भात... हळूहळू डोळ्यातून  ती चव आपल्या डोक्यात, मनात, आणि मग जिभेवर उतरायला लागते. चायला, आपण फूड चॅनेल बघतोय का काय असं वाटतं.

घरच्यांच्या आवडीनिवडी आणि चवीढवींचा विचार करत करत रोजचा स्वैपाक करणं, सकाळी दूध येण्यापासून सुरू झालेला दिवस, रात्रीची जेवणं झाली की ओटा टेबल आवरून, भांडी घासून मग श्रांत तनामनानं दिवा बंद करून बिछान्यावर अंग टाकणं ही त्या गृहलक्ष्मीची आनंदाची, सार्थकतेची, तृप्तीची कल्पना. लग्नानंतर सुरुवातीला  नवरा व सासरच्यांचं सगळं व्यवस्थित करणा-या ह्या घरोघरीच्या नायिका, नंतर मुलंबाळं, नातवंडं ह्यांच्यासाठी अविरत झिजतच असतात......झिजतच रहातात....मरेपर्यंत. आणि आपण म्हणतो...माझी आई/आजी फार फार प्रेमळ होती. माझ्यासाठी खूप केलं तिनं. तो तिच्यासाठीही सन्मानच असतो.

कथानायिकाही लग्नानंतर सासूच्या बरोबरीनं  सर्व जबाबदा-या उचलायचा प्रयत्न करताना दिसते.  एक आदर्श सून, बायको बनण्याचा प्रयत्न करताना दिसते.  हे सर्व करताना तिला मजा येते आहे, आत्मिक समाधान मिळतं आहे. पण ते निभवताना तिची दमछाक होतेय.

घरातला पुरुषवर्ग शांत, अबोल....पैसे मिळवून आणणं आणि बाहेरची कामं करणं हे पुरुषांचं काम. ते किचनमधे ढवळाढवळ करत नाहीत. आणि अचानक सासूला मुलीच्या बाळंतपणासाठी परदेशी जावं लागतं. आणि संपूर्ण घराची संपूर्ण जबाबदारी सुनेवर धाप्पकन् येऊन पडते.  माहेरी
फारशी स्वैपाकघरात न  वावरलेली ही मुलगी, पटापट सगळं शिकून अपेक्षांना उतरायच्या प्रतिक्षेत.

सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, भांडी घासणं, केरवारे, अंगणाची झाडलोट, फरश्या पुसणे, जिने पुसणे..... न संपणारी आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणं सतत वाढत जाणारी कामं आणि अपेक्षा. सास-यांना चुलीवरचाच भात, पाट्यावरची चटणी प्रिय आहे. कुकर, मिक्सरमधे ती चव येत नाहीये. ते प्रेमानं तिला सुचवू पहातात. तीही त्यांच्या मताचा आदर राखते, एक एक दिवस पुढे सरकतो तशी वेगवेगळ्या प्रसंगातून तिला येत जाणारी जाण, येणारा मानसिक आणि शारिरीक थकवा,  फ्रस्टेशन्, पुरुषांच्या प्रायोरिटीज,  एकत्र कुटुंबपद्धतीतल्या अपेक्षा, रोज येणारी वेगळी वेगळी आव्हानं. त्यावर मात करण्यासाठीची तिची ओढाताण आणि ह्या सगळ्यावर त्यावर तिनं दिलेलं उत्तर....ह्यावर बोलतो हा सिनेमा.

