ए ऍसिडिटी,तुमने भी बहोत कुछ सिखाया - भाग 2

Submitted by me_rucha on 26 November, 2020 - 06:30

दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांना आधीच्या टेस्टचे रिपोर्ट्स दाखवले. माझ्या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यानंतर मात्र सुरु झाला तो टेस्ट्स चा सपाटा. त्या डॉक्टरांनी पोटाचा MRI आणि SCAN, X-RAY, SONOGRAPHY, BERRIUM Follow through आणि सोबतीला 5-6 ब्लड टेस्ट्स असा टेस्ट्सचा सपाटाच लाऊन दिला. माझ्या आजाराचं समूळ निदान व्हावं हा त्या मागचा उद्देश होता.

मला अजूनही आठवतंय 2016 मधले नवरात्रातले दिवस होते आणि अष्टमीच्या दिवशी सकाळी मी आणि माझी मोठी बहीण सकाळी ७ वाजता दीनानाथ ला पोहोचलो. सकाळ पासून काहीही खाल्लं प्यायलं नव्हतं. तिकडे गेल्यावर एक रसायनयुक्त द्रव्य दिलं की ज्याचा अतिशय उग्र वास येत होता आणि जे एक घोट पिलं तरी ओकारी येईल असं मला मोठे दोन ग्लास प्यायचं दिव्य पार करायचं होतं. पाहिला घोट घेतला आणि अक्षरशः तोंडातून तो ओकून टाकावासा वाटला. त्याच्या त्या वासानी आणि चवीनी. बहिणीला सांगितलं हे नाही जातंय. माझी बहीण डॉक्टर आहे. तीला ह्या सगळ्याची कल्पना होती बऱ्यापैकी. ती म्हणाली तू ला कसही करून हे घ्यावंच लागेल. थोडं थोडं करत मी 1.5 ग्लास ते उग्र वासाचं द्रव्य प्यायले. दोन ग्लास पिणं अपेक्षित होतं पण मी पुढे एक थेंबही प्यायले तरी सगळं उलटलं असतं. सिस्टरना (हॉस्पिटल च्या ) सांगितलं नाही जातंय. त्या ठीकय म्हणाल्या.
माझा नंबर आला. स्कॅन च्या त्या बेड वर मला झोपवलं आणि टेस्ट सुरु झाली. माइक वरून सूचना मिळतं होत्या त्या प्रमाणे कूस बदलणं इत्यादी करायचं होतं. मला वाटलं टेस्ट संपत आली पण इतक्यात एक बॉय आला आणि त्याने इंजेक्शन टोचलं. ते इतकं इतकं वेदनादायी होतं की ते टोचल्याबरोबर माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि मी त्या बेडवर अक्षरशः रडायला लागले. त्या इंजेक्शनच्या आधीही कुठल्या नाही कुठल्या इंजेक्शन स घ्याव्या लागल्या . नंतरही घेतल्या (फार नाही पाणी एखादी दोन ) पण त्या इंजेक्शन इतकं वेदनादायी इंजेक्शन मी आजपर्यंत घेतलं नव्हतं . मी अक्षरशः कळवळून रडायला लागले . आणि त्या क्षणी मला असं वाटलं हे सगळं माझ्यासोबत का होतय ...?
टेस्ट झाली. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता. रिपोर्टचं टेन्शन होतंच. नवऱ्याने संध्याकाळी जाऊन रिपोर्ट आणला. देव कृपेने रिपोर्ट नॉर्मल निघाला.
नॉर्मल री पोर्टनी हायसं वाटलं. पण दिवसभरातल्या दगदगीने आणि रिपोर्ट मिळेपर्यंत च्या टेन्शन मध्ये मी इतकी दमले की दुसऱ्या दिवशीच्या दसऱ्याचा काहीच उत्साह नव्हता. कसाबसा दसरा पार पडला पण उत्साहाविना च..
तर अशी ही एक टेस्ट.अश्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट केल्या. काहींना न खाता पिता जायचं होतं तरी काहींसाठी भरपूर पाणी पिऊन. टेस्ट साठी वेटिंग. एवढं करून मी घरातलं बघत होतंच अगदी फार साग्रसंगीत नसला तरी जमेल तसा स्वयपाक, मुलाला शाळेतून ने - आण कारण ई. सुरूच होतं.
सोबतीला उलट्या सुरूच होत्या.
ह्या उलट्या चं असं व्हायचं की मी काहीही खाल्लं की उल्टी व्हायची. बिस्कीट खाल्लं, झाली उल्टी . दुपारचं नॉर्मल पोळी भाजी खाल्ली तेव्हातर इतका त्रास होऊन उल्टी झाली की बस्स. मी डॉक्टरांना सांगायचे की डॉक्टर मी काहीही खाऊ शकत नाहीय.
खायचं तर सोडा एक काळ तर असा होता की तहान लागली म्हणून मी ढसाढसा पाणी प्यायले तर त्याचीही उल्टी होतं! मी फार हतबल झाले. मी काहीही खाऊ अथवा पिऊ शकतं नव्हते!
मला कसं ठाऊक नाही पण असं वाटलं की आपण शहाळ्याच पाणी प्यायलो तर कदाचित उल्टी नाही होणार. आणि लकीली ते लागू पडलं. ती एकच गोष्ट होती जी मी घेऊ शकत होते. आणि सकाळचा अर्धा कप चहा आणि दुपारी शहाळ्याचं पाणी . बाकी नाश्ता, जेवण वगैरे काहीही नाही.
नाही म्हणायला एक गोष्टी चांगली होती की मी रात्रीच भरपेट जेऊ शकायचे.
मग भाजी, पोळी, वरण, भात सगळंच बनवायचे (पोळ्या सोडून त्यांना मावशी होत्या.) आणि खायचे.आणि नशिबाने ते खाल्ल्यावर उल्टीही व्हायची नाही हिच काय ती एकमेव चांगली गोष्ट होती. नाहीतर दिवसभर मी काहीही न खाता असायचे. अशी साधारण मी दीड ते दोन वर्षे काढली असतील. बर उल्टी होतानाचा आणि झाल्यानंतर चा त्रास इतका भयंकर असायचा की असा वाटायचं नको ते खान आणि ती उल्टी.
माझ्या घरचे मला त्या काळात मी रोज प्रदोष सोडते असं म्हणायचे.
क्रमश :

