पोळी चपातीची गोष्ट

Submitted by सई केसकर on 7 May, 2020 - 23:45

पोळ्या कशा करायच्या आणि त्या कशा आल्याच पाहिजेत वगैरे सगळे उपदेश मी अनेकांच्या तोंडून लहानपणापासून ऐकत आले आहे. माझे आजोबा आम्हा नातवंडांना गोळा करून त्यांच्या कलेक्टरपणीच्या कथा सांगायचे. त्यात ते चपाती, भाकरी काय पाहिजे ते करून स्वतः कसे खात असत हे ऐकून ऐकून आमचे कान दुखू लागायचे. पण गंमत म्हणजे, आजोबांना मी म्हातारपणी कधीही ओट्यासमोर पोळ्या लाटताना पाहिले नाही. ते काम मामी नाहीतर आजीच करायची. सुदैवाने, आज परिस्थिती बदलते आहे.माझ्याच मित्रयादीत अनेक पुरूष या लॉकडाऊनच्या काळात मस्त मस्त स्वयंपाक करताना दिसताहेत. आणि घरातले कामसुध्दा घरातले लोक वाटून घेतायत.

आमची आजी कणकेची त्रिकोणी घडी घातली की नंतर तिचा गोल अजिबात करायची नाही. तिला बालसुलभ प्रश्न ते सून सुलभ टोमणे सगळे मारून, विचारून झाले होते. पण ती तिच्या त्रिकोणावर ठाम होती. आयुष्यात इतर अनेक अन्याय आजीने सहन केले पण कुणीतरी म्हणालं म्हणून पोळी कधीही गोल केली नाही. पण मामीचा गोल आणि आजीचा त्रिकोण तव्यावर जाऊन मात्र एक सारखे टम्म फुगायचे.

मला पोळी हा प्रकार अगदी परवा परवा, जमायला लागला. पोळीला कितीही काट मारायचा प्रयत्न केला, स्वयंपाकातून हद्दपार करायचा प्रयन्त केला, तरी मऊ मऊ, लुसलुशीत पोळी कधीतरी खावीशी वाटतेच. याचा प्रत्यय मला भारताबाहेर राहताना आला. पोळीच्या ऐवजी टॉरटिया, पिटा ब्रेड, फ्रोझन पराठे वगैरे अनेक प्रकार लोकांना करताना पाहिले. पण पोळीची त्यांना सर नाही. घडीच्या, तेल लावलेल्या पोळ्या आणि कोल्हापूर-कर्नाटक सीमेवरच्या पातळ भाकरी हे दोन प्रकार ज्यांना ज्यांना चांगले जमतात, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.

मराठी पदार्थ शिकण्याची हुकमी जागा म्हणजे मायबोली. मायबोलीवर, जगभरातल्या अनेक स्वयंपाकाची आवड असलेल्या लोकांनी, अतिशय अवघड अवघड पाककृती सोप्या करून लिहिल्या आहेत. राखीपौर्णिमेचा नारळीभात, किंवा पुरणपोळी, या संकेतस्थळावर काही ना काही सिक्रेट टिप्स नेहमीच मिळतात. अशीच एकदा पुरणपोळीची पाककृती शोधताना तिथल्या व्हीबी आयडीने (त्या फेसबुकवर कुणाच्या संपर्कात असतील आणि त्यांची हरकत नसेल तर त्यांना कुणीतरी टॅग करा) रवा मैद्याची पुरणपोळी कशी करायची ते लिहिले होते. ती पाककृती म्हणजे माझ्या पोळीशिक्षणाचा टर्निंग पॉईंट होता असे म्हणता येईल. त्यात किंवा खालील अभिप्रायात असे सांगितले होते की कणीक घट्ट मळून त्यावर तांब्याभर पाणी ओता.आणि तशी तिला पाण्यातच रात्रभर राहूद्या. हे वाचून, मला मी इतरत्र वाचलेल्या अनेक गोष्टींचा अचानक उलगडा झाला. पोळीची मक्खी कणकेत आहे हे माहिती होते. पण कुणी संकटकाळात देव पाण्यात बुडवतो तशी कणीक बुडवत असेल असे कधीच वाटले नव्हते. आणि त्याचवेळी तसे करणे किती भारी आहे हेदेखील लक्षात आले.

