प्रतिजैविके :--समज आणि गैरसमज.

Submitted by सुबोध खरे on 21 February, 2020 - 01:10

प्रतिजैविके :-- समज आणि गैरसमज.

सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?

सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ.

यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.

यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.

या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव

जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी किंवा जिवाणूंनी इतर जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.

यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.

जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.

१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.

२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.

दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.

काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
पाळी पुढे ढकलण्यासाठी वहिनीला दिलेली औषधे डॉक्टरांना न विचारता घेतली आणि नंतर पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे आलेल्या महिलेला तुम्ही "गरोदर आहात" त्यामुळे पाळी अली नाही हे सांगितल्यावर धक्का बसला. अर्थात तिला गर्भपात करून घेण्याची पुढची कटकट आणि खर्च आलाच.

दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.

३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.

४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.

५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.

६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.

७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते.

दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो.

अशीच स्थिती क्षयरोगाच्या रुग्णात दिसते. सुरुवातीला औषधे घेतल्यामुळे क्षयरोगाचे जंतू मोठ्या प्रमाणावर मरतात आणि त्यांचे विष शरीरभर पसरते. यामुळे रुग्णाची भूक जाते जेवण पचत नाही आणि त्याचे वजनही कमी होते. यामुळे अनेक रुग्ण विशेषतः हातावर पोट असणारे आणि शारीरिक कष्टाचे काम करणारे रुग्ण औषध सोडून देतात. यामुळे रोग बरा तर होत नाहीच परंतु शरीरात शिल्लक राहिलेले क्षयरोगाचे जंतू या प्रतिजैविकाला जुमानेनासे होतात( antibiotic resistant)

या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.

८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.

काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?

"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.

९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात केवळ "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही.

याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.

यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"

मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1

१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.

प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे

१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते

२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.

३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.

४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.

प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही.
बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते. त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात.
माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चा ही झाली आहे. केवळ त्याचे वैयक्तिक मत.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो.
तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की.

प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो.

जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने.

या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले.

जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली.

कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो.
ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो.

सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही.

दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे.
नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात.

मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो.

मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग औषध घ्या अथवा घेऊ नका. सर्दी खोकल्यासारखे अनेक साधे आजार घरगुती उपचारांनी बरे होतातच आणि सुरुवातीला तसेच करावे असाच मी आग्रह धरेन.

बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच.
शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल.

आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे?

१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.

बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे.

हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

समजा पाच दिवसांचा ॲण्टीबायोटिक्स चा कोर्स दिला किंवा अन्य औषध दिले व दोन दिवसात तुम्हाला बरे वाटू लागले तर उरलेले तीन दिवस कंपल्सरी औषध घ्यायचे असे सांगितले जाते त्याचा काही दुष्परिणाम?

आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. >> अ‍ॅलोपॅथी काय व कशी आहे ते रुग्णाला कळतच असते. पण त्यासाठी दुसर्‍या पॅथीना नावे ठेवायची गरज नाही असे मला वाटते. मला अ‍ॅलोपॅथीचा बराच त्रास झालेला आहे. आता होमिओपॅथीने खरंच गुण आलाय.
लेख चांगला आहे, पण दुसर्‍यांना नांवे ठेवली नसती तर अजून चांगला वाटला असता. 'दुसरे असे सांगतात' असे म्हणत तुम्ही पण तेच केलेत.

एके काळी मी इतर पॅथी वर टीका करत नसे.

परंतु जशी वर्षे जाताहेत तसे अनेक रोग जे बरे होऊ शकले असते ते होमियोपॅथी च्या लोकांनी बरेच महिने औषधोपचार करत मुळे हाताबाहेर गेलेले दिसून येत आहेत.
टकलावर केस वाढवण्याची खात्री देणाऱ्या मुकेश बात्रामुळे बीजांडकोषाचा कर्करोग( ovarian cancer) असलेल्या( मीच निदान केलेल्या) ४५ आनि ४७ वयाच्या दोन स्त्रिया डोळ्यासमोर मरताना पाहिल्या आहेत. "कॉन्स्टीट्युशनल डिसऑर्डर" म्हणून फेरम फॉस आणि फॉसम फेर देऊन सहा महिने झाले. या कालावधीत कर्करोग शरीरभर पसरला आणि पोटात पाणी झाल्यावर ते रुग्ण परत आले तोवर रोग हाताबाहेर गेला होता (स्टेज ४).
साधारण दोन तीन महिन्यात एक या दराने मूत्रपिंडातील खडे काढून देतो सांगून चोळ्त बसल्याने मूत्रपिंड खराब झालेले रुग्ण मी पाहतो आहे.

मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे काहीही फायदा न झालेले रुग्ण माझ्या रोजच्या पाहण्यात गेली २५ वर्षे आहेत.

पुण्यातील प्रथितयश डॉक्टर हबू आणि इतरही प्रतिष्ठित वैद्य खडीवाले, वेणीमाधवशास्त्री जोशी किंवा चंद्रशेखर जोशी यांचे मुतखडा किंवा पित्ताशयातील खडा याचे लष्करातील ६० रुग्ण( ज्यांना शल्यक्रिया करायची नव्हती) मी ३ वर्षे पर्यंत सोनोग्राफी करून पाहिले आहेत एकही रुग्णाचा एकही खडा गेलेला मी पाहिला नाही. पण आम्ही हे रोग बरे करून देतो हे छाती ठीकपणे सांगतात आणि ते सुद्धा "साईड इफेक्ट् शिवाय" या मूलमंत्रासकट.

बीजांडकोशातील साधी सिस्ट (follicular cyst) ला कर्करोग म्हणून रुग्णाला सांगायचे ( ही सिस्ट ३-४ महिन्यात स्वतःहून बरी होते) आणि सहा महिन्यात कर्करोग बरा केला म्हणून शेंडी लावायची. हे पण कित्येक दिवस पाहत आलो आहे.

आमच्या वर राहत असलेल्या आता अमेरिकेत असलेल्या मुलाची मुलगी ऑटिझम या रोगाची शिकार आहे. त्याच्या औषधाचे ५०००/- रुपये सांगितले जेंव्हा बाप "एन आर आय" आहे हे समजले तेंव्हा फी ५००० डॉलर्स झाली.
या बापाने संतापाने सांगितले मी ५००० रुपये देईन औषध द्यायचे तर द्या. डॉलर्स मिळवण्यासाठी आम्ही किती कष्ट करतो तुम्हाला माहीत नाही. गपचूप औषध दिले. दुर्दैवाने फायदा काही झाला नाहीच.

मुकेश बात्रा यांचा एक तरी लेख "साईड इफेक्ट् शिवाय" हे शब्द नसलेला दाखवून द्या. प्रत्येक होमियोपॅथ हेच रडगाणे गात असतो.

तुम्ही तुमचे धुणे धुवा की आधुनिक वैद्यकशास्त्राला शिव्या दिल्याशिवाय यांना जेवण घशाखाली उतरत नाही. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही प्रवृत्ती शिसारी आणणारी आहे.

अगोदर आम्ही सर्व रोग बरे करून देतो असा दावा करायचा. स्वतःला क्षयरोग झाला की मात्र आधुनिक औषधे घ्यायची हे करणारे दोन होमियोपॅथ माझ्या आसपास व्यवसाय करीत आहेत. त्यांची परिस्थिती पाहून त्याना "साबुदाण्याच्या गोळ्या" घ्या असे सांगायचं मोह मी आवरला.

असेच तीन (२ होमियोपॅथ आणि २ आयुर्वेद) व्यावसायिक स्वतःच्या मुतखड्यासाठी येतात. सुरवातीला मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत कि आमच्याकडे एकदम चमत्कार करणारी औषधे आहेत . सहा महिने एक वर्ष झाल्यावर अजूनही मुतखडे तिथेच आहेत हे पाहून आता काही बोलत नाहीत.
ते इतर रुग्णांना सांगणार का? कि आमच्याकडे मुतखड्यावर औषध नाही. तो धंद्याचा भाग झाला.

अब्जावधी लोक प्लेग कॉलरा विषमज्वर यांना बळी पडले किंवा देवी रोगाचे बळी जात होते तेंव्हा आयुर्वेद आणि होमियोपॅथी होतीच की पण प्रतिजैविके/ देवीची लस आल्यावर लोकांचे प्राण वाचले ही वस्तुस्थिती कशी नाकारणार?

आजही हेच होमियोपॅथ "लस टोचून घेऊ नका" हे सांगताना पाहतो तेंव्हा मात्र संताप आणि हतबल झाल्याची मिश्र भावना येते. (जालावर गुगलून पहा).

पूर्वी मी गप्प राहत असे परंतु आता स्पष्टपणे बोलल्यामुळे काही रुग्णांचा फायदा झालेला पाहिला आहे म्हणून हे बोलतो.

