शब्दांशी मैत्री

Submitted by नादिशा on 23 August, 2020 - 06:19

"स्वयम , हे बघ आता तू हा धडा नीट वाचलास किनई, मग आता मला सांग या प्रश्नाचे उत्तर, की नदीशी आपण काय बोललो असतो.. "माझ्या चौथी मधल्या मुलाचा मी अभ्यास घेत होते, पण माझे मन भूतकाळात गेले होते. ते पोचले होते, अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या काळामध्ये.

सात -आठ वर्षांची मी पुस्तक वाचत होते आणि माझे पपा तेव्हाच्या मला सांगत होते, "तायडे, आज मी संध्याकाळी जेव्हा घरी येईन ना, तेव्हा मला तू ही गोष्ट सांगायची बरंका, नीट वाचून ठेव. "

आम्ही तेव्हा उस्मानाबाद ला राहायचो आणि पपा तुळजापूरला कॉलेज मध्ये प्राध्यापक होते. ते रोज येऊन जाऊन करायचे.सकाळी लवकर जायचे, ते संध्याकाळी घरी परत यायचे . रोज दिवसभरात मी गोष्ट वाचायची आणि संध्याकाळी पपा फ्रेश झाले, की ते चहा घेत असताना त्यांना ती गोष्ट सांगायची, असा नेहमीचाच शिरस्ता होता.

अक्षरांशी माझी ओळख कधी झाली, वाचनाची गोडी कशी लागली, याबद्दलचे तपशील काही आठवत नाहीत मला. पण एवढे लक्षात आहे, की आईनेच घरी मला लिहायला -वाचायला शिकवले होते. मी बालवाडीमध्ये गेलेच नव्हते, बालवाडीची माझी तयारी आईने घरीच करून घेतली होती, त्यामुळे मला पहिलीमध्ये ऍडमिशन मिळाली होती माझी तयारी पाहून.

यातच केव्हातरी वाचनाची आवड लागली असावी. मला ठळकपणे आठवणारी त्याबाबतीतली आठवण हीच आहे, वर सांगितलेली. रोज पपांना मी गोष्ट सांगायचे, ही.हा क्रम तिथून पपांची बदली होऊन आम्ही पाटणला येईपर्यंत असाच चालू होता. पण पपांनी घालून दिलेल्या या प्रेमळ नियमामुळे मला एवढ्या लहान वयातच कॉमप्रीहेन्शन या शब्दाशी ओळख झाली होती. गोष्ट वाचून नाही दाखवायची ना, तर सांगायची. त्यासाठी पहिल्यांदा ती स्वतः ला समजली पाहिजे, तर च नेमके काय घडते गोष्टींमध्ये, हे आपण समोरच्याला सांगू शकतो. त्यासाठी लिखाणासाठी वापरलेल्या काही अनावश्यक गोष्टी बाजूला करून नेमका गाभा समजून घ्यावा लागतो आणि तोच इतरांना सांगावा लागतो. नेमके हेच मला एवढ्या लहान वयामध्ये जमू लागले होते.

