पोळ्या कशा करायच्या आणि त्या कशा आल्याच पाहिजेत वगैरे सगळे उपदेश मी अनेकांच्या तोंडून लहानपणापासून ऐकत आले आहे. माझे आजोबा आम्हा नातवंडांना गोळा करून त्यांच्या कलेक्टरपणीच्या कथा सांगायचे. त्यात ते चपाती, भाकरी काय पाहिजे ते करून स्वतः कसे खात असत हे ऐकून ऐकून आमचे कान दुखू लागायचे. पण गंमत म्हणजे, आजोबांना मी म्हातारपणी कधीही ओट्यासमोर पोळ्या लाटताना पाहिले नाही. ते काम मामी नाहीतर आजीच करायची. सुदैवाने, आज परिस्थिती बदलते आहे.माझ्याच मित्रयादीत अनेक पुरूष या लॉकडाऊनच्या काळात मस्त मस्त स्वयंपाक करताना दिसताहेत. आणि घरातले कामसुध्दा घरातले लोक वाटून घेतायत.
आमची आजी कणकेची त्रिकोणी घडी घातली की नंतर तिचा गोल अजिबात करायची नाही. तिला बालसुलभ प्रश्न ते सून सुलभ टोमणे सगळे मारून, विचारून झाले होते. पण ती तिच्या त्रिकोणावर ठाम होती. आयुष्यात इतर अनेक अन्याय आजीने सहन केले पण कुणीतरी म्हणालं म्हणून पोळी कधीही गोल केली नाही. पण मामीचा गोल आणि आजीचा त्रिकोण तव्यावर जाऊन मात्र एक सारखे टम्म फुगायचे.
मला पोळी हा प्रकार अगदी परवा परवा, जमायला लागला. पोळीला कितीही काट मारायचा प्रयत्न केला, स्वयंपाकातून हद्दपार करायचा प्रयन्त केला, तरी मऊ मऊ, लुसलुशीत पोळी कधीतरी खावीशी वाटतेच. याचा प्रत्यय मला भारताबाहेर राहताना आला. पोळीच्या ऐवजी टॉरटिया, पिटा ब्रेड, फ्रोझन पराठे वगैरे अनेक प्रकार लोकांना करताना पाहिले. पण पोळीची त्यांना सर नाही. घडीच्या, तेल लावलेल्या पोळ्या आणि कोल्हापूर-कर्नाटक सीमेवरच्या पातळ भाकरी हे दोन प्रकार ज्यांना ज्यांना चांगले जमतात, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.
मराठी पदार्थ शिकण्याची हुकमी जागा म्हणजे मायबोली. मायबोलीवर, जगभरातल्या अनेक स्वयंपाकाची आवड असलेल्या लोकांनी, अतिशय अवघड अवघड पाककृती सोप्या करून लिहिल्या आहेत. राखीपौर्णिमेचा नारळीभात, किंवा पुरणपोळी, या संकेतस्थळावर काही ना काही सिक्रेट टिप्स नेहमीच मिळतात. अशीच एकदा पुरणपोळीची पाककृती शोधताना तिथल्या व्हीबी आयडीने (त्या फेसबुकवर कुणाच्या संपर्कात असतील आणि त्यांची हरकत नसेल तर त्यांना कुणीतरी टॅग करा) रवा मैद्याची पुरणपोळी कशी करायची ते लिहिले होते. ती पाककृती म्हणजे माझ्या पोळीशिक्षणाचा टर्निंग पॉईंट होता असे म्हणता येईल. त्यात किंवा खालील अभिप्रायात असे सांगितले होते की कणीक घट्ट मळून त्यावर तांब्याभर पाणी ओता.आणि तशी तिला पाण्यातच रात्रभर राहूद्या. हे वाचून, मला मी इतरत्र वाचलेल्या अनेक गोष्टींचा अचानक उलगडा झाला. पोळीची मक्खी कणकेत आहे हे माहिती होते. पण कुणी संकटकाळात देव पाण्यात बुडवतो तशी कणीक बुडवत असेल असे कधीच वाटले नव्हते. आणि त्याचवेळी तसे करणे किती भारी आहे हेदेखील लक्षात आले.