गरमागरम डोसे करून वाढायचे म्हणजे बरोबरीनं ती जेवू नाही शकत बाकीच्यांबरोबर. सगळ्यांचं खाणं झाल्यावर टेबलवर ताटाबाहेर काढून टाकलेल्या शेवग्याच्या शेंगांची सालं आणि इतर खरकटं  उचलताना तिला ढवळतं. जेवायला सुरुवात करताना नवरा व सास-यासाठी हिनं सुबकपणे मांडलेलं टेबल आणि आता ती आणि सासू जेवायला बसतानाचं टेबल ह्यात जमीन अस्मानाचं अंतर. सासू सरावलीये. तिला ह्याचं काहीच नाही वाटत. उलट ती नव-याच्या उष्ट्या ताटातच घेते वाढून. मुलीला मात्र हे जड जातंय. हाॅटेलमधे टेबल मॅनर्स पाळणारा नवरा घरात का पाळू शकत नाही? सतत भांडी घासण्याचा आणि उष्ट- खरकटं आवरण्याचा सीन येत रहातो. किती घरांमधे तुंबलेल्या सिंकमधे हात घालायचा प्रसंग घरच्या मुलांवर/ पुरुषांवर  येत असेल? दुस-या घरातनं आलेल्या मुलीनं मात्र हे पट्कन् आत्मसात करण्याची अपेक्षा ठेवली जाते.

घरोघरी नव-याच्या हातात डबा, रुमाल, पाकिट, मोबाईल देणा-या बायका आपण पहातोच की. त्यात कुठं काय वावगं वाटतं? नाॅर्मलच तर आहे की हे..
रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं..  "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. त्या गृहीतकांना मानवतेच्या निकषांवर परत एकदा तपासायला लावतो. मारहाण किंवा  शिवीगाळ म्हणजेच काही घरगुती हिंसाचार नाही फक्त. खूप व्यापक आहे ती कल्पना. पिढ्या न् पिढ्यांपासून होत असलेले काही अन्याय आता परंपरेच्या नावानं इतके मान्यताप्राप्त झाले आहेत की  मानवतेनच्या  दृष्टीकोनातूनही ते दूर करू शकत नाहीये आपण. म्हणून ही अस्वस्थता येते. ही अस्वस्थता कधी जाईल, कशी जाईल ते माहीत नाही पण  सिनेमाचा प्रेक्षक आपल्या ताटातलं उष्टं दुस-या कुणाला तरी साफ करायला टाकताना  दहा वेळा तरी विचार करून टाकेल  हे सुद्धा ह्या सिनेमाचं यशच म्हणावं लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

या चित्रपटात बेडरूम सीन्स किंवा तत्सम प्रकार किती आहेत? त्यावरून ठरेल की एकटीने बघायचा का साबांसोबत!

अनू, सिनेमा कसा पकेल? आपण पकतो : हाहा: पण कोई तो है असं वाटलं.
सिमंतीनी, मला थप्पडची मुळ कंन्सेप्ट आणी ती डेव्हलप करताना वाढवलेला सिनेमा काहीच पटलं नाही. भाराभर स्टोर्यांचा संबंध नाही. आवडलं फक्त नायिकेच्या वडिलांचं पात्र.
बादवे, तुंबलेलं सिंक, बेसिन माझ्या नवर्याशिवाय कुणीही काढत नाही. अगदी त्याला यायला वेळ असेल तरी तसंच ठेवतो. तो आल्यावर करेल म्हणुन. Lol

अहो पण ती स्वतःहुन खाते ना उष्ट. प्रेम वाढावं म्हणुन. कुणी बळजबरी तर नाहीना केलेली. खाऊदे की तिला.

सस्मित Lol
लग्न अटेंड नाही करता आले म्हणून मी मागे एका मित्राला भेटायाला गेलो होतो गेलो होतो लग्नानंतर घरी त्याच्या. तिथे ते एकमेकांवर गुळण्या टाकत होते. मला तर शिसारीच आली ते पाहून. वाढीव प्रथा पडल्यात समाजात.

लग्नानंतर काही वर्षांनी बाथरुममधुन ओले पाय घेऊन घरभर फिरणार्या, हात धुतल्यावर घरभर निथळवत जाणार्या नवरा-मुलांशी संयमाने डील करता यावी असं काही सुप्त हेतू असेल ह्या प्रथेमागे.
करु का वायरल वॉॅअप युनिवरसिटीत.

