©अज्ञातवासी - भाग ७ - नायक!

Submitted by अज्ञातवासी on 2 November, 2020 - 22:58

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!

भाग - ६
https://www.maayboli.com/node/77161

भाग - ५
https://www.maayboli.com/node/77156

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77152

भाग - ३
https://www.maayboli.com/node/77137

भाग - २
https://www.maayboli.com/node/77129

भाग १ -
https://www.maayboli.com/node/77125

खुर्चीवर जगनअण्णा बसले होते.
खुर्चीची तर आता रयाच गेली होती!
वाड्यावर एक अभद्र शांतता पसरली होती. वाडा पूर्णपणे ओसाड पडला होता.
"अण्णा,"
"संपलं सगळं दादा."
"काहीही संपलं नाही. तुम्ही आहात, अप्पा आहे. संतोष आहे. काही नाही संपलं."
"वाड्यावर गोळीबार झाला. एवढ्या बंदुका तर मी मुंबईला पाहिल्या नाहीत. नाशिक शांत होतं रे, आता दिवसाढवळ्या खून पडतायेत."
"कारण आपण नाशिक शांत ठेवलं होतं. आपण कधीही प्रतिस्पर्धी निर्माण होऊ दिला नाही. आजपर्यंत आपण सांगू ती पूर्वदिशा म्हणून नाशिक शांत होतं."
"काही चुकीचं वागलो मी? कधी केला कुणावर अन्याय?"
"नाही अण्णा, तसं नाही. पण सत्ता कायम आपल्याकडे एकवटली. आपण कळसूत्री बहुल्यांप्रमाणे सगळं नाशिक चालवत राहिलो, पण ही जिवंत माणसे आहेत अप्पा. यांच्या महत्वाकांक्षा आपण कधीही समजू शकलो नाही."
"म्हणजे?"
"इब्राहिम कधी इतका ताकदवान झाला असता? इतक्या बंदुका नाशिकमध्ये आल्या, आणि आपल्याला कानोकान खबर नाही? नाही अण्णा, इब्राहिमला संपवण्याच्या नादात आपण एक गोष्ट विसरलो, म्हणजे कुणीतरी आपलंच आपल्याला संपवायच्या मागे लागलंय."
"दादा, असं असेल, तर आयुष्यात मी काहीही कमावलं नाही."
"नाही अण्णा, उलट तुम्ही खूप कमावलं, आणि म्हणून त्या कमाईवर काही नाग डोळा ठेवून राहिलेत, मात्र आता त्यांनाही कळलं असेल, त्यांच्या विषावर एक सैतान वाढलाय."
अण्णा सुन्नपणे ऐकत राहिले.
"अण्णा, मोडून काढेल मी एकेकाला, पण आधी हा सैतान ठेचायला हवा."
"नाही दादा, त्याच्याजवळ कुणी पोहोचू शकत नाही."
"मी पोहोचू शकेन. मी पोहोचेनच."
★★★★
हवेलीत आज दिवाळी साजरी झाली!
लोक बेधुंद होऊन नाचत होते, गात होते. मद्याचे पाट वाहत होते.
"इब्राहिम, कमाल कर दिया!"
"बताया था चाचा मैने. पण आता मी थांबणार नाही. वाड्यावर दुसरा वार व्हायलाच हवा."
"इब्राहिम, काय उरलंय वाड्यावर वार करायला?"
"जगनअण्णा वाचलाय. पण मारून टाकू त्यालाही. किड्यांना मारायला वेळ लागत नाही."
हवेलीतला जल्लोष आता वाढला होता.
★★★★★
वाड्यातील एका खोलीत सातजण बसले होते.
कुणालाही शांततेचा भंग करावासा वाटत नव्हता.
"शेखावत, सिंग, सायखेडकर, पांडे, जाधव आणि डिसुझा!"
एका दमात त्याने सगळ्यांची नावे घेतली.
"आपण सातजण वाचलोत राव, काहीतरी करायला पाहिजे."
"दादासाहेब, सातीजणांनी मिळून शेवटचा वार करावा की काय." पांडे हसला.
"आणि आपला शेवट करून घ्यावा असंच ना?"
थोडावेळ वातावरणात विचित्र शांतता पसरली.
"आता शांतपणे विचार करायला हवा. झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही, पण निर्णायक वार करायला हवा."
"शेखावत. आजपासून दिवसरात्र कारखाना चालव. बॉम्ब आणि बंदुका, कमी पडायला नकोत."
"पांडे, आपले जेवढेही माणसं असतील त्यांच्याकडेही बंदुका आणि गोळ्या कमी पडायला नकोत. लक्षात ठेव."
"जाधव, मुंबईला जा. इब्राहिमचा माल कुठून येतोय याचा पत्ता काढ. ते एकदा कळलं, की नाशकात येणाऱ्या बंदुकांचा मार्ग थांबवता येईल."
"सिंग, ट्रान्सपोर्ट लाइनकडे लक्ष वाढव. बाहेरून एकही बंदूक आत यायला नको."
"सायखेडकर आणि डिसुझा, माझ्या कायम आजूबाजूला राहा. सोबत नाही, पण आजूबाजूला. माझ्याबरोबर काहीही बरं वाईट झालं, तुम्हाला माहिती असायला हवं कारण...
मी आजपासून अंडरग्राउंड होतोय!"
★★★★★
यानंतर पंधरा दिवस कुठूनही काहीही हालचाल नव्हती. इब्राहिमने अक्षरशः नाशिकचं राज्य मिळवल्याची परिस्थिती होती.
वाड्यावर मात्र पूर्ण अवकळा आली होती. वाड्याचा दराराच नाहीसा झाला होता.
रात्र झाली होती, तरीही अण्णा अजून खुर्चीवरच बसून होते.
"असं कसं गाफील राहिलो आपण? आपल्या डोळ्यासमोर हा सैतान वाढला?"
तेवढ्यात वाड्याचे दरवाजे उघडले गेले, आणि प्रखर प्रकाशझोत आत आला.
गाडीतून सात माणसे उतरली, व त्यांनी अजून एका माणसाला ओढून बाहेर काढले.
त्या माणसाच्या चेहऱ्यावर काळा कपडा बांधलेला होता, आणि दोन्ही हात मागे बांधलेले होते.
लोकांनी त्याला गाडीतून ओढून काढलं, आणि फरफटत अण्णांसमोर ठेवलं...
"अण्णा, गिफ्ट आहे तुमच्यासाठी."
अण्णा चक्रावून गेले होते. तरीही त्यांनी धीर करून त्याच्या तोंडावरच कापड काढलं... त्यांच्या तोंडून आश्चर्याने शब्द बाहेर पडले...
"इब्राहिम???"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !
ईब्राहीमला कस पकडून आणलं हे यायला हव पुढील भागात!