*आधी नाकाने, मग जीभेने*

Submitted by सरनौबत on 10 December, 2020 - 23:35

*आधी नाकाने, मग जीभेने*

खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियाचा सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे वर्णन त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे केले आहे.

भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि एकंदर मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. मला असं वाटतं कि आपले अनेक खाद्यपदार्थ 'सर्वात आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जीभेने' अनुभवायचे असतात.

पुरणपोळीच्या खमंग वासापासून ते अगदी अंबाडीच्या भाजीवर लसणाच्या फोडणीपर्यंत शेकडो वास भूक चाळवतात. पण माझ्या विशेष आवडीचा वास म्हणाल तर बेकरी मध्ये येणारा गोडसर खमंग वास. हा वास मला भर्रकन भूतकाळात घेऊन जातो आणि ‘nose’talgic करतो….

माझं आजोळ म्हणजे पुण्यापासून ५५ किलोमीटर असलेलं भोर नावाचं गाव. बसस्टॅन्ड वरून आजोबांच्या घरी जाताना वाटेत 'श्रीराम' बेकरी लागायची. तिथे तयार होत असलेल्या बिस्किटांचा गोडसर वास; बेकरी यायच्या २-३ मिनिटे आधीच यायला लागायचा. तिथला सुवास साठवून घेत-घेत जीरा बटर घेऊन यायचं. ते चहात टाकून 'कडे-कडेने' चहा प्यायचा. नंतर ते टम्म फुगलेलं बटर चमच्याने खायचं म्हणजे निव्वळ सुख!

मला चहाबरोबर बिस्किटांऐवजी खारी, टोस्ट, बटर हे त्रिकुट जास्त आवडतं. लहानपणी एक मुसलमान इसम अल्युमिनियम ची पेटी डोक्यावर घेऊन हया गोष्टी घरोघरी विकायला यायचा. त्यात ह्या पदार्थांबरोबर नाजूक-पांढरी 'नानकटाई' देखील असायची. मिशी नाही आणि लांब दाढी वाढवलेला माझ्या माहितीतला हा पहिलाच माणूस.

पुण्यात घोले रोड ला असलेली 'संतोष बेकरी' अशीच आपल्या आसुसलेल्या नाकाला भरपूर 'संतोष' देते. सकाळी ९:३० च्या सुमारास गेल्यावर पॅटिस, क्रीमरोल, केक, ब्रेड इत्यादी मिश्रणाचा एक अदभुत वास आसमंतात दरवळत असतो. ह्या वासांमधून केक चा गोड वास, टोस्ट-बटर चा मध्यम गोड वास आणि पॅटिस व आतील सारणाचा तिखटसर वास हुडकायला थोडीफार प्रॅक्टिस लागते. जास्त तपश्चर्या केल्यास बेकरीजवळून नुसतं दुचाकीने गेलं तरी देखील केवळ वासावरून कुठला माल भट्टीतून काढत आहेत हे ओळखू शकतो.

sketch1607386767141

ब्रेडला देखील स्वतःची खास चव असते हे अश्या ठिकाणचा ब्रेड खाल्ल्यावर समजतं. 'ब्रँडेड' ब्रेड् पेक्षा अश्या ठिकाणी मिळणारा ब्रेड स्लाइस (अमूल बटर लावून) चहासोबत खाऊन पहा. केवळ मऊ-लुसलुशीत म्हणजे उत्तम ब्रेड नव्हे. ह्या ब्रेड ची कड भले थोडी 'कड'क असेल, पण चहात बुडवून खाताना फारच अप्रतिम लागते. ताजा ब्रेड तिकडेच मशीन वर कापून कागदात बांधून देतात. तो घरी आणून चहा होईपर्यंत धीर निघत नाही. कुठल्याही नवसाशिवाय ही बेकरी मला 'पाव'ते.

पुण्यात मेट्रो प्रकल्प जेव्हा होईल तेव्हा होईल; पण त्या आधी संतोष बेकरी शेजारी एखादे 'अमृततुल्य' काढण्याची जास्त गरज आहे! ह्या बेकरी मुळे एखाद्याची बेकारी दूर होईल. बेकरी शेजारी चहाचे दुकान असल्यास ‘GST मधून ५ वर्षे सूट' सारखा काहीतरी कायदा लवकर आणायला हवा. मोदी स्वतः चहा विकायचे, त्यामुळे ते तरी ह्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील ही आशा आहे.

