पोळी चपातीची गोष्ट

Submitted by सई केसकर on 7 May, 2020 - 23:45

पोळ्या कशा करायच्या आणि त्या कशा आल्याच पाहिजेत वगैरे सगळे उपदेश मी अनेकांच्या तोंडून लहानपणापासून ऐकत आले आहे. माझे आजोबा आम्हा नातवंडांना गोळा करून त्यांच्या कलेक्टरपणीच्या कथा सांगायचे. त्यात ते चपाती, भाकरी काय पाहिजे ते करून स्वतः कसे खात असत हे ऐकून ऐकून आमचे कान दुखू लागायचे. पण गंमत म्हणजे, आजोबांना मी म्हातारपणी कधीही ओट्यासमोर पोळ्या लाटताना पाहिले नाही. ते काम मामी नाहीतर आजीच करायची. सुदैवाने, आज परिस्थिती बदलते आहे.माझ्याच मित्रयादीत अनेक पुरूष या लॉकडाऊनच्या काळात मस्त मस्त स्वयंपाक करताना दिसताहेत. आणि घरातले कामसुध्दा घरातले लोक वाटून घेतायत.

आमची आजी कणकेची त्रिकोणी घडी घातली की नंतर तिचा गोल अजिबात करायची नाही. तिला बालसुलभ प्रश्न ते सून सुलभ टोमणे सगळे मारून, विचारून झाले होते. पण ती तिच्या त्रिकोणावर ठाम होती. आयुष्यात इतर अनेक अन्याय आजीने सहन केले पण कुणीतरी म्हणालं म्हणून पोळी कधीही गोल केली नाही. पण मामीचा गोल आणि आजीचा त्रिकोण तव्यावर जाऊन मात्र एक सारखे टम्म फुगायचे.

मला पोळी हा प्रकार अगदी परवा परवा, जमायला लागला. पोळीला कितीही काट मारायचा प्रयत्न केला, स्वयंपाकातून हद्दपार करायचा प्रयन्त केला, तरी मऊ मऊ, लुसलुशीत पोळी कधीतरी खावीशी वाटतेच. याचा प्रत्यय मला भारताबाहेर राहताना आला. पोळीच्या ऐवजी टॉरटिया, पिटा ब्रेड, फ्रोझन पराठे वगैरे अनेक प्रकार लोकांना करताना पाहिले. पण पोळीची त्यांना सर नाही. घडीच्या, तेल लावलेल्या पोळ्या आणि कोल्हापूर-कर्नाटक सीमेवरच्या पातळ भाकरी हे दोन प्रकार ज्यांना ज्यांना चांगले जमतात, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.

मराठी पदार्थ शिकण्याची हुकमी जागा म्हणजे मायबोली. मायबोलीवर, जगभरातल्या अनेक स्वयंपाकाची आवड असलेल्या लोकांनी, अतिशय अवघड अवघड पाककृती सोप्या करून लिहिल्या आहेत. राखीपौर्णिमेचा नारळीभात, किंवा पुरणपोळी, या संकेतस्थळावर काही ना काही सिक्रेट टिप्स नेहमीच मिळतात. अशीच एकदा पुरणपोळीची पाककृती शोधताना तिथल्या व्हीबी आयडीने (त्या फेसबुकवर कुणाच्या संपर्कात असतील आणि त्यांची हरकत नसेल तर त्यांना कुणीतरी टॅग करा) रवा मैद्याची पुरणपोळी कशी करायची ते लिहिले होते. ती पाककृती म्हणजे माझ्या पोळीशिक्षणाचा टर्निंग पॉईंट होता असे म्हणता येईल. त्यात किंवा खालील अभिप्रायात असे सांगितले होते की कणीक घट्ट मळून त्यावर तांब्याभर पाणी ओता.आणि तशी तिला पाण्यातच रात्रभर राहूद्या. हे वाचून, मला मी इतरत्र वाचलेल्या अनेक गोष्टींचा अचानक उलगडा झाला. पोळीची मक्खी कणकेत आहे हे माहिती होते. पण कुणी संकटकाळात देव पाण्यात बुडवतो तशी कणीक बुडवत असेल असे कधीच वाटले नव्हते. आणि त्याचवेळी तसे करणे किती भारी आहे हेदेखील लक्षात आले.