बादवे, तुंबलेलं सिंक, बेसिन माझ्या नवर्याशिवाय कुणीही काढत नाही. अगदी त्याला यायला वेळ असेल तरी तसंच ठेवतो. तो आल्यावर करेल म्हणुन. Lol
>>>>>>>

हे आमच्याकडेही सेम आहे. कित्येक घरात असेच असेल. पुरुष बरेचदा कामं करतात आणि बोलून दाखवत नाहीत Happy

भारतातही किमान पुण्यात अनेक कुटुंबांमधे इतके बेकार चित्र नक्कीच नाही.
>>>>>
मुंबईत बरेच घरात उलटे चित्र सापडेल. हल्ली प्रेमविवाह होताना कोण चेक करते की कोणाला स्वयंपाक बनवता येतो की नाही वगैरे... ज्याला जे जमते तसे करतात नवरा बायको.

इथे चर्चा वाचुन काल अखेर चित्रपट पाहिला.
हा चित्रपट आजच्या काळात घडतोय असं गृहीत धरलं तर मला अनेक गोष्टी पटल्या नाहीत.

Spoiler alert :

आजच्या काळातलाच आहे कारण त्यात शबरीमला मंदीर वाद दाखवला आहे.
आपली नायिका लग्नासाठी तयार झाली तेव्हा तिने आपल्या होण्यार्या नवर्‍याच्या फॅमिली बद्दल काहीच माहिती जाणुन घ्यावीशी वाटली नाही का ? ती जर इतकी शिकली सवरलेली होती तरीही. ( एका प्रसंगात म्हणते ती की नोकरी केलेली चलणार नाही हे मला कोणीच सांगितलं नव्हतं)

बर ते असो..नाही कळत बरेचदा लग्नाच्या आधी तिथे कशा चालिरीती आहेत ते ..म्हणुन हा मुद्दा सोडुन देउ आपण.
पण बर्‍यापैकी सधन घरात कुठल्याही कामाला बाई असु नये ते पण घर इतकं मोठं असताना असं कसं शक्य आहे ?
स्वैपाक, भांडी , घर साफसफाइ, कपडे धुणे इतकं सगळं आजकाल (चित्रपटात दाखववलेल्या सांपत्तीक स्थिती असलेल्या घरात ) खरच एकटी बाई करते का ?
लॅपटॉप उघडुन नोकरी साठी apply करणार्‍या मुलीली साधा एखादा प्लंबर स्वतः फोन करुन बोलवुन घेता येउ नये हे कसे शक्य आहे ? त्यासाठी नवर्‍यावर का अवलंबुन रहायचं ?
ज्या घरातली मुलगी लग्न होउन अमेरीकेत वगैरे गेली आहे तिकडे इतक्या जुन्या चालीरीती अजुनही पाळतात यावर कसा विश्वास ठेवायचा ?

रांधा वाढा उष्टी काढा ह्यात तर मागच्या अनेक पिढ्या संपल्या. ह्यात काय एवढं मोठं? नाॅर्मलच आहे की हे सगळं.. "ह्याच" गृहितकांकडे हा सिनेमा परत एकदा नव्यानं बघायला लावतो. >> मी जिथे राहाते तिथे माझ्या आणि माझ्या आजुबाजुच्या घरात आता हे चित्र पुर्णपणे बदललं आहे. त्यामुळे हा चित्रपट अजुन १०-१५-२० वर्षांपुर्वी आला असता तर तेव्हा लोकांमधे खळबळ उडाली असती.
पण आताच्या जमान्यात मात्र मला हा चित्रपट बघुन फार काही "डोळे उघडले" वालं फीलिंग आलं नाही.