हिंदुस्थान बेकरी आणि न्यू पूना बेकरी चे देखील काही पदार्थ आवडतात. मात्र 'हिंदुस्थान बेकरी' पेक्षा 'पॅटिस संपले' हा बोर्ड जास्त ठळकपणे दिसतो. पूना बेकरी चे पॅटिस बरे असले तरी मला तिकडे दोन कारणांसाठी जायला आवडत नाही. एकतर पुणे ला पूना म्हणलेलं आवडत नाही. दुसरं म्हणजे पूना बेकरी अप्पा बळवंत चौकात आहे, तिकडे जाताना CA इन्स्टिटयूट दिसते आणि CA च्या वेळी केलेली जागरणं आणि अभ्यास आठवून कोरडा पॅटिस घशाखाली उतरत नाही.

नवी हॉटेल्स 'माऊथ पब्लिसिटी' मुळे चालतात. मात्र अनेक बेकऱ्या 'नोज पब्लिसिटी' मुळे चालत असाव्यात. मी स्वतः अशी अनेक ठिकाणं 'वास लागल्यामुळे' शोधली आहेत. पेरूगेट वरून बाजीराव रोडकडे जाताना असाच एकदा बेकरीचा गोड वास आल्याने तिथेच थांबलो. रस्त्यावर कुठेच बेकरी दिसेना. नाकावर पूर्ण विश्वास असल्याने शोधमोहीम चालू केली. तेव्हा एका बिल्डिंग च्या अगदी आतल्या भागात लपलेल्या 'मनोहर बेकरी' चा शोध लागला. दुपारची वेळ असल्याने बरेचसे पदार्थ संपले होते. मग भट्टीतून नुकत्याच काढलेल्या बन-पावाची मान मुरगाळून 'बेकरी ईद' साजरी केली. आता कधीही त्या भागात जाणे झाले कि 'आहे मनोहर बेकरी'.

पुण्यातील बेकरी चा विषय 'कयानी बेकरी' चा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तिथल्यासारखी श्रुजबेरी बिस्किटे आणि प्लेन केक आख्ख्या जगात कुठेही मिळत नसावीत. तशी श्रुजबेरी बिस्किटे आणि केक अनेकांनी बनवून पाहिले. पण ओरीजिनल किशोर कुमार ची आणि कुमार सानू ने त्याची गायलेली गाणी इतका फरक दोन्हीत आहे. शोले च्या गब्बर स्टाईल मध्ये विचारावंस वाटतं कि ‘ये कयानी वाले अपने केक में कौनसे चक्की का पीसा मैदा डालते हैं रे’?

कॅम्प मध्ये जाऊनदेखील बुधानी वेफर्स आणि कयानी चा केक न घेणाऱ्या लोकांचे आधार कार्ड जप्त केले पाहिजे असे माझे (प्रांजळ!) मत आहे.
937d5431-2013-4902-8721-be517ff0d936

नाकाचा पुरेपूर वापर हि केवळ मुकेश आणि हिमेश ची मक्तेदारी नाहीये. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे जरी चांगलं नसलं तरी प्रत्येक खाद्यपदार्थाचा 'आधी नाकाने, मग डोळ्याने आणि नंतर जिभेने' आस्वाद घ्यायला हवा. असं केल्यास नाकाला घ्राणेंद्रिय ऐवजी खाणेंद्रिय म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.

आताच्या मुलांच्या आरोग्यविषयक कल्पना ऐकल्या कि एकूणच बेकरी व्यवसाय केवळ बर्थ-डे पेस्ट्रीज बनवण्याइतपतच राहील कि काय अशी धास्ती वाटते. ताजे पोहे- उपमा सोडून preservatives घातलेले (आणि अनेक महिन्यापूर्वी बनवलेले) कॉर्न फ्लेक्स आणि ओट्स अनेक जण खातात. खारी-टोस्ट ऐवजी high-fibre ची Digestive बिस्किटे खाताना पाहिलं कि माझ्या चहातील बटर फुगेनासे होते.

प्रख्यात आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर ह्यांनी 'खारी-टोस्ट-बटर' प्रकृतीस कसे चांगले आहे ते पटवून देऊन थोडा 'खारीचा वाटा' उचलावा अशी विनंती आहे. सरकारने देखील खारी-टोस्ट-बटर खपावेत म्हणून पुढच्या वेतन आयोगात 'बेकरी भत्ता' समाविष्ट करावा. पाश्च्यात्य देशांत जेवणापूर्वी वाईन चा ग्लास उंचावून 'टोस्ट' देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे सुद्धा एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात 'टोस्ट' घेऊन 'चियर्स' ची प्रथा सुरु करायला हवी.