आणि त्याचा फायदा मला अभ्यासाच्या बाबतीत खूप झाला. पुढच्या सर्व वर्गात मराठी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र , विज्ञान या विषयांत प्रश्नांची उत्तरे लिहिताना मला कधीच अडचण आली नाही.चौथी पर्यंत पपा माझा अभ्यास पाहायचे, मी काय उत्तरे लिहिली, हे वाचायचे.आवश्यक तिथे दुरुस्ती सुचवायचे.धडा पूर्ण वाचायचा, त्यात काय शिकवले आहे, हे नीट समजून घ्यायचे आणि आपल्या भाषेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची, असे त्यांनी मला शिकवले होते.ती सवय मला कायमसाठी उपयोगी पडली. त्यामुळे धड्यामधल्या ओळी जशाच्या तशा माझ्या प्रश्न च्या उत्तरात कधीच आल्या नाहीत. आणि गाईड च्या कुबड्यांची मला कधीच गरज भासली नाही. कुबड्या हा त्यांचाच शब्द. ते म्हणायचे "चालायला येते ना आपल्याला, मग कुबड्या कशाला घेऊ आपण, बरोबर ना? मग तसेच स्वतः ची बुद्धि आहे ना आपल्याला, मग गाईड्स कशाला हवीत? त्या पण कुबड्याच झाल्या की. कुणीतरी आयती दिलेली उत्तरे. कशाला घ्यायच्या आपण त्या कुबड्या? एकदा नाही समजले, तर दोनदा वाच, तीनदा वाच, त्या धड्याशी अगदी मैत्री करून टाक, बरोबर समजेल तुला उत्तर.आणि नाहीच आले अगदी, तर मी किंवा आई आहेच की, आम्ही करू तुला मदत. "त्यामुळे आमच्या घरी कधीही कोणत्याही विषयाची गाईड्स आली नाहीत.(नववी मध्ये पहिला नं. आला म्हणून नवनीत चा पूर्ण सेट मला बक्षीस मिळाला होता. मी तो दुसऱ्याच दिवशी वर्गातील एका गरीब मुलीला देऊन टाकला होता. )पाचवी पासून माझी मी अभ्यास करू लागले, तरी मला कधी गाईड ची गरज भासली नाही.

गोष्ट सांगता येण्याच्या या सवयीचा उपयोग वक्तृत्व कलेमध्ये झाला. शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा भरत. भाषण -निबंध स्पर्धेत पपा मला भाग घ्यायला लावत. चौथी पर्यंत आई /पपा कुणीतरी मला भाषण -निबंध लिहून द्यायचे.मग मला पपा सांगायचे, "हे बघ तायडे, हे भाषण तू वाच, समजून घे आणि तुझ्या भाषेत म्हण.अर्थ तोच आला पाहिजे,कायकाय मुद्दे आहेत यामध्ये लक्षात ठेव, मग बाकी भाषा बदलली तरी चालेल." मी तसेच करायचे आणि स्पर्धेत सादर करायचे, नंबर मिळवायचे.इतर मुलांसारखे मला भाषण -निबंध पाठ करायची सवय नाही लागली आणि त्यामुळे मध्येच एखादा मुद्दा विसरला, तर पुढची साखळी विस्कटून जाते, काहीच आठवत नाही, हा दुर्दैवी प्रसंग पण माझ्यावर कधी ओढवला नाही.

दुसरीमध्ये गेल्यापासून वर्तमानपत्र वाचायची सवय लावली आईने मला.घरात माझ्यापेक्षा छोट्या दोन बहिणी असल्याने आई सतत कामात गुंतलेली असायची. आई मला म्हणायची, "तायडे, मला वाचून दाखव ना जरा पेपर, आज खूप काम होते . वेळच नाही मिळाला बघ मला. "मग मी तिचे काम चालू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा पेपर तिला वाचून दाखवायचे. त्यामुळे जोडशब्द, उच्चरायला कठीण शब्द मला लीलया वाचता येऊ लागले दुसरीत असतानाच. आता खरेच तिला वेळ नसायचा, की गोड बोलून मला वाचायला लावायची तीची क्लुप्ती असायची ती, हा प्रश्न आता मला पडतो.