पण ती पद्धत वापरून केलेल्या पोळ्या स्वर्गीय लुसलुशीत होतात. यांचं शास्त्रीय कारण म्हणजे ग्लूटेन. मैदा कितीही घातक असला तरीही त्याचे बेकिंग क्षेत्रातले स्थान अढळ आहे. कुणी ज्वारी, बाजरी, नाचणी वापरून कितीही काहीही बेक केलं असलं तरी आधाराला मैदा असतोच. यांचं कारण मैद्यामध्ये, किंवा गव्हामध्ये दोन प्रथिनं सुप्तावस्थेत असतात. ग्लूटेनिन आणि ग्लियाडीन. आपण गव्हाच्या पिठात पाणी मिसळले की ही दोन प्रथिनं जागृतावस्थेत येतात आणि त्यांचं ग्लूटेन तयार होतं. आपण कणीक जितकी मळू तितकं या प्रथिनांमधील क्रॉसलिंकींग वाढतं म्हणजे एकावर एक अशा अनेक जाळ्या तयार होतात आणि त्यामुळे आपल्या कणकेला आकार धरता येऊ लागतो. जेव्हा आपण यीस्ट वापरून मैदा आंबवतो, तेव्हा दोन तीन वेळा कणीक फुगवून मळायची असते. तसें करताना आपण ग्लूटेनचे जाळे वाढवायला मदत करत असतो. आणि या जाळ्यांमधून वाट काढत जेव्हा यीस्टने तयार केलेला कार्बन डायॉक्साईड पळून जातो तेव्हा अपल्याला लुसलुशीत ब्रेड मिळतो.

अर्थात पाणी आणि पिठाच्या जवळीकीमुळे ग्लूटेन तयार होते.जेव्हा आपल्याला स्वतःचा आकार धरणारा पदार्थ बनवायचा असतो (जसे की पोळी किंवा ब्रेड) तेव्हा पाणी आणि पिठाला एकमेकांशी जवळीक करायला आपण जास्त मुभा देतो.म्हणजेच कणकेला पाण्यात बुडवल्याने कणिक इलॅस्टिकही बनते आणि भाजल्यावर चांगला आकार धरू शकते. हेच भाकरी करताना किती त्रेधा तिरपीट होते ते अनुभवी लोक सांगू शकतीलच. भाकरी करण्याचं सगळं कसब ती तव्यावर जाऊन तुटू नये यात असतं. पण पोळीचं तसं नाही.

जसं पिठात पाणी घालून ठेवलं की ते आकार धरू शकतं, या उलट जेव्हा आपल्याला मैद्यापासून सहज तुटणारं, खुसखुशीत असं बिस्कीट बनवायचं असतं तेव्हा ग्लूटेनच्या खूप साखळ्या तयार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, नानकटाई करताना आधी पिठात आपण मोहन घालतो. पाश्चात्य देशांत याला शॉर्टनिंग असं म्हणतात. आधी तूप किंवा बटर घातल्याने आपण पाण्याची आणि पिठाची इंटरॅक्शन कमी करतो. त्यामुळे सहज तुकडा पडेल आणि तरीही खुसखुशीत असं बिस्कीट आपल्या हातात येतं.

तर अशी लुसलुशीत पोळी करायची असेल तर तुम्हाला अपेक्षित पोळ्यांना जेवढी लागेल त्यापेक्षा अर्धी ते पाऊण वाटी कमी पीठ घेऊन त्याची तेल न घालता घट्ट कणीक मळा. आणि ती तास ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवा. मग उरलेले अर्धी वाटी पीठ घालून ती मळून घ्या आणि शेवटी हवं तितकं तेल लावा. ही कणीक सकाळी मळून संध्याकाळी पोळ्या केल्या तर त्या अजून मऊसूत होतात.

