*आधी नाकाने, मग जीभेने*

Submitted by सरनौबत on 10 December, 2020 - 23:35

*आधी नाकाने, मग जीभेने*

खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियाचा सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे वर्णन त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे केले आहे.

भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि एकंदर मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. मला असं वाटतं कि आपले अनेक खाद्यपदार्थ 'सर्वात आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जीभेने' अनुभवायचे असतात.

पुरणपोळीच्या खमंग वासापासून ते अगदी अंबाडीच्या भाजीवर लसणाच्या फोडणीपर्यंत शेकडो वास भूक चाळवतात. पण माझ्या विशेष आवडीचा वास म्हणाल तर बेकरी मध्ये येणारा गोडसर खमंग वास. हा वास मला भर्रकन भूतकाळात घेऊन जातो आणि ‘nose’talgic करतो….

माझं आजोळ म्हणजे पुण्यापासून ५५ किलोमीटर असलेलं भोर नावाचं गाव. बसस्टॅन्ड वरून आजोबांच्या घरी जाताना वाटेत 'श्रीराम' बेकरी लागायची. तिथे तयार होत असलेल्या बिस्किटांचा गोडसर वास; बेकरी यायच्या २-३ मिनिटे आधीच यायला लागायचा. तिथला सुवास साठवून घेत-घेत जीरा बटर घेऊन यायचं. ते चहात टाकून 'कडे-कडेने' चहा प्यायचा. नंतर ते टम्म फुगलेलं बटर चमच्याने खायचं म्हणजे निव्वळ सुख!

मला चहाबरोबर बिस्किटांऐवजी खारी, टोस्ट, बटर हे त्रिकुट जास्त आवडतं. लहानपणी एक मुसलमान इसम अल्युमिनियम ची पेटी डोक्यावर घेऊन हया गोष्टी घरोघरी विकायला यायचा. त्यात ह्या पदार्थांबरोबर नाजूक-पांढरी 'नानकटाई' देखील असायची. मिशी नाही आणि लांब दाढी वाढवलेला माझ्या माहितीतला हा पहिलाच माणूस.

पुण्यात घोले रोड ला असलेली 'संतोष बेकरी' अशीच आपल्या आसुसलेल्या नाकाला भरपूर 'संतोष' देते. सकाळी ९:३० च्या सुमारास गेल्यावर पॅटिस, क्रीमरोल, केक, ब्रेड इत्यादी मिश्रणाचा एक अदभुत वास आसमंतात दरवळत असतो. ह्या वासांमधून केक चा गोड वास, टोस्ट-बटर चा मध्यम गोड वास आणि पॅटिस व आतील सारणाचा तिखटसर वास हुडकायला थोडीफार प्रॅक्टिस लागते. जास्त तपश्चर्या केल्यास बेकरीजवळून नुसतं दुचाकीने गेलं तरी देखील केवळ वासावरून कुठला माल भट्टीतून काढत आहेत हे ओळखू शकतो.

sketch1607386767141

ब्रेडला देखील स्वतःची खास चव असते हे अश्या ठिकाणचा ब्रेड खाल्ल्यावर समजतं. 'ब्रँडेड' ब्रेड् पेक्षा अश्या ठिकाणी मिळणारा ब्रेड स्लाइस (अमूल बटर लावून) चहासोबत खाऊन पहा. केवळ मऊ-लुसलुशीत म्हणजे उत्तम ब्रेड नव्हे. ह्या ब्रेड ची कड भले थोडी 'कड'क असेल, पण चहात बुडवून खाताना फारच अप्रतिम लागते. ताजा ब्रेड तिकडेच मशीन वर कापून कागदात बांधून देतात. तो घरी आणून चहा होईपर्यंत धीर निघत नाही. कुठल्याही नवसाशिवाय ही बेकरी मला 'पाव'ते.

