व्हिसल ब्लोअर-६

Submitted by मोहिनी१२३ on 21 November, 2020 - 12:46

भाग १- https://www.maayboli.com/node/77210
भाग २-https://www.maayboli.com/node/77219
भाग ३-https://www.maayboli.com/node/77224
भाग ४-https://www.maayboli.com/node/77249
भाग ५-https://www.maayboli.com/node/77256

बराच वेळ नेहा डोकं डेस्कवर ठेऊन हमसाहमशी रडत होती. ती अचानक अशी रडायला लागलेली पाहून “काय झाले” हे विचारायला तिचे सहकारी,मित्र-मैत्रिणी तिथे जमा झाले. कोणी तिच्या पाठीवरून हात फिरवला तर कोणी पाण्याचा ग्लास आणून दिला.एवढचं काय तर आदितीही केबिनबाहेर येऊन डोकावून गेली आणि कल्पनानेही तिच्या क्युबिकलमधून पाय उंचावून पाहिले.

हळुहळू नेहाच्या रडण्याचा आवेग ओसरला. आपण कंपनीत आहोत हे लक्षात येऊन ती चपापली.मी ठीक आहे, तुम्ही तुमच्या कामाला गेलात तरी चालेल असं पुटपुटतच ती रेस्टरूममध्ये गेली.चेहर्यावर सपासप पाण्याचे हबकारे मारले तेव्हा तिला बरं वाटलं. त्या रेस्टरूममध्ये जमिनीवर एक योगा मॅट टाकली होती. नेहा भिंतीला टेकून त्या मॅटवर डोळे मिटून शांतपणे बसली.

तिने थोडा वेळ दीर्घ श्वसन केले आणि ती एका एका गोष्टीचा शांतपणे विचार करू लागली. सर्वात प्रथम “आता शेंडी तुटो अथवा पारंबी आपण लढायचे” हा द्रढनिश्चय केला. तिने वर्क फ्रॅाम होम मध्ये पुढच्या ३-४ दिवसांचे कामही बर्यापैकी आटोक्यात आणले होते त्यामुळे त्या आघाडीवर पुढचे ३-४ दिवस जरा शांतता होती. तसेच तिने एक जॅाब ॲाफर जवळजवळ पदरात पाडून घेतली होती. त्यामुळे वेळ पडली तर हा जॅाब सोडायला ती सज्ज होती.

ती उठली, पॅन्ट्रीत गेली, स्वत:साठी वाफाळता जिंजर टी घेतला आणि शांतपणे एचआरशी कसं भिडायचं याचा विचार करू लागली.
हे सर्व घडत असताना लांबून तिचं कोणीतरी सुक्ष्म निरीक्षण करत होतं जे तिच्या गावीही नव्हतं. चहा झाला आणि एचआर डायरेक्टरला भेटायला १५व्या मजल्यावर जायला तिने लिफ्ट बोलावली.

त्यादिवशी नेमकी लिफ्ट यायला बराच वेळ लागत होता. त्या वेळेचा सुध्दा उपयोग नेहाने तिच्या योजनेतल्या त्रुटी शोधायला केला. १५व्या मजल्यावर प्रशस्त अशी शिशिरची म्हणजे त्यांच्या एचआर डायरेक्टरची केबिन होती. शिशिरला भेटण्याआधी त्याची सेक्रेटरी पल्लवी हिच्याकडून अपॅाइंटमेंट घेण जरूरी होतं.

नेहा आणि पल्लवी एकामेकींना एका जेंडर बायस वरच्या सेमिनारमुळे चांगलं ओळखत होत्या. मात्र पल्लवीने नेहाला इतक्या कमी वेळाच्या नोटीसवर शिशिरची अपॅाइंटमेट मिळवून देण्यात असमर्थता दाखविली. नेहाने त्यावर “शिशिरला फक्त हा निरोप पोचव” म्हणून एक नोट दिली. त्या नोटमध्ये तिने “कल्पना प्रकरण दाबून टाकण्यात येत आहे याचा निषेध म्हणून ती राजीनामा देत आहे. आणि राजीनामा देताना ती अधिकृत कागदपत्रांवर आणि मेलमध्ये हे कारण नमूद करणार आहे” असं लिहीलं होतं. ती नोट वाचताच शिशिरने नेहाला तडक १० मिनीटांची वेळ दिली.

आता नेहा शिशिरपुढे ताठ मानेने , डोळ्याला डोळे भिडवून बसली होती. शिशिरने “काय नेहा, कशी आहेस, तुझ्यामुळे आपली ॲडॅाप्शन बेनिफिट्स पॅालिसी अस्तित्वात आली,त्यानंतर आपण आजच भेटतोयं “ अशी मखलाशी करून नेहाचं लक्ष मुख्य मुद्दयावरून भरकवटण्याचा प्रयत्न केला. पण आता नेहाही कच्चा गुरूचा चेला राहिली नव्हती. तिने थंड स्वरात “कल्पना जे तरूण मुलांचे शोषण करतेय त्याबद्दल ठोस पावले कधी आणि कोणती उचलणार” असा प्रश्न विचारला.

