नैराश्य: Antidepressant गोळ्या घ्याव्यात कि नकोत? सल्ला हवाय

Submitted by ek_maaybolikar on 29 January, 2021 - 02:29

नमस्कार. मी मायबोलीवर पूर्वी एकदोनदा मला ज्या समस्या भेडसावत होत्या त्या मी इथे मांडल्या व मायबोलीकरांनी त्यास उपयुक्त प्रतिसाद दिला. त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. हा धागा त्यासंदर्भातच पण पुढच्या पायरीबाबत आहे.

गेली दोन तीन वर्षे मी नैराश्याचा सामना करत आहे. एखादे काम सुरु करण्यात चालढकल करणे व वेळ वाया घालवणे या दोन मुख्य सवयी जडल्या आहेत व त्या अक्षरशः विकोपाला गेल्या आहेत. ऑफिसचे वा महत्वाचे कामाला हात घालायला नको वाटते. विशेषतः ज्यात मानसिक उर्जा लागते अशी कामे नको वाटतात. मानसिक उर्ज्या पूर्णपणे कमी झाली आहे. अनेक दिवसच्या दिवस चालढकल करत राहतो व अन्यत्र वेळ वाया घालवतो. प्रसंगी झोपून काढतो. पण काम करणार नाही. अगदीच गळ्याशी आले तर उसासे टाकत कसेबसे ते काम उरकून टाकतो. मग पुन्हा वेळ वाया घालवण्याच्या mode मध्ये जातो.

याबाबत मी अगदी अलीकडे एका नामांकित मानसोपचार तज्ञांशी सल्लामसलत केली (त्यांच्याकडे जायला सुद्धा चालढकल करत एक महिना काढला). त्यांनी माझे सगळे ऐकून घेतले. अनेक प्रश्न विचारले. आणि अखेर मला काही गोळ्या दिल्या. सध्या तुम्ही agitation मध्ये आहात त्यामुळे सुरवातीला वीस दिवस या गोळ्या घ्या व पुन्हा भेटा. मग आपण पुढची कृती ठरवू असे त्यांनी सांगितले. घरी आल्यावर मला कळले कि या गोळ्या Antidepressant आहेत. Selective serotonin reuptake inhibitor (SSRI) antidepressant. व त्याबाबत अनेक मते वाचायला मिळतात. मला सल्ला हवा आहे तो ह्या गोळ्या घ्याव्यात कि नकोत ह्याबाबत. कारण त्याचे side effects आहेत. त्यामुळे गोळ्या सुरु कराव्यात कि नाही याबाबत सध्या अत्यंत द्विधा मनस्थितीत आहे. कोणास अनुभव किंवा माहिती असल्यास व सांगितल्यास खूप मदत होईल.

या गोळ्यांचे वाचनात आलेले side effects आणि डॉक्टर त्याबाबत काय म्हणतात:

१. अनेक वर्षे/महिने घ्याव्या लागू शकतात: डॉक्टरनी सांगितले कमीत कमी सहा महिने
२. यांची सवय लागू शकते: डॉक्टरांनी सवय लागत नाही म्हणून सांगितले
३. या गोळ्यांमुळे वजन वाढू शकते: डॉक्टरनी असे काही सांगितलेले नाही
४. लैगिक क्षमता कमी होते: डॉक्टरनी हे सांगितले नाही पण अनेक ठिकाणी हे वाचायला मिळते
५. आम्लपित्त चा त्रास होतो: हे डॉक्टरांनी सुद्धा संगितले
६. या गोळ्यां सुरु असताना मद्यपान करू नये: डॉक्टर म्हणाले शक्यतो मद्यपान करू नका. पण मी मद्यपी नसलो तरी अधूनमधून घेतो. सहा महिने पूर्ण थांबवणे कठीण आहे.
७. झोप व दिवसभर सुस्ती येऊ शकते व नेहमीच्या रुटीनवर परिणाम होऊ शकतो: डॉक्टर म्हणाले नेहमीच्या कामांवर परिणाम होणार नाही उलट तुमची कामातली एकाग्रता वाढण्यास मदत होईल.