बाकी सुंदर सुंदर साउथ इंडीयन पदार्थ बघुन डोळे निवले.
आज लगेच इडली साठी डाळ तांदुन भिजत घातले आहेत Happy

देशात आजही अनेक समाजांत स्त्रियांनी नोकरीसाठी बाहेर जाणं, घरात स्वयंपाकासाठी नोकर ठेवणं, पाहुण्यांसमोर पटकन पुढे येणं ह्या आणि अशा अनेक गोष्टी चांगल्या मानल्या जात नाहीत. आमच्या फिजियो थेरपिस्ट मारवाडी आहेत. त्यांना त्या करिअरसाठी बाहेर जातात ह्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या दीड दोन वर्षांच्या मुलाला सांभाळायला एकत्रच रहात असलेल्या सासूसासऱ्यांनी नकार दिला आहे. उप्र, बिहार, राजस्थान, बंगाल, तामिळनाड, आंध्र, तेलंगण, महाराष्ट्रातला देश, विदर्भ, मराठवाड्यातला निम्न वर्ग ह्यात काही जुनाट प्रथा अजूनही तशाच आहेत. आमच्या शेजारी एक अत्युच्च वर्णीय केरळी कुटुंब रहात असे. त्या घरात घरची स्त्रीच भांडी घासणे करीत असे कारण बाहेरच्या बायका विटाळ चांडाळ पाळीत असतील का अशी शंका तिला येई.

शिकल्या सवरलेल्या आधुनिक घरात प्रतिगामी प्रथा पाळल्या जात नसाव्यात आणि अश्या घरात मुली देताना लोक विचार करत नाहीत का असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी -
माझी एक कलीग तमिळ ब्राम्हण आहे. तिचे लग्न त ब्रा शीच झाले. झाल्यावर सासरच्यांनी तीच्यावर शुद्धीकरण विधी केला. तिचे सासरे एअर इंडीयात फ्लाईट पर्सर होते, जगभर फिरले होते पण त्यांनी उभ्या आयुष्यात बाहेर काही खाल्ले नाही. सोबत छोटा कुकर आणि घरी बनवलेले इडली बॅटर, ड्राय उपमा बॅटर व व घेऊन फिरायचे. का? तर बाहेरचे चालणार नाही, अलौडही नही है.... रोज दोन्ही वेळचा ताजा सैपाक ढिगाने बनवायचा, सकाळी उरलेला सकाळीच टॉयलेटमध्ये फेकायचा, संध्याकाळचा उरलेला संध्याकाळी. सासू सासर्यासाठी बनलेले अन्न दुसऱ्या कोणी खाणे अलौडही नही है.. Happy कलीगने फक्त साड्याच नेसायच्या, महिन्यातले चार दिवस अस्पृश्यासारखे काढायचे वगैरे कित्येक बंधने तिच्यावर होती.

तिचे वडीलही आमच्याच ऑफिसात होते व त्या बाजूला खूपच मोकळे वातावरण होते. आम्ही तिला विचारायचो, नवरा शोधताना हा कर्मठपणा दिसला नाही का? ती म्हणायची, काय काय बघणार? उच्च शिक्षित, निर्व्यसनी, अमुक वय, अमुक शहर वगैरेच्या यादीत कर्मठ नको, मोकळे वातावरण वगैरे घालत बसले तर नवरा मिळायचाच नाही ही भीती Happy .

बर्‍याच घरात हे अजून पाळतात.
कांदा लसूण आयुष्यभर न खाल्लेले बरेच लोक पाहण्यत आहेत.
मुळात अरेंज मॅरेज हे इतके सांभाळून जपून डील असते, त्यात आजूबाजूचे इतके सल्ले देत असतात की सुरुवातीला क्लायंट वर इंप्रेशन मारण्याच्या नादात दोन्ही पार्टी नीट खोदून स्पेसिफिकेशन्स विचारुन घेणे टाळतात. आणि मग नंतर एकमेकांशी अखंड पणे इश्यू कॉल इश्यू कॉल खेळत बसतात.
शिवाय त्यात दोन्ही पार्टींचा आपल्या प्रेमाच्या माणसांबद्दल नकळत असलेला बायस आड येतो. त्यामुळे ते खर्‍या गोष्टी एकमेकांना सांगत नाहीत.