पुण्यात मेट्रो प्रकल्प जेव्हा होईल तेव्हा होईल; पण त्या आधी संतोष बेकरी शेजारी एखादे 'अमृततुल्य' काढण्याची जास्त गरज आहे! ह्या बेकरी मुळे एखाद्याची बेकारी दूर होईल. बेकरी शेजारी चहाचे दुकान असल्यास ‘GST मधून ५ वर्षे सूट' सारखा काहीतरी कायदा लवकर आणायला हवा. मोदी स्वतः चहा विकायचे, त्यामुळे ते तरी ह्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील ही आशा आहे.

हिंदुस्थान बेकरी आणि न्यू पूना बेकरी चे देखील काही पदार्थ आवडतात. मात्र 'हिंदुस्थान बेकरी' पेक्षा 'पॅटिस संपले' हा बोर्ड जास्त ठळकपणे दिसतो. पूना बेकरी चे पॅटिस बरे असले तरी मला तिकडे दोन कारणांसाठी जायला आवडत नाही. एकतर पुणे ला पूना म्हणलेलं आवडत नाही. दुसरं म्हणजे पूना बेकरी अप्पा बळवंत चौकात आहे, तिकडे जाताना CA इन्स्टिटयूट दिसते आणि CA च्या वेळी केलेली जागरणं आणि अभ्यास आठवून कोरडा पॅटिस घशाखाली उतरत नाही.

नवी हॉटेल्स 'माऊथ पब्लिसिटी' मुळे चालतात. मात्र अनेक बेकऱ्या 'नोज पब्लिसिटी' मुळे चालत असाव्यात. मी स्वतः अशी अनेक ठिकाणं 'वास लागल्यामुळे' शोधली आहेत. पेरूगेट वरून बाजीराव रोडकडे जाताना असाच एकदा बेकरीचा गोड वास आल्याने तिथेच थांबलो. रस्त्यावर कुठेच बेकरी दिसेना. नाकावर पूर्ण विश्वास असल्याने शोधमोहीम चालू केली. तेव्हा एका बिल्डिंग च्या अगदी आतल्या भागात लपलेल्या 'मनोहर बेकरी' चा शोध लागला. दुपारची वेळ असल्याने बरेचसे पदार्थ संपले होते. मग भट्टीतून नुकत्याच काढलेल्या बन-पावाची मान मुरगाळून 'बेकरी ईद' साजरी केली. आता कधीही त्या भागात जाणे झाले कि 'आहे मनोहर बेकरी'.

पुण्यातील बेकरी चा विषय 'कयानी बेकरी' चा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तिथल्यासारखी श्रुजबेरी बिस्किटे आणि प्लेन केक आख्ख्या जगात कुठेही मिळत नसावीत. तशी श्रुजबेरी बिस्किटे आणि केक अनेकांनी बनवून पाहिले. पण ओरीजिनल किशोर कुमार ची आणि कुमार सानू ने त्याची गायलेली गाणी इतका फरक दोन्हीत आहे. शोले च्या गब्बर स्टाईल मध्ये विचारावंस वाटतं कि ‘ये कयानी वाले अपने केक में कौनसे चक्की का पीसा मैदा डालते हैं रे’?

कॅम्प मध्ये जाऊनदेखील बुधानी वेफर्स आणि कयानी चा केक न घेणाऱ्या लोकांचे आधार कार्ड जप्त केले पाहिजे असे माझे (प्रांजळ!) मत आहे.
937d5431-2013-4902-8721-be517ff0d936

नाकाचा पुरेपूर वापर हि केवळ मुकेश आणि हिमेश ची मक्तेदारी नाहीये. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे जरी चांगलं नसलं तरी प्रत्येक खाद्यपदार्थाचा 'आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जिभेने' आस्वाद घ्यायला हवा. असं केल्यास नाकाला घ्राणेंद्रिय ऐवजी खाणेंद्रिय म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.

आताच्या मुलांच्या आरोग्यविषयक कल्पना ऐकल्या कि एकूणच बेकरी व्यवसाय केवळ बर्थ-डे पेस्ट्रीज बनवण्याइतपतच राहील कि काय अशी धास्ती वाटते. ताजे पोहे- उपमा सोडून preservatives घातलेले (आणि अनेक महिन्यापूर्वी बनवलेले) कॉर्न फ्लेक्स आणि ओट्स अनेक जण खातात. खारी-टोस्ट ऐवजी high-fibre ची Digestive बिस्किटे खाताना पाहिलं कि माझ्या चहातील बटर फुगेनासे होते.