पण ती पद्धत वापरून केलेल्या पोळ्या स्वर्गीय लुसलुशीत होतात. यांचं शास्त्रीय कारण म्हणजे ग्लूटेन. मैदा कितीही घातक असला तरीही त्याचे बेकिंग क्षेत्रातले स्थान अढळ आहे. कुणी ज्वारी, बाजरी, नाचणी वापरून कितीही काहीही बेक केलं असलं तरी आधाराला मैदा असतोच. यांचं कारण मैद्यामध्ये, किंवा गव्हामध्ये दोन प्रथिनं सुप्तावस्थेत असतात. ग्लूटेनिन आणि ग्लियाडीन. आपण गव्हाच्या पिठात पाणी मिसळले की ही दोन प्रथिनं जागृतावस्थेत येतात आणि त्यांचं ग्लूटेन तयार होतं. आपण कणीक जितकी मळू तितकं या प्रथिनांमधील क्रॉसलिंकींग वाढतं म्हणजे एकावर एक अशा अनेक जाळ्या तयार होतात आणि त्यामुळे आपल्या कणकेला आकार धरता येऊ लागतो. जेव्हा आपण यीस्ट वापरून मैदा आंबवतो, तेव्हा दोन तीन वेळा कणीक फुगवून मळायची असते. तसें करताना आपण ग्लूटेनचे जाळे वाढवायला मदत करत असतो. आणि या जाळ्यांमधून वाट काढत जेव्हा यीस्टने तयार केलेला कार्बन डायॉक्साईड पळून जातो तेव्हा अपल्याला लुसलुशीत ब्रेड मिळतो.
अर्थात पाणी आणि पिठाच्या जवळीकीमुळे ग्लूटेन तयार होते.जेव्हा आपल्याला स्वतःचा आकार धरणारा पदार्थ बनवायचा असतो (जसे की पोळी किंवा ब्रेड) तेव्हा पाणी आणि पिठाला एकमेकांशी जवळीक करायला आपण जास्त मुभा देतो.म्हणजेच कणकेला पाण्यात बुडवल्याने कणिक इलॅस्टिकही बनते आणि भाजल्यावर चांगला आकार धरू शकते. हेच भाकरी करताना किती त्रेधा तिरपीट होते ते अनुभवी लोक सांगू शकतीलच. भाकरी करण्याचं सगळं कसब ती तव्यावर जाऊन तुटू नये यात असतं. पण पोळीचं तसं नाही.
जसं पिठात पाणी घालून ठेवलं की ते आकार धरू शकतं, या उलट जेव्हा आपल्याला मैद्यापासून सहज तुटणारं, खुसखुशीत असं बिस्कीट बनवायचं असतं तेव्हा ग्लूटेनच्या खूप साखळ्या तयार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच, नानकटाई करताना आधी पिठात आपण मोहन घालतो. पाश्चात्य देशांत याला शॉर्टनिंग असं म्हणतात. आधी तूप किंवा बटर घातल्याने आपण पाण्याची आणि पिठाची इंटरॅक्शन कमी करतो. त्यामुळे सहज तुकडा पडेल आणि तरीही खुसखुशीत असं बिस्कीट आपल्या हातात येतं.
तर अशी लुसलुशीत पोळी करायची असेल तर तुम्हाला अपेक्षित पोळ्यांना जेवढी लागेल त्यापेक्षा अर्धी ते पाऊण वाटी कमी पीठ घेऊन त्याची तेल न घालता घट्ट कणीक मळा. आणि ती तास ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवा. मग उरलेले अर्धी वाटी पीठ घालून ती मळून घ्या आणि शेवटी हवं तितकं तेल लावा. ही कणीक सकाळी मळून संध्याकाळी पोळ्या केल्या तर त्या अजून मऊसूत होतात.