काही वर्षांपूर्वी एक मित्र नैराश्य मधून गेला होता. त्याला सुद्धा अशाच गोळ्या दिल्या होत्या. पण रोगापेक्षा उपाय भयंकर असे झाल्याने त्या गोळ्यांच्या side effects मुळे त्याला बराच त्रास झाला. अखेर अन्य एक मित्राने त्याला सांगितले कि या गोळ्या घेऊ नकोस व गोळ्यांपेक्षा स्वत:च्या इच्छाशक्तीने नैराश्यावर मात कर. त्यानुसार त्याने गोळ्या थांबवल्या. अचानक गोळ्या थांबवल्यामुळे त्याला त्रास झाला खरा. पण पुढे त्याने निर्धाराने नैराश्यावर मात केली.

हे सगळे पाहता मला आता प्रश्न असा पडला आहे कि या गोळ्या घ्यायला सुरवात करू कि नको? याबाबत मायबोलीवरांचे स्वत:चे अथवा माहितीतल्या इतरांचे antidepressants चे अनुभव असल्यास किंवा खात्रीशीर माहिती असल्यास व सांगितल्यास उपकृत राहीन. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा सिरीयसली काढला असेल असं समजून उत्तर देतीय.
कुठलेही अँटिडिप्रेसंट्स Please Please नका घेऊ
तुम्ही वरती लिहिलेत ते सगळे आणि त्याहीपेक्षा अधिक भयंकर असे साईड इफेक्ट्स आहेत.
ह्याबद्दल मी

https://www.maayboli.com/node/77323
https://www.maayboli.com/node/77338
ए ऍसिडिटी,तुमने भी बहोत कुछ सिखाया - भाग ३
https://www.maayboli.com/node/77363
https://www.maayboli.com/node/77396
इकडे सविस्तर लिहिले आहे.

मलाही देताना सांगितले होते एक महिनाच घ्यावं लागेल.
पण कसलं काय?
त्याने शष्प फरक पडला नाही.
त्यापेक्षा Youtube वर भरपूर इन्स्पिरेशन ल विडिओ आहेत ते बघा.
मराठीत कितीतरी प्रेरणादायी पुस्तके आहेत ती वाचा.
मध्यंतरी दिग्दर्शक अभिनव देव ह्याची पत्नी स्मिता देव ह्यांचा एक youtube विडिओ बघण्यात आला.
त्यातही त्यांनी अँटिडिप्रेसंट बद्दलचा negative experience सांगितला होता.
तुम्हाला नैराश्यातून बाहेर पाडण्यासाठी शुभेच्छा.

मी महिनाभरातच बंद केली होती ती औषधे कारण मला ज्या आजारपणात नैराश्य आले होते त्याच्याच औषधांनी एवढा शरीराला त्रास व्हायचा की ही नवीन झेपणे अवघड होते. पण मला आयुर्वेदिक औषधांनी हळुहळू फरक पडत गेला आणि मुळ आजारातून बाहेर येत गेल्यावर नैराश्यातुन सुटका होत गेली. सुशांतच्या धाग्यावर कुठेतरी एक औषध लिहिले होते आणि दुसरे म्हणजे ''मानसमित्र वटकम''. दोन्हींचा चांगला अनुभव आल्याने मी ती अजुनही वापरतो वरचेवर कोणत्याही दुष्परिणामाशिवाय. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने तुम्हाला काय लागू पडते ते बघा पण तज्ज्ञांनी सांगितले असेल तर घ्यावी लागतील ती औषधे.....and yes, depression is real thing.

