प्रतिजैविके :--समज आणि गैरसमज.

Submitted by सुबोध खरे on 21 February, 2020 - 01:10

प्रतिजैविके :-- समज आणि गैरसमज.

सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?

सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ.

यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.

यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.

या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव

जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी किंवा जिवाणूंनी इतर जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.

यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.

जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.

१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.

२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.

दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.

काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
पाळी पुढे ढकलण्यासाठी वहिनीला दिलेली औषधे डॉक्टरांना न विचारता घेतली आणि नंतर पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे आलेल्या महिलेला तुम्ही "गरोदर आहात" त्यामुळे पाळी अली नाही हे सांगितल्यावर धक्का बसला. अर्थात तिला गर्भपात करून घेण्याची पुढची कटकट आणि खर्च आलाच.

दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.

३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.

४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.

५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.

६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.

७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते.

दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो.

अशीच स्थिती क्षयरोगाच्या रुग्णात दिसते. सुरुवातीला औषधे घेतल्यामुळे क्षयरोगाचे जंतू मोठ्या प्रमाणावर मरतात आणि त्यांचे विष शरीरभर पसरते. यामुळे रुग्णाची भूक जाते जेवण पचत नाही आणि त्याचे वजनही कमी होते. यामुळे अनेक रुग्ण विशेषतः हातावर पोट असणारे आणि शारीरिक कष्टाचे काम करणारे रुग्ण औषध सोडून देतात. यामुळे रोग बरा तर होत नाहीच परंतु शरीरात शिल्लक राहिलेले क्षयरोगाचे जंतू या प्रतिजैविकाला जुमानेनासे होतात( antibiotic resistant)

या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.

८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.

काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?

"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.

९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात केवळ "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही.

याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.

यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"

मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1

१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.

प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे

१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते

२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.

३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.

४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.

प्रतिजैविकांबरोबर अँटासिड देण्यासाठी कोणतेच तर्कशास्त्र नाही.
बरेच वेळेस सुदृढ प्रकृतीच्या बैठी कामे करणाऱ्या लोकाना( ही जमात आताशा फारच वाढलेली आहे) "अशीच" ऍसिडिटी होत असते. त्यामुळे नंतर कटकट नको म्हणून आणि भरपूर औषधे दिली नाहीत तर लोकांना हा डॉकटर बरोबर नाही असेही वाटत असते त्यासाठी डॉक्टर सर्रास अँटासिड लिहून देत असतात.
माझा एक अत्यंत हुशार, उत्कृष्ट असा हाडांचा डॉक्टर असलेला आणि नैतिक आणि प्रामाणिक व्यवसाय करणारा वर्गमित्र प्रत्येक रुग्णाला अँटासिड लिहून देतो. या मागे कोणतेही तर्कशास्त्र नाही. यावर चर्चा ही झाली आहे. केवळ त्याचे वैयक्तिक मत.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे. एड्स होतो तेंव्हा ही प्रतिकारशक्तीच खच्ची होते म्हणून माणूस अनेक रोगांना बळी पडतो.
तुम्हाला साधे कापले खरचटले तर कोणतेही औषध न घेता तुम्ही बरे होताच की.

प्रत्येक पेशींच्या पृष्ठभागावर त्यांच्या आतील रासायनिक रचनेचा आलेख लिहिलेला असतो. हा आपल्या पासपोर्ट सारखा असतो. आपल्या शरीरात दर सेकंदाला असंख्य जंतू प्रवेश करत असतात. या येणाऱ्या प्रत्येक जंतू अथवा पेशीचा "पासपोर्ट तपासणे" हे पांढऱ्या पेशीतील काही विविक्षित तर्हेच्या पेशींचे काम असते. पेशी हा पासपोर्ट तपासून तुमची "स्व" आणि "परकीय" अशी विभागणी करतात आणि ज्या पेशी परकीय आहेत त्यांना दुसऱ्या सैनिक पांढऱ्या पेशींकडे सुपूर्द करतात. या सैनिक पेशी परकीय पेशींचा नाश करीत असतात. तेंव्हा शरीरात शिरलेले जंतू हे ताबडतोब नष्ट केले जातात. जेंव्हा शिरले जंतू हे पांढऱ्या पेशींपेक्षा संख्याबलाने "फारच जास्त" असतात तेंव्हा ते पटकन शरीरभर पसरतात आणि आपल्याला रोग होतो. या वेळेत तूमचे शरीर काही स्वस्थ बसलेले नसते, ते नवीन पांढऱ्या पेशी तयार करण्याचे काम जोमाने करत असतात. ज्यावेळेस नवीन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतात तेंव्हा नैसर्गिक रित्या रोग आटोक्यात येऊ लागतो.