आता मात्र शिशिर थोडा विचारात पडला. नेहा ह्या प्रकरणाची पाळंमुळं खणून राहिल्याशिवाय राहणार नाही हे त्याच्या अनुभवी डोळ्यांनी ओळखले. तसेच ती हे सगळं निस्वार्थपणे करतीयं याची त्याला खात्री पटली आणि तो बोलू लागला.
“नेहा, तुला आता सगळं काही सांगायची वेळ आली आहे. कदाचित तुझा मानसशास्त्राचा अभ्यास, समुपदेशक म्हणून केलेले काम याचा उपयोग आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि कंपनीची प्रतिष्ठा शाबूत राहण्यासाठी होऊ शकेल.”

नेहाच्या चेहर्यावरचे बुचकळ्यात पडलेले भाव बघून शिशिर “तू पुढचे २ दिवस कृपया फक्त या प्रश्नाकरिता ठेव. तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील” असं म्हणाला. एवढे बोलून तो फक्त थांबला नाही तर तशी त्याने आदितीला आज्ञावजा विनंतीची मेल पाठवली.
तसेच तुला खूप ताण आला असेल तर तू तुझ्या १-२ विश्वासू सहकार्यांशी या प्रकरणाबद्दल बोलायला हरकत नाही अशी जाता जाता तो पुस्ती जोडायला विसरला नाही.

या शेवटच्या विधानाचा मनाशी अर्थ लावत ती डेस्कपाशी आली तर तिला इंटर्नल मेसेंजरवर नवीन वैयक्तिक मेसेज आलेला दिसला.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय मस्त चालू आहे कथा.
एक प्रश्न. जर नेहा कडे दुसरी ऑफर नसती तरीही तिने राजीनामा दिला असता का? किंवा हा इश्यू कसा हाताळला असता? ही बाजू ही वाचायला आवडेल.

धन्यवाग भक्ती, चिन्मयी.
भक्ती:पुढच्या भागात नेहाच्या बाबतीतल्या बर्याच जर/तरची उत्तरे मिळतील.
चिन्मयी:हा भाग बराच मोठा टाकायचा प्रयत्न केला आहे. हळुहळू जमवण्याचा प्रयत्न करतेय. पुढचा भाग जमलं तर शनिवारच्या आत लिहायचा प्रयत्न करेन.

कथेचा गाभा अशाही समस्या असू शकतात आणि त्याही संवेदनशीलतेने सोडवल्या पाहिजेत हा आहे.
तुम्ही सर्व जण इतके यात रस घेत आहात बघून आनंद/दडपण दोन्ही वाढले आहे. मला भाग लिहायला छान वाटतयं.
पुढच्या २-३ भागांत ही कथा संपेल. तुम्हाला या भागांत काय वाचायला आवडेल हे मोकळेपणाने लिहीले तरी चालेल.

छान चालू आहे कथा.
Corporate culture is like Animal Farm by Orwell..- " “All animals are equal, but some animals are more equal than others.”
ढळढळीत चुकीचे वागणार्या लोकांनाही कशी राॅयल वागणूक मिळते हे जवळून पाहिले आहे.

हो. खरयं धनवंती. आपलं स्वत:चं वागणं तपासत राहणं आणि आपण कोणावर अन्याय करत नाहीना आणि आपल्यावर होऊन देत नाहीय ना एवढं आपण करू शकतो.

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

उत्सुकता खरंच वाढली आहे.. नेहा कुणाची मदत घेऊन काय प्लान करणार??आणि कल्पनाचा कसा पर्दाफाश करणार????
छान आहे हा भाग पण..

धन्यवाद ऋतु_निक, रूपाली,मृणाली तुमच्या नेहमीप्रमाणे प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल.

अरे छान वाटलं प्रतिसाद वाचून . नाही लिहीला अजून. सध्या जर्मन परिक्षेचा अभ्यास करतेय. त्यामुळे खरचं कधी लिहीन ठाऊक नाही. पण वेळात वेळ काढीन नक्की. धन्यवाद.
नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.

आणि कल्पनानेही तिच्या क्युबिकलमधून पाय उंचावून पाहिले>> म्हणजे नक्की कसे Biggrin
मला कल्पना करुनच जाम हसू येतय. ऑफिस स्कर्ट मध्ये पाय ऊंचावून म्हणजे पाय वर उलटे घेणे कसे शक्य आहे? (टाचा ऊंचावून? Proud )

हे सर्व घडत असताना लांबून तिचं कोणीतरी सुक्ष्म निरीक्षण करत होतं जे तिच्या गावीही नव्हतं >> हे सुद्धा नाही समजले

आणि कल्पनानेही तिच्या क्युबिकलमधून पाय उंचावून पाहिले>> म्हणजे नक्की कसे Biggrin
मला कल्पना करुनच जाम हसू येतय. ऑफिस स्कर्ट मध्ये पाय ऊंचावून म्हणजे पाय वर उलटे घेणे कसे शक्य आहे? (टाचा ऊंचावून? Proud )—हो हो, टाचा ऊंचावून.
हे सर्व घडत असताना लांबून तिचं कोणीतरी सुक्ष्म निरीक्षण करत होतं जे तिच्या गावीही नव्हतं >> हे सुद्धा नाही समजले—-पुढच्या भागात कळेल हे.