SSRI हे डिप्रेशन व्यतिरिक्त OCD साठी दिल्या जाते. अनेक OCD पेशंट्स ही औषधे वर्षानु वर्षे घेऊन कामे करताना पाहिले आहेत. सुस्ती येणे झोप येणे हे साईड इफेक्ट्स हळूहळू कमी होत जातात, सवय व्हायला २ - ३ महिने लागू शकतात. सगळे साईड इफेक्ट्स सगळ्यांनाच होतात असे नाही. तुम्ही लिहिल्या व्यतिरिक्त केस गळणे हा या गोळ्यांचा एक कॉमन साईड इफेक्ट आहे, तसे होत असल्यास डॉक्टर या गोळ्यासोबत बायोटिन हे व्हिटॅमिन घेण्यास सांगतात.
या औषधांची मात्रा हळूहळू वाढवत नेतात आणि बंद करताना त्याही पेक्षा सावकाश करतात. एकदा तुम्हाला मोठ्या मात्रेने औषध सुरू केले की ते मात्रा हळूहळू कमी करूनच थांबवता येते ज्यास दोन/तीन महिने लागु शकतात. तुमची ट्रीटमेंट वर्ष की दोन वर्षे वगैरे चालेल हे डॉक्टर प्रोग्रेस पाहून ठरवतील.

क्राऊड कन्सलटेशन पेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध/इतर ट्रीटमेंट (कौंसेलिंग) घ्यावे असे मी सुचवेन.

शुभेच्छा.

नमस्कार.
तुम्हाला होत असलेल्या त्रासातुन तुमची लवकर सुटका व्हावी ह्या शुभेच्छा.
माझा हा प्रतिसाद दुसर्‍यांसाठी आहे.
जरी धागालेखकाचा स्वानुभववाल्यांकडुन सल्ला मागायचा उद्देश भाबडा असला तरी जे कोणी ह्या संवेदनशील विषयावर आपला स्वतःचा अनुभव मांडत आहेत किंवा मांडणार आहेत त्यांनी दोन वेळा विचार करुन माहिती द्यावी किंवा उघड करावी.
कारण आपल्या स्वतःबद्द्ल दिलेल्या ह्या संवेदनशील माहितीचा माबोवरील काही "हलकट प्रवृत्ती" पुढे मागे उणेदुणे काढताना, स्कोरसेटलिंग म्हणुन किंवा डिवचण्यासाठी चुकीचा उपयोग करु शकतील.

धन्यवाद सर्वाना. जी धागा गांभीर्यानेच काढला आहे. आधीचे धागे सुद्धा यासंदर्भात आहेत. आपला सर्वांचा सल्ला पटतो आहे. साईड इफेक्टस् हेच मुख्य चिंतेचे कारण आहे. पुढच्या भेटीत डॉक्टरांना "मला काही कारणास्तव गोळ्या घ्यावयाच्या नाहीत. कृपया पर्यायी उपाय सांगा" असे सांगून पाहतो.

जेम्स बॉन्ड, आपला मुद्दा लक्षात आला नव्हता. धाग्यात आवश्यक ते बदल करीत आहे.

पुन्हा एकवार सर्वाना धन्यवाद.