पण ती पद्धत वापरून केलेल्या पोळ्या स्वर्गीय लुसलुशीत होतात. यांचं शास्त्रीय कारण म्हणजे ग्लूटेन. मैदा कितीही घातक असला तरीही त्याचे बेकिंग क्षेत्रातले स्थान अढळ आहे. कुणी ज्वारी, बाजरी, नाचणी वापरून कितीही काहीही बेक केलं असलं तरी आधाराला मैदा असतोच. यांचं कारण मैद्यामध्ये, किंवा गव्हामध्ये दोन प्रथिनं सुप्तावस्थेत असतात. ग्लूटेनिन आणि ग्लियाडीन. आपण गव्हाच्या पिठात पाणी मिसळले की ही दोन प्रथिनं जागृतावस्थेत येतात आणि त्यांचं ग्लूटेन तयार होतं. आपण कणीक जितकी मळू तितकं या प्रथिनांमधील क्रॉसलिंकींग वाढतं म्हणजे एकावर एक अशा अनेक जाळ्या तयार होतात आणि त्यामुळे आपल्या कणकेला आकार धरता येऊ लागतो. जेव्हा आपण यीस्ट वापरून मैदा आंबवतो, तेव्हा दोन तीन वेळा कणीक फुगवून मळायची असते. तसें करताना आपण ग्लूटेनचे जाळे वाढवायला मदत करत असतो. आणि या जाळ्यांमधून वाट काढत जेव्हा यीस्टने तयार केलेला कार्बन डायॉक्साईड पळून जातो तेव्हा अपल्याला लुसलुशीत ब्रेड मिळतो.

अर्थात पाणी आणि पिठाच्या जवळीकीमुळे ग्लूटेन तयार होते.जेव्हा आपल्याला स्वतःचा आकार धरणारा पदार्थ बनवायचा असतो (जसे की पोळी किंवा ब्रेड) तेव्हा पाणी आणि पिठाला एकमेकांशी जवळीक करायला आपण जास्त मुभा देतो.म्हणजेच कणकेला पाण्यात बुडवल्याने कणिक इलॅस्टिकही बनते आणि भाजल्यावर चांगला आकार धरू शकते. हेच भाकरी करताना किती त्रेधा तिरपीट होते ते अनुभवी लोक सांगू शकतीलच. भाकरी करण्याचं सगळं कसब ती तव्यावर जाऊन तुटू नये यात असतं. पण पोळीचं तसं नाही.

जसं पिठात पाणी घालून ठेवलं की ते आकार धरू शकतं, या उलट जेव्हा आपल्याला मैद्यापासून सहज तुटणारं, खुसखुशीत असं बिस्कीट बनवायचं असतं तेव्हा ग्लूटेनच्या खूप साखळ्या तयार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, नानकटाई करताना आधी पिठात आपण मोहन घालतो. पाश्चात्य देशांत याला शॉर्टनिंग असं म्हणतात. आधी तूप किंवा बटर घातल्याने आपण पाण्याची आणि पिठाची इंटरॅक्शन कमी करतो. त्यामुळे सहज तुकडा पडेल आणि तरीही खुसखुशीत असं बिस्कीट आपल्या हातात येतं.

तर अशी लुसलुशीत पोळी करायची असेल तर तुम्हाला अपेक्षित पोळ्यांना जेवढी लागेल त्यापेक्षा अर्धी ते पाऊण वाटी कमी पीठ घेऊन त्याची तेल न घालता घट्ट कणीक मळा. आणि ती तास ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवा. मग उरलेले अर्धी वाटी पीठ घालून ती मळून घ्या आणि शेवटी हवं तितकं तेल लावा. ही कणीक सकाळी मळून संध्याकाळी पोळ्या केल्या तर त्या अजून मऊसूत होतात.

आता पोळीबद्दल अगदी ठामपणे म्हणू शकते की चांगली पोळी म्हणजे चांगली कणीक. कणीक चांगली असेल तर पोळी थोडी जाड लाटली तरी छानच लागते. आणि थोडी जास्त भाजली तरी वातड होत नाही. उलट खुसखुशीत लागते. अशा पद्धतीने कणीक मळून पोळ्या केल्या की त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुध्दा मऊ राहतात.