लिहायला शिकल्यापासून ते पाचवी मध्ये जाईपर्यंत रोज एक पान शुद्धलेखन लिहिण्याचा पपांचा दुसरा एक नियम माझ्यासाठी होता. त्यात कधीच खंड पडला नाही. शाळा असो, सुटी असो, रोज एक पान लिहायचे म्हणजे लिहायचेच. तेही मनापासून, अगदी सुवाच्य अक्षरात आणि शुद्धलेखन सुद्धा अचूक असले पाहिजे. तसे नसेल, तर पपा परत एक पान लिहायला लावायचे.एकही दिवस यात सुटी नाही, गावाला जर गेलो, तरच सुट्टी . (तेव्हाही नकळत आमचा अभ्यास चालूच असायचा.एस. टी .स्टॅन्ड वर असताना कोणकोणत्या गाड्या येत आहेत, ते बोर्ड वाचून आईपपाना सांगायचे, गाडीत बसल्यावर दिसणाऱ्या दुकानांची, गावांची नावे वाचून सांगायची...
( तो खेळ आता मी माझ्या मुलाबरोबर सुद्धा खेळते. सांग बरे,"अक्षता हार्डवेअर कुठे लिहिलेय?"त्याने कारच्या डावीकडच्या -उजवीकडच्या खिडकीतून पटकन पाहून दाखवायचे मला. मग तो जिंकला. मग त्याने विचारायचे मला. कधी दुकानांचे बोर्ड , कधी पाठीमागून येणाऱ्या एस. टी .चा बोर्ड , कधी समोरच्या ट्रक च्या बॅक साईड ला लिहिलेली गाण्याची ओळ, शेजारून जाणाऱ्या कारच्या पाठीमागच्या काचेवर लिहिलेली कुणाकुणाची नावे.. काहीही विचारू शकतो आपण. यामुळे स्पीड ने वाचायची प्रॅक्टिस होऊन जाते नकळत.)
"रोज जेवतो ना आपण,रोज खाऊ खातेस ना तू, का एखादे दिवशी नाही खाल्ले तर चालेल तुला?मग तसेच हेही रोज झालेच पाहिजे. तेवढीच आवश्यक गोष्ट आहे ही ", पपा सांगायचे. त्यावेळी शाळेच्या अभ्यासाबरोबर हा एक्सट्रा अभ्यास करताना मला जीवावर यायचे, मनातून कधीकधी खूप राग यायचा त्यांचा, पण पपा खूप रागीट होते तेव्हा, त्यामुळे मार खायचा नसेल, तर इलाज च नव्हता, गुपचूप लिहिण्याशिवाय.

पण याच त्यांच्या अट्टाहासामुळे माझे अक्षर सुवाच्य - सुबक बनले, कधी न, कधी ण वापरायचा, कधी श, कधी ष वापरायचा, पहिली -दुसरी वेलांटी, पहिले - दुसरे उकार कधी वापरलेल्या असतात, लक्षात राहिले, यथावकाश त्यांनी मला शुद्धलेखनाचे नियम शिकवलेच ,पण त्यापूर्वीच माझी नजर तयार झालेली होती शुद्ध -अशुद्ध ओळखण्याएवढी.पट्टीच्या गाणाऱ्याला कसा एखादा सूर कणसूर लागला, की लगेच कानाला खटकते, तसे मलाही भात खाताना दाताखाली खडा यावा, तशा शुद्धलेखनामधल्या चुका खटकायच्या, चटकन लक्षात यायच्या. त्यामुळे निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धांमध्ये मी सहज नंबर मिळवायचे.

पाचवी मध्ये गेल्यापासून आईपपानी मला रेड़ीमेड भाषण - निबंध लिहून देणे बंद केले.स्पर्धांचे विषय जाहीर झाले, की पपा मला विचारायचे, "तुला कुठला विषय आवडला?" मी सांगायचे. मग ते मला लायब्ररी मधून त्या विषयावरची पुस्तके आणून द्यायचे. मी ती वाचायची, त्यातून महत्वाचे पॉईंट काढायचे, एका कागदावर लिहून काढायचे आणि मग भाषण बनवायचे. मग त्यांना दाखवायचे.ते वाचून पाहायचे,भाषणासाठी वेळ किती आहे, निबंधाला किती शब्दमर्यादा आहे, त्यानुसार ते लांबी कमी करायचे, अनावश्यक गोष्टी काढून टाकायचे. उदा.लहान असताना स्पर्धांचे विषय थोर संत, समाजसुधारक, नेते असेच असायचे. मग पपा सांगायचे, "ते कुठे जन्मले, कधी जन्मले, आईवडिलांची नावे काय, हे सर्वांना माहिती असते, आणि नसले जरी माहिती समजा कुणाला, तरी ते एवढे महत्वाचे नसते. कारण त्यामुळे हे लोकं मोठे झालेले नाहीत किनई. ते मोठे झालेत त्यांच्या कामामुळे. मग ते नेमके कोणते काम, ज्याने ते मोठे झालेत, ते प्रामुख्याने आपल्या भाषणात -निबंधात आले पाहिजे. "