'आमची देवावर श्रद्धा आहे.आणि आम्ही सर्व रुढी पाळतो.पण आम्ही कर्मठ नाही.'
'माझी आई फणसाप्रमाणे आहे वरुन काटेरी आतून प्रेमळ '
'काय काय एकेक सासवा असतात. पण माझी आई तशी अजिबात नाही. माझ्या भावाच्या बायकोला किती छान वागवते ती. वहिनीच रुड आहे.'
आणि वगैरे वगैरे Happy

सुरुवातीला क्लायंट वर इंप्रेशन मारण्याच्या नादात दोन्ही पार्टी नीट खोदून स्पेसिफिकेशन्स विचारुन घेणे टाळतात. आणि मग नंतर एकमेकांशी अखंड पणे इश्यू कॉल इश्यू कॉल खेळत बसतात.>>>

खरे आहे... लग्नाच्या आधी काहीही विचार नाही. ज्यांनी विचार करायला हवा ते स्वप्नाच्या जगात रमलेले असतात, मुलीकडचे कसे विचारायचे बाई, माणसे तर चांगली दिसताहेत, आम्ही गेलो तेव्हा कित्ती चांगली वागली, त्यांचे अमुक्तमुक ह्या पोस्टवर आहेत, त्यांच्या तमुकच्या सासरी इतकी सुबत्ता आहे वगैरे वगैरे डायलॉगात अडकलेली आणि मुलाकडचे आमचा मुलगा इतका शिकलेला, त्याला इतकी शिकलेली मुलगी मिळाली व व च्या भानगडीत.

हे सगळे फुगे लग्नानंतर फुटले की खायचे दात दिसायला लागतात Lol

उच्च शिक्षित, निर्व्यसनी, अमुक वय, अमुक शहर वगैरेच्या यादीत कर्मठ नको, मोकळे वातावरण वगैरे घालत बसले तर नवरा मिळायचाच नाही ही भीती Happy .
>>>>>>>

जोपर्यंत हे अपेक्षांमध्ये टाकायला सुरुवात नाही करणार तोपर्यंत समाज बदलणार तरी कसा मग?
हे म्हणजे या गोष्टीला कमी प्रायोरीटी देत स्वताहूनच कॉम्प्रोमाईज केल्यासारखे झाले.

कामवाली आली नाही तर घरात संडास बाथरुम कोण घासतं आणि केराची बादली कोण धुतं असा प्रश्न विचारायला हवा खरं तर. पण अॅरेंज मॅरेजमधे शिष्टाचार आड येतात. आमच्या मुलाला स्वैपाक येतो आणि घरकामात मदत करतो इतपत कळले तरी आनंद असतो एकंदरीत.

@मेधावि.. या ही खूप झाल्या अपेक्षा.. अजूनही किचन मध्ये जाणं कमी पणाचा मानणारे आहेत.. सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात.. आम्ही नोकरी करत नव्हतो..सो नवऱ्याला आणि बबड्याला कशाची सवय नाही हे ही अभिमानानं सांगतात लोक...

अनेक जणांना जिरे आणि मिरी मधला फरकही माहीत नसतो. आमचे भाचे जावई सोळाव्या वर्षीच पुढे शिकण्यासाठी अमेरिकेला गेले. घरचं गडगंज. भाचीच्या लग्नाच्या वेळचा थाट बघून सगळे हुरळले होते. लग्नाला आज वीस वर्षे झाली पण अजूनही घरातले सामान आणायला सांगितले तर हा पठ्ठ्या सुपर मार्केट मधून तीन तीनदा घरी भाचीला फोन करतो. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय वगेरे. कधी कधी स्कॅन करून फोटो पाठवतो की हीच ना ती वस्तू म्हणून. अर्थात त्यामुळेच की काय, भाची सुपर वूमन झाली आहे!