जेंव्हा पांढऱ्या पेशींचे वाढलेले प्रमाण सुद्धा जंतूंना अटकाव करू शकत नाही अशा वेळेस शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडते आणि माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्लेग, कॉलरा, विषमज्वर इ रोगांनी माणसे मरत असत ती या कारणाने.

या मधल्या काळात शरीराला हानी पोचू नये म्हणून हे अतिरिक्त जंतू प्रतिजैविके देऊन मारले जातात आणि रोग पटकन आटोक्यात येतो. यामुळेच प्रतिजैविकांचा शोध लागला आणि लक्षावधी अपमृत्यू टाळता आले.

जन्म मृत्यू चे हे प्रमाण संतुलित होते त्यामुळे १९५० पर्यंत जगाची लोकसंख्या आटोक्यात होती दुर्दैवाने मागच्या तीन पिढ्यानि सरासरी सात ते आठ मुलांना जन्म दिला आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जगाची लोकसंख्या गेल्या साठ वर्षात तिप्पट झाली.

कर्करोगाच्या पेशींचाही पासपोर्ट बदललेला असतो त्यामुळे अशा ९९ % कर्करोगाच्या पेशी आपोआप आपले शरीर नायनाट करीत असते. उरलेल्या १% पेशींचा पासपोर्ट आपल्या "स्व" पासपोर्टशी मिळताजुळता असल्याने त्या पेशींचे "परकीय" म्हणून निदान होत नाही आणि त्या पेशींपासून कर्करोग होतो.
ऑटो इम्यून डिसीज मध्ये आपल्या प्रतिकारशक्तीत बिघाड होतो आणि "स्व" च्या पेशी परकीय समजून त्यावर हल्ला चढवला जातो.

सतत प्रतिजैविके घेण्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती नीट विकसित होत नाही हे सत्य आहे. त्यातून आजकाल जरा काही झाले की डॉक्टरकडे बाळाला घेऊन जाणारे आणि लगेच प्रतिजैविक द्या असा आग्रह धरणारे "अति जागरूक" पालक फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. याची मुले " साजूक" असतात आणि जरा बाहेर काही खाल्ले किंवा पावसात भिजली की लगेच आजारी पडतात. आजारी पडला की एक दोन दिवस धीर धरा हे यांना समजतच नाही.

दोन तास ताप आटोक्यात येत नाही म्हणून लगेच इंजेक्शन द्या म्हणणारे कित्येक पालक दिसतात. एक मूल आणि त्याची काळजी वाहायला दोन आई बाप आणि चार आजी आजोबा या मुळे हे सर्रास दिसत्ते आहे.
नुसते तेवढेच नव्हे तर डॉक्टरकडे गेले की परत ताप येत कामा नये किंवा हगवण ताबडतोब थांबली पाहिजे हा आग्रह असतो. औषध दिले आणि त्यानंतर दोनदा शौचास झाले की डॉक्टर बदलणारे पालक आज काल भरपूर दिसतात.

मुलाच्या आजारपणासाठी आज रजा काढली आहे उद्या रजा मिळणार नाही तेंव्हा आज संध्यकाळपर्यंत मूल खडखडीत बरे झाले पाहिजे हा आग्रह -कम- धमकी असल्यावर नवशिका डॉक्टर प्रतिजैविकांचा मारा करतो.

मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आजारावर औषध/ प्रतिजैविक घेतलेच पाहिजे असे मुळीच नाही. बहुसंख्य आजार स्वतः हून बरे होतील मग औषध घ्या अथवा घेऊ नका. सर्दी खोकल्यासारखे अनेक साधे आजार घरगुती उपचारांनी बरे होतातच आणि सुरुवातीला तसेच करावे असाच मी आग्रह धरेन.

बाकी अनुभव म्हणाल तर लोकांना "बाहेरची बाधा" "भूत" "साक्षात्कार" यांचाही "अनुभव" येत असतोच.
शास्त्रीय कसोट्यांवर टिकला तर तो पुरावा म्हणता येईल.

आले, हळद, कांदा लसूण यात जंतुनाशक गुण आहेत परंतु त्यावर पूर्ण संशोधन होऊन त्याचे औषधात रूपांतर अजून तरी झालेले नाही. तोवर याचे जंतुनाशक गुण आयुर्वेदाला माहीत होतेच म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काय हशील आहे?