हळूहळू मला त्यांची तेवढीही मदत लागेनाशी झाली. मी अगदी तरबेज झाले. भाषण -निबंध तयार करण्यात.नंतर नंतर तर अगदी आयत्या वेळी विषय हातात पडूनही चुटकीसरशी मनातल्या मनात तयारी करून मी वादविवाद, वक्तृत्व, निबंध स्पर्धेत मी नंबर मिळवला आहे. याच संबंधातील एक किस्सा आठवतो. मराठी च्या शिक्षक गृहपाठ म्हणून एखाद्या विषयावर निबंध लिहायला सांगतात ना,माझा निबंध तर हसतहसत लिहून व्हायचा.माझ्या काही मैत्रिणींनी लिहिला नसेल, तर त्या माझी मदत मागायच्या .मला मस्का मारायच्या. मला ते खाद्य वाटायचे माझ्या बुद्धीला. मग मी त्यांना सगळ्यांना निबंध तयार करून द्यायचे, पण तेही वेगवेगला.एकीचा निबंध दुसरीसारखा नाही. प्रत्येकीच्या निबंधाची भाषा, त्यात वापरलेल्या सयुक्तिक , समर्पक काव्यपंक्ती/सुभाषिते सगळे वेगवेगळे असणार.त्यामुळे मैत्रिणी अगदी खुश असायच्या माझ्यावर.

सुभाषितावरून आठवले, आमच्याकडे संस्कृत मराठी सुभाषितमाला नावाचे पुस्तक होते,त्यामध्ये शंभर एक संस्कृत सुभाषिते विग्रह आणि मराठी अर्थासहित दिलेली होती. पपा आणि मी रोज सकाळी त्यातील एक सुभाषित वाचायचो , ते दिवसभरात पाठ करायचे आणि संध्याकाळी न पाहता म्हणून दाखवायचे, अशी आम्हा दोघांची स्पर्धा असे. बहुतेक वेळा मीच जिंकायचे.पपा पडल्या चेहऱ्याने म्हणायचे, "किती वेळा पाठ केले, खूप प्रयत्न केला, पण झालेच नाही बघ माझे पाठ. तायडे, तू हुशार आहेस हं . तुझे बरे पाठ झाले, अवघड होते खूप." पपांच्या या मी केलेल्या पराभवामुळे मला अजूनच हुरूप यायचा उद्याचे सुभाषित पाठ करायला. आणि मग बघताबघता ती संपूर्ण सुभाषितमाला माझी पाठ होऊन गेली होती.

शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त पपा मला वेगवेगळी पुस्तके आणून द्यायचे वाचायला.सिहासन बत्तीशी , पंचतंत्र, रामायण, महाभारत,विक्रमवेताळ,अरबी भाषेतील गोष्टी, देश विदेशातील बालकथा, बालकविता , बरीच पुस्तके वाचली. चांदोबा -चंपकची तर वार्षिक वर्गणी भरलेली असल्याने ती दर महिन्याला घरीच यायची.ह्या बालकथा -कविता वाचतावाचता मग सानेगुरुजी यांचे सुधास पत्रे, चाचा नेहरू यांचे इंदिरेस पत्रे करत ललित लेखन, कथा, प्रवासवर्णन , विनोदी कथा...पपा खूप पुस्तके आणून द्यायचे.घरात आई -पपा -मी तिघांनाही वाचनाची आवड. त्यामुळे वाचलेल्या भागावर चर्चाही व्हायच्या. सानेगुरुजी यांची पुस्तके वाचून आई आणि मी दोघी खूप रडायचो.तर चिं. वि . जोशी , द.मा.मिरासदार यांचे विनोद वाचून हसून हसून पोट दुखेपर्यंत हसायचो , नंतरही एकमेकींना आठवण करून द्यायचो त्यातल्या प्रसंगाची आणि डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायचो.
दिवाळीमध्ये दिवाळी अंकांची मेजवानी असायची. कित्ती दिवाळी अंक मिळायचे !हा वाचू, का तो, कधी हा संपतो आणि तो हातात घेतो, असे होऊन जायचे अगदी.

