चिठ्ठी भाग 12 (समाप्त)

Submitted by चिन्नु on 6 September, 2020 - 04:42

"ए आमची चिठ्ठी कुठंय?", हनीने मोठ्या उत्सुकतेने विचारलं. बनीने चिठ्ठीच्या भेंडोळ्याला हात घातलाच होता आणि तेवढ्यात अनु ओरडला- "ए नको. तुमचं काही नाहीये तिथं".
"तू आम्हाला नाही लिहिलीस चिठ्ठी? आम्ही डॅडूला सांगू तुझं नाव. कट्टी जा!", असं म्हणून बनीने निषेध जाहीर केला व ते भेंडोळं शोभाताईंकडे दिलं व नेहमीच्या शिरस्त्यानुसार त्या भोकाड पसरून घरी निघाल्या.
"अरे पण, चिठ्ठी लिहिली तर समजायला तुम्हाला वाचता तरी येतं का? हिंदी समजतं का?", इति अनु.
"हो हो. सगळं येतं आम्हाला. तुझ्या पेक्षा जास्तच. आधी अक्षर सुधार जा!", हनी ओरडून पळाली.
अनुने त्यांच्या डॅडूंचं- डाॅक्टर अंकलचं नाव ऐकून रदबदली करायचा प्रयत्न केला पण प्रकरण फाटकाबाहेर गेल्यामुळे त्याचा अर्थातच काही उपयोग झाला नाही.
"उगाच त्रास देतोस बघ तू अनु", सुमाने दटावले.
"अय्या हे काय? मुग छन कलाकार असं लिहिलंय आणि एकात पो.ताई- त्याच्या पुढे एक गिचमिड रांगोळी व पुढे छान असं आहे बघ", नीलूने दोन कागदं दाखवली मुग्धाला.
"पोलिस ताई तुझी रांगोळी छान- असं आहे ते", अनुने decode केलं लगेच, "आणि तू छान भजन गातेस ना मग तू छान कलाकार"
"हो पण मुग्धा ताई लिहायचं ना. मुग काय रे!", असं म्हणत मुग्धाने अनुला धपाटा घातला!
"अजून आहे एक चिठ्ठी. कोणाला लिहिलंस हे - मरख, आली नईस अजून?", मुग्धानं विचारलं.
"ती चिठ्ठी माझ्या साठी आहे मुग्धा ताई!", असं म्हणत चिंगी आतमध्ये प्रवेश करती झाली. तिच्या पाठोपाठ अजून एक मुलगी आली. ती परी होती.
अनुला चिंगीला बघताच खूप आनंद झाला व तो उडी मारून पुढे आला पण परीला बघताच थबकला.
"ओळखलं नाहीस का? ही परी- त्या नवीन घरात रहायला आली आहे-", चिंगीनं intro सुरू केला.
"माहितीये मला. पण तू बोलूच नकोस माझ्याशी", असं म्हणून रागावून पाठ वळवली अनुने.
"रागावू नकोस ना. आता आल्ये ना मी?", इति चिंगी.
"आलीस तर आता येतेयस? मला बरं नव्हतं किती काल? आणि शाळा किती बुडली तुझी!", अनु चिडलेलाच होता.
"ए कालच येऊन गेले मी. स्वतः झोपून होतास वर मला म्हणतोस?", आता चिंगीनं पण चिडून दाखवताच अनुचा सूर खाली आला.
"बरं बरं, पण अनु, तू नक्की काय लिहिलंय चिंगीला?"
नीलूने विचारलं.
"मी सांगते - मुर्ख! अजून आली नाहीये- असंच ना?", चिंगीनं सांगितले.
"अनु! असं लिहितात का?", सुमाने डोळे वटारले.
"ए साॅरी ना. पण आल्याबरोबर आले की नाही मी तुमच्या कडे? आता तरी राग सोड?", चिंगीनं ओशाळला चेहरा केलेल्या अनुला विनवलं.
"परत नाही जाणार ना इतके दिवस तेही मला न सांगता?", अनुने आपल्या terms व conditions पुढे केल्या.
"नाही नाही. पण तू नको रागावू असं. ओके? ही बघ परी आली आहे तुला भेटायला", चिंगीनं भांबावलेल्या परीकडे निर्देश केला तसं सगळ्यांनी तिच्याकडे जणू पहिल्यांदाच पाहिलं. अनु-चिंगीच्या गोड भांडणात सगळे परीला विसरूनच गेले होते.
"हॅलो अनु. मै परी"