आता पोळीबद्दल अगदी ठामपणे म्हणू शकते की चांगली पोळी म्हणजे चांगली कणीक. कणीक चांगली असेल तर पोळी थोडी जाड लाटली तरी छानच लागते. आणि थोडी जास्त भाजली तरी वातड होत नाही. उलट खुसखुशीत लागते. अशा पद्धतीने कणीक मळून पोळ्या केल्या की त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुध्दा मऊ राहतात.

मैदा आणि साखर हे मनुष्याच्या शारीरिक अधोगतीचे कारण आहेत हे मान्य आहे. पण एखादा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून या दोन गोष्टींकडे पाहिले तर माणसाच्या सृजनशीलतेची कमाल वाटते. साखर सुध्दा इतकी रूपं घेऊन येते की तिचा कधीच कंटाळा येत नाही. एक तारी, दोन तारी पाक असो, किंवा टॉर्च वापरून केलेला क्रेम ब्रुले. साखर स्वयंपाकघरातील जादूगारीण आहे. आणि या सगळ्या प्रक्रियांच्या मागे असलेलं रसायनशास्त्र बघितलं की स्वयंपाक करणे म्हणजे प्रयोगशाळेत काम करण्यासारखेच आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच सध्या काम बंद असल्यामुळे स्वयंपाक वाढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत एक छान लेख!
पण मामीचा गोल आणि आजीचा त्रिकोण तव्यावर जाऊन मात्र एक सारखे टम्म फुगायचे.>>>>>>>>>> ४-५ दिवसांच्या प्रयत्नाने,आज चौकोनी पराठा करण्यात यशस्वी झाले.तोही अगदी पूर्ण टम्म झाला नाही तरी पाऊण टम्म झाला,त्यावेळी जाम समाधान मिळालेले.
बाकी पोळ्यांच्या बाबतीत अजून शिकतेच आहे ही स्थिती आहे.

सई, तुझा नवीन लेख पाहून छान वाटले! पोळ्यांबद्दल अगदी अगदी झाले. मलाही आत्ता कुठे बऱ्या पोळ्या जमायला लागल्या आहेत. कणकेच्या बाबतीत आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ही म्हण खरी आहे. आता कणीक पाण्यात ठेवून बघते.

_/\_

स्वयंपाकघरातील विद्न्यान पुस्तकाची आठवण झाली. विदर्भात माठवरचे मांडे करतात. त्याची कणिक अशीच पाण्यात बुडवून ठेवतात व हातावरच त्याचे अगदी पातळ जाळीदार मांडे बनवतात. पोळ्या, फुलके, तेल न घालता मऊसुत होतात. तसेच भाकरी पण!

छान लेख.
साखर स्वयंपाकघरातील जादूगारीण आहे. हो तर.आमच्या घरात तिच्याच जादूच्या कांडीने काहीजणांचं रूप जास्तच बहरून गेलेलं आहे :फिदी :

छान लिहीलय ( सईचा लेख म्हणजे माहिती पूर्ण, खुसखुशीत असणारच)
पोळ्या हि एकच गोष्ट अशी आहे जी मी लग्नाच्या आधीपासून आवडीने करत होते. मला आवडतात पोळ्या करायला कितीही आणि कधीही. कणीक मात्र चांगली हवी, आधी गहू दळून आणून करायचे पण आता देशपांडे जिंदाबाद. उत्तम क्वालिटी चं पिठ असतं. सईने लिहीलय ते बघून vb चा पुपोचा लेख शोधून वाचला. पण मला लिंक देता आली नाही.

छान लेख....पोळ्यांंना पर्याय नाही. माझ्याकडे घडीच्या पोळीला जो मान आहे तो फुलके, नान, पराठा यांना नाही. आई तर सायलेंट तुच्छ कटाक्षाने बघते. मी मुलांना पर्यायी खाऊ घातले तर !
या एवढ्याच पदार्थाबद्दल मला आत्मविश्वास आहे.
आम्ही जेव्हा आजोळी सुट्टीत जायचो. मामा म्हणायचा लेकर खातच नाहीत ( भाचे, पुतने, स्वतःचे मिळून तेरा ) ...अस कित्येक वेळा म्हणाल्यावर मामी म्हणाल्या . अहो रोज शंभर पोळ्या व भाकरी लागतात Lol . ब्रेड, पाव बिस्किटे असे काही नसल्याने पोळ्यांवर तुटून पडायचे लहान मोठे सगळे. धन्य त्या माम्या व आज्या ! माझा वीस पोळ्यात प्राण कंठाशी येतो.