>>या गोळ्यां सुरु असताना मद्यपान करू नये: डॉक्टर म्हणाले शक्यतो मद्यपान करू नका. पण मी मद्यपी नसलो तरी अधूनमधून घेतो. सहा महिने पूर्ण थांबवणे कठीण आहे. हे जे कठीण वाटत आहे तो रेड फ्लॅग तर नाही ना हे स्वतःलाच प्रामाणिकपणे विचारा.
तुम्हाला जर का क्लिनिकल डिप्रेशन असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीफार औषधांची मदत लागणार. नुसती इच्छाशक्ती, इंस्पिरेशनल विडीओ उपयोगी नाही. साईड इफेक्ट्स हे साधे पेनकिलर घेतले तरी असतात. तुम्हाला या औषधाचे साइडइफेक्ट्स कितपत असतील हे आत्ताच सांगणे कठीण. प्रत्येकाची प्रकृती वेगळी. चांगले डॉक्टर साईड इफेक्टस बघून त्यानुसार काहीवेळा पुरक औषध सुचवतात, काही वेळा औषध बदलूनही देतात. औषधांसोबत काउंसेलिंग सेशन्स नाहीत का? सोबत काउंसेलिंग असेल तर नेराश्यातून बाहेर पडायला आणि रिलाप्स टाळायला चांगली मदत होते.
तुम्ही सध्याचे निदान आणि जी उपाययोजना सांगितली आहे ती पडताळून पहाण्यासाठी सेकंड ओपिनियन घेवून बघा. दुसर्‍या मानसोपचारतज्ञांना भेटा आणि ते काय निदान करतात, उपचार सुचवतात ते बघा. नैराश्यासारख्या आजारात तुम्ही जी माहिती देता ती आणि तुमचा एकंदरीत वावर यावरुन डॉक्टर निदान करतात. तुमच्यासोबत घरातील कुणी गेले होते का? कारण आपल्या वावरातले बारकावे घरातील दुसरी व्यक्ती डॉक्टरांना सांगू शकते, त्यांच्या प्रश्नांना वेगळ्या अँगलने उत्तर देते जेणेकरुन योग्य निदान करायला मदत होते. औषध घ्यायला सुरुवात केल्यावरही घरी कुणी तरी तुमच्यातले बदल नोंदवायला, जर का त्रास होत असेल तर त्याची दखल घ्यायला हवे.
योग्य उपचर मिळून तुम्हाला बरे वाटो.

योगासने आणि प्राणायाम यांचा खूप फायदा होईल. मात्र किमान 3 महिने तरी करायला हवे.
गोळ्या घेण्याआधी करून बघा.

धीराने नैराश्यावरती मात होत असती तर काय हवे होते. मेंदूतील इम्बॅलन्स , औषधांनी काबूत येतो. क्वालिटी ऑफ लाईफ महत्वाची आहे की अन्य मुद्दे हे तुम्ही ठरवायचय. काही साईडैफेक्टस असतात पण फार सिव्हीअर नसतात. बाकी सिव्हीअर वाटले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःचे प्रयत्न चालू ठेवा पण औषधे जरुर घ्या.

मला आधी काही लोकांनी सल्ला दिलेला अऊषधे घेउ नकोस, आत्मविश्वास पार निघून जातो, फार वाईट परीणाम होतात, साईड इफेक्टस व अ‍ॅडिक्शन!! पण औषधांनी माझे क्वालिटी ऑफ लाइफ अतोनात सुधारले. पर्यायी कुटुंबियांचा त्रास कमी झाला. मी एक लाएबिलिटी होते आता मी एक अ‍ॅसेट आहे. भक्कम आहे, आत्मविश्वास आहे मला, आरोग्य आहे.

लोकांना अर्धवट माहीती असते. डॉक्टरांची फी का भरावी लागते. डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्याची अनमोल वर्षे, पैसे, उर्जा, वेळ खर्च करुन वैद्यकिय शिक्षण घेतलेले असते. अर्धवट माहीतीवाले लोक रिलाएबल असते तर आपण त्यांना नसते पैसे दिले? हे म्हणजे तुम्ही पैसेही देताय व तुमचा विश्वासही नाहीये. असे करु नका.