आता पोळीबद्दल अगदी ठामपणे म्हणू शकते की चांगली पोळी म्हणजे चांगली कणीक. कणीक चांगली असेल तर पोळी थोडी जाड लाटली तरी छानच लागते. आणि थोडी जास्त भाजली तरी वातड होत नाही. उलट खुसखुशीत लागते. अशा पद्धतीने कणीक मळून पोळ्या केल्या की त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुध्दा मऊ राहतात.
मैदा आणि साखर हे मनुष्याच्या शारीरिक अधोगतीचे कारण आहेत हे मान्य आहे. पण एखादा पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून या दोन गोष्टींकडे पाहिले तर माणसाच्या सृजनशीलतेची कमाल वाटते. साखर सुध्दा इतकी रूपं घेऊन येते की तिचा कधीच कंटाळा येत नाही. एक तारी, दोन तारी पाक असो, किंवा टॉर्च वापरून केलेला क्रेम ब्रुले. साखर स्वयंपाकघरातील जादूगारीण आहे. आणि या सगळ्या प्रक्रियांच्या मागे असलेलं रसायनशास्त्र बघितलं की स्वयंपाक करणे म्हणजे प्रयोगशाळेत काम करण्यासारखेच आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळेच सध्या काम बंद असल्यामुळे स्वयंपाक वाढला आहे.
भाकऱ्या मी अन पोळ्या नवरा असे
भाकऱ्या मी अन पोळ्या नवरा असे ठरलंय,>>>> अरे वा! मस्त आहे की.
पोळ्यांच्या लाट्या अधी तयार करायच्या.एक किंवा २ पोळ्या आधी लाटायच्या, गॅसवर मोठ्या आचेवर तवा तापला की आधी लाटलेली पोळी तव्यावर घालायची.इथे दुसरी लाटायला घ्यायची.ती थोडी मोठी झाली की तव्यावरची पोळीची बाजू पलटायची.आता गॅस जरासा कमी करायचा.नंतर सर्व पोळ्या होईपर्यंत तसाच ठेवायचा.पोळीची दुसरी बाजू शेकेपर्यंत पोळपाटावरची पोळी तयार असते.
मलाही पोळ्या करणे अवघड वाटायचे,कशाला अजूनही वाटते.पण सद्ध्या पटपट(माझ्या दृष्टीने) होत आहेत.
भाकरी चा प्रयत्न केला पण
भाकरी चा प्रयत्न केला पण तुकडे झाले
पीठ जुने असावे इथे म्हंटल्याप्रमाणे बहुतेक
पोळी/चपातीखालचा गॅस कमी जास्त
पोळी/चपातीखालचा गॅस कमी जास्त करत बसण्यापेक्षा पोळीचपातीचा तव्यावर भाजण्याचा वेळ कमी जास्त करणे सोपे आहे. पुरेशा तापलेल्या तव्यावर पोळी टाकली रे टाकली की छोटे बुडबुडे दिसू लागताच चपाती परतायची. ह्यावेळी थोडी जास्त वेळ ठेवायची आणि मग वरची कच्ची राहिलेली बाजू शेकली जावी म्हणून पुन्हा परतून पातळ मऊ फडक्याने हलकेच दाबून आणि फिरवून फुगवायची. चांगली टम्म फुगते. घडीबिडीची नसली तरी. दोनदा परतावी लागते इतकेच.
पोळी/चपातीखालचा गॅस कमी जास्त
पोळी/चपातीखालचा गॅस कमी जास्त करत बसण्यापेक्षा पोळीचपातीचा तव्यावर भाजण्याचा वेळ कमी जास्त करणे सोपे आहे >>>
कमी गॅसवर माझ्या पोळ्या कडक होतात आणि मोठ्या गॅसवर करपतात .
म्हणून कसरत करावी लागते .
मध्यम गॅसवर हव्या तशा खमंग भाजल्या जात नाहीत .