मैदा आणि साखर हे मनुष्याच्या शारीरिक अधोगतीचे कारण आहेत हे मान्य आहे. पण एखादा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून या दोन गोष्टींकडे पाहिले तर माणसाच्या सृजनशीलतेची कमाल वाटते. साखर सुध्दा इतकी रूपं घेऊन येते की तिचा कधीच कंटाळा येत नाही. एक तारी, दोन तारी पाक असो, किंवा टॉर्च वापरून केलेला क्रेम ब्रुले. साखर स्वयंपाकघरातील जादूगारीण आहे. आणि या सगळ्या प्रक्रियांच्या मागे असलेलं रसायनशास्त्र बघितलं की स्वयंपाक करणे म्हणजे प्रयोगशाळेत काम करण्यासारखेच आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच सध्या काम बंद असल्यामुळे स्वयंपाक वाढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई,
कणीक मऊ करण्यासाठी आपण पाण्यात बुडवून ठेवतो. मग ग्लुटनचे प्रमाण वाढून पोळ्या मऊ होतात. तर ग्लुटन हे पचायला जड आहे असे म्हणतात तर ह्या पोळ्या ही मग पचायला जरा जड पण मऊ असतील का ? ग्लुटन बद्दल बरे वाईट ऐकून आहे म्हणून हा प्रश्न पडला.
धन्यवाद Happy

@ आदिश्री
मला ग्लूटेन कसं अपायकारक आहे याबद्दल जास्त माहिती नाही.
त्यामुळे माहित नाही कसा परिणाम होईल ते. पण मायबोलीवर नक्कीच कुणीतरी यावर माहिती देऊ शकेल. वाट पाहूया.

तसा काँट्रॅव्हरशीयल विषय वाटतोय ग्लुटन.
Coeliac disease व्यतिरिक्तही ग्लुटन अनेक समस्या निर्माण करू शकते असे विल्यम डेव्हीस "Wheat Belly" या पुस्तकात लिहितात तर त्यात तथ्य नाही असे इतर तज्ज्ञ मानतात.

मला गव्हाच्या पोळीने पोटात गॅस धरणे, कधीतरी अपचन होणे असे प्रकार होतात. ज्वारी आणि बाजरी ची भाकरी खाल्यास असा त्रास होत नाही.

या धाग्यावर मऊ पोळ्यांवर खूप छान चर्चा झाली पण दशम्यांचा उल्लेख आढळला नाही. आमच्याकडे बरीच वयस्कर लोक नियमितपणे दशम्या खातात. दशमी म्हणजे दूधात भिजवलेल्या कणकेची पोळी. पचायला पोळीपेक्षा बरी आणि चावायलाही !! काहीजणं प्रवासात पण नेतात...दोन तीन दिवस टिकतात. भिजवायला पाण्यापेक्षा बरेच कमी दूध पुरते. मी मुले बेबीज असताना करायचे , कणकेत/ पोळीतले प्रोटीन आणि calcium वाढवायला. प्रोटीन पावडरपेक्षा बरा पर्याय म्हणून.
धन्यवाद Happy

आदिश्री,
मी सध्या अल्मोस्ट रोजच दशम्या करते. उरलेलं दूध संपवायचा हुकमी मार्ग आहे. लिहायला हवं होतं लेखात.

