Submitted by अतुल. on 2 February, 2021 - 01:50

पहिले प्रेम, पहिला पगार, पहिला पाऊस, नोकरीचा पहिला दिवस... ह्या आणि अशा अनेक गोष्टी पहिलेपणाच्या न विसरण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
पण ह्या व्यतिरिक्त अनेक "पहिल्या" अविस्मरणीय गोष्टी असतात कि ज्या आपण कधीतरी पहिल्यांदाच केलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या असतात. आणि तेंव्हा हे पहिल्यांदाच असल्याने आपल्याला त्याविषयी काही माहित नसते त्यामुळे कधी थरार तर कधी गोंधळ अशा गमतीजमती घडत असतात. आणि आता आपण जेंव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा ह्या मजेशीर आठवणी आपल्याला गालातल्या गालात हसायला लावतात. इथे अशाच काही मजेशीर आठवणी आपण शेअर करूया...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळ्यांचे अनुभव भारी आहेत!
सगळ्यांचे अनुभव भारी आहेत! त्यांवरून मी शाळेत खाल्लेल्या पहिल्या थोबाडितेची गोष्ट आठवली.
तसा मी लहानपणी घरी थोडाफार मार खातच होतो, पण शाळेत अगदी गुणी मुलगा होतो. त्यामुळे मला पहिल्या बाकावर बसवायचे (हे लॉजिक काय आहे, मला अजून कळले नाहिये. व्रात्य मुले मागे बसली तर त्यांच्यापर्यंत पोहोचायला जास्त कष्ट लागतील ना? असो). चौथीत असताना एकदा बाईंनी ठरवलं की सगळ्यांचा काहीतरी खेळ घ्यायचा. त्यांनी दोन गट पाडले व सांगितलं की एका गटाने दुसर्याला प्रश्न विचारयचा, आणि तो आला तर त्यांना गुण, नाहीतर पहिल्या गटाला गुण; मग तसंच दुसर्या गटाने करायचं. 'तर मग मुलांनो, आपल्या ह्या नवीन खेळाला नाव काय द्यायचं बरं?' कुणी म्हणलं 'बाई, प्रश्नोत्तरे', कुणी 'बाई, कोडी', कुणी 'बाई, सवाल-जवाब', कुणी अजून काही. वर्गात एकच दंगा सुरू झाला. त्या सर्व गोंधळाच्या वर आवाज चढवून मी म्हणालो 'बाई, तमाशा' !! 'क्क्काआआआआआय्य्य्य्य्य?????' बाई ओरडल्या आणि माझ्या उत्तरावर फिसकन हसलेल्या आजूबाजूच्या लोकांसकट पूर्ण वर्ग गप्प-गार झाला. त्याचं काय आहे, की तेव्हा टीव्हिवर शनिवार/रविवार मराठी चित्रपट लागायचा आणि त्या वेळी त्यांनी सलग वेगवेगळे तमाशापट दाखवले होते. त्यात मी पाहिलं होतं की एक बाई स्टेजवरून दुसरीला 'ऐका ..... टण्टण्टण...' वगैरे करून काहीतरी कोड्यात प्रश्न विचारायची आणि दुसरी तिला त्यावर उत्तर देऊन अजून एक सवाल टाकायची. त्यामुळे माझ्या बालबुद्धीची अशी समजूत झाली होती की तमाशा म्हणजे दोन बायकांचे ग्रूप्स एकमेकींना कोडी घालतात. पण एवढं सगळं बाईंना समजावून सांगायची अक्कल आणि हिम्मत तेव्हा कुठे होती! मी नुसताच बाईंकडे घाबरून बघत राहिलो. काही कळायच्या आत काडकन माझ्या कानाखाली बसली आणि बाई म्हणाल्या, 'पुन्हा असं म्हणशील?'. माझं नक्की काय चुकलंय हेच मला कळेना. पण आपण काहीतरी मेज्जर लोचा केलाय, एवढं त्या थोबाडीतीमुळे कळलं होतं. त्यामुळे पुढे काही विचारत न बसता मी गपगुमान 'नाही' असं म्हणालो. पण माझ्या चेहर्यावरती प्रश्नचिन्ह तसंच होतं.
हरचंदजी भारीए किस्सा !
हरचंदजी
भारीए किस्सा !