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला फारच त्रास झाला हो. असं एवढा त्रास होण्याचं नेमकं काय कारण होतं पण...? आता बर्‍या आहात ना..?? काही ऑपरेशन वगैरे तर नाही ना करावं लागलं..???

एकदम लिहा हो.ह्याने लिंक तुटत आहे.बहुतेक पित्त वाल्या व्यक्ती इकडे तुम्ही काय उपाय केलात हे वाचण्यासाठी आतुर आहेत.पुढचे एकदमच लिहा.

धीर धरा.
शेवटला भाग येई पर्यंत
ए ऍसिडिटी कल आना
असे म्हणत रहा.

बापरे. . किती सोसलेत तुम्ही ..
आता काही सोसावे लागू नये.
योग्य निदान करणारे डॉक्टर पटकन भेटणे फार गरजेचे असते.

तुम्हाला शुभेच्छा. मला एक काळ असा होता की काहीही घशाखाली उतरायचे नाही. माझ्या साखरपुड्याला मी केवळ वरणभात आणि तो पण तीन Domizol DS घेऊन खाऊ शकले होते.

मला स्वतःला प्रचंड त्रास आहे पित्ताचा. उन्हाळा तर एकदम घातऋतु. पित्ताबरोबर होणारी डोकेदुखी तर केवळ अशक्य . अक्षरशः डोकं आपटाव असं वाटतं. मी दर रविवारी सकाळी वमन करतोच करतो. गेले तीन एक महिने दर 15 दिवसांनी एरंडेल 3 चमचे घेतो रात्री झोपताना, खूप फरक पडला त्यामुळं. गेली कित्येक वर्षे सकाळी गार दूध आणि सब्जा घेत आहे. मला साधारण 8वि 9वी पासून त्रास आहे आणि आयुर्वेदिक आणि इतर सगळे उपचार करून झालेत. सकाळी 3/4 तांदूळ दाणे आणि पाण्यानं कमी होतं असं ऐकलं होतं ते पण बरेच महिने केलं. ऑफिसमध्ये दोन वेळा कॉफी होते , पूर्वी खूप च्या लागायचा आताशा फक्त विकेंड ला असतो च्या तो पण एकदाच. साळीच्या लाह्यांनी पण फरक पडतो नक्कीच. तरीही दोन एक महिन्यातून असह्य त्रास होतोच होतो कित्येकदा डोकेदुखी मुळे मी गडबडा लोळतो , ते 4/5 तास ब्रह्मंड आठवते. एम आर आय काढून झालाय रिपोर्ट नॉर्मल होते. पाणी भरपूर पितो. आणि सकाळच दूध आणि सब्जा चुकवत नाहीच. अजून एक मी कुठल्याही अंटासिड, जेलुसिल टाईप्स गोळ्या सिरप चुकूनही घेत नाही. शाळेत असताना मात्र अनासीन घ्यायचो.