आज कणिक भिजवल्यावर पाण्यात जवळपास ५० मिनीटे भिजवून ठेवली. मग पाणी पूर्ण काढून टाकले आणि थोडे कोरडे पीठ घालून मळले. मग तेलाचा हात लावून सारखी करून घेतली. मी किचन एडचा स्टँड मिक्सर वापरते. इतरवेळी पाण्यात न भिजवता भरपूर मळून घेऊन मग तेलाचा हात लावून नीट करते. त्यावेळी जी कणकेची कन्सिस्टन्सी येते, तशीच कंसीस्टन्सी पाण्यात भिजवून ठेवल्यावर आली असं वाटलं. मात्र पोळ्या लाटताना सहज मोठ्या होत होत्या. याशिवाय मोठा फरक म्हणजे कणिक अजिबात चिकट वाटली नाही आणि लाटताना पीठ जास्त लागले नाही. इतरवेळी (स्टँड मिक्सरवर जास्त वेळ मळून घेऊनही) कणिक थोडी चिकट वाटते आणि लाटताना पीठही जास्त लागते. जे कणिक भिजवण्यासाठी स्टँड मिक्सर वापरतात त्यांना कदाचित फारसा फरक जाणवणार नाही. पण पुरणपोळी किंवा कुठलाही भरून करायचा पराठा वगैरे असेल तर नक्की भिजवून ठेवून करणार. त्यामुळे पोळ्या/पराठे लाटताना फुटणार नाहीत असे वाटते.
अजून एक नोंद म्हणजे मी आशिर्वाद, सुजाता, लक्ष्मी, रॉयल या सगळ्या ब्रँडसचा शरबती आटा वापरला आहे. लक्ष्मीचा शरबती आटा सर्वात चांगला वाटला.
फोटो काढले आहेत प्रत्येक स्टेपचे पण इथे अपलोड करायचे तर किचकट काम आहे.

मी सध्या अल्मोस्ट रोजच दशम्या करते. उरलेलं दूध संपवायचा हुकमी मार्ग आहे. लिहायला हवं होतं लेखात. -- प्लीज रेसीपी सान्गा ना..

मी पण ही पद्धत वापरून पाहिली आणी बाकीच्यांनी लिहिलय तसाच अनुभव आला.
अंजली +१

मी भाकरी चॅलेन्ज्ड आहे. तर माझा प्रश्न असा आहे की भाकरी चं पीठ मळताना त्यात चमचाभर व्हीट ग्लूटेन पावडर घात्ली तर भाकरी जमतील का?

माझ्या कडे ग्लूटन पावडर का आहे असे विचारू नका. लेकीला ब्रेड फ्लार हवे होते ते मिळत नव्हते म्हणून नुसताच मैदा आणि त्यात मिसळायला म्हणून ग्लूटेन पावडर आणली होती.
उकड काढून भाकरी त्यातल्या त्यात बर्‍या होतात उकड काढताना ग्लूटेन पावडरची चीटिंग करून बघते.

>>ग्लूटन पावडर का आहे
हेच विचारणार होते Wink

शुम्पी आमच्याकडे मिळणारं पीठ जूनं असतं म्हणून ज्ये.नांनी सगळीच पीठं (गहू नाही) उकड काढ म्हटलं आहे. जाणकार यायच्या आत लिहून घेते Lol

उकड कशाला काढायला हवी, थोडे कोमट पाण्याने पीठ नीट मळले तरी होतात की भाकऱ्या. अन तांदळाच्या पिठाची भाकरी करायची असेल तर साधे पाणी देखील पुरेसे आहे

उकड कशाला काढायला हवी, थोडे कोमट पाण्याने पीठ नीट मळले तरी होतात की भाकऱ्या. अन तांदळाच्या पिठाची भाकरी करायची असेल तर साधे पाणी देखील पुरेसे आहे>>>> खरंतर नाही. तांदळाच्या पिठाच्या भाकरीबद्दल माहित नाही, कधीच केलेली नाही पण ज्वारीचे पीठ असेल तर विरी गेली (म्हणजे चिकटपणा कमी झाला) तर भाकरी थापताना त्रास होऊ शकतो. विशेषतः सवय नसेल तर. म्हणून त्यात थोडा चिकटपणा येण्यासाठी बाकी घटक मिसळायचे - गव्हाचे पीठ, थोडे उडीदाचे पीठ इत्यादी. काही लोक चमचाभर तेलपण घालतात.

शूम्पे, मी मागेही लिहीलं होतं - प्रॅक्टीससाठी निम्मे मासेका (कॉर्नचे मेक्सिकन पद्धतीने केलेले पीठ) आणि निम्मे ज्वारीचे पीठ मिसळ. भाकरी थापायला सोप्या जातात. तुमच्याकडे एकदम ताजं मासेका पण मिळत असेल तर बघ (म्हणजे तुमच्या भागात असं पीठ मिळण्याची शक्यता जास्त आहे). त्यात मग लिंबू नसलेले पीठ घ्यायचे. मी इथेच भाकरी शिकले त्या मासेकाचं पीठ वापरून. त्यावरच प्रॅक्टीस करत गेले आणि आता ज्वारीच्या पीठाच्या भाकरी व्यवस्थित जमतात.