हरचंद पालव
हरचंद पालव
वरचा टिपचा किस्सापण भारी आहे
एकदा मी आणि माझी मैत्रीण आमच्या एका लग्न झालेल्या मैत्रिणीकडे गेलो होतो. ती आमच्यापेक्षा तीनेक वर्षांनी मोठी. आम्ही दोघी मध्यमवर्गीय तर तिचं सासर गडगंज श्रीमंत आणि घरातल्या अनेक पद्धती आमच्या दोघींसाठी पूर्ण नवीन होत्या. त्यामुळे आम्ही जरा दबूनच वावरत होतो. पण तिच्या घरचे वागाबोलायला एकदम चांगले आणि मोकळे होते. त्यांनी आग्रह केला म्हणून आम्ही राहिलो तिच्याकडे. रात्री झोपायला गेलो तेव्हा थोड्या वेळाने मैत्रीण गप्पा मारायला आली आणि आल्या आल्या म्हणाली, ' हे काय, तुम्ही बेडकव्हर का नाही काढलंत?' आम्हाला बेडकव्हर म्हणजे काय तेच माहिती नव्हतं. मग आम्ही बेडवरून उतरलो तसं तिने ते बेडकव्हर काढलं. आत छान बेडशीट होतं. आम्ही कव्हरलाच बेडशीट समजून झोपलो होतो. उशाही कव्हरखालीच होत्या, पण आम्हाला वाटलं होतं की असेल हीपण यांची पद्धत.
असेल हीपण यांची पद्धत >>
असेल हीपण यांची पद्धत >>

तमाशाचा किस्सा मस्त आहे...ह.ह
तमाशाचा किस्सा मस्त आहे...ह.ह.पु.वा. हा धागा एकदम मस्त आहे.
लहानपणी पहिल्यांदा फोन मी वापरला होता ते मला अजून आठवते. आमची बदली रत्नागिरीला झाली व बाबा बॅकेत होते म्हणून बॅकेतर्फे रहाण्याची व्यवस्था होती. तेथे फोन ही होता. (त्याचा नंबर २६४७ हा अजून आठवत आहे). बरेच दिवस मला कोणी फोन करेल म्हणून वाट बघितली तर कोणीच केला नाही. बाबा फोनला हात लावू देत नव्हते. (मुळात जे फोन यायचे किंवा केले जायचे ते बाबांचेच असायचे). एक दोनदा wrong number आलेला ऐकला. ते म्हणजे काय असते हे समजून घेतले.
एकदा सर्वांची नजर चुकवून आपणच एक wrong number लावायचा असे ठरवले. बाबांच्या फोनच्या वहीतून बघून एक नंबर निवडला आणि ठरवले की ह्या नंबरला फोन लावायचा आणि विचारायचे की दुसराच नंबर आहे का ते. तेवढेच फोन वर बोलायची संधी मिळेल. मग एका दुपारी आई झोपलेली असताना तो नंबर फिरवला. जशी फोनवरून दुसरीकडच्या आवाजाची रिंग वाजायला लागली तसा माझ्या पोटात खड्डा पडला. चार पाच रिंग नंतर तिकडून फोन उचलला गेला. कोण्या बाईने फोन उचलला आणि रुक्ष आवाजात "हॅलो, कोण बोलतंय" असे विचारले. तो आवाज ऐकून माझी तंतरली. मी घाबरून माझे नाव सांगितले. मग तिने काम काय आहे आणि कोणाशी बोलायचे आहे हे विचारले. मी मग थोडे उसने अवसान आणून wrong number विचारायाच्या ऐवजी तिचा जो नंबर होता तोच नंबर आहे का विचारले. त्यावर तिने "नंबर बरोबर आहे, कोणाशी बोलायचे आहे आणि काय काम आहे?" असे विचारले. त्यावर मला काहीच बोलता आले नाही. तिने मला परत माझे नाव विचारले व सरळ माझ्या बाबांना बोलावले. चुकून बाबांच्या वहीतुन मी त्यांच्याच ऑफिसचा नंबर निवडला होता. आणि त्या बाईने नाव व आडनाव ऐकून घरचा फोन असावा असे समजून बाबांना फोनवर बोलावले. बाबांनी शांतपणे कशाला फोन केला ते विचारले. बाबांचा आवाज ऐकून मला सुरूवातीला बरे वाटले पण नंतर धडकी भरली. मला काहीच व्यवस्थित बोलता येत नव्हते. मग मी काहीतरी गुळमुळीत बोलून फोन ठेवला. नंतर थोड्यावेळाने बाबांनी फोन करून आईशी बोलून घेतले. त्यांना वाटले घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मी फोन केला काय.