जरुर आवश्यक औषधे घ्या. गो फॉर इट! मनात किंतु बाळगु नका. प्लीज औषधे घ्या. औषधांनी क्वालिटी ऑफ लाईफ ट्रिमेन्डसली सुधारेल. गो फॉर इट!!! १००%. आणि जेव्हा घ्याल तेव्हा विश्वास बाळगा नक्की गुण येइल. आत्ताही तुमचे हो-नाही होते आहे तो कदाचित आजाराचा सिम्प्टम असेल. तेव्हा औषधे घ्यायला सुरुवात करा. जर औषधांचा दुष्परिणाम झालाच तर, डॉक्टर कॅन ट्वीक मेडस , डोस वगैरे. टन्स ऑफ मेडस आर अव्हेलेबल. पण धीराने घ्यावे लागेल, चुटकीसरशी औषध लागू पडेलच असे नाही. शरीराला सवय व्हायला थोडा अवधी लागेल. तुम्ही नंतर नंतर 'न्यु नॉर्मल' ला सरावाल. काही साईड इफेक्टस पॉझिटिव्हही आहेत हे तुमच्या लक्षात येइल. अतिशय संतुलीत मूड रहाणे, प्लेझंट डिस्पोझिशन. हे पॉझिटिव्ह साईडैफेक्टस कोणी सांगत नाही.

डाटा कशाचा असतो सिलेक्टिव्ह गोष्टींचा पण एका नकारात्मक केसमागे १० सकारात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह केसेस असतात त्याचे काय. उदाहरणच देते - शत्रूच्या तळावरती हल्ला करुन परतलेल्या विमानांचा डेटा मिळवला. त्यांच्या असे लक्षात आले विमानाच्या काही विशिष्ठ भागांना, पंख वगैरे शत्रूच्या, गोळ्यांनी जबरदस्त मार बसतो, तेव्हा ते भाग जास्त मजबूत केले पाहीजेत. पण जेव्हा एक्स्पर्टसचा सल्ला घेतला गेला तेव्हा एक्स्पर्टस काय म्हणाले- विमानाचे पंख तर मजबूत कराच परंतु अन्य भाग जास्त मजबूत करा कारण अन्य भाङांचा डेटा का नसेल तर त्या भागांना गोळ्या लागल्या तर विमानच पडतायत. इतके ते भाग दुर्बळ आहेत की डाटा सँपलमध्ये तो डेटाच येत नाहीये.

तेव्हा आपल्याला नकारात्मकच का ऐकू येते कारण लोकांच्या निगेटिव्ह केसेस लक्षात रहातात. जर कोणाला पॉझिटिव्ह रिझल्टस मिळाले असतील, तर ते ऐकीवात येतच नाही कारण ती व्यक्ती निरोगी असते व आपल्या लक्षातही येत नाही तिला काही स्मस्या असतील.
_________
स्वाती यांचा सल्ला नेहमीप्रमाणेच फार आवडला.

मी स्वतः डिप्रेशन वर २ वर्षे औषध घेतले. माझ्या ज्या डॉक्टर होत्या त्यांनी पेडियाट्रिक डोसने सुरूवात केली आणि नंतर थोडे वाढवले.

डॉक्टर कडे जाऊन औषध घेण्याआधी आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रह्मविद्या असे कोर्सेस करून पाहिले. तसेच काही स्तोत्र पठण करूनदेखील पाहिले. पण परिस्थिती जैसे थे राहत होती.

फार अवघड काळ होता. माझ्याबरोबर माझ्या घरच्यांनीही खूप त्रास काढला. परंतु बाहेरच्या व्यक्तींना माझ्या आजारपणाची पुसटशी कल्पना देखील येत नव्हती. ऑफिस मधील एक मैत्रीण म्हणाली देखील की आप जैसा carefree होना चाहीये.

माझ्यासाठी ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी माझ्या मुली ड्रायव्हिंग फोर्स होत्या. कारण मला काही झाले (म्हणजे मानसिक संतुलन बिघडणे) तर मुलींना लागणारे आईचे प्रेम, आधार कसे मिळणार.

मला तरी मला दिलेल्या औषधांचा काही साईड इफेक्ट वाटला नाही. कारण डिप्रेशनचेच खूप त्रासदायक परिणाम होते.

त्यामुळे औषध घेणे योग्य वाटते. त्याचबरोबरीने त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सपोर्ट सिस्टीम आणि ड्रायव्हिंग फोर्स पाहिजे.