बापरे! फारच सहन करावे लागले तुम्हाला!>>> +१.

तरीही दोन एक महिन्यातून असह्य त्रास होतोच होतो कित्येकदा डोकेदुखी मुळे मी गडबडा लोळतो , ते 4/5 तास ब्रह्मंड आठवते. >>> अरेरे.

पित्तासाठी मला मोरावळ्याचा खूप उपयोग झाला.
कॉलेजमध्ये असेपर्यंत उलट्या, डोकेदुखी आणि अंगावर पित्त उठणे व्हायचे.
आता डोकेदुखी होते, जराजरी ऊन लागलं तरी. मोरावळा खाल्ला की उतरतं लवकर. आणि उन्हाळ्यात गुलकंद नियमित खाते. त्यानेही फरक पडला.

तुम्ही खूपच त्रास सहन केलात. आता ठीक आहे ना?

असह्य त्रास होतोच होतो कित्येकदा डोकेदुखी मुळे मी गडबडा लोळतो , ते 4/5 तास ब्रह्मंड आठवते. >>> खूपच असह्य त्रास असतो हा. तुम्हीपण मोरावळा आणि गुलकंद वापरून बघा.

अ‍ॅसिडिटी आणि अ‍ॅसिड रिफ्लक्स एकच का कसं ते माहित नाही. पण दोन वर्षांपूर्वी अचानक दुपारच्या जेवणानंतर पोटात दुखायला सुरुवात झाली. ओवा खाऊन, पेनकिलर्स वगैरे घेऊन काही उपयोग होत नव्हता. ही पोटदुखी रात्री झोपल्यावरच थांबायची आणि पुन्हा दुपारच्या जेवणानंतर चालू. असं सत्र जवळजवळ सव्वा महिना चाललं. एंडोस्कोपी, सोनोग्राफी वगैरे केल्यावर अ‍ॅसिड रिफ्लक्सचं निदान झालं. स्ट्राँग गोळ्यांनी फरकही पडला. आता घरात प्रायलोसेक वगैरे गोळ्या घरात ठेवायला लागतात.

मला असा अनुभव आहे की अनेक डॉक्टर त्यान्च्याकडे असलेल्या यन्त्रान्चे पैसे काढण्याकरता या अशा अनेक टेस्टस करवऊन घेतात.

सायो, ऍसिडिटी आणि ऍसिड रिफ्लक्स वेगळं.
ऍसिड रिफ्लक्स + ऍसिडीटी असं दोन्ही होऊ शकतं.
ऍसिड रिफ्लक्सची पुढची पायरी म्हणजे GERD
मला ऍसिडिटी आणि GERD दोन्ही त्रास आहेत. त्यावेळी डोकॉटरांंनी दिलेली आणि वाचलेली माहिती:

ऍसिडिटी मध्ये जास्तीचे ऍसिड तयार होते.
ऍसिड रिफ्लक्स असे न होता ही होऊ शकते.

आपली अन्ननलिका पोटाला जिथे मिळते तिथे एक स्नायूंची वर्तुळाकार झडप असते. ती बंद असते. आपण घोट / घास गिळला की ती प्रसरण पाऊन उघडते आणि अन्न खाली गेले की परत आकुंचन पाऊन बंद होते. तिला LES (Lower Esophageal Sphincter) म्हणतात.
पचनासाठी आपल्या पोटात ऍसिड तयार होतच. या ऍसिड पासून संरक्षण करायला आपल्या पोटात म्यूकसचं जाड लाईननिंग असतं. पण अन्ननलिकेतील म्यूकस लाइनिंग हे एवढं जाड नसतं, पातळ असतं. ते पोटातील ऍसिड सहन करू शकत नाही, जळजळ होते. तिथे नेहमी ऍसिड येत राहिलं तर अन्ननलिकेचे लाइनिंग डॅमेज होऊ शकते.

ऍसिड रिफ्लक्स मध्ये काही कारणाने कधी कधी / बरेचदा LES पूर्ण आकुंचन पावत नाही, म्हणुन पूर्ण बंद होत नाही. त्यामुळे आपण झोपलो की / पोटभर जेवलो की बसलो असतानाही पोटातील ऍसिड अन्ननलिकेत येतं. त्याने जळजळ, हार्टबर्न होते. ऍसिड घशाशीही येऊ शकतं. हा त्रास ऍसिडीटी झाली असताना / नसतानाही होऊ शकतो.