नंतर संध्याकाळी घरी आल्यावर बाबा ओरडतील असे वाटले होते. पण बाबा काहीच बोलले नाहीत. पण नंतर त्यांनी मला फोनचा वापर कसा करायचा, कसे बोलायचे ते शिकवले.
कस्सले एक से बढकर एक किस्से
कस्सले एक से बढकर एक किस्से आहेत
वाह... वेटरला दिलेली टीप, पहिल्यांदा काढलेला फिल्मी फोटो,
. बेडकव्हर, पहिल्यांदा फोन वर बोलणे (so innocent childhood!!) 
सवाल जवाब तमाशा
पाचवीला गेल्यावर नुकतेच
पाचवीला गेल्यावर नुकतेच इंग्लिश यायला लागले होते. इनिशियल्स घेऊन नाव कसे बनवायचे ते कळू लागले होते. तेंव्हा माझ्या वडीलाना "डी आर पाटील सर" म्हणून सर्वजण अतिशय आदराने बोलवत. माझा एक नात्याने थोडा दूरचा नातेवाईक "दत्ता" हा नेहमी घरी यायचा. नात्याने तो थोरला भाऊच लागायचा म्हणून आम्ही त्याला दत्तादादा म्हणत असू. इनिशियल्स शिकल्यानंतर मला शोध लागला कि दत्तादादा चे सुद्धा इनिशियल्स डी आर पाटील असेच येत होते. म्हणून मी ते वापरायचे ठरवले. नवीन शिक्षणाचा उपयोग पहिल्यांदा करताना किती छान वाटते. आणि त्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर आईला विचारले "डी आर पाटील आला होता काय?" आईने हातातले काम तसेच सोडले आणि डोळे विस्फारून माझ्याकडे बघून ओरडली, "क्काय? काय म्हणालास?" मी शब्दांची जुळवाजुळव करत म्हणालो "अगं आपला दत्ता दादा. आज आम्हाला इनिशियल्स वरून नाव बनवायचे शिकवले. दत्तादादाचे डी आर पाटील असे नाव येते". आईने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि उद्वेगाने म्हणाली "काय गं बाई, कसली कसली वळणं लागायला लागलीत मुलांना"
तरी नशीब तेंव्हा वडील घरी नव्हते नाहीतर इनिशियल्स चा पहिला प्रयोग फार महागात पडला असता 
मस्त धागा.
मस्त धागा.
लिफ्ट, तमाशा... मस्त किस्से.
DI ........ R चा किस्सा
DI ........ R चा किस्सा भारीये
"डी आर पाटील आला होता काय?">>
"डी आर पाटील आला होता काय?">>>>>>>>
बापरे ! वाचलात.
आम्हालाही एक पाटील सर होते पण कडक शिस्तीचे असले तरी हसतमुख होते, हळवे पण होते.
बाकी किस्से पण जबरी
आहेत.
पहिल्यांदा मोबाईल फोन हाताळला
पहिल्यांदा मोबाईल फोन हाताळला होता ते सुद्धा आठवतेय. एका मित्राने मोबाईल फोन घेतला होता. तो "कसला असतो ते बघायला" आम्ही दोघे तिघे त्याच्या घरी गेलो होतो. एंटेनाची छोटी दांडी असलेला तो आदीमोबाईल होता. हि दांडी अगदी सुरवातीच्या फोन्स मध्ये होती (उत्क्रांती मध्ये जसे मानवाचे शेपूट गायब झाले तशी हि दांडी पण नंतरच्या फोन मध्ये गायब झाली. असो)
तर त्याने मला हातात फोन दिला आणि म्हणाला तुला कुणाला फोन करायचा असेल तर ट्रायल घेऊन बघ. मी मोठ्या उत्साहाने हातात फोन घेतला...

....आणि कानाला लावला. मला गुर्र्रर्र्र्रर्र्र्र असा डायल टोन ऐकायला येणे अपेक्षित होते. तो डायल टोन ऐकायला आला नाही. म्हणून मी त्याला फोन परत दिला आणि म्हणालो, "डायल टोन नाहीये. डेड झालाय बहुतेक. सुरु करून दे".