तुम्हाला लवकरात लवकर बरे वाटो ही सदिच्छा!

धीराने नैराश्यावरती मात होत असती तर काय हवे होते. मेंदूतील इम्बॅलन्स , औषधांनी काबूत येतो. क्वालिटी ऑफ लाईफ महत्वाची आहे की अन्य मुद्दे हे तुम्ही ठरवायचय. काही साईडैफेक्टस असतात पण फार सिव्हीअर नसतात. बाकी सिव्हीअर वाटले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःचे प्रयत्न चालू ठेवा पण औषधे जरुर घ्या. >>> +१

>>>>माझ्यासाठी ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी माझ्या मुली ड्रायव्हिंग फोर्स होत्या.>>>> किती सुंदर!! ऐकून बरे वाटले. कुटुंबियांचा रोल फार महत्वाचा असतो.
@जिद्दु - धन्यवाद.

रोगावर परिणाम व्हावा म्हणून औषधांची योजना केलेली असते. ती औषधे शरीरात गेल्यावर सगळीकडे सारखाच परिणाम करतात. आपल्या हव्या असलेल्या ठिकाणी परिणाम होतो त्याला आपण औषध लागू पडले म्हणतो आणि बाकीच्या ठिकाणी जे होते त्याला साईड इफेक्ट म्हणतो.

कँसरच्या केमोमुळे सगळ्याच पेशी सारख्या प्रमाणात अफेक्ट होतात. पण आपल्याला तेव्हा कँसर पेशी नष्ट करण्यात रस असतो. त्या सोडून इतर पेशीही नष्ट होतात तिकडे आपण दुर्लक्ष करतो. का? कारण भयंकर साईड इफेक्ट आहेत म्हणून कँसरचे औषध आपण घेणे टाळले तर जीवाशी गाठ असते.

नैराश्यात जीवाशी गाठ तितकीशी नसते म्हणून साईड इफेक्टस आणि इतर काय काय याची चर्चा करणे आपल्याला परवडते. (नैराश्यामुळे माणसे जीव देतात पण नैराश्य कँसरसारखे पेशंटला मृत्यूच्या दारात नेऊन उभे करत नाही) कँसरसारखे नैराश्यातही उपचार केले नाही तर थेट मृत्यू असे असते तर कोणीही उपचार करण्याआधी दहा जणांचा सल्ला घेतला नसता.

आजार कोणताही असो - शारीरिक की मानसिक - त्यावर उपचार घ्या. औषधांचा आधी इफेक्ट मिळू द्या, मग साईड इफेक्टची चिंता करा.

नेटवर वाचायला गेलात तर सगळे निगेटिव्हच सापडणार. कुठल्याही गोष्टीचा फायदा झाला तर कोण काय बोलत नाहीत कारण फायदा होण्यासाठीच ती वस्तू घेतलेली असते. मात्र नुकसान/तोटा झाला तर मात्र त्याचा रिव्ह्यू लगेच लिहिला जातो. त्यामुळे पोसिटीव्हच्या तुलनेत निगेटिव्ह रिव्ह्यू जास्त मिळणार, ते मनावर घेऊ नका.

तुमचे आधीचे धागे बघता तुम्ही व तुमच्या कुटुंबाने भरपूर त्रास सहन केलाय असे दिसतेय. आता तुम्हाला डॉक्टरकडे जायची बुद्धी झालीय तर औषधे घ्या व वेळेवर घेऊन बरे व्हा. चांगल्या आयुष्यावर सगळ्यांचा हक्क आहे. तुमच्या कुटुंबाला व तुम्हाला एका सुंदर आनंदी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा!! लवकर बरे व्हा.

<< स्वाती यांचा सल्ला नेहमीप्रमाणेच फार आवडला......+1 >
---- सहमत...

लवकर बर्‍या होण्यासाठी शुभेच्छा.