पण प्रयत्न करून बघेन हा ही
गॅस मध्यमपेक्षा जास्त ठेवायचा
गॅस मध्यमपेक्षा जास्त ठेवायचा.अर्थात लाटणे आणि भाजणे एकावेळी करणं थोडं कठीण पडणार. चारपाच पोळ्या लाटून ठेवायच्या. तिसऱ्या पोळीपासून विस्तव सुरू करून तवा तापत ठेवायचा.तव्यावर थोड्या उंचीवर हात धरला की तवा पुरेसा गरम झालाय की नाही ते कळतं. गॅसची आच तेव्हढीच कायम ठेवून पोळी प्रत्येक बाजूने शेकण्याचा वेळ अडजस्ट केला की परिणाम विस्तव कमीजास्त केल्याचाच होतो. गॅसही वाया जात नाही.
Thanks VB ताई गोलाची idea
Thanks VB ताई गोलाची idea सांगितल्या बद्दल. बाकी gas कमी जास्त, लाटणे भाजणे एकत्र जमत नाही वगैरे problems मलाही येत आहेत. असो. इथल्या युक्त्यांचा उपयोग होईलच.
सई, कणीक पाण्यात भिजवून ठेवून
सई, कणीक पाण्यात भिजवून ठेवून बघितले. प्रचंड आवडली आयडीया. मऊ सुत झालेले कणीक अगदी पुरणपोळीला असते तसे. फक्त मला थोडे पीठ अॅड करावे लागले नंतर कारण पीठ थोडे पातळ वाटले भीजवल्यावर. उद्या परत एकदा जास्त तेल लावून भिजवून ठेवेन. म्हणजे पाणी कमी शोषल जाईल अस वाटतय.
खुप धन्यवाद.
व्हिबी, चपाती लाटुन आणि नंतर भाजण्या ऐवजी त्रिकोण एकदम करून ठेव आणि मग लाटण आणि भाजणं एकदम जमत का बघं. हळुहळु ते जमलं कि मग पुर्ण चपती आणि भाजणं अस एकत्र तंत्र नक्की जमेल. चपाती गॅस वर पहिल्यांदा टाकली कि गॅस कमी एकदम. उलटुन टाकली कि मग गॅस मोठा करायचा.
लॉकडाऊन मध्ये शिकलेली मास्टरी
लॉकडाऊन मध्ये शिकलेली मास्टरी.
सर्वप्रथम गहू. चांगला गहू असला की कणीक चांगली आणि अर्थातच पुढे चपात्याही चांगल्या होतात हा अनुभव. अगदी टिपिकल गहू रंग येतो पोळीला.
शक्यतो सिहोर/शरबती गहू घेतो आताशा, याच्या पोळ्या/ फुलके अगदी संध्याकाळच्या जेवणापरेंत मऊ राहातात.
लोकवन इ. पोळ्या जरा कोरड्या होतात.
विकतच्या आट्याच्या (कुठलाही ब्रँड - पतंजली, पिल्सबरी, आशिर्वाद, नेचर फ्रेश, इनहाऊस ब्रँड्स इ.) पोळ्या लोकवन गव्हाच्या पोळ्यांपेक्षाही जरा जास्त कोरडसर होतात आणि रंगालाही जरा पांढर्या राहातात.
इथे पोळ्या/ चपात्या म्हणजे नेहेमीचे फुलके असं वाचा. आमच्या कडे घडीची पोळी इ. प्रकार करत नाहीत रोजच्या जेवणाला.
तर ही कणीक-कहाणी
तवा, जरा जड चांगल्या थिकनेस चा लोखंडी तवा असेल तर उत्तम. माझ्याकडे लोखंडीच आहे पण मला जरा पातळ वाटतो तो, पोळी पटकन जास्त होते त्यावर.
दोन मध्यम ओंजळभर कणकेचे आकारानुसार १२/१४ फुलके होतात.