त्यावर तो हसला. म्हणाला, "आतल्या, अरे ह्याला डायल टोन नसतो. फोन सुरूच आहे तू फक्त नंबर डायल कर आणि हिरवे बटन दाब"
डायल टोन हा प्रकार नसल्यामुळे सुरवातीला खूप दिवस मोबाईलवर नंबर डायल करणे म्हणजे हॉटेलमध्ये वेटर समोर दिसत नसताना तो आहे असे समजून ऑर्डर देत असल्यासारखे वाटायचे
>>>खूप दिवस मोबाईलवर नंबर
>>>खूप दिवस मोबाईलवर नंबर डायल करणे म्हणजे हॉटेलमध्ये वेटर समोर दिसत नसताना तो आहे असे समजून ऑर्डर देत असल्यासारखे वाटायचे Lol>>> हाहाहा भारीये.
.
>>>>त्यात मी पाहिलं होतं की एक बाई स्टेजवरून दुसरीला 'ऐका ..... टण्टण्टण...' वगैरे करून काहीतरी कोड्यात प्रश्न विचारायची आणि दुसरी तिला त्यावर उत्तर देऊन अजून एक सवाल टाकायची. >>> खी: खी: शनिवारी फार मराठी शिणेमे पाहील्याचा परिणाम.
सगळ्यांचे किस्से मस्त आहेत..
सगळ्यांचे किस्से मस्त आहेत..
माझा पण sanitizer चा एक किस्सा आठवला
6 7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एका जवळच्या नात्यातील लग्न होत म्हणून मी ताई सोबत पहिल्यांदाच पार्लर ला गेले होते. क्लीन अप करायला बसल्यावर पार्लर वाल्या काकूने हात पुढे करायला सांगितला आणि एक जेली सदृश्य पदार्थ हातावर दिला. घरी कधी कधी मी alove veera जेल चेहऱ्याला लावायची मला वाटले ही तशीच एखादी जेल असेल आणि क्लीन अप चेहऱ्याला करायचं आहे तर हा पदार्थ पण चेहऱ्याला लावायचा असेल म्हणून मी एकदम गूड गर्ल सारखं ते चेहऱ्याला चोपडून टाकले त्यावर ताई आणि पार्लर वाली दोघी हसायला लागल्या. मला काहीच कळेना काय चुकल ते. नंतर तिने चेहरा धुवायला सांगून ती जेल म्हणजेच आपली सद्याच्या काळातील मूलभूत गरज Sanitizer आहे हे सांगितले आणि त्याचा वापर कसा करायचा ते पण सांगितले. Hand wash आणि travelling करताना मी paper soap वगैरे वापरायचे. Sanitizer मात्र कधीच वापरले नव्हते आणि असा काही प्रकार असतो तेच माहित नव्हते.
त्या दिवशी चांगलीच फजिती झाली पण मला कुठं माहीत होत नंतर हेच sanitizer खिशात घेऊन फिरावं लागेल
मला गंमत वाटते आहे की "कळायला
मला गंमत वाटते आहे की "कळायला लागल्यानंतर प्रथम मुलाशी / मुलीशी बोलणे" याबद्दल कुणीच लिहिले नाही.
कॉलेजमध्ये असतांनाची गोष्ट.
कॉलेजमध्ये असतांनाची गोष्ट. गावाबाहेरचं जग न पाहिलेला एक मित्र आम्हा मित्रमंडळीबरोबर पहिल्यांदा मुंबईला आला होता. एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर सहज त्याची फिरकी घ्यावी म्हणुन टेबलावर ठेवलेल्या टिश्युपेपरकडे बोट दाखवत एकाने "हे जपुन वापरा. खुप महाग असतात." असं सांगितलं. जेवण झाल्यावर सगळे बाहेर पडलो तर हा आपला गालात हसतो, सांगायला तयार नाही. शेवटी खोदुन विचारल्यावर "ह्या पठ्याने आपलं जेवणाचं बिल वसुल केलं" असं सांगुन त्याने खिश्यातुन हॉटेलमधुन ढापलेला टिश्यु पेपरचा गठ्ठा काढुन दाखवला.
हे जपुन वापरा. खुप महाग असतात
हे जपुन वापरा. खुप महाग असतात >> हे पर्यावरणाच्या दृष्टीने बरोबरच आहे. काही लोक एक पुरेसा असताना भसाभस चार चार वापरतात, त्यांना हे सांगायला पाहिजे. पाण्याने हात धुवायची सोय असेल तर शक्यतो वापरुच नयेत.