स्वाती२ छान प्रतिसाद, सामो, कुंपणावरची अनुभव शेअर करून चांगले केलं.

आपल्याला देण्यात येणाऱ्या गोळ्यांची नेटवरुन माहिती काढणे बहुतेक लोक करतात, खास करून साईड इफेक्ट्स बघण्यास.
Atorvastatin हे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणारं खुप कॉमन औषध आहे. आपल्या आसपास दिसणाऱ्या 45+ वयातील 50% ? लोक हे औषध नियमितपणे घेत असतील (आकडा अंदाजे फेकलेला आहे माहितीतील काही लोक मोजून तेव्हा टक्केवारी गांभीर्याने घेऊ नये,). आता याचे साईड इफेक्ट्स इथे वाचा. हे वाचून बहुतेक लोक म्हणतील आम्ही नाही घेणार. पण हे साईड इफेक्ट्स सगळ्यांना होतीलच असे नाही. माझ्या बायकोला हे औषध गेली पाच वर्षे सुरू आहे. सुरवतीला काही महिने तिला चालताना पोटऱ्या लौकर थकलेल्या वाटायच्या, पण नंतर तो ही त्रास गेला ल. इतर कुठले साईड इफेक्ट्स तिला जाणवले नाहीत.

आणि साईड इफेक्ट्स बाबत प्लासीबोच्या विरुद्ध नोसिबो असते. यात काही लोकांना कळले की या औषधाचे हे हे साईड इफेक्ट्स आहेत तर त्यांना त्यातील बरेच होतातच - औषधा ऐवजी औषध नसलेली खोटी गोळी दिली तरीही. कदाचित आपला मेंदु पॉवर ऑफ सजेशनला किती ससेप्टिव्ह आहे त्यावरून आपल्याला नोसिबो जाणवेल की नाही / किती जाणवेल अवलंबून असेल?
तेव्हा नेटवर गोळ्यांची माहिती काढा, पण साईड इफेक्ट्सची लिस्ट पाहून घाबरून जाऊ नका, यातील काही साईड इफेक्ट्स तुम्हाला होतील/न होतील, कमी/जास्त प्रमाणात होतील, तसे झाल्यास डॉक्टरांना भेटून सांगा ते डोस ऍडजस्टमेंट अथवा गोळी बदलणे, अथवा अजून काही सल्ला त्यांच्या अनुभवाने देतील.
अति काळजी आणि अविश्वास केल्याने केवळ नोसिबोमुळेही आपल्याला साईड इफेक्ट्स जाणवु शकतात.
असो. पण साईड इफेक्ट्स जाणवला तर मात्र असेल नोसिबो म्हणुन दुर्लक्ष करू नका, डॉक ना सांगा.

मला वाटते धागामालकाने सांगितलेला अनुभव हा काही मानसिक आरोग्याचा त्रास नसावा. वयोमाना नुसार कामात चालढकल होत असावी किंवा बाहेरील वातावरणाचा (कोवीड मुळे घरातच डांबून रहाण्याची सवय) परिणाम होऊन सतत आळसावलेलं किंवा कसनुसं वाटत रहात असावं असं मला वाटतंय. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेण्याआधी रोज सकाळ किंवा संध्याकाळ (जे सोयीचे असेल ते) १०-१५ मिनिटं जॉगिंग / सायकलिंग/ भरभर चालण्याचा व्यायाम करून बघा... फरक पडेल

सर्वांच्या सल्ल्याबद्दल आभार. हो मला साईड इफेक्ट्सची भीती वाटते. पण सगळ्यात भीती वाटते ती ह्या साईड इफेक्ट्सची:
- स्वत:ला इजा करून घेण्याची मानसिकता निर्माण होऊ शकते