माझ्या डोक्टरांनी सांगितलेले व्यवस्थापन: पोटात ऍसिड तयार न होऊ देणारी गोळी (जास्त त्रास असल्यास संध्याकाळीही) काही खाण्यापूर्वी अर्धा त्रास आधी, जी तुम्ही घेत आहात. (डिस्क्लेमर: या गोळ्या नियणीतपणे /लॉंगटर्म घेतल्यास इतर समस्या उद्भवतात, डॉक्टरांंच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. )
पोटभर न जेवणे. कमी खाऊन चार तासांनी परत काही खाणे.
पोटभर पाणी न पिणे.
खाल्यावर तीन तास पर्यंत आडवे न होणे, म्हणुन रात्री झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी जेवणे आणि तासभर आधी तहान भागवणे. झोपण्यापूर्वी अजून काही न खाणे / पिणे (पाणी सुद्धा प्यायचे असल्यास अगदी थोडे पिणे.)
कॅफिन, cocoa LES रिलॅक्स करतं, म्हणजे त्याला पूर्ण आकुंचन पाऊ देत नाही. तेव्हा चहा कॉफी कमी करणे, संध्याकळनंतर टाळलेले बरे. चॉकलेट नियमित न खाणे, संध्याकाळ नंतर टाळलेले बरे.
तेलकट, मसालेदार, तिखट पदार्थ टाळणे.
कृपया आपपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

पोटात कृमी झाले असतील तरीसुद्धा पित्त, डोकेदुखी आणि अंगावर पित्ताच्या दादी उठून कंड सुटणे ही लक्षणे दिसतात.

बापरे .
मला अ‍ॅसिडिटीचा त्रास , सहसा दूपारचं जेवण चुकलं किन्वा वेळ चुकली की होतो .
बेसुमार उलट्या , जीवघेणी डोकेदूखी .
पण रुचा , तुझा त्रास फारच जास्त आहे . hope u have recovered well

अशी साधारण मी दीड ते दोन वर्षे काढली असतील. बर उल्टी होतानाचा आणि झाल्यानंतर चा त्रास इतका भयंकर असायचा की असा वाटायचं नको ते खान आणि ती उल्टी.>>>बापरे!
पुढचे भाग लवकर टाका. तुम्हाला नक्की कसा आणि काय साकात्कार झाला आणि तुम्ही हे पित्त कसे कमी केले याची उत्सुकता लागली आहे.

मला डॉक्टर निखिल पेंडसे पुणे यांनी आयुर्वेदिक उपचार करून अविदिटी मुळे होणाऱ्या त्रासातून बरे केले, फरक ४ दिवसात पडला

मी_रूचा आणि प्रतिसादांत ज्यांना त्रास होतोय हे लिहीलंय त्यांना सर्वांना बरं वाटू दे! खरंतर वाचताना देखील त्रास होतो आहे तर प्रत्यक्ष सहन करताना किती त्रास झाला असेल! लवकर लवकर लिहा कारण तुम्हाला नेमकं काय झालं होतं आणि तो आजार कसा बरा झाला हे वाचण्यासाठी उत्सुक आहे.

मी_ऋचा आणि प्रतिसादांत ज्यांना त्रास होतोय हे लिहीलंय त्यांना सर्वांना बरं वाटू दे! खरंतर वाचताना देखील त्रास होतो आहे तर प्रत्यक्ष सहन करताना किती त्रास झाला असेल!...
जिज्ञासा +1
अति पित्तप्रकृती असल्याने अनुभव आहेत ( दर चार पाच महिन्याला मायग्रेन+ रात्रीच उल्टी दोन दिवस डोकेदुखी+ दात सुद्धा हुळहुळायचे त्या आम्ल उल्टीने, डोकेदुखी, sound light sensitivity जन्माचीच आहे. ऊन/गोंगाट सहन होत नाही... हल्ली हे खूपच कमी झालंय , अत्यंत शिस्तबद्ध करून टाकली आहे जीवनशैली तरीही PMSची डोकेदुखी आहेच. )
इतक्या टोकाचा अनुभव नाही. पण समजू शकते.
सगळ्यांना शुभेच्छा.

आता मी बरी आहे.
खरंच मीही मनोमन हीच प्रार्थना करेन की ज्यांना कुणाला ऍसिडिटी आहे त्या सगळ्यांना ह्या त्रासातून मुक्तता मिळू दे.
ह्या आजारांनी तुमच्या जीवाला धोका नसला तरी तुमचे जे मानसिक खच्चीकरण होते त्याला तोड नाही.
सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेली काळजी बघून बरं वाटलं.
काही कार्य व्यग्रतेमुळे प्रतिसाद द्यायला उशिर झाला.

बापरे बाप!! वाचताना ही खरेच कसेसेच होत आहे.. बऱ्या झाल्यात हे वाचून हुश्श झालंय तरीही पुढच्या भागाची जोरदार उत्सुकता लागली आहे..