कणीक भिजवतांना काहीही घालायचं नाही; (इतक्या कणकेला नेहेमीचा स्टीलच्या पेल्यापेक्षा जरासं कमी पाणी लागतं) कणीक भिजवून पूर्ण गोळा झाला की जरा कडक/स्टीफ लागेल हाताला. आता यात चांगल २ टेबलस्पून तेल घालून अजून एक ५ मिनिटं मळायचं आणि झाकून कमीतकमी १५/२० मिनिटं तरी मुरू द्यायचं.
पुढे...
तवा स्वच्छ घासून कोरडा करून अगदी बारीक गॅसवर तापत टाकायचा.
तोवर पोळपाट, लाटणं आणि चिमटा स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे आणि भिजवलेल्या कणकेचे मध्यम मोठ्या लिंबाएवढे गोळे तोडून ठेवायचे; तसेच ओबडधोबड असू द्यावे.
एका गोळ्याला तळहातांमध्ये जरा मळून गोल पेढा करून घ्यावा; आणि कोरड्या पिठात चांगला सगळ्या बाजूनी माखून मग पोळपाटावर, लाटण्याच्या मदतीनं हलक्या पण स्विफ्ट मूव्ह अॅक्शन नी पोळी लाटावी. मध्ये एकदा अर्धवट लाटून झालेल्या पोळीला कणीक लावावी लागते.
त्याशिवाय जर अजून लागली कणीक तर वापरावी.
आता तवा तापला असेल, त्यावर लाटलेली पोळी टाकावी आणि दुसरी लाटायला घ्यावी,
दुसर्या पोळीला अर्धवट लाटून जेव्हा कणीक लावाल तेव्हा तव्यावरची पहीली पोळी उलटावी आणि आच जरा वाढवावी. इथे ती तव्याला जाम चिकटून बसणे अपेक्षीत नाही.
पोळपाटावरची दुसरी पोळी पूर्ण लाटून तव्यात जायला तयार ठेवावी आणि तव्यावरची पहिली पोळी तव्यावरून चिमट्याने उचलून पलटून (फ्लिप करून) आचेवर टाकावी, पोळपाटावरची लाटलेली पोळी तव्यात टाकावी तोवर पहीली पोळी बर्यापैकी भाजून झाली असेल ती डब्यात टाकावी.
(जरा फास्ट अॅक्शन आहे पण मला जमते म्हणजे कुणालाही अगदी सहज जमेल)
गॅस बारीक तवा गॅसवर विथ सेकंड पोळी. नाऊ, पोळपाट रिकामा इज. तिसरा गोळा लाटायला घेणे.
रीपीट द प्रोसेस.
मला पोळ्या करायला घेऊन त्याची सगळी उपकरणी घासून ओटा साफ करून पुसून व्हायला ३०/३५ मिनिटं लागतात.
टीपा -
पोळ्यांच्या तव्यात शक्यतो तेलाचं काही करू नये; केलंच तर तवा चांगला तारेच्या घासणीनं घासून तेलाचा अंश पूर्णपणे जाईल असं पाहावं.
पोळपाट, लाटणं, चिमटा अगदी कोरडा असला पाहीजे
हुश्य...
योकु, काय मस्त स्टेप्स
योकु, काय मस्त स्टेप्स लिहिल्यात.
@शोधक
@शोधक
ज्वारीत ग्लूटेन नसतं. त्यामुळे ही ट्रिक ज्वारीवर येत नाही. एवढं मला शास्त्रीय माहिती आहे. पण मला भाकरी करायचा अनुभव आणि एक्स्पर्टीज दोन्ही कमी आहे. त्यामुळे इकडे बाकी कुणाला ट्रिक माहिती असेल दुसरी.
त्रिकोणी घडीचा गोल करायला
त्रिकोणी घडीचा गोल करायला टॅंजंट मरत लाटायची. टोकाला टँजेन्ट लाटायचं आणि मग तसेच पुढे पुढे लाटत जायचं. पोळी आपल्या आपण फिरली पोळपाटावर की उत्तम. मग मस्त तंद्री लागते.
योकु भारी.
योकु भारी.
मला फुलके येत नाहीत. बराच प्रयत्न केला आता हे करून बघते.
