प्रतिसाद

Submitted by विनायक पेडणेकर on 9 August, 2020 - 01:16

आमच्या ठाण्याच्या घराच्या खिडकीत बसून, वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत बसायला मला फार म्हणजे फारच आवडतं. सोबतीला एखादं छानसं पुस्तक किंव्हा ताजं वृत्तपत्र. मधून मधून बाहेर नजर टाकत असं चहा पिण्यातली गंम्मत काही औरच. माझी निवांतपणाची ती व्याख्या आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यात बाहेर पाऊस पडत असेल तर काही विचारायलाच नको.

आजही अशीच एक शनिवारची सकाळ आहे. बाहेर पाऊस मी म्हणतोय आणि मी हातात गरमागरम चहाचा कप घेऊन बसलोय. काँक्रीट, पत्रे आणि ताडपत्रीवर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाची, इमारती आणि झाडं ह्यांतून धसमुसळेपणाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाची, खाली पडून खळखळत वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाची अशी सगळ्यांची मिळून एक मस्त सिंफनी ऐकू येतेय. आणि मी शांत बसून निसर्गाच्या ह्या काहीश्या अतिपरिचयेत अवज्ञा झालेल्या चमत्काराचा साक्षी होतोय.

समोरच्या बैठ्या गॅरेजच्या छतावर मातकट पाण्याचं एक छोटंसं तळं साचलंय. झाडाच्या खाली असल्याने त्यात पाऊस थेट पडत नाहीये. पण झाडाच्या पानांपानांतून ओघळत, घरंगळत काही थेंब त्यात पोहोचताहेत. आणि गंमत म्हणजे त्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाची ते तळ्यातलं पाणी अगदी आवर्जुन दखल घेतंय. एक वलय बनवून. ते वलय विस्तारत जातं. तळ्याच्या परिघापर्यंत. आणि मग विरून जातं. कोणतीही खुण मागे न ठेवता. जणू काही झालंच नव्हतं. आणखी काही थेंब पडतात. पुन्हा काही वलये. त्यातील काही एकमेकांना छेदणारी. अखेर विरून जाणारी. हे सुरूच राहतं.

मला खरंच कमाल वाटते पाण्याच्या इतक्या समंजस वागण्याची. कसं काय जमत असेल त्याला इतका नेमका आणि पुरेसा प्रतिसाद देणं. प्रत्येक वेळी. तसूभर जास्त नाही की कमी नाही. थोडाफार काही फरक असलाच तर तो थेंबाच्या आकारामुळे कदाचित. पण पाण्याचा ओढा ह्या प्रत्येक बदलाला सामावून घेऊन चटकन शांत होण्याकडेच.

मला प्रश्न पडतो. कुठून येत असेल हे शहाणपण पाण्याकडे? कदाचित हजारो वर्षांच्या अनुभवाने शिकवलं असेल त्याला. आपल्याला जमेल असं समंजसपणे रिऍक्ट व्हायला? एखाद्या प्रसंगाला किंव्हा बदलाला त्याच्या मेरिट प्रमाणे प्रतिसाद द्यायला? खरंतर जमायला हवं. विचार करायला भाग पाडलं खरं त्या लहानश्या तळ्याने.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अय्या किती वेगळाच विचार! मस्त लिहीलंयत तुम्ही. खरंच जमायला हवं नेमका प्रतिसाद देणं.
मला स्वतःला मायबोलीवर लेख, गोष्टी जेवढ्या आवडतात त्याच्या बरोबरीने सगळ्यांचे प्रतिसाद वाचायला आवडतात. प्रतिसाद वाचून तो कोणी दिला असेल ह्याचा अंदाज लावते आणि मग नाव बघते! बरेचदा बरोबर येतं.

पाण्याला जमतं कारण ते सॉलिड नाही, सहजपणे बाजूला सरुन दुसऱ्या गोष्टींना जागा करुन देते, जे सामावता येईल ते सामावून घेते , सामावता येत नसेल तर आपण तेथून दूर जाते.