याला कारण आहे कि अनेक आत्महत्यांच्या बातम्यामध्ये उल्लेख असतो कि ती व्यक्ती नैराश्यातून जात होती व त्यांना काही महिने Antidepressant च्या गोळ्या सुरु होत्या असे बातमीत लिहिलेले असते. आता त्यांनी केलेली आत्महत्या हि नैराश्यातून होती कि गोळ्यांचा इफेक्ट् म्हणून झाली हे कसे कळणार. औषध कंपन्या कधीच हे खुलेपणाने सांगणार नाहीत. वर दीजे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मानसिक आरोग्याचा त्रास नसेल असे पण वाटते. गोळ्या घेऊन आगीतून फुफाट्यात असे भलतेच काही होईल अशी भीती वाटते.

हे भीती डॉक्टरांशी बोलणे पण योग्य होणार नाही. त्यांना आपल्यावर अविश्वास दाखवल्यासारखे वाटेल.
काय करावे तेच कळत नाही. डॉक्टरांकडे गेल्यापासून मानसिक गोंधळ अजूनच वाढला आहे.

यु ट्युब वर जस्ट फॉर लाफ गॅग्ज सिरिजचे विडीओज बघायला सुरु करा.. नैराश्य, मानसिक गोंधळ कुठल्या कुठे पळून जाईल कळणारही नाही.

एकदा इंटरनेटवर depression विषयी search करताना वाचले होते की काही फळांमध्ये (संत्री,मोसंबी, केळे) natural antidepressants असतात. त्यामुळे अशा फळांचे सेवन वाढविल्याने depression मध्ये फायदा होऊ शकतो.

आपुलकीने सल्ले दिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. येथील विविध सल्ले वाचल्यानंतर इतर डॉक्टरांशी बोललो. तुमचा त्रास हा depression चा आहे असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही या गोळ्या घेऊ नका. त्यापेक्षा meditation केल्यास फयदा होईल असे मला सांगण्यात आले. त्यामुळे सध्यातरी antidepressant गोळ्या घ्यायच्या नाहीत असे ठरवले आहे. इथल्या विविध प्रतिक्रियांमुळेच मला इतर वैद्यांचा सल्ला घेण्याची बुद्धी झाली. म्हणून, गोळ्या घ्या व घेऊ नका अशा दोन्ही बाजूनी सल्ला देणाऱ्यांचा मी आभारी आहे. दोन्ही बाजूमध्ये प्रत्येकजण त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहे.
हा प्रतिसाद उशीरा लिहित आहे त्याबद्दल दिलगीर आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

धागा वाचल्यावर तुमची समस्या डिप्रेशन नसून procrastination ची असावी ही शंका आली होती पण तुम्ही डिप्रेशन लिहिल्याने काही लिहिता नाही आले. मेडिटेशन वगैरे मी सुचवणार नाही कारण कोणत्याही मानसिक समस्येवर मेडिटेशन उपाय सांगतात लोक तेव्हा थोडे हसूच येते आणि मी यावर इथे काही लिहिण्यापेक्षा तुम्ही स्वतः इंटरनेटवर थोडा वेळ देऊन शोध घेतल्यास बरेच चांगले संदर्भ मिळतील वाचायला. यूटुबवर चांगले विडिओ आहेत, रेडिटवर गेट डिसीप्लिन्ड नावाचा छान सबरेडीट आहे तिथे लोकांनी त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत. पोमोडोरो, छोटे टार्गेट्स पूर्ण करणे, कामाच्या वातावरणात बदल करून पाहणे असे बरेच कायकाय आहे करण्यासारखे. तरी एक चांगला सन्दर्भ म्हणून टीम अर्बनचा टेडटॉक विडिओ पहा आणि त्याचे खालील लेख वाचून पहा .
https://waitbutwhy.com/2013/10/why-procrastinators-procrastinate.html
https://waitbutwhy.com/2013/11/how-to-beat-procrastination.html
नाइके ब्रँडचे "जस्ट डू इट" हे वाक्य थोडे मनावर घ्या
also small possibility of adult ADHD