प्रख्यात आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर ह्यांनी 'खारी-टोस्ट-बटर' प्रकृतीस कसे चांगले आहे ते पटवून देऊन थोडा 'खारीचा वाटा' उचलावा अशी विनंती आहे. सरकारने देखील खारी-टोस्ट-बटर खपावेत म्हणून पुढच्या वेतन आयोगात 'बेकरी भत्ता' समाविष्ट करावा. पाश्च्यात्य देशांत जेवणापूर्वी वाईन चा ग्लास उंचावून 'टोस्ट' देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे सुद्धा एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात 'टोस्ट' घेऊन 'चियर्स' ची प्रथा सुरु करायला हवी.

आवडत्या दुपारची माझी अशी कल्पना आहे - पावसाळी हवा असावी. अंबाडीची भाजी, भाकरी आणि भात असं आटोपशीर दुपारचं जेवण झालेलं असावं. आवडते पुस्तक वाचत आरामखुर्चीतच डोळा लागावा. पावसाच्या सरीने आणि चहाच्या वासाने ४ च्या सुमारास जाग यावी. चहाबरोबर (सकाळी आणलेली) पिळाची खारी असावी. खारी चहात बुडवून खावी.. आणि रेडिओ वर दिलीप कुमार वैजयंतीमाला चे गाणं लागलेलं असावं "नैन लड़ जइ हैं तो मनवामा कसक होई *बेकरी*

IMG_20170525_173029_HDR

~ सरनौबत

Group content visibility: 
Use group defaults

खुसखुशीत लेख...
लेखातील चित्र सुद्धा छान आहेत.

लेख व चित्रे अतिशय सुरेख. अजून लिहा . अनेक शुभेच्छा.

परवा सांगलीत पाच तास बस प्रवास करून पोहोचलो. हॉटेलात फ्रेश होउन घरी जाणार होतो पण घरच्यांचा आग्रह पडला .तसेच गेलो. वहिनीने जुनेद बेकरीतले अंडा करीपफ व गरमागरम चहा दिला इतके भारी वाटले. विश्राम बागेतली जुनेद फार जुनी बेकरी आहे. तिथले पाव बटर क्रीम रोल फार भारी. संतोष बेकरी, हिंदुस्थान बेकरीची पण मी फॅन . प्याटीस तर ग्रेट. पण चौकोनी खारी पन ग्रेट लागते.

वासांची दुनिया प्रचंड मोठी आहे. अ‍ॅलिस इन वंडरलँड सारखी.

@पद्म - बाकी पदार्थांसाठी अजून भाग आले, तर खूप आवडेल >>>>> धन्यवाद. नक्की प्रयत्न करण्यात येईल

अगदी खारी बिस्किटासारखा खुसखुशीत, पावासारखा 'नर्म' विनोदी, अमृततुल्य सारखा ताजातवाना करणारा लेख व भरीस भर म्हणून एखाद्या खारीवरील शिंपडलेल्या साखरेसारखी चित्रं.. व्वा..
मजेशीर योगायोग म्हणजे मी हा प्रतिसाद लिहीपर्यंत तुमच्या तिन्ही खाऊच्या धाग्यांची प्रतिसाद संख्या सेमच होती. ३४-३४-३४.

कडक पाव म्हणजे ब्रून का?
>>>>
हो
मुंबईला जुन्या बिल्डींगमध्ये खारीवाला दारातच यायचा. रोजचा दुधाचा रतीब असल्यासारखे हे कडक पाव घेतले जायचे. सोमवार ते शुक्रवार चहासोबत सकाळी माझा ब्रून बटर हाच मेनू असायचा. मग नवीन टॉवर झाला. दारातला खारीवाला यायचा बंद झाला. बेकरी खाली जवळच होत्या. पण मुद्दाम रोज सकाळी कोण जाणार. अध्येमध्ये मग खाणे होऊ लागले.

