कॉफी विथ अनामिका

Submitted by ध्येयवेडा on 26 June, 2020 - 05:22

एक काळ होता तेव्हा मी "मनोगत" वर पडीक असायचो. आयटी मधील नवी नोकरी आणि इंटरनेटची सुविधा. ऑनलाईन वाचन हि संकल्पना माझ्यासाठी नवीन होती. मला मजा यायची ऑनलाईन वाचायला. सतत काही छान वाचायला मिळतंय का ते बघायचं.
छान म्हणज, जे मला छान वाटतं ते.

असंच एकदा चाळत असताना तुझी 'कॉफी' दिसली. म्हटलं बघूया कशी वाटतीये !
कॉफी हा प्रकारच वेगळा आहे. कॉफी म्हंटलं कि येतं प्रेम आणि सोबतच विरह सुद्धा !
कॉफीचा कडवटपणा जितका जास्ती, तितकी तिची नशा जास्ती !
तुझी 'कॉफी' वाचताना अगदी असंच काहीसं वाटलं.

एखादा लेख आवडला की त्या लेखकाच्या इतर लिखाणावर नजर टाकायची माझी सवय.
'अनामिका'.
ह्याच नावानं लिहितेस ना तू?
एका टिचकी सरशी तुझं सगळं लेखन माझ्यासमोर आलं.
बरंच लिहून ठेवलं आहेस की !
मग काय. प्रवास सुरू झाला. तुझ्या कथा-कविता-चारोळ्या वाचून काढायचा.
तुझी एक एक कथा वाचायला लागलो.

कसं काय इतकं मस्त शब्दांकन जमतं ग तुला? असं वाटतं ती कथा, त्यातील प्रसंग; आपल्याच भोवती घडतोय.
आजूबाजूला घडणाऱ्या लहान सहान गोष्टीसुद्धा किती सहज मांडल्या आहेस. मनाचे कोनाडे किती छान शब्दांकित केले आहेस !
एखाद्या लिखाणात प्रेमभंग, तर कधी मैत्रीमध्ये ताटातूट ! कधी कोणाला जुनं प्रेम पुन्हा मिळालं, तर कधी कोणी प्रेम व्यक्तच करू शकला नाही !
असं खरंच घडतं का प्रत्येकाच्या आयुष्यात? काय माहित, घडतही असावं?
कथेतील पात्रांच्या सुख-दु:खाची झळ माझ्या मनाला बसू लागली. माझ्या नकळत !

तू नक्कीच एखाद्या आयटी कंपनीत कामाला असणार. कारण तुझ्या काही कथा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या, माझ्यासारख्याच 'पात्रांवर' लिहिलेल्या !
एका लेखात तू एक वाक्य लिहिलंयस.
ती त्याला उद्देशून म्हणते "माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. आणि एकांतात, तू सोबत नसतोस तेव्हा ते वाढतंच जातं. :-)"
वाक्य वाचलं आणि खुर्चीतून उठून ताडकन उभा राहिलो. आजूबाजूला एक नजर फिरवली.
मनात म्हटलं "अरे ही अनामिका तर नक्की इथंच आसपास आहे ! माझ्या मनात येणाऱ्या भावना इतक्या तंतोतंत कसं काय लेखनात उतरवू शकते ती? माझ्या आणि हिच्या मनात सेम टू सेम भावना कश्या येऊ शकतात? नक्कीच ओळखून आहेस तू मला"

ह्या पात्रांची निर्मिती ज्यानं केली त्या व्यक्तीविषयी माझं कुतूहल वाढू लागलं.
कोणीतरी म्हटलंय कि जितक्या दुखी मनानी लिखाण कराल, कथा तितकी जास्ती काळजाला भिडेल !
असं वाटू लागलं की लेखातील पात्र हे तुझीच गोष्ट तर सांगत नाहीयेत ना ? आणि मग नकळत त्यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती तुझ्याबद्दलही वाटू लागली.
एकदा ह्या शब्दांमागचा चेहरा बघायचा आहे.
फक्त एकदा. माझ्या कुतूहलासाठी.

पण तू तर 'अनामिका' ! कसं कळणार कोण आहेस?
तुझं शेवटचं लेखनही तू जवळपास तीन वर्षांपूर्वी केलं होतंस !
तुझ्या लेखांवर असंख्य प्रतिक्रिया येऊन पडल्या होत्या, त्यावर उत्तर लिहायलासुद्धा तू फिरकलेली दिसत नाहीस.
तुला मनोगतावर व्यक्तिगत निरोप धाडला ! त्यालाही तुझं उत्तर नाही.
अपेक्षितच होतं.