आमच्याईथे स्वयंपाकात मीठमसाला कमीजास्त पडले वा चहा मनाजोगती नाही झाली म्हणून बायकोला आईबहिणीच्या शिव्या देणारेही होते. आणि ते सुद्धा बाहेरच्यांसमोर म्हणूनच मला माहीती आहेत.
जगात सर्व प्रकारचे लोकं असतात. प्रश्न आहे की यावर ऊपाय काय.
जेव्हा मी अशी शिव्या खाणारी बाई बघायचो तेव्हा ती हेच आपले आयुष्य असल्याप्रमाणे काहीही रिॲक्ट न करता याचा स्विकार करायची. अश्याने एखाद्या त्रयस्थाला तिच्याबद्दल सहानुभुतीही वाटू नये. असो, असेल तिचा प्रॉब्लेम. नसेल तिच्याकडे ईतर पर्याय. पण ज्या सुशिक्षित आणि कमावत्या बायका आहेत त्यांच्याकडे पर्याय असूनही जर त्यांनी घरात वाद नको वगैरे कारणे देत शक्य तितके सहन करायचा पर्याय निवडला तर त्यात त्यांचाच दोष.

सासूबाईंनी माझ्या नवरयाला लाडाऊन ठेवले आहे हि निव्वळ पळवाट झाली. जिची गरज तेव्हा भासते जेव्हा ताकद असूनही जे घडतेय त्याविरुद्ध आवाज उठवायची हिंमत नसेल. लग्नाआधी भले मुलाला काही येत नसले तरी जर ठरवले तर ते लग्नानंतर शिकून करता येते.

घरात वाद नको पेक्षा बाहेर च्यांसमोर वाद नको हे निर्वीकारपणाचं मुख्य कारण असतं.पूर्वीच्या काळी नवरा बायकोत पटत नाही कळल्यावर बायकांच्या अब्रू वर हात टाकणारे पुरुषही होते.
असे वाद स्वतःला बॅकिंग मिळवून नंतर खाजगीत हाताळत असतील त्यातल्या त्यात शूर बाया.

व्यक्ति तितक्या प्रवृत्ती! कोणाच्या घरात काय चालते, कोणाला कशाच्या अभिमान वाटतो, कोणाला किती येतं आणि त्यातले काय आणि किती बरोबर हे आपण का ठरवावे. ज्याला जे चालते, तो ते चालवून घेतो. पण जे नाही आवडत ते करायचे आणि नावडते काम केले/करावे लागते म्हणून रडायचे याला काही अर्थ नाही.

इतरांचं काय or किती बरोबर ते आपण नाही ठरवू शकत.. पण त्यावरून धडा तरी नक्कीच घेऊ शकतो.. e.g. as साधना and ऋन्मेश suggested, लग्नाळू च्या अपेक्षा तरी सेट होऊ शकतात.. or आधीच अडकलेल्यांना realisation झालं तरी पुष्कळ... त्यावर काही act करता आलं तर उत्तम..

आमच्याकडे माझ्या लग्नाच्या आधीपासूनच नवऱ्याला सवय होती.. मिरची कडीपत्ता ताटातच बाजूला ठेऊन ताट सिंकमध्ये ठेवताना..तो कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा.. त्याच्यामुळे मला हि ती सवय लागली..मी हि ती सवय माझ्या माहेरी..माझ्या भावांना आणि मित्रांना लावली..