असं म्हणून परीने शेकहॅड करायला तिची बाहुली काखेत घालून हात पुढे केला.
अनुने पण भारावलेल्या चेहर्याने हात पुढे केला. पण त्याचा हात लागून परीची बाहुली व एक दोर गुंडाळलेला कागद खाली पडला. चिंगीनं ती उचलून उघडली व तो कागद अनुसमोर धरला.
"हे तूच लिहिलंय ना? अक्षर तुझंच आहे नं?", चिंगीनं विचारलं.
"ये मालीकाका को लाॅनमे मिला था", परी म्हणाली.
"हो हो, मी गेले होते हिच्या कडे बाबांच्या बरोबर. तेव्हा ही चिठ्ठी पाहताबरोबर मी अक्षर ओळखून लग्गेच इकडे आले. तूच न लिहिलंय ते?"
अनुला रात्री त्याने चिठ्ठी फेकल्याचा व चिंगीच्या वडीलांच्या पायात ती अडकल्याचा प्रसंग आठवलं. तो एकदम मागे झाला.
"तू लिहिलंय तर सांग ना तिला. आली आहे ना ती?", चिंगीनं परीला पुढे केलं.
अनु अजून संभ्रमात होता. तो तसाच उभा राहिला. परी पुढे होऊन म्हणाली- "friends?"
अनुचा चेहरा एकदम खुलला व तो पटकन उडी मारून हो हो म्हणाला. त्याचे आविर्भाव पाहून सर्वांनाच हसायला आले.
"पण तिला का बोलावलं घरी ते तर सांग", असं म्हणत चिंगीनं परीला लिहिलेली चिठ्ठी फडकवली समोर.
त्यावर आ मेरे असं लिहून त्याच्या पुढे- एका घराचं चित्र होतं. नंतर चाॅकलेट व ग्लास काढला होता.
"हे रे काय आता?", शोभाताईंनी ते पाहून विचारलं.
"मेरी मम्मी को ऐसा अच्चा चाॅकलेट मिल्शेक आता है बनानेको", अनु घाई घाईत परीला म्हणाला.
"म्हणजे तू माझ्या कडे ये चाॅकलेट मिल्कशेक प्यायला असं होतं का चिठ्ठीत?", नीलूने विचारलं. तिला मोठं कोडं सोडवल्याचा आनंद झाला होता.
"चला सुमाक्का. मिल्कशेक करा!", जयंतानं हसून सुमाला सांगितले. आतापर्यंत ऐकत बसलेला जयंत उठून अनुकडे येऊन म्हणाला- "अनुशेट, आता जर तू नीट लिहायला शिकला नाहीस तर तुझी चिठ्ठी कुणालाच समजणार नाही. आज चिंगीनं वाचल्यावर ती परीला घेऊन आली आपल्या कडे, तेही तिला तू लिहिलेलं समजलं म्हणून! नाही तर कठीण होता पेपर".
"काय मग? रोज सराव करणार ना चिठ्ठी लिहायचा?", शोभाताईंनी हसून विचारलं.
"हो पण-"
"पण काय?"
"मला हिंदी शिकावी लागेल परीसाठी". अनुचा चेहरा बघून परी हसली.
"त्याची काही गरज नाही. मला येते मराठी. माझी आई मराठी आहे".
परीचं बोलणं ऐकून हायसं वाटलं अनुला.

जयंता हसतच फॅक्टरी कडे निघाला. सुमा मिल्कशेक बनवण्यासाठी आत वळली. नीलू, मुग्धा शोभाताईंसाठी फुलं तोडायला गेल्या. शोभाताई पायरीवर बसून मेथी निवडत समाधानाने पेरूच्या झाडाखाली बघत होत्या. तिथं अनु, चिंगी व परी बसून खेळत होते. एक नवी मैत्री आकारास येत होती.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविन, प्रीती
आणि सर्व वाचकांना खूप खूप धन्यवाद!
अगदी सुरुवातीच्या भागापासून तुम्ही सर्वांनी खूप प्रोत्साहन दिले. इथं तसंच मेसेज करून कथा भाग आवडल्याचे कळविले, खूप आभारी आहे.
पुढची कथा.. आहे डोक्यात पण कधी बाहेर येईल सांगता येत नाही Happy लवकरच प्रयत्न करेन _//\\_

खुप सुंदर झाली ही कथा मालिका. अनुचं निरागस विश्व खुप आवडलं. खट्याळ अन् नटखट अनुने सगळ्यांच्या जगात आनंद भरला आहे.