कुडीचे ऐनवेळी चांदणे होते

Submitted by 'स्वच्छंदी on 9 July, 2020 - 01:18

कुडीचे ऐनवेळी चांदणे होते
- महेश मोरे (स्वच्छंदी)

तुझ्या दारात जेव्हा थांबणे होते
बिचारे मन पुन्हा वेडेपिसे होते

तुझ्या डोळ्यांत केवळ पाहतो मी अन्
जगाला वाटते की बोलणे होते

बदलली वाट नाही आजसुद्धा मी
दिशेवर प्रेम माझे आंधळे होते

कुठे हे राहते ताब्यात माझ्या मन ?
तुझ्यापासून जेव्हा वेगळे होते

तुझ्या हातात माझा हात असला की
कळत नाही किती हे चालणे होते

हृदय माझे तसे माझेच आहे पण
तुझ्या नजरेस पडले की तुझे होते

उभे आयुष्य विणले काल दोघांनी
कसे मग आज हे माझे-तुझे होते ?

फुले फुलतात तुझिया फक्त स्पर्शाने
कुडीचे ऐनवेळी चांदणे होते

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ! छान. लिहिते राहा.

तुझ्या डोळ्यांत केवळ पाहतो मी अन्
जगाला वाटते की बोलणे होते

आवडले.

-दिलीप बिरुटे

वाह