या सगळयांचा फायदा असा झाला, की पपांच्या बदलीच्या नोकरीमुळे, खेडेगावात राहत असूनही भाषा शुद्ध बनली, वैचारिक समृद्धी लाभली , शब्द संग्रह वाढला, जिभेच्या टोकावर अनेक कविता, सुभाषिते, मोठ्यांची वचने असल्याने भाषाप्रभुत्व लाभले. जनमाणसात वावरण्याचा आत्मविश्वास मिळाला.पुस्तकातील उतारेच्या उतारे मुखोद्गत असायचे माझे. वाचताना आवडलेल्या कविता, मोठ्यांची उधृते , अलंकारिक भाषा, अर्थपूर्ण ओळी सर्व डायरी मध्ये लिहून ठेवायची सवय होती मला, आवडलेल्या पुस्तकातील पॅराग्राफ च्या पॅराग्राफ लिहीलेले असायचे मी.दरवर्षी एक तरी डायरी भरायचीच. अशा कितीतरी डायऱ्या जमल्या होत्या माझ्या. पण त्या माझ्या सगळ्यां डायऱ्या आईपपांनी पण जपल्या होत्या - सांभाळल्या होत्या, किती हा पसारा म्हणून त्यांना रद्दीची वाट नाही दाखवली कधी. त्यांचा उपयोग मला स्पर्धांची तयारी करताना व्हायचा. अजूनही त्या डायऱ्या आहेत माझ्याजवळ. नंतरच्या काळात निराशेचे काही प्रसंग आले, की मी त्या काढून वाचत बसायचे. निराशेची सावली दूर होऊन नवी उमेद मिळायची त्यांच्या वाचनाने मला.

पपांच्या बदल्यांमुळे शाळा बदलल्या जायच्या माझ्या, त्यामुळे मैत्रिणी बनवायला वेळही कधी कधी मिळायचा नाही ,पण पुस्तकांशी मैत्री असल्याने एकटे वाटायचे नाही.आणि एखाद्या ठिकाणी राहायला मिळालेच जास्त दिवस, तरी पुस्तकांशी नाते इतके घट्ट होते, की बाकी कुणाकडे लक्ष च जायचे नाही.

वर्तमानपत्रात रोज येणारे शब्दकोडे सोडवायला आई -मी -पपा तिघांना आवडायचे. आपल्याला कोडे सोडवायला मिळावं , म्हणून मग मी टपून राहायचे पेपर यायची वाट पाहत. शब्दकोडे सोडवण्याची तेव्हा लागलेली सवय आजपर्यंत टिकून आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या वाचनात बहुधा तोचतोचपणा असतो, म्हणजे मुले शाळेत गेल्यावर गोष्टीची पुस्तके वाचतील, कॉलेज मध्ये गेल्यावर कादंबऱ्या वाचतील. तसे माझ्याबाबतीत नव्हते.पपा मला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आणून द्यायचे. कथा, कादंबऱ्या, चरित्रे , आत्मचरित्रे , प्रवासवर्णने , काव्य संग्रह, विनोदी, वैचारिक , ऐतिहासिक अगदी तुकाराम महाराजांची गाथा , रामदास महाराजांचे दासबोध सुद्धा वाचायचो आम्ही . त्यामुळे माझ्या वाचनात एकसूत्रीपणा आला नाही, त्यांनी जाणीवपूर्वक तो येऊ दिला नाही.माझ्याबाबतीत वाचायला काहीतरी हवे आहे, एवढीच महत्वाची गोष्ट असायची, मग वाचायला काहीही चालायचे.
माझा स्वभाव शांत होता, अगदी दवाखाना चालू करेपर्यंत मला कुणाशी खूप गप्पा मारायची, बडबड करायची सवय नव्हती. त्यामुळे आईपपांनी कुणा मित्रमंडळींकडे , नातेवाईक कडे नेले त्यांच्याबरोबर, की थोडे बोलणे झाले, की माझा संवाद संपायचा . मग तिथे वाचायला काही सापडते का, याचा मी शोध घेऊ लागायचे, काहीतरी पाहिजे, मग अगदी रद्दी मधले काही सापडले, तरी माझी स्वारी खुश होऊन जायची. मग आईपपांच्या गप्पा संपेपर्यंत तिथला एक कोपरा धरून मी गुंग होऊन जायचे वाचनात. ते निघताना त्यांची हाक ऐकूनच भानावर यायचे.