ह्या इथल्या पिठाच्या भाकर्‍या. थोडस गरम पाणी (विरी साठी) घालून केल्या आहेत. बाकी काही नाही मिक्स केल.
पण तेवढ पाणी भारतात कधी मिक्स कराव लागत नाही.
IMG_1595.PNG

अंजली आणि व्हिबी तुम्हा दोघिंचही बरोबर आहे. सगळं भाकरीच पीठ कितपत जुन आहे त्यावर आहे.

>>> दशमी म्हणजे दूधात भिजवलेल्या कणकेची पोळी.

आमच्याकडे दुध वापरुन केलेल्या ज्वारीच्या भाकरीला दशमी म्हणतात.

मला भाकरी येत नाहीत. म्हणजे मी अगदी माझ्या तळव्याच्या आकाराच्या छोट्या भाकरी करू शकते. तशाच करते मी.
पण ज्वारीचे पीठ जुने होणे हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. वरचेवर भाकरी करत नसल्यामुळे एकदा पीठ आणलं की ते एकदाच वापरता येतं. आता गव्हाचे पीठ घालून बघीन. ही आयडिया भारी आहे.

माझ्या मैत्रिणीच्या घरी (ते गुजराती आहेत) बिस्कीट भाकरी म्हणून प्रकार करतात. कणकेची भाकरी असते. प्रचंड तूप घालून केलेली. मी तिच्या सांगण्याप्रमाणे एकदोन वेळा करून बघितली होती पण मला काही जमली नाही. कुठे सविस्तर पाककृती असेल तर सांगा.

सई, गाकर तुला माहित आहेत का? तशी करतात गुजराती लोक. ते जाडसर गव्हाच्या पिठाचे जे गाकर करतात त्याला भाकरी म्हणतात. बाजरी/मकाच्या ज्या ते भाकरी करतात त्याला रोटली बाजरा/ मकाची म्हणतात.

इथे अमदावादला तर बिस्कीट भाकरी खाकरा मिळतो. नुस्ता खुसखुशीत.. ते भाकरी ज्याला म्हणतात ते वरप्रमाणे बनवतात.

@सई
खूपच छान माहिती !
हीच युक्ती (पाणी टाकून १ तास पीठ ठेवायची ) भाकरी सॉफ्ट करायला पण वापरता येईल का ?

सॉफ्ट करायला पण वापरता येईल का ?..... नाही.कारण भाकरीच्या पिठाला चिकटपणा नसतो.दुसरे म्हणजे चपातीच्या पिठाप्रमाणे भाकरीचे पीठ मळून ठेवत नाहीत.भाकरीला तडे जातात.

दोन टोकातील मधली बाजू वक्राकार करत फिरवायची, अश्या तिन्ही बाजू झाल्या की पोळी गोल होते.

माझा प्रॉब्लेम दुसराच आहे. मला पोळ्या लाटणे अन शेकणे एकत्र जमत नाही. मी आधी सगळ्या लाटून घेते अन मग आरामात शेकते. तरच मऊ होतात, टम्म फुगतात नाहीतर कडक तरी होतात किंवा करपतात तरी. गॅस वाया जाते ते वेगळे.

VB, big hug :).
काही वर्षापूर्वी मला 4 पोळ्या करायला अर्धा तास लागायचा.कारण हेच.
अजूनही perfectly जमत नाही पण बर्यापैकी overlap असतो.
Gas कमी जास्त करायच तंत्र जमवायच.
पोळयांच्या सगळ्या लाट्या अगोदर तयार ठेवायच्या.
Practice , practice and practice . जमेल हळूहळू.

स्वस्ति ☺️,
सध्या तरी कोरोनामुळे दोघे घरी असल्याने भाकऱ्या मी अन पोळ्या नवरा असे ठरलंय, त्यालाही दोन्ही एकत्र जमत नाही पण माझ्यापेक्षा बऱ्या असतात☺️

Pages