योकु तुस्सी ग्रेट हो, भारी
योकु तुस्सी ग्रेट हो, भारी लिहलयस सगळ्या स्टेप्स (कणकेत मोहन, मिठ काहिच नाहि ?)
सिन्ड्रेलाची क्रुती आहे ज्वारीच्या भाकरिची त्या रेसिपिने ग्लुटेन कमी असेल तरी जमौन येतात. मी खुप एक्स्पर्ट नाही पण प्रत्येक भाकरी करताना गोळा भरपुर मळुन घ्यावा मग थापावा.
मी अलीकडेच पोळ्यांसाठी
मी अलीकडेच पोळ्यांसाठी लोखंडी तवा वापरायला सुरवात केली. पण अनेकदा सीझनिंग करून पण पहिल्या २/३ पोळ्यानंतर पुढच्या पोळ्या करपायला आणि चिकटायला लागतात. काय चुकतंय ? माझा गॅस कॉईलचा आहे. कमी केला कि पोळी शिजत नाही आणि मी घडीच्या पोळ्याच करते. तवा पुण्यातून तुळशीबागेत घेतला होता. सेम प्रॉब्लेम हॉकिन्स futura च्या तव्यात पण होतो. त्यामुळे झक्कत नॉनस्टिक परत काढावा लागतो. लॉजचा कास्ट आयरन चा पण आहे पण तो खूप जाड होतो मला.
देवकी ताई, सीमा थँक्स
देवकी ताई, सीमा थँक्स
योकू, स्टेप्स भारी आहेत. पण फुलके प्रकरण झेपणेबल अन परवडणारे दोन्ही नाही. ते छोटुसे फुलके किमान ६० -७० तरी लागतील एका वेळेला आमच्याकडे. त्यापेक्षा भाकरी नाहीतर चपात्या बऱ्या.
आम्ही पण सिहोर किंवा शरबती वापरतो. कणिक भिजवून वीसेक मिनिट ठेवली की जास्त मळायला लागत नाही, पोळ्या अगदी मऊ होतात. लाटायला वेळ लागतो थोडा, पण हाय फ्लेम वर पटकन होतात शेकून. बघू आता परत कधी केल्याच मी तर प्रयत्न करेन एकत्र करायचा.
श्रमविभागणी करा. एकाने लाटा,
श्रमविभागणी करा. एकाने लाटा, दुसऱ्याने भाजा.
ज्वारीच्या भाकरी करतानाचा
ज्वारीच्या भाकरी करतानाचा माझा अनुभव. पीठ जितकं ताजं तितक्या भाकरी करायला सोप्या. पिठाची तारीख पाहून त्यातल्या त्यात ताजं पीठ आणावं. बंगलोर मध्ये नामधारीमध्ये सर्वात चांगलं ज्वारी/बाजरी आणि इतर मिलेट्सचं पीठ मिळतं असं मला वाटतं. ज्वारी/बाजरी विकत आणून दळवून आणल्यास जास्त चांगलं. पण मला तेवढा उरक नाहीये.
ह्यावेळचं पीठ असंच पारखून आणून सुद्धा जास्त भरड निघालं आणि भाकरी तुटू लागल्या. गरम पाणीबिणी टाकून सुद्धा.
मग आणखी एक युक्ती अशी की उकळतं पाणी टाकून व्यवस्थित भिजवून तो गोळा नीट झाकून त्याला मायक्रोवेव मध्ये एखाद मिनिट फिरवायचा आणि काही मिनिटं त्याला तसंच घट्ट बंद करून ठेवून द्यायचं. उकड काढल्यागत होऊन त्या पिठाच्या लाटून भाक-या करता येतात.
अर्थात हा माझा अनुभव.
त्या दिवशी ज्वारीचं पीठ अगदी डब्याच्या तळाला लागलेलं. मग त्यात रागी (नाचणी)चं पीठ मिसळून त्याच्या वर दिल्याप्रमाणेच भाकरी केल्या तर अगदी मऊ पोळ्या असाव्या तशा झाल्या. आज तर मी फक्त रागीच्या पिठाच्या उकड काढून पोळ्या(च) केल्या. उत्तम झाल्या आहेत.