बाकी त्याचा कडकपणा पर्रफेक्ट हवा. बाहेरचे आवरण कडक हवे पण आतून पुरेसा सॉफ्टनेस हवा. कापताना आतल्या भागाचाही चुरा पडायला लागल्यास मजा नाही तितकी. तसेच चिवटही नसावा. शिळा झाला की तसा होतो. त्यामुळे सकाळचा सकाळीच संपवायचो. आणि मजा मस्का लाऊन खाण्यातच.

इतका सुंदर आणि खुसखुशीत लेख लिहिल्याबद्दल सरनौबत साहेबांचा आखील भारतीय पावबेकरी संघटनेने सत्कार केला पाहिजे. इथे कोणी बेकरीवाले असतील तर कृपया नोंद घ्यावी.

मस्त लिहीलंय. बेकरीत गेल्यावर पोलादी सुरीनं आपल्या डोळ्यासमोर स्लाईस कापून मिळायचा त्या पावाची चव भारी असायची. चहा दूध काॅफी कशाहीबरोबर तो भन्नाटच लागे.

आजकाल वेलदोडा किंवा व्हॅनिला चवीचे ब्रॅन्डेड टोस्ट्स मिळतात ते अजिबात नाही आवडत.

खरच भारी खमंग आणी खुसखुशीत वर्णन केलेय. Happy
मामाने सपेतल्या हिंदुस्तान बेकरीतले पॅटीस खाऊ घातले होते. तेव्हापासुन पॅटीसची मी फॅन आहे. आता पुना बेकरीतले आणतो आम्ही घरी, पण ती चव नाही.

अय्यंगार बेकर्‍या पण ढीगभर झाल्यात. केकचा खमंग वास नेहेमी दरवळतो, पण गोड खाऊन वजन किती वाढवायचे हा प्रश्न. तरी पण चहा-खारी आवडतेच.

लेख छानच आहे. कॉफीत बिस्कीटं, ब्रेडची स्लाइस, पाव बुडवून खायला अगदी मनापासून आवडतं. पण ह्यातलं काहीही गोड नको. कॉफीची चव मरते. मारीसारखं बिनाचवीचं किंवा जरा खारं.
इथे कोणी नाशिकवले असतील तर तिथल्या आदर्श बेकरीतले ओवा घातलेले टोस्ट खाल्ले असतील. फार छान असायचे. पण ती बेकरी बंद झाली बहुतेक.

ऍसिडिटी मुळे बेकरी प्रॉडक्ट नाही खात.. पण बेकरीतुन येणारा एक वेगळाच पाव केक भाजतानाचा सुगंध मस्तच वाटतो..आणि आम्ही लहान असताना दिवाळीच्या वेळी तर बेकरी बाहेर खूप गर्दी असायची नानकटाई बेक करायला येणार्यांची.. मस्त गोड सुगंध दरवळायचा.

आजकाल वेलदोडा किंवा व्हॅनिला चवीचे ब्रॅन्डेड टोस्ट्स मिळतात ते अजिबात नाही आवडत
>>>

जवळपास चांगली बेकरी वा फरसाणवाला नसला की मग असे ब्रांडेड प्रॉडक्ट खावे लागतात. नाईलाज असतो.
बेकरीतली गरमागरम ताजी खारी आणि या प्रॉडक्टसमध्ये घरचे जेवण आणि हॉटेलातील जेवण असा फरक असतो. ते बरे वाटले तरी सतत तेच ते खायला वीट येतो. मग वेगवेगळे ब्रांड शोधावे लागतात. जे बेकरीतल्या खारीबाबत वर्षानुवर्षे खाऊन कधी झाले नाही.

आजकाल वेलदोडा किंवा व्हॅनिला चवीचे ब्रॅन्डेड टोस्ट्स मिळतात ते अजिबात नाही आवडत.>>> चवीला बरे असतात पण ज्यांनी ताजे टोस्टस खाल्ले आहेत त्यांना अजिबात आवडणार नाहीत. अनेकांनी मला 'मालपाणीचे क्रीमरोल ट्राय करा' असे सांगितले होते. मला ते खूपच कोरडे वाटले. ताज्या क्रीमरोलची सर नाही

ऋन्मेषभाऊ - गुडलक ला ब्रून खाल्ला होता तेव्हा आवडला नाही. पण तुझे वर्णन वाचून भायखळ्याचा ब्रून आत्ताच खावासा वाटतोय

छान लिहिलंय, लेखाचे नाव ही समर्पक एकदम. जिथे जिथे राहिलीय तिथल्या बेकर्यांची आठवण झाली. चित्र ही सुरेख काढलीत.

खमंग लेख...
हिंदुस्थान बेकरी चिंचवड ची का?
सोलापूर ची बेंगलोर अय्यंगार बेकरी मस्त आहे...

@ च्रप्स - पूर्वी शनिवार पेठेत होती. काही वर्षांपासून सिंहगड रोडला आहे.... माल बनवून सगळ्या शाखांत पाठवतात.

सोलापूरच्या आय्यांगार दुकानात कोकोनट केक खाल्ला होता, अप्रतिम होता. तसा दुसऱ्या आय्यांगार मध्ये कधी मिळाला नाही.
कडक पाव गावाला असताना लहानपणी चहाबरोबर खाल्ला आहे, फार छान लागतो. तो त्या वातावरणाचाही परिणाम असतो. मुंबईत तशी चव कधी मिळाली नाही.

फर्मास लेख आहे @ सरनौबत.

.... मुकेश आणि हिमेश ची मक्तेदारी ..... Happy

मुंबईतल्या अनेक दशकं जुन्या पारशी-इराणी मालकीच्या बेकऱ्यांना (भाकरी - भाकऱ्या तसे बेकरी- बेकऱ्या Happy ) उदार आश्रय दिलाय मीसुद्धा. ज्याला मी 'व्हेज पफ' म्हणून ओळखतो त्याला पुण्यात / अहमदनगरला 'पॅटिस' म्हणतात हा मोठाच धक्का होता, पचवला.

डायजेस्टिव्ह बिस्किटांबद्दल सहमत - कार्डबोर्ड खाल्ल्याचे वाईट्ट फीलिंग देतात ते Happy

ज्याला मी 'व्हेज पफ' म्हणून ओळखतो त्याला पुण्यात / अहमदनगरला 'पॅटिस' म्हणतात हा मोठाच धक्का होता,
>>>>>>
केक शॉपमध्ये गेले की वेज पफ, बेकरीत गेले की पॅटीस Happy
बाकी दोघांत काही फरक असतो का कृतीत मलाही माहीत नाही. पण बोलतात असेच

नानकटाई पेक्षा मोठे आणि जाड "रोट " ह्यांचा कोणीच कसा उल्लेख केला नाही?
कोणीच खाल्ले नाहीत का रोट ?
>>>>>>>

खाल्ले आहेत, पण नानखटाई वा गोड बिस्कीटे तत्सम आवडत नाही म्हणून उल्लेख केला नाही. पण तरी हे तुलनेत जास्त खाणे व्हायचे कारण कमी गोड असायचे. हे बहुधा मुस्लिम बेकरी वा मिठाईवाल्यांकडे आढळत असावेत. कदाचित मी चुकतही असेल, म्हणजे ही त्यांची मक्तेदारी नसेल, अनुभवावरून बोलतोय. त्यांच्याकडे साधारण एकसारखेच भासणारे पण दर्जानुसार किंमत वेगवेगळी असणारे ढिगाढिगाने पाहिले आहेत. जशी त्यांच्याकडे अफलातून हि मिठाई सुद्धा दर्जानुसार किंमत वेगवेगळी असणारी ढिगाढिगाने आढळते.

…. कोणीच खाल्ले नाहीत का रोट ?

अरे हे तर हैदराबाद स्पेशल !!! जसे ईद ला बिरियानी तसे मुहर्रमच्या दिवसात रोट. आता वर्षभर असतात. आपण जिन्नस देवून रोट ताजे बेक करून घेऊ शकतो काही ठिकाणी.

मुंबईत कमीच बघितले.

तिकडे हैदराबादच्या धाग्यावर फोटो डकवतो लवकरच.

Pages