>> प्रथम मुलाशी / मुलीशी
>> प्रथम मुलाशी / मुलीशी बोलणे
हा प्रथम बोलण्याचा असा अनुभव नाही. पण यावरून आठवले म्हणून लिहित आहे. मुलींचे पंजाबी ड्रेस आता खूपच कॉमन झालेत. पण शाळकरी वयात असताना आमच्या खेडेगावात मुलींच्या पेहरावात पंजाबी पाहायला सुद्धा मिळत नव्हता. जेंव्हा शहरात आलो तेंव्हा बऱ्याच मुली पंजाबी ड्रेस घातलेल्या दिसायच्या. छोट्या/मध्यम शहरात तेंव्हा पंजाबी ड्रेस बऱ्यापैकी प्रमाणात दिसू लागला होता. पण मला वाटायचे कि ह्या साऱ्या मुली पंजाब वरून शिक्षणासाठी इकडे आल्या आहेत
असायच्या मराठीच. पण कधी बोलायचा योग आलाच तर मी मोडक्यातोडक्या हिंदीत त्यांच्याशी बोलायचो. आणि त्यांना वाटायचे मला मराठी येत नाही. पहिल्यादा पंजाबी ड्रेस घातलेल्या मुली पाहिल्या तेंव्हाची हि आठवण.
सरकता जिना जेंव्हा पहिल्यांदा
सरकता जिना जेंव्हा पहिल्यांदा बघितला...
लहानपणी "सरकता जिना" असा शब्द अनेकदा वाचनात आला होता. हे जिने परदेशात असतात असे वाचायला मिळायचे. कुतूहल नक्कीच होते. पण "सरकता जिना" म्हणजे असून असून असे काय असणार? असेही वाटायचे. नेहमीच्याच जिन्याच्या पायऱ्या, त्या दोन्ही बाजूला जाडजूड अशा लोखंडी चेन ला फिट केल्या असतील. किंवा फार फारतर एकमेकांना बिजागऱ्यानी (Hinjes) जोडलेल्या लोखंडी प्लेट्सवर माउंट केल्या असतील आणि तो प्रकार दोन्ही बाजूला चाके लावून गोलगोल फिरवला असेल. झाला सरकता जिना! अशी कल्पना मी केली होती. तरीही अशा रचनेत सुरवातीच्या पायऱ्या (फिरणाऱ्या चाकावरून आल्या आल्या) तिरक्या असणार. तिथे उभे राहणे तसे अवघडच. त्यामुळे तो भाग स्थिर पायऱ्याखाली झाकून सरकत्या जिन्याचा वापर करणारे लोक टूण्णकन उडी मारून थेट तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीवर उभे राहत असतील असा काहीसा तोडगा मी मनातल्या मनातच काढला होता.
पण प्रत्यक्ष "सरकता जिना" मुंबई विमानतळावर पहिल्यांदा पाहायला जेंव्हा मिळाला तेंव्हा त्यावरच्या सुरवातीला छोट्या असणाऱ्या व हळूहळू मोठ्या होत जात जाणाऱ्या पायऱ्या पाहून प्रचंड आश्चर्य वाटले होते. कि हे नक्की कसे केले असेल? गोविंदाच्या चित्रपटात तो म्हणतो "यार मैने तुम्हे क्या समझा था, और तुम क्या निकले?" तसा माझा चेहरा झाला होता
मी त्या पायऱ्यांकडे कितीतरी वेळ निरखून बघत राहिलो होतो.
माझ्या कल्पनेप्रमाणे "दोन्ही बाजूला चेन लावलेल्या पायऱ्या" एवढ्यापुरतेच मर्यादित ते प्रकरण नव्हते हे मात्र मला कळून चुकले
जे काही होते ते माझ्या कल्पनेतल्या जिन्यापेक्षाही खूपच सुरक्षित असे ते होते.