<<<श्रमविभागणी करा. एकाने
<<<श्रमविभागणी करा. एकाने लाटा, दुसऱ्याने भाजा>>>
हो करतो की पण घाई असेल तरच
ज्वारीचे पीठ कोमट किंवा त्यापेक्षा थोडे जास्त गरम पाण्यात नीट मळून घ्यावे, मग नाही भाकरी तुटत.
पण जी चव तांदळाच्या भाकरीला येते ती दुसऱ्या कुठल्याही नाही असे मला वाटते☺️
साध्या पोळ्या किंवा चपात्या
साध्या पोळ्या किंवा चपात्या (घडीच्या नव्हेत.) अगदी पूर्ण गोल होत नसतील, तर एक पिझ्झा कटर हाताशी ठेवावा. लाटून झाल्यावर कडांवरून झर्रकन फिरवावा. कापलेल्या पिठाची पट्टी भर्रकन
काढून घ्यावी आणि पिठाच्या एखाद्या गोळ्यात खस्सकन खुपसून द्यावी. हाकानाका. हवं तर आधी शिसपेन्सिल भरलेला कंपास फिरवावा आणि मग त्यावर कटर फिरवावा.
साध्या पोळ्या किंवा चपात्या
साध्या पोळ्या किंवा चपात्या (घडीच्या नव्हेत.) अगदी पूर्ण गोल होत नसतील, तर एक पिझ्झा कटर हाताशी ठेवावा. लाटून झाल्यावर कडांवरून झर्रकन फिरवावा. कापलेल्या पिठाची पट्टी भर्रकन काढून घ्यावी आणि पिठाच्या एखाद्या गोळ्यात खस्सकन खुपसून द्यावी. हाकानाका. हवं तर आधी शिसपेन्सिल भरलेला कंपास फिरवावा आणि मग त्यावर कटर फिरवावा.
एका पोळीला दोनदा करायचं का
एका पोळीला दोनदा करायचं का हीरा?

Submitted by पार्वती on 14
Submitted by पार्वती on 14 July, 2020 - 03:40 -> +१ अगदी याच पद्धतीने माझी ताईपण करते..
सध्या मी कणिक भिजवून पाण्यात डुम्बवत ठेवते सकाळी..तेल न लावता आणि जेवढी लागते त्याच्या ३/४थ गोळा भिजवते..दुपारी ऊरलेली मिक्स करून सारखी करते..पोळ्या उत्तम होतात.
योकू, छान लिहिले आहे, माझ्या
योकू, छान लिहिले आहे, माझ्या लग्नानंतर बाई च होती पोळी करायला , त्याने सवय गेली पोळ्या करण्याची, 10 12 पोळ्या करायला 1 तास लागू लागला या लॉक डाउन मध्ये, पण आता 30 मिनिटात 15 पोळ्या , पीठ मळून, ओटा आवरून होतात,
कणकेत मोहन, मिठ काहिच नाहि ?
कणकेत मोहन, मिठ काहिच नाहि ? >>> नोप काहीही नाही.
आजच रणवीर ब्रार ची फ्रँकी ची रेस्पी आलीये युट्यूबवर त्यात मैद्याची पोळी करायच्या वेळी तो सांगतो - फॅट आटा भिजवतांना घातलं तर एंड प्रॉडक्ट (भाजून/ तळून झाल्यावर अर्थात) फ्लेकी होतं उदा. कचौडी/ काही प्रकारचे पराठे इ.
आणि
फॅट आटा भिजवून मग वरून लावलं तर आटा लचीला/ स्ट्रेचेबल होतो आणि प्रॉडक्ट सॉफ्ट होतं.
पण चिमटिभर मिठ तरी हवच ह
पण चिमटिभर मिठ तरी हवच ह
योकू, दोनदा सांगितलं की
योकू, दोनदा सांगितलं की डोक्यात पक्कं बसतं.