लेख आवडला. रोचक आहे.
.
>>>>>म्हणूनच, नानकटाई करताना आधी पिठात आपण मोहन घालतो. पाश्चात्य देशांत याला शॉर्टनिंग असं म्हणतात. आधी तूप किंवा बटर घातल्याने आपण पाण्याची आणि पिठाची इंटरॅक्शन कमी करतो. त्यामुळे सहज तुकडा पडेल आणि तरीही खुसखुशीत असं बिस्कीट आपल्या हातात येतं.>>>>>>>> माहीत नव्हते.

छान लेख,
आमची आजी कणकेची त्रिकोणी घडी घातली की नंतर तिचा गोल अजिबात करायची नाही >>
मी त्रिकोणी घडी घातली कि चपाती गोल करते. परंतु त्रिकोणाला कुठुनही मुडपत नाही. त्रिकोणी ठेवूनच गोल चपाती लाटली तर सुरेख पदर सोडून चपाती फुगते असा माझा विश्वास बसला आहे. Happy
हेच जर त्रिकोणाची टोक मुडपुन चपाती केली कि फुगत नाही फार. काहीतरी सायंटिफिक कारण असणार आहे. पण मला ते माहित नाही.

पाण्यात बुडवायची म्हणजे काय करायच? कणीक नेहमी प्रमाणे भिजवली पुर्ण बुडेल इतक्यात पाण्यात ठेवली मग काहिवेळाने पाणि फेकुन दिले आणी भिजवलेली कणिक परत निट मळून पोळ्या? या स्टेप्स आहेत का? कितिवेळ पाण्यात भिजवायची?

मी आमच्या गावात अलिकडेच इतकी इतकी मऊ पोळी खाल्ली होती की गेल्या हजार वर्षात कधीच नाही. अप्रतीम, अवर्णनीय. सिक्रेट माहित नाही. पण काही तरी असावे. साधारण हजाराच्या वर बायकांच्या हातची पोळी खाल्यानंतरही त्या पोळ्या खूप पलिकडे होत्या असे वाटले.
(किती सुगरणींनी अन्नदान केले हे खरच एकदा मोजायला पाहिजे, काही अपवादात्मक सुग्रण होते म्हणा होस्टेल मधे. ) . आता पोळ्या शिकणे आले. कृपया नविन मुलायम रेसिपी सापडली असल्यास एसोपि लिहीणे.

मॅडम तुम्ही मधेच अल्फा अमिलेज आणाल असे वाचता वाचता वाटले. Happy

@प्राजक्ता
किती पोळ्या करायच्यात तेवढी कणीक घ्यायची.
त्याचे 3 भाग करायचे. 2 भागांची कणीक घट्ट मळून एका बाऊल मध्ये ठेऊन त्यावर बुडेल इतके पाणी घालायचे. मी एक तास ठेवते. मग पाण्यातून काढून जे उरलेले पीठ आहे ते वापरून तेल लावून मळा परत. फोटोसाठी माझी एफबी प्रोफाइल पहा. पोस्ट पब्लिक आहेत.

>>>मॅडम तुम्ही मधेच अल्फा अमिलेज आणाल असे वाचता वाचता वाटले.
हा हा. गावाकडे बरेच ठिकाणी खूप चेचून मळतात कणीक. जास्त मळली तरी इफेक्ट तोच होतो. ब्रेड करताना सुध्दा खूप वेळ मळतात कणीक. पण पाणी टाकलं की मळायला सोपी जाते आणि हातानी करायच्या कामाचा वेळ वाचतो.

फेसबुकवर वाचल्यापासून कणीक बुडवून ठेवणे चालू केले होते. पण नेमकं तेव्हाच पीठही बदललं असल्याने (आधी नाईलाजास्तव मॅडम ब्रँडचं पीठ होतं त्याने चपात्या फार वाईट बनत होत्या) बदलात पीठ आणि प्रक्रिया यांचा वाटा किती ते कळत नव्हते.
पण काल न भिजत ठेवता केल्यावर फरक कळला.