१२ व्या शतकानंतर वाढ खुंटलेले आणि दुराग्रहामुळे आधुनिक विज्ञानाची कास न धरता आपल्या दैदिप्यमान इतिहासातच रमलेले ते एक जुने शास्त्र आहे एवढेच मी म्हणेन.

बहुसंख्य आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी चे लोक आम्ही प्रतिकार शक्ती "वाढवतो" त्यामुळे रोग होणारच नाही असा दावा करतात. दुर्दैवाने यातील एकही दावा पुराव्याने अजून तरी शाबीत झालेला नाही.

एक लक्षात घ्या जेंव्हा प्रतिजैविके नव्हती तेंव्हा सुद्धा माणसे १०० वर्ष "पर्यंत" जगतच होती याचा सरळ अर्थ असा आहे की आपली प्रतिकारशक्ती हा रोग बरा होण्यासाठी आवश्यक असा एक "सर्वात महत्त्वाचा" घटक आहे.

हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आजाराचे निदान चुकणे
ही एक बऱ्याच वेळेला घडणारी घटना आहे.
मानवी शरीर हे यंत्र नाही. एक शरीर दुसऱ्या सारखे कधीच नसते.

फक्त डॉक्टर ना दोष देवून फायदा नाही
एक शिंक आली तरी डॉक्टर कडे जाणारे किंवा मेडिकल मधून औषध घेवून खाणारी लोक कमी नाहीत.
खोकला आला की टीबी झाली असेल
कुठे गाठ दिसली की कॅन्सर झाला असेल
जरा कुठे छाती मध्ये दुखलं की aattac आला असेल असे समजणारे कमी लोक नाहीत

जरा कुठे छाती मध्ये दुखलं की aattac आला असेल असे समजणारे कमी लोक नाहीत
Submitted by Rajesh188 on 25 February, 2020 - 03:09 >> राजू सारखे लोक असेच असतात.

Submitted by Rajesh188 on 25 February, 2020 - 03:09 >> राजू सारखे लोक असेच असतात.

110 किलो वजनाच्या आणि 120/160blood pressure असणाऱ्या म्हाताऱ्या विपु वाच

>>एवढेच कशाला मूल तापाने फणफणलेले असले तरी पॅरासेटेमॉल ची गोळी/सिरप काही देत नाहीत.>> हे असं तुमच्या डॉ. वर्गमित्राने सांगितलेलं असेल तर त्यावर तुमचा विश्वास बसतो का? असं कोणी प्रत्यक्षात करेल का?
हे धादांत आणि निखालस खोटं अतिरंजित बेजबाबदार आणि ग्रोस जनरलायझेशन करणारं वक्तव्य आहे.
असो. अग्री टू डिसअग्री करायचं तर यापुढे यावर लिहिणार नाही.

"हे धादांत आणि निखालस खोटं अतिरंजित बेजबाबदार आणि ग्रोस जनरलायझेशन करणारं वक्तव्य आहे."

माझ्या मेहुण्याच्या(बायकोच्या सख्ख्या चुलत भावाच्या) मुलाला दोन दिवस काहीही औषध दिले नव्हते. साधा विषाणूंचा ताप आहे काहीही देऊ नका म्हणून परत पाठवले. यानंतर आम्ही भारतातून त्याला औषधे पाठबली आणि कधीही लागले तर फोन कर म्हणून सांगितले।
यानंतर मी ही गोष्ट माझ्या मित्राना विचारली त्यावरून लिहिले आहे.

हे आपल्याला धादांत खोटे वाटत असेल तर आपल्यात कोणताही संवाद होऊ शकत नाही म्हणून मी येथेच थांबतो.
धन्यवाद

पुढच्या वेळी फार्मसी मध्ये जाऊन ओव्हर द काऊंटर टायलेनॉल आणायला सांगा. पॅरासिटेमॉल भारतातून पाठवलंत!!!! माझा खरंच विश्वास बसत नाहिये.

नुसतंच पॅरासेटेमॉल नव्हे तर amoxyclav
azithromycin, ondansetron, albenzazole, ibuprofen, norflox +metrogyl इ सिरप पण काकांच्या बरोबर पाठवलं आहे.

आपला विश्वास असो की नसो.
It does not matter.

Medicines are exorbitantly costly and someone on-site can ill afford them

पुढच्या वेळी फार्मसी मध्ये जाऊन ओव्हर द काऊंटर टायलेनॉल आणायला सांगा.

ही गोष्ट मेