भरली भोपळी मिरची

Submitted by MazeMan on 28 October, 2020 - 06:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ भोपळी मिरच्या
मध्यम वाटी ओले खोबरे
अर्धा वाटी बेसन
६-७ पाकळ्या लसूण
२-३ छोटे चमचे साखर
हिंग
हळद
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

1. बेसन कोरडे भाजून रुम टेंपरेचरला आणून ठेवा.
2. भोपळी मिरचीचे दोन उभे तुकडे करून घ्या. बिया काढून टाका.
3. लसूण वाटून किंवा बारीक किसून घ्या.
4. अधिक टीपा वाचून घ्या. नंतरच पुढच्या कृतीकडे वळा.
5. ओले खोबरे, बेसन, लसूण, हिंग, मीठ, हळद, साखर मिक्स करून घ्या.
6. वरील सारण भोपळी मिरचीमध्ये भरून घ्या. सारण हलक्या हाताने भरा. गच्च भरू नका.
7. जाड बुडाच्या कढईत किंवा पसरट भांड्यात थोडे तेल घालून ते तापले की सारण वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीने भोपळी मिरच्या ठेवा. वरून झाकण ठेवा.
8. भोपळी मिरची पूर्ण शिजली की उलट करून ३-४ मिनीटेच शिजू द्या. जास्त वेळ ठेवाल तर सारण करपेल. याच स्टेजला अधिकचे सारण असेल तर तेही शिजायला टाका.
9. दुसरी बाजू शिजल्यावर गॅस बंद करून भांडे हटवा. भोपळी मिरची तयार.

साधारण भोपळी मिरची म्हटली की मसालेदार भाजी डोळ्यासमोर येते. ही भाजी सौम्य पण अप्रतिम चवीची होते. लहान मुलेही आवडीने खातात.
आदल्या रात्री तयारी करून ठेवली तर अजून लवकर होते/ घाऊक प्रमाणात करता येते.

याच पद्धतीने पडवळ करता येते. पण मी कधी केले नाही.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

सारण चिकट नकोय. त्यासाठी...
1. सारण एकत्र करताना बेसन आणि खोबरे रुम टेंपरेचरला हवे..त्यामुळे सगळे पदार्थ मिक्स होतात. परंतु खोबर्याचा प्रत्येक कण सुटा दिसला पाहिजे. सारण चिकट झाले तर भोपळी मिरची शिजली तरी सारण कच्चे राहते आणि ते नीट शिजवण्याच्या नादात भोपळी मिरची जळून जाते.
2. खोबरे डीप फ्रीझरला ठेवले असेल तर किमान ३-४ तास आधी बाहेर काढून ठेवा
3. पाणी अजिबात घालू नये. खोबर्याचा नॅचरल ओलसरपणा पुरेसा असतो.
4. साखरेऐवजी गुळ नको, गुळाची पावडर चालू शकेल. कुणी गुळाची पावडर वापरली तर प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
5. या भाजीची चव गोडसर असते. त्यामुळे वरून मिरची/लाल तिखट घालणे अपेक्षित नाही.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

Yum

मस्तच साधी सोपी भभोमि पाकृ. यांना ढोबळी मिर्ची म्हणतात काही ठिकाणी. रंगीत ढोबळ्या मिरच्या वापराव्यात. डिश छान दिसेल.

मला यातली 4 नंबर टीप जबरा आवडली
तेल तापत ठेवून मग फ्रीज मध्ये भाज्या शोधणारे उतावळे वीर आम्ही Happy

वावे, मृणाली >>> जरूर करून पहा आणि सांगा.

मी_अनू >>>
सारणाची कन्सिस्टंसी हाच या भाजीचा मेक ऑर ब्रेक पॉईंट आहे. या टिपा म्हणजे स्वानुभवातून आलेले कळकळीचे बोल आहेत हो Wink