लेख माहितीपूर्ण आहे.
औषधं घेण्याच्या बाबतीत रुग्णच तारतम्य पाळत नाहीत हे कारण आहेच.
शहरातील प्रेस्टीज रेसमध्ये कुणाला मागे पडायचे नसते.

खूप खूप खूप धन्यवाद!! डॉ. सुरेश शिंदे यांची आठवण झाली. माबोवरील सर्व डॉक्टर लोकांना धन्यवाद. धनगराचं औषध घेणाऱ्या डॉ की कंपौ. सोडून.

>>लेख चांगला आहे, पण दुसर्‍यांना नांवे ठेवली नसती तर अजून चांगला वाटला असता.<< +१
तुम्ही मुंबईकर आहात हे गृहित धरुन उदाहरणादाखल डॉ. अरुण समसी यांचा संदर्भ देतो. मुंबईचे टॉप सर्जन, जीएस मेडिकलच्या सर्जरी डिपार्टमेंटचे हेड, भारतीय क्रिकेट संघाचे फिजियो इ. शिवाय अ‍ॅलोपथीचे नावाजलेले/लोकप्रिय शिक्षक असुनहि होमियोपथीची प्रॅक्टिस करायचे. केइएम मध्ये होमियोपथीचा विभाग हि त्यांच्या पुढाकाराने सुरु झाला होता. काय बरं कारण असेल या प्रयासामागे?

अगोदर आम्ही सर्व रोग बरे करून देतो असा दावा करायचा. स्वतःला क्षयरोग झाला की मात्र आधुनिक औषधे घ्यायची हे करणारे दोन होमियोपॅथ माझ्या आसपास व्यवसाय करीत आहेत

होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर हातात डिग्री मिळाली की थेट एखाद्या अ‍ॅलोपॅथी हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतात. वर्षभरात स्वतःचा दवाखाना टाकून १००% अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टिस करतात. काहीही रक्ताच्या चाचण्या करायला लावतात, ह्यांना पॅथॉलोजी रिपोर्ट कळतात की नाही याबद्दल शंकाच वाटते. पेशंटला ताप सुरू होऊन एक दोन दिवस जरी झालेले असतील तरी टायफॉइडकरता रक्त तपासायला सांगतात. ताप सुरू होऊन सहा दिवस झाल्यावरच ही टेस्ट करायची असते हे ह्यांना माहीत नसते.

डॉक्टर लेख खूप छान आणि माहिती पूर्ण आहे.
पण तरी असे वाटतं की लेखाचे तीन भागात विभाजन करायला हवे होत.
एकत्र सर्व सामान्य लोकांच्या डोक्यावरून जात .
ज्यांचा हा पेशा नाही किंवा अभ्यास नाही त्यांना अवघड होते समजणे.
पाहिले जिवाणू, विषाणू ह्यांची सविस्तर माहिती त्यांचे प्रकार
उपयोगी जिवाणू
मानवी शरीर ची जैविक यंत्रणा व्यवस्थित चालू राहण्या साठी अत्यंत आवशक्य काम
करणारे जिवाणू.
त्यांची मदत करायची पद्धत.
दुसरे रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू
त्यांना प्रतिकार करण्याची मानवी शरीराची ताकत

आणि नंतर प्रती जैविक असे विभाजन केले असते तर आम्हाला सोप गेले असते

तुमच्या डिग्री पेक्षा तुमचा अनुभव महत्वाचा असतो.
त्याच बरोबर तुम्ही रोगाकडे गंभीर पने बघता की आणि दुसऱ्या कोणत्या नजरेने बघत हे महत्त्वाचे.
डिग्री असलेला डॉक्टर अनुभवी असेल तर मास्टर डिग्री असलेला डॉक्टर अनुभवी नसेल तर डिग्री असलेल्या त्या डॉक्टर समोर मास्टर डिग्री वाला डॉक्टर कमी दर्जाचं असतो.
डिग्री आणि ज्ञान ह्याचा संबंध कधीच लावू नये

सहा दिवसाच्या टेस्ट जुन्या झाल्या
Widal test ने दोन दिवसात निदान होते? हीच तपासणी करायला सांगतात अजूनही.