उत्तम उत्तम दर्जेदार पुस्तके ते मला आणून द्यायचे. बारावी पास होईपर्यंत माझ्यासाठी चोखंदळपणे पुस्तके तेच आणून द्यायचे. आता मला उत्तम -दर्जेदार -सवंग-सुमार वगैरे कळायला लागलेय, याची त्यांना खात्री पटल्यावरच त्यांनी मला स्वतः पुस्तके खरेदी करायची, लायब्ररी मधून हवी ती पुस्तकं आणायची मुभा दिली.तरीही सुरुवातीला काही दिवस मी काय वाचते आहे, यावर त्यांचे लक्ष असेच. एकदा खात्री पटल्यावर मात्र मग त्यांनी विश्वासाने मला वाचनाच्या दालनात मुक्तपणे मुशाफिरी करण्यास मोकळे सोडले.

खूप दुर्मिळ पुस्तकांचा त्यांच्याकडे संग्रह होता.पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया पासून शेक्सपिअर , शेली, किट्स, बायरन च्या कविता, चेकॉव्ह च्या कथा पासून, ट्रेन टू पाकिस्तान, भीष्म सहानींचे तमस..कुणालाही वाचनाला प्रोत्साहन देण्याच्या स्वभावामुळे त्यातील खूप पुस्तके गहाळ झाली, ज्यांनी वाचायला नेली, त्यानी ती परत केलीच नाहीत.

इंग्लिश मधली शॉर्ट स्टोरी ची पुस्तके मला वाचायला लावून त्यांनी इंग्लिश वाचनाची पण सवय लावली होती मला.बऱ्यापैकी वाचू लागलेही होते मी. पण सतत डिक्शनरी घेऊन बसायचा मला कंटाळा यायचा, त्यामुळे मी इंग्लिश वाचनात फार रमले नाही.

सतत वाचत राहण्याच्या या सवयीमुळे माझा वाचनाचा वेग वाढला. एकेक पुस्तक एका दिवसात वाचून व्हायचे सहज. ज्या ज्या ठिकाणी पपांच्या बदल्या होत, तिथल्या लायब्ररी मधील माझ्या वयोगटातील सगळीच्या सगळी पुस्तकं मी वाचलेली असत.एकदा हातात पुस्तक घेतले, की वाचून झाल्याशिवाय खाली ठेवायचं नाही. तासाला शंभर पाने सहज वाचायचे मी, आज ही वाचते. पपा संध्याकाळी घरी आले, की त्यांच्यापुढं वाचलेले पुस्तक ठेवून उद्या दुसरे पुस्तक हवे असल्याची मागणी करून रिकामी !

आईपपांनी माझ्या हातात दिलेला वाचनाचा हात कधीच सुटला नाही. आजही दिवसभरात काही वाचले नाही, तर रात्री शांत झोप लागत नाही, चुकल्याचुकल्यासारखे वाटते. कायम माझ्या पर्स मध्ये एकतरी पुस्तक असतेच. त्यामुले एस. टी .स्टॅन्ड वर बसची वाट पाहताना, मुलाला शाळेतून आणायला गेले तर शाळा सुटेपर्यंत , दवाखान्यामध्ये पेशंट नसताना, कधीही थोडा मोकळा वेळ मिळाला, की पुस्तक काढायचे पर्समधून आणि वाचत बसायचे. वेळ वाया जायला नको, मोबाईल च्या आहारी जायला नको, गॉसिपिंग पण नको.

वाचनातून मिळालेल्या या शब्दसंपत्तीचा , भाषा सौन्दर्याचा , ज्ञानाचा सर्वात जास्त उपयोग मला पीएच.डी.करताना झाला.