खरंतर मलाच मनोगतावर यायला उशीरच झाला. कमीत कमी चार वर्ष उशीर ! कारण त्याच काळात मनोगतावर भरपूर प्रमाणात चांगलं लेखन प्रकाशित झालेलं मी बघितलं आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्यांना उत्तरं, किती त्वरित यायची.
अनेक दिवस प्रतीक्षा केली.
तुझे लेख वाचता वाचता अगदी अखेरच्या लेखावर येऊन पोचलो होतो. तुझ्या लेखनाची शिदोरी संपत आल्याची चिंता मनाला सतावू लागली.
टिचकी मारून लेख उघडला. नाव होतं 'नवीन सुरुवात'.
लेख आवडला हे वेगळं काही सांगायला नकोच.
पण आश्चर्य म्हणजे आज खाली तू तुझं नाव लिहिलं होतंस.. Happy

चलातर, तुझं नाव काय आहे हे तरी समजलं !
त्या नावाच्या माझ्या ओळखीतल्या दोन्ही व्यक्ती चटकन डोळ्यासमोरून गेल्या... छे, त्या कसल्या इतकं सुंदर लेखन करतायत !
केवळ तुझ्या नावावरून भरपूर शोध घेतला तुझा. काही फायदा झाला नाही. एका शब्दावरून तुला शोधणार तरी कसं !
तुझे सगळे लेख अनेक वेळेस वाचून झाले. तुला शोधण्याचा नादही सोडून दिला.
मनोगत वर माझं यायचंही कमी झालं. तसंही आजकाल फार कोणी इथे लेखन प्रकाशित करताना दिसत नाही.

जवळपास तीन वर्ष गेली. आज पुन्हा एकदा तुझी 'कॉफी' घेतली. नेहमीसारखीच बहारदार ! कडू... पण हवीहवीशी !
असं वाटलं, बघूया ही अजून कुठे लेखन करतीये का.
तुझ्या एका लेखातलं एक वाक्य गुगल वर टाकलं. तंतोतंत जुळणारा एक धागा मिळाला.
मायबोलीचा !

मग काय, क्षणात मायबोलीचा सदस्य झालो.
सर्च केलं आणि तू सापडलीस !
तुझ्या प्रोफाइलवर, तुझ्या लेखांवर पटापट नजर फिरवली.
'तुझा चाहता' म्हणून नोंदही केली. मायबोलीवर तू नवीन नवीन लेखन करतीयेस हे बघून खूप छान वाटलं.
तुझ्या एका चाहत्यानं अखेर तुला शोधून काढलं !

आता पुढे ?
तुझ्याबद्दलचं कुतूहल, त्या सुंदर कॉफीच्या निर्मीतीला शोधण्याचा ध्यास एका क्षणात संपला.
जे समाधान कॉफी मध्ये होतं, ते मात्र काही मिळालं नाही. आणि आता थोडं वेगळं वाटतंय.
बहुतेक मी त्या कथांमध्ये असणाऱ्या अनामिकेच्या शोधात होतो ! कथेच्या निर्मात्याच्या नव्हे.
इतके दिवस कळलंच नाही मला.
अनामिका आणि प्रत्यक्ष तू ह्या दोन्हीमधला फरक आज समजला.

मी तुझ्या कथांच्या प्रेमात पडलो, त्यात मला जी अनामिका दिसली, ती पुन्हा एकदा तुझ्या लेखांमधून माझ्या भेटीला येईन अशी अपेक्षा आहे.
कॉफीच्या अजून एका घोटाच्या प्रतीक्षेत आहे.

-ध्येयवेडा

(मनोगत वरती पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलय.
लेखनातून आपल्या पर्यंत पोहचणारी व्यक्ती आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती(लेखक) यात जमीन अस्मानाचा फरक असतो. (mostly).

वाचकाला आपल्या लेखनविश्वात गुंतवून ठेवण्याची विद्या खरेच खूप कमी लेखकांकडे असते...
अनामिका पण ग्रेट आणि तुम्ही देखील...

श्रद्धा + 1

प्रत्यक्ष व्यक्ती फार वेगळी असते.
बहुसंख्य वेळा पात्र हे आपल्या न जमलेल्या (स्वतःचे लिमिटेशन्स्/शॉर्ट्कमिंग्ज किंवा परिस्थिती) चे प्रोजेक्शन असू शकतात. लेखन कॅथार्टिकही असते.

पूर्वी हे पान नीट वाचा... हिंट मिळेल.... अनामिका कोण ते...

खरे तर अनामीका कोण ते महत्वाचे नाहीय... प्रत्यक्ष लेखक आणि आपल्याला लिखाणातून भेटणारा लेखक वेगवेगळ्या व्यक्ती असतात हे समजणे महत्वाचे...

@पूर्वी - अनामिका कोण आहे हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली हे ह्या लेखाचं यश म्हणायचं का Happy
@च्रप्स, @मुक्ता - धन्यवाद.