नंतर इंग्लडला गेल्यावर जागोजागी (आणि विशेषत: ट्यूब स्टेशन्स मध्ये) असलेले अवाढव्य एस्केलेटर पाहून अक्षरशः थक्क झालो होतो. जमिनीखाली शेकडो फुट खोल खोल असलेल्या स्टेशन्सला प्रवाश्यांना ने आण करण्याचे काम हे सरकते जिने अहोरात्र करतात. रोज त्यावरून हजारो लोक ये जा करतात. इतके सुरक्षित असूनही त्यावर पाय ठेवताना अपघात व्हायचे आणि अजूनही होतात. ते पाहून "टूण्णकन उडी मारून" उभे राहण्याचे जिने असते तर किती अपघात झाले असते याची कल्पनाच करवत नाही
पुढे एकदा कुतूहलापोटी इंटरनेटवर शोध घेतला तेंव्हा कळले कि "सरकता जिना" हे पेटंट असलेले तंत्रज्ञान आहे. आणि त्याचे सध्याचे स्वरूप चार्ल्स सीबर्गर नावाच्या संशोधकाच्या डिजाईनवर आधारित आहे, कि जे त्याने १८९७ साली विकसित केले होते. आता आपल्याकडे सुद्धा "सरकता जिने" मॉल्स, मोठ्या इमारती अशा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठी विमानतळ गाठावे लागत नाही. पण त्याची पहिली ओळख अजूनही मला स्पष्ट आठवतेय.
पहिल्यांदा जेव्हा दाढीसाठी
पहिल्यांदा जेव्हा दाढीसाठी सलून मध्ये बसलो होतो तेव्हा जसजसा गालावरून ब्रश फिरत होता अन फेस होत होता तसतस गुदगुल्या वाटत होत्या. मी गालातल्या गालात हसत होतो
भारी किस्से सगळ्यांचे
भारी किस्से सगळ्यांचे
माझा दुचाकीचा अनुभव ( तसा
माझा दुचाकीचा अनुभव ( तसा पहिला नाही म्हणता येणार)
तर झाले असे होते की तेव्हा म्हणजे गेअर वाली बाईक नुकताच शिकलो होतो म्हणजे ६-७ दिवसच झाले असतील. मी आणि मित्र मस्तपैकी हुंदडत होतो बाईक चालवायला शिकलो या उत्साहात.आणि अश्यातच माझ्याकडून गाडीचा क्लच लिव्हर तुटला. गाडी पण नवीनच होती. आम्ही घाबरलो. गाडी चालू करून पाहिली चालू झाली. (तेव्हा एवढी अक्कल कुठे की गाडी चालू करायला क्लच लिव्हर चा काही संबंध नसतो. आताच्या गाड्या सेल्स स्टार्ट आहेत ज्या गियर मध्ये क्लच दाबून सुरू होतात पण तेव्हा हे तंत्रज्ञान नव्हत splendour ला.) गाडी चालू केली क्लच न दाबता गियर टाकला की झटका देऊन बंद व्हायची. आमची अजून फाटायची.मनात म्हटलं आपली आज घरी बिन पाण्याची. खूप प्रयत्न केले काहीच होईना. नाही हा करता करता एक शक्कल लढविली. मित्राला म्हटल तू बाजूला थांब. मी फुल accelerator देतो आणि लगेच पहिला गियर टाकतो. तो बाजूला झाला आणि मी ठरवल्याप्रमाने केलं. गाडी direct हवेत एवढी की तिचा मागचा mudguard जमिनीवर टेकला आणि गाडी पूर्ण ९० अंशात फिरून (दक्षिणेकडून पश्चिमेकडे) दाणकन आपटली. मी पूर्ण ताकदीने हॅण्डल धरून ठेवलं त्यामुळे पूर्ण गाडी पडली नाही. माझ्या घशाला कोरड पडली होती. धाबे दणाणले होते. मित्र ही थरथर कापत होता. रस्त्यावर गर्दी जमा झाली. काय झाले विचारणा सुरू झाली. आमच्या सुदैवाने त्या गर्दीत आमच्या शेजारचे गॅरेज वाले काका पण होते. प्रॉब्लेम त्यांच्या लक्षात आला त्यांनी गर्दी पांगवली आणि गाडी क्लच ची वायर ओढून की अजून काही करून गाडी चालू केली (म्हणजे झटका देऊन बंद न होता पुढे जाईल अशी चालू केली) आणि गॅरेज मध्ये आणली. मग गाडी चे बिल,पेपर ई.मागवून मग showroom मधून नवीन क्लच् लिव्हर आणून बसवला.