मला थप्पडची मुळ कंन्सेप्ट आणी ती डेव्हलप करताना वाढवलेला सिनेमा काहीच पटलं नाही. भाराभर स्टोर्यांचा संबंध नाही. >> मला तरी थप्पड मधल्या बहुतेक सगळ्या स्टोरीज मूळ कथानकाशी सुसंगत अश्याच वाटल्या. उदा.: सुनीताची गोष्ट. ती तिच्या नवर्‍याचा मार चुकवण्यासाठी तिच्या कुवतीप्रमाणे काहीतरी उपाय करत असते. कधी यशस्वी होते तर कधी नाही. पण जेव्हा ती बघते की so called सुधारलेल्या/ sophisticated घरातही नवरा बायकोला मारतो आणि ती गप्प बसते तेव्हा सुनीताही निमूट नवर्‍याचा मार सहन करते.
अमृताकडून नाच शिकणारी, तिच्या शेजारीच रहाणारी teenager सानिया. तीही बघते की पार्टीत अमृताचा नवरा तिला मारतो आणि अमृता काहीच करू शकत नाही. स्त्री-पुरूष नात्याचे असे abusive रूप ती घराजवळच बघतेय. तिला एका मुलाबरोबर फिरताना दाखवले आहे. म्हणजे मुलाबरोबर नाते सुरू करण्याच्या पायरीवर ती आहे. अश्यात एक abusive नाते घराजवळच बघायला मिळणे ही मोठी (तिच्या व्यक्तीमत्वावर परीणाम करणारी) घटना आहे. कदाचित तिला नात्याचे हेच रूप normal वाटू शकते. पुढे जाऊन तिला एखाद्या नात्यात असे अनुभव आले तर तीही ते निमूट्पणे सोसत रहाण्याची शक्यता आहे.
मुद्दा हा आहे की: आपण एका मोठ्या समाजाचा भाग आहोत आणि नात्यांबद्दलचे आपले कंडिशनिंग बहुतेकदा आजूबाजूच्या समाजामुळेच होते. तसेच आपल्या वागण्याचे पडसाद ही आजूबाजूच्या समाजावर उमटतात. अनेकदा हे आपल्याला लक्षात येत नाही. थप्पड सारखा सिनेमा पाहिला की ते लख्ख जाणवते.

मिरची कडीपत्ता ताटातच बाजूला ठेऊन ताट सिंकमध्ये ठेवताना..तो कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा
>>>
हि सवय मलाही आहे.
ईतकी कॉमन नसावी हे आपण आता मुद्दाम उल्लेख केल्यामुळे समजले Happy
बाकी मला खाताना चुकून एखादा भाताचा कण ताटाबाहेर पडला तरी तो बघवत नाही. त्याला गपचूप डाव्या हाताने बोटांच्या चिमटीत उचलून ताटाच्या कडेला काढलेल्या लिमडा मिरचीसोबत ठेवतो. आणि बोटं गपचूप पॅंटला पुसतो Happy

मिरची कडीपत्ता बाजूला काढणं कॉमन असेल.. पण स्वतःचं ताट उचलणं नाही.. म्हणजे कोणीतरी एक जण जो शेवटी ता ट उचलते तिच्या नशिबी उश्ट उचलणं.. ते एक वेळ वरील गोष्टी पर्यंत ठीक आहे.. ती लिस्ट जेव्हा शेवग्याच्या शेंगा, नॉन व्हेज खात असतील तर लेग पिस etc असं वाढत तेव्हा किळसवाणा प्रकार होतो इतरांच्या ताटातील उचलणं

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 February, 2021 - 00:53>>>>>>अगदी सेम मी पण.
सोहा, मेन हिरोईणीची स्टोरी सोडून बाकी स्टोर्या पटल्या.

मिरची कडीपत्ता बाजूला काढणं कॉमन असेल.. पण स्वतःचं ताट उचलणं नाही..
>>>>>>
हो, माझ्या सासुरवाडीला मला स्वतःला ताट उचलू देत नाहीत. तो आमचा मान आमचा मान म्हणून ताटावर झेपावतात. बाकी मी मला जे करायचे तेच करतो. तरी एकदोनदा पटकन माझे ताट पळवण्यात त्यांना यश लाभले Happy

काल याचवरून मला एक किस्सा आठवला, तो सविस्तर लिहायला हा स्वतंत्र धागा काढला
https://www.maayboli.com/node/78092

Pages