मी तिकडे लिहिलं तसं फूड प्रोसेसरमध्ये (तेल न घालता) कणीक मळून तासभर पाण्यात बुडवून मग पुढची प्रोसेस केली.

आधीही दुपारी मळलेल्या कणकेच्या रात्री चपात्या केल्या तर अधिक चांगल्या होतात हा अनुभव होता.

प्रयोग करून तो नीट समजावून सांगितल्याबद्दल आभार.

मस्त आहेत या सीरीज मधले सगळे लेख.

इथेही आणल्याबद्दल धन्यवाद
परत वाचायचे / रेफर करायचे असल्यास सोपे झाले.

इथेही आणल्याबद्दल धन्यवाद
परत वाचायचे / रेफर करायचे असल्यास सोपे झाले.>>>>इथेही म्हणजे आधी कुठे प्रकाशित झालेत?

>>>>हेच जर त्रिकोणाची टोक मुडपुन चपाती केली कि फुगत नाही फार.>>>> ओह काहीजण टोक मुडपुन पोळीचा आकार गोल करतात, ही माहीतीच मला नवीन आहे. मी , आई, मामी, आज्जी सगळ्या त्रिकोणातूनच गोल आकार इव्हॉल्व्ह करतो.

काहीजण टोक मुडपुन पोळीचा आकार गोल करतात, ही माहीतीच मला नवीन आहे. >>>सेम हिअर
पण मी अगदी आत्ता आता चपाती नीट करायला शिकली आहे सो असं विचारण्याची हिम्मत नाही झाली,तरी सकाळी चपाती करताना टोक मुडपून कशी गोल करता येईल यावर पण जरा प्रयोग केला पण जम्या नाही Lol

सई तुमचे लेख अप्रतिम आहेत,सगळेच

>>ओह काहीजण टोक मुडपुन पोळीचा आकार गोल करतात, ही माहीतीच मला नवीन आहे. मी , आई, मामी, आज्जी सगळ्या त्रिकोणातूनच गोल आकार इव्हॉल्व्ह करतो.

+१११ अगदी अगदी. पण चांगली आयडीया आहे, टोकं मुडपल्याने पटकन गोल होत असावा Proud

ओह काहीजण टोक मुडपुन पोळीचा आकार गोल करतात, ही माहीतीच मला नवीन आहे. मी , आई, मामी, आज्जी सगळ्या त्रिकोणातूनच गोल आकार इव्हॉल्व्ह करतो.>>>+1
मी एकीला वेगळे करताना पाहिले आहे. म्हणजे आधी उंडा घेऊन पुरी एवढा गोल करून त्याला बरोबर मध्यभागी चिमटीने दाबायचे. तो एक फुलपाखरू टाईप आकार होतो. मग एका बाजूला तेल व एका बाजूला चिमटीभर पीठ लावायचे. मग हे फुलपाखरू पुन्हा एकमेकावर फोल्ड करायचे. पुन्हा गोल होते मग हे लाटत मोठे करायचे. त्यामुळे गोल करणे सोपे जाते. पण पदर एकच होतो. पण बिगीनर साठी बरे आहे.
माझी पणजी खूप सुरेख पोळ्या करायची म्हणे, कुठेही डाग नाही, कुठेही कच्चे नाही मऊसुत आणि पदर... हे माझे ऐकीव गोल्ड standard आहे.
धन्यवाद.

हा लेखही आवडला.
ओह काहीजण टोक मुडपुन पोळीचा आकार गोल करतात, ही माहीतीच मला नवीन आहे. मी , आई, मामी, आज्जी सगळ्या त्रिकोणातूनच गोल आकार इव्हॉल्व्ह करतो.>>>+1
आदिश्री, तुम्ही उल्लेख केलाय त्या पद्धतीने माझी आत्या पोळ्या करायची. एकच पदर मात्र छान मऊसुत पोळ्या असत. माझ्या आजोबांचे पोस्टिंग गुजराथेत होते तेव्हा त्यांच्याकडे स्वयंपाकाला महाराज(आचारी) यायचे. त्यांनी तिला तशा पोळ्या करायला शिकवले होते.