मेडिकल फिल्डमध्ये सर्वात जास्त मेरीट एमबीबीएस अॅडमिशनसाठी असावं. लोकसंख्येच्या रेट्यातून एमबीबीएस साठी प्रयत्न करुनही प्रवेश न मिळाल्याने डीएच एम एस, बीएच एम एस , बिए एम एस बनलेल्यांना घर चालवण्यासाठी ग्राहक आवश्यक असतात. त्यामुळे रुग्णांची दिशाभूल केली जाते.

सुबोधजी आपले एक म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. रूग्णाच्या फायद्यासाठी डाॅ. ने स्पष्टच बोलले पाहिजे. कधीकधी एखाद्या रोगाचा ईलाज दोनतीन वेगवेगळे डाॅ. मिळून करतात. अशा वेळी एखाद्याच्या उपचारात काही कमतरता किंवा त्रुटी आढळली तर दुसरे डाॅ. सांगत नाहीत.त्यामुळे रूग्णाचे नुकसान होते.

अनुभव मधून आलेलं ज्ञान हे खरे.
शिक्षण घेताना आपण दुसऱ्याचे अनुभव आणि प्रयोग तून आलेलं निष्कर्ष ह्याचा अभ्यास करतो आणि तेच सत्य आहे असा समज करून घेतो.
मला अनुभवातून आलेलं ज्ञान महत्वाचे वाटते.
माझा अनुभव

मी रोज सकाळी 5 किलोमीटर आणि संध्या काळी 5 किलो मीटर असे चालतो.
चालण्यात तुमच्या वेगावर अनेक घटक परिणाम करत असतात.
तुमची चालण्याची पद्धत ,रस्त्याची अवस्था
,तुम्ही वापरात असलेले shoose.
Etc..
तुम्ही टाच असलेलं shoose वापरता की प्लॅन हे सुधा महत्वाचे आहे.
मी नेहमी टाच असलेलं बूट वापरात होतो.
आणि काही कारणास्तव sandle वापरले प्लेन वाले.
आणि काही दिवसांनी घोट्यात पाय दुखायला लागला .
डॉक्टर गाठला.
निष्कर्ष कॅल्शियम कमी झाल्या मुळे हाडे ठिसूळ.
थोडे हसून दुकानात गेलो टाच वाले बूट घेतले सर्व दुखणे बंद

डिग्री असलेला डॉक्टर अनुभवी असेल तर मास्टर डिग्री असलेला डॉक्टर अनुभवी नसेल तर डिग्री असलेल्या त्या डॉक्टर समोर मास्टर डिग्री वाला डॉक्टर कमी दर्जाचं असतो.

काहींच्या काही

25 वर्षे अनुभव असलेल्या MBBS कडून आपण शस्त्रक्रिया करून घ्याल की 1 वर्ष अनुभव असलेल्या सर्जन कडून

राजेश, तुम्ही गैरसमज पसरवण्याची क्लासिक देसी केस आहात. समजुन सुधारण्यासारखे वाटत नाही. सो अपने हाल पे सुखी रहा.

ज्या डॉक्टर. ल जास्तीत जास्त सर्जरी िचा अनुभव आहे त्या डॉक्टर कडून.
दुसऱ्या व्यक्तीच्या प्रयोगाचे निष्कर्ष काय आहे ह्याचा अभ्यास करून आणि पुस्तकी ज्ञान
चा वापर करून माणूस हुशार होत नाही .
तर स्व अनुभवातून मिळालेल्या ज्ञान मधून जो शिकतो ते खरे
ह्या मता वर मी ठाम आहे

लेख खूप आवडला....तुमच्या सडेतोड पणा मागे तुमची प्रामाणिक कळकळ अगदी जाणवली..तुम्ही प्रतिजैविकांबाबत ची भीती कमी केली. माझ्या मुलाला काही दिवसांपुर्वी antibiotics prescribe केले तेव्हां Doctor was insisting on taking probiotics longer than the antibiotics with it. ते फारच महाग वाटले . खरच आवश्यक आहेत का ते सोबत घेणे. तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.

आर्यन कितवे खोटे नाव माहीत नाही.
पण एक लक्षात ठेव अनुभवातून आलेलं
ज्ञान हेच खरे.
डिग्री आहे पण अनुभव नाही.
असे डॉक्टर असेल किंवा ड्रायव्हर असेल किंवा कोण्ही पण काही कामाचा नाही.

छान उपयुक्त लेख. पूर्वी वाचला होता तिथे login केले नसल्याने अभिप्राय दिला नव्हता.

ते दोन दिवसाचे typhoid चाचणी म्हणजेtyphidot IgM बद्दल बोलत असावेत.

Pages