वैद्यकीय व्यवसाय करत असतानाही केवळ साहित्यावरच्या प्रेमापोटी मी शिवाजी युनिव्हर्सिटी ची प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होऊन रीतसर एम. ए .ला ऍडमिशन घेतले. डिस्टिंक्शन मिळवून एम. ए .झाले.एम. फिल.चे पेपर्स दिले, त्यातही एक्सट्रा ऑर्डीनरी क्लास (ओ +)मिळवला आणि फक्त दीड वर्षात संशोधन पूर्ण करून पीएच. डी . पदवी मिळवली.या सगळ्याचे श्रेय माझ्या वाचनाला जाते.

ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरु, पुस्तकंच माणसाचे सर्वात जवळचे मित्र असतात, हे मी आयुष्याच्या सर्व टप्प्यावर अनुभवले आहे.माझ्या मुलाशीही त्यांची मैत्री जुळवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. तो वर्षाचा झाल्यापासून त्याला रोज झोपताना एक गोष्ट सांगणे, बडबडगीते पाठ करून घेणे, मग थोडा मोठा झाल्यावर खूप चित्रे असलेली गोष्टींची पुस्तके त्याला वाचून दाखवायचे. जेणेकरून त्याला वाचता नाही आले, तरी चित्रे पाहण्यासाठी का होईना, पण तो पुस्तके चालेल, त्यांचा स्पर्श, गंध अनुभवेल .आणि आता जर तो मोठा झालाय तर रोज एक पान अवांतर वाचन आणि शुद्धलेखन लिहिण्याचा आग्रह , तिघे मिळून एखाद्या पुस्तकाचे अभिवाचन करणे, त्याच्याशी मुलामुलींच्या नावांच्या, गावांच्या नावांच्या , म्हणी -वाक्यप्रचार यांच्या भेंड्या खेळणे, अशा वेगवेगळया आयडिया करत राहते. (ही भेंड्याची आयडिया पण आईचीच .ती स्वतःची कामे करताकरता आमच्याशी अशा भेंड्या खेळायची.)

कळत नकळत आईपपांनी माझ्यावर जे काही वाचनसंस्कार केले, त्यांनी खऱ्या अर्थाने मला चांगले मन कमावता आले, चांगल्या -वाईटामधला फरक समजला, माझ्या माझ्या पातळीवर, माझ्या आवाक्यात असणारी तत्वनिष्ठ जीवनप्रणाली अंगिकारता आली, आपण पोटभर जेवत असताना किमान चार घास भुकेल्यांसाठी काढून ठेवावे, ही जाणीव सतत मनात जागती ठेवली, कृतीत आणायला भाग पाडले, चांगला माणूस बनण्याकडे माझा प्रवास चालू ठेवला. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी खूप खूप कृतज्ञता आहे !आणि त्यांच्या नातवाचीही शब्दांशी घट्ट नाते जोडून मी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा अंशतः प्रयत्न करते आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुरेख लिहिले आहे. तुमचे आईवडील फारच भारी. किती जाणीवपूर्वक वाढवले तुम्हाला.
तुमच्या पुढच्या पिढीकडेही हा वारसा जावो या शुभेच्छा.
या लेखातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. धन्यवाद.

धन्यवाद पीनी.
मुळात या लेखाचा हेतू हाच होता, की वाचनाचे महत्त्व सर्वांना समजावे. आणि छोट्या छोट्या आयडिया वापरून आपण मुलांना हळूहळू वाचनाची सवय लावू शकतो. यापुढचा काळ खूप कठीण आहे. पावलोपावली ईर्ष्या, मोह, निरनिराळी आव्हाने यांना तोंड द्यावे लागणार आहे आपल्या पुढच्या पिढीला. त्यामुळे शब्दांशी त्यांची मैत्री होणे जास्त गरजेचे आहे. तेच खरे मित्र, वाटाडे, गुरु बनून सदैव साथ देऊ शकतात, योग्य मार्गावरून चालण्याची प्रेरणा देऊ शकतात .
तुम्हाला विनंती आहे, की जर तुम्हाला आवडला असेल हा लेख आणि सर्वांना फायदेशीर ठरेल असे वाटत असेल, तर तुमच्या परिचितांनाही हा लेख वाचायला जरूर सांगा.