छान लेख.. Happy हा भिजवुन ठेवायचा प्रकार नवीन कळला. हल्ली रोटीमॅटिकमुळे पोळी करायची वेळ येत नाही पण लक्षात ठेवली आहे ही युक्ती.

सई , आज तु सान्गितलस तस पाण्यत भिजवुन ठेवण्याचा प्रयोग केला आणि पोळित अजुन पॉझिटिव्ह फरक पडलाय, माझ्या पोळ्या मुळात चान्गल्या होतात फक्त प्रश्न होता तो त्यानतर मौसुत राहत नाही हा होता आणि कॉइल असल्यामुळे इतर भरपुर फेक्टर अ‍ॅड होत राहतात.
मी नोटिस केलेले दोन फरक म्हणजे कणकेची ईलॅस्टीसिटी खुप वाढते त्यामुळे छोट्या उन्ड्याची पोली सुद्धा मोठी लाटली जात होती आणि तेही न तुटता, फुगते पण भरपुर आणी चवित पण फरक जाणवला.
सतत हिच मेथड फॉलो केली तर बहुधा अगदी भारतातल्यासारखी ताज्या कणकेची पोळी मिळण पण शक्य आहे.

मऊ पोळ्यांची युक्ती सही आहे शास्त्रीय कारणासह... फॅमिली ग्रूपवर पोहोचवतो हा लेख. आताही तश्या ठिक असतात. पण जर आणखी मऊसूत पोळ्या खायला मिळाल्या तर माबोवर येण्याचे सार्थक होईल Happy

छान लिहिला आहे लेख !!
आमच्याकडे कोल्हापूर- सांगली side ला या घडीच्या पोळीला चपाती म्हणतात.

ओह काहीजण टोक मुडपुन पोळीचा आकार गोल करतात, ही माहीतीच मला नवीन आहे. मी , आई, मामी, आज्जी सगळ्या त्रिकोणातूनच गोल आकार इव्हॉल्व्ह करतो.>>>+1 ... मी यापद्धतीनेच रोजच्या चपाती बनवते .

मैदा आणि साखर हे मनुष्याच्या शारीरिक अधोगतीचे कारण आहेत हे मान्य आहे. +++ १ हे कितीजरी खरे असले तरी याला दुसरा पर्याय नाही हेच खरे ...
एकदा change म्हणून पुरणपोळी बनवताना मी कणकेत थोडा मैदा ऍड केला आणि विशेष म्हणजे पुरणपोळी एकदम मस्त आणि खुसखुशीत बनली होती .

>>>तो एक फुलपाखरू टाईप आकार होतो. मग एका बाजूला तेल व एका बाजूला चिमटीभर पीठ लावायचे. मग हे फुलपाखरू पुन्हा एकमेकावर फोल्ड करायचे. पुन्हा गोल होते मग हे लाटत मोठे करायचे. >>> हां ही पद्धत माहीत आहे आदिश्री. मस्त दिसतात त्या डबल लाट्या.

. ही कणीक सकाळी मळून संध्याकाळी पोळ्या केल्या तर त्या अजून मऊसूत होतात>>>>>>> हे मळलेले पीठ फ्रीज मध्ये ठेवायचे की बाहेर.

छान लेख.
हेच लॉजिक पालक, मेथी वगैरे पराठ्याच्या पिठाला वापरता येईल का? की भाजी त्यात असल्यामुळे काही वेगळं करावं लागेल?

@नील
मळून झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवायची.
पाण्यात बुडवलेली असताना सुध्दा फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल.
@पीनी
आत स्टफ करून काहीही करायचे असेल तर अशी कणीक उपयोगी आहे. बटाटा पराठा, पुरणपोळी वगैरे. मी मेथी पालक पराठा भाजी कणकेत मळून करते. तिथे कणीक भाजीमुळे ओलसर होतेच. आणि नंतर सारखं पाणीही सुटतं त्यामुळे तिथे या पद्धतीला स्कोप नाही असं वाटतं.

Pages