पण सिरियसली, पिझ्झा कटरची आयडिया हुकमी रेमेडी आहे गोल्पोळी सिंड्रोमवर .
लग्नाआधी साधं पीठही न
लग्नाआधी साधं पीठही न मळलेल्या मला लग्नानंतर ऑफिसला जायच्या आधी आमच्या दोघांच्या डब्याच्या आणि बाकी मेंम्ब्रासाठी दुपार्च्या जेवणाच्या मिळुन १८-२० चपात्या करायला खुप जड जायचं. पीठ मळण्यापासुन चपाती लाटुन शेकवण्यापर्यंत कसरतच होती. त्यात आधी खाली बसुन चपात्या लाटुन मग उभ्याने गॅसवर शेकवायचं. कधी चपात्या एकमेकांना चिकटायच्या. कधी कडक व्हायच्या. कधी नाही नेहमीच कडकच व्हायच्या. अशी २ वर्ष गेली.
मग नव्या घरी रहायला आल्यानंतर अचानकच लाट्ता लाटता चपाती शेकवता येउ लागली. कसं जमलं वैगेरे काही माहित नाही. आपोआपच झालं. आता अगदी कितीही चपात्या, पोळ्या, फुलके करु शकते. तव्यातली चपाती शेकेपर्यंत पोळपाटावर दुसरी चपाती लाटुन तयार असते. तवा रिकामा रहात नाही. 
सिहोर किंवा शरबतीच्या चपात्या पोळ्या छान होतात. मला पॅक्ड पीठाच्या चपात्या आवडत नाहीत. आशिर्वाद वैगेरे.
त्यातल्या त्यात टेस्ट ऑफ लाईफ ठीक आहे.नेहमीच गहु चक्कीवरुन दळुन आणते.
भाकरी पण वरचेवर प्रयत्न करुन बर्यापैकी जमु लागलेली आहे. फक्त कोमट पाण्यात पीठ भिजवते.
क्वचित दुधात पीठ भिजवुन
क्वचित दुधात पीठ भिजवुन पोळ्या केल्यात. चवीत फरक जाणवला नाही. हा दुधाची स्निग्धता जाणवते. त्यांनाच दशम्या म्हणतात का?
फॅट आटा भिजवतांना घातलं तर
फॅट आटा भिजवतांना घातलं तर एंड प्रॉडक्ट (भाजून/ तळून झाल्यावर अर्थात) फ्लेकी होतं उदा. कचौडी/ काही प्रकारचे पराठे इ.
योकु, असं करण्याला शॉर्ट करणे असं म्हणतात. त्यावरून शॉर्टब्रेड हे नाव आले आहे. कणीक शॉर्ट असणे म्हणजे क्रम्बली असणे, म्हणजेच त्यात ग्लूटेनच्या इलॅस्टिक साखळ्या नसणे. आणि लॉंग असणे म्हणजे ग्लूटेन फॉर्मेशन व्यवस्थित झाले असणे. फॅट ग्लूटेन तयार होण्यात अडथळे आणतं. म्हणून पाय, बिस्कीट, शंकरपाळे, खारी वगैरे खुसखुशीत पदार्थात शॉर्टनिंग घालतात. आधी हे तूप किंवा लार्ड असायचं पण मागल्या काही वर्षांमध्ये डालड्यासारखी हायड्रोजनेटेड फॅट्स शॉर्टनिंग म्हणून वापरात आली. आणि बाहेर तर आपल्याकडे जसं डालडा हेच ब्रँडनाव प्रसिद्ध आहे तसंच क्रिसको आहे. मला वाटतं युकेमध्ये असावं. शॉर्टनिंग =क्रिसको
ओह. मी शॉर्टनिंगबद्दल लेखातच
ओह. मी शॉर्टनिंगबद्दल लेखातच लिहिलं आहे! रिपीटेशन बद्दल सॉरी!
Pages