आणि मग आम्ही relax झालो. घरच्यांनी घोडे गाढव लगावले ते वेगळे सांगायला नको. तेव्हा एवढे पण डोकं चाललं नाही की आपण गाडी धक्का मारून नेऊ शकतो.
आज पण जेव्हा तो मित्र भेटतो तर कधी कधी हा किस्सा आठवून त्यावर पोटभर हसल्याशिवाय राहवत नाही.
बापरे डेंजर किस्सा यमराज!!
बापरे डेंजर किस्सा यमराज!!
यमराजांना यमलोक आठवला असेल
यमराजांना यमलोक आठवला असेल त्या अनूभवात.

रेडा सोडून दुचाकी हातात घेतली
रेडा सोडून दुचाकी हातात घेतली तर पंचाईत होणारच
रेडा सोडून दुचाकी हातात घेतली
रेडा सोडून दुचाकी हातात घेतली तर पंचाईत होणारच >> nice one
भारीए किस्सा यमराज यांचा !!
भारीए किस्सा यमराज यांचा !!
>>>रेडा सोडून दुचाकी हातात
>>>रेडा सोडून दुचाकी हातात घेतली तर पंचाईत होणारच>>>
मी बहुतेक BSc च्या दुसऱ्या
मी बहुतेक BSc च्या दुसऱ्या वर्षाला असतानाची गोष्ट आहे. माझा मुख्य विषय इलेक्ट्रॉनिक्स होता आणि नवीन नवीनच printed circuit board (PCB ), सोलडेरिंग वगैरे शिकलो होतो (बेसीक). त्या वेळेला आमच्याकडे Voltage चा issue होता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा घरातली tube light सुरु व्हायची नाही.
माझ्या मामेभावाने (जो आमच्या घराजवळच राहायचा, माझ्याच वर्गात होता आणि माझ्या एवढाच ज्ञानी होता
), कुठूतरी मासिकामधून एक कात्रण कापून आणले. त्यात छोटेसे सर्किट आणि डिस्क्रिपशन होते कि ज्यामुळे हा प्रॉब्लेम solve होतो. मग काय, फुल excitement मध्ये आम्ही ठरवले कि हे सर्किट बनायचे आणि आमच्या घराच्या tube light ला जोडून पाहायचे. घरचे खुश होतील आणि शाबासकी मिळेल वगैरे वगैरे ..
लगेच कामाला लागलो, Component वगैरे जास्त नव्हते आणि बजेट मध्ये होते त्यामुळे १-२ आठवड्यात ते विकत आणले, PCB मार्किंग वगैरे केले आणि एका वीकएंड ला सर्किट बनवून टाकले. नेमके त्या वीकएंड ला माझे वडील आणि मामा दोघेही बाहेरगावी कामानिमित्त गेले होते त्यामुळे आई जरा कुरकुरत होती कि तेआल्यावर काय करायाचे ते करा पण आम्हाला कसला दम निघतोय. आम्ही Tube light भिंतीवरून काढाली,सर्किट जोडले आणि बटण चालू केले. १-२ वेळा tube light ने डोळे मिचकावले आणि सर्किट ने पेट घेतला. आम्हाला काही कळायच्या आत भिंतीवरच्या मीटरमध्ये मोठा आवाज झाला आणि घरातली सगळी light गेली.
आई ,बहिण आणि आम्हीपण घाबरलो . काय करावे कळेना . संध्याकाळची वेळ होती आणि अंधार पडायला सुरवात झाली होती. मामेभाऊ वायरमन ची चौकशी करायला गेला पण कोणी मिळाले नाही. ती रात्र मेणबत्तीच्या प्रकाशात काढली. आई मध्ये मध्ये आम्हाला ऐकवत होती पण करणार काय? जास्त काळजी हि होती हि काय मोठा झोल तर नाही झाला ना मीटर मध्ये आणि वडील आल्यावर काय?
दुसऱ्या दिवशी वायरमन आला. नशीबाने फक्त फ्युज उडाला होता तो त्याने फिक्स केला पण Tube light ने राम म्हटला होता. नवीन आणावी लागली . २ दिवसांनी मामा आणि वडील परत आल्यावर माझी आणि मामेभावाची बिनपाण्याची झाली हे वेगळे सांगायची गरज नाही
(No subject)
ट्यूबलाईट आणि बाइक - दोन्ही
ट्यूबलाईट आणि बाइक - दोन्ही किस्से भारी आहेत
Pages