आवडत्या दुपारची माझी अशी कल्पना आहे - पावसाळी हवा असावी. अंबाडीची भाजी, भाकरी आणि भात असं आटोपशीर दुपारचं जेवण झालेलं असावं. आवडते पुस्तक वाचत आरामखुर्चीतच डोळा लागावा. पावसाच्या सरीने आणि चहाच्या वासाने ४ च्या सुमारास जाग यावी. चहाबरोबर (सकाळी आणलेली) पिळाची खारी असावी. खारी चहात बुडवून खावी.. आणि रेडिओ वर दिलीप कुमार वैजयंतीमाला चे गाणं लागलेलं असावं "नैन लड़ जइ हैं तो मनवामा कसक होई *बेकरी*

IMG_20170525_173029_HDR

~ सरनौबत

Group content visibility: 
Use group defaults

झकास लिहिलंय! पेटीतले टोस्ट जास्त गोड आणि पिठूळ असतात, आणि ब्रँडेड packed टोस्ट आणि खारी अक्षरश: विचित्र लागतात. अनेक अनुभवानंतर लहानपणापासून खात असलेले "अशोक बेकरी जळगाव" यांचीच उत्पादने बेस्ट आहेत अशी खात्री झालीये.

आवडलं लिखाण खमंग खुसखुशीत आहे.
देव तुम्हाला असाच 'पाव'त राहो ही प्रार्थना
लेखातली चित्रं खूप म्हणजे खूपच सुरेख आहेत. कोणी काढल्येत?

आवडलंय !!
हिंदुस्थान च्या पॅटिस सारखाच लेख , खुसखुशीत आणि लगेच संपला पण Happy
"नैन लड़ जइ हैं तो मनवामा कसक होई *बेकरी* - हे भारी होतं

वा वा! खारी-टोस्ट-बटर हेच त्रिकूट मलापण जास्त आवडतं चहाबरोबर.. बिस्किटं त्यातल्या त्यात गुडडेची आवडतात.
बेकरीचा वास खरंच मोहक असतो! डोक्यात त्याची नोंद होतेच होते.
स्वैपाकघरातल्या इतर पदार्थांच्या वासांबद्दलही अजून वाचायला आवडलं असतं. पोळ्या भाजताना येणारा खरपूस वास, दिवाळीच्या फराळाचा खमंग वास, वरणभाताच्या कुकरचा सात्विक वास..वगैरे वगैरे.

बेकरीचा वास खरंच मोहक असतो! डोक्यात त्याची नोंद होतेच होते.
स्वैपाकघरातल्या इतर पदार्थांच्या वासांबद्दलही अजून वाचायला आवडलं असतं. >>>>> + १००००००

काही वास डोक्यात आणि मनात घर करून रहातात .
कॉलेजमध्ये असताना , पार्ले बिस्किट फॅक्टरीतून येणारा वास नाकात आणि मनात साठवायला , लोकल ट्रेनच्या दारात उभे रहायचो .
सध्या मी रहाते त्या बिल्डीन्गच्या बाजूला, कंपाउंडच्या पलिकडेच बेकरी आहे .
आता दूपारी २:३० ला freshaly baked पावाचा वास यायला सुरुवात होते Happy .

आवडलं लिखाण खमंग खुसखुशीत आहे.
देव तुम्हाला असाच 'पाव'त राहो ही प्रार्थना
लेखातली चित्रं खूप म्हणजे खूपच सुरेख आहेत. कोणी काढल्येत? >>>> +9999 Happy

हा धागा पण छान जमलाय !
पॅटिस माझा मिसळप्रमाणे जिव्हाळ्याचा विषय. संतोष बरोबरच शनवार पेठेतील हिंदुस्तान बेकरीचे पॅटिस एक नम्बर असतात. कॉलेजला होतो तेव्हा आठवड्यातून बऱ्याचदा तिथे जायचो मात्र मधल्या काळात बराच ग्याप पडला. मागच्यावर्षी पुण्यात परत आल्यावर अधूनमधून जात असतो. बऱ्याच वर्षांनी गेल्यावरसुद्धा तिथल्या मेहंदळे काकांना आठवण राहिली हे पाहून आनंद वाटला होता.

पुण्यात मंगला थिएटर समोरील पुणे म न पा शेजारची रामसर बेकरी. शिवाजी नगर वरुन स्वारगेट जाणार्या बस मध्ये बसले असाल तर छान वास येतो.

मुंबईत लोकल ने अंधेरी ला जाताना बिस्किटाच्या सुगंधावरूनच विले पार्ले आल्याचे कळायचे. आता बंद आहे ती फॅक्टरी .

झकास जमलाय लेख! वाचून जिव्हा चाळवलीच! खारी - साधी आणि पिळाची अत्यंत आवडीची! चहात बूडवुन जीरा बटर म्हण्जे स्वर्ग सुख! असेच खुमासदार लिहित रहाल ही शुभेच्छा! पुलेशु!

काय खरपूस लिखाण केले राव!

ह्याला भाग१ करुन, बेकरी साठी डेडीकेट करता येईल...

बाकी पदार्थांसाठी अजून भाग आले, तर खूप आवडेल..

धन्यवाद वीरू, DJ, कुमार१, श्रवु् , वावे, भावना, peacelily2025, स्वाती२ , अस्मिता, sonalisl, निलेश 81, हिमु, मानव

@ हर्पेन - लेखातली चित्रं खूप म्हणजे खूपच सुरेख आहेत. कोणी काढल्येत?

धन्यवाद. हा लेख लिहून अभिप्रायासाठी माझ्या एका मित्राला पाठवला त्याने (त्याचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर) ही चित्रे काढून पाठवली

सुंदर चित्रे आणि छान लेख.
माझ्या शाळेजवळ ,पुण्यात, गुरूवार पेठेत अशोक बेकरी..तीथला डोनट चा वास अहाहा.. तेव्हा अडिच रू.ला ताजा ताजा मिळायचा तिथे.
आता आहे कि नाही ती बेकरी माहीत नाही.

@ जिद्दु - हिंदुस्थान बेकरीच्या पॅटिस मधील सारण कमी वाटते. मला मात्र चहा बरोबर आवडतात.

मस्त लेख ! नॉस्टेल्जिक झालो...
पुण्यातील बेकरीचे संदर्भ नाही माहीत मात्र माझेही बालपण भायखळा माझगाव या दक्षिण मुंबई परीसरात गेल्याने बेकरी सुख फार अनुभवलेय. माझे वडिल नेहमी म्हणायचे की आपल्या भायखळ्यासारखे केक दुसरे कुठेच नाही. खरेच होते ते. तसले मावा केक नंतर पुन्हा कधी नाही खाल्ले.

बिस्कीटे मलाही कधी आवडली नाहीत. गोडसर पदार्थ काय चहात बुडवून खायचा हे लॉजिकच कळले नाही. खारी बटर टोस्ट - याच क्रमाने आवडतात. खारीचा उरलेला चुरा वा मुद्दाम कुस्करून चहात टाकून छान लागते. बटर दोन तळहातांच्यामध्ये धरून फोडायचा आणि कालवणात अंडे फोडून टाकल्यासारखा गरमागरम चहात सोडायचा. टोस्ट त्या मानाने कमी आवडीचे. पण केक टोस्ट (एगलेस) सुद्धा चहात बुडवून खायला आवडतात. पॅटीस मात्र भट्टीतले गरमागरम खाण्यातच मजा आहे. थंड झाले की सुके लागतात. सॉसचा आधार घ्यावा लागतो. गरमागरम असताना मात्र पापुद्रे मस्त तोंडात विरघळतात. वेज पॅटीस असो वा मटण पॅटीस, हे कॉम्बिनेशनच भारी आहे. मावा पॅटीसला मात्र बिग नो! वालचंद, सांगलीला असताना तिथले आवडीचे अंडा पॅटीस मिस करतो. ईथे कुठे दिसले नाहीत ते. त्यांचा उल्लेख मागे या कथेत केला होता - https://www.maayboli.com/node/62355

सध्या नवी मुंबईला रोज मुंबईतल्या बेकरयांची आठवण काढणे होतेच. तिथल्या पावांसारखे पावही ईथे मिळत नाहीत. लहानपणी मटणासोबत चपाती कधी खाल्लीच नाही. एकतर घावणे वा वडे असायचे. किंवा ते बनवायला वेळ नसल्यास भट्टीतले गरमागरम पाव. हातालाही चटका बसावा असे. कारण भट्टीतून कधी निघतात याची वेळ माहीत होती. तेव्हाच जाऊन घ्यायचे हे ठरलेले. आई मटण गरम करून ताटात देईपर्यंत एखादा पाव असाच तुकडा तुकडा खात आणि कांदा तोंडाला लावत संपायचा.

आणि कडक पाव हा प्रकारच ईथे मिळत नाही. हा पाव स्पेशल कडक बनवला जायचा. विळीवर चिरून तीन तुकडे करायचे. मग प्रत्येक तुकडा मधून कापून त्याला मस्का लावायचा आणि चहात बुडवून खायचे.. यार कुठून आठवले हे.. गेले तीन चार वर्षे खाल्ले नाही हे. आता काही आठवायचा लिहायचा मूडच गेला. ईतके भारी प्रकरण होते हे Sad

हा लेख वाचून रात्री 8 वाजता आपटे रोडवरच्या संतोष बेकरीमध्ये गेलो, पण हाय रे कर्मा पॅटिस सम्पले होते मग क्रीमरोल आणि खारी घेतली, त्या पाच मिनिटात 6/7 गिर्हाईक पॅटिससाठी येऊन गेले. ☺️

धन्यवाद वीरू, DJ, कुमार१, श्रवु् , वावे, भावना, peacelily2025, स्वाती२ , अस्मिता, sonalisl, निलेश 81, हिमु, मानव >>> मी पण चांगलीच कमेंट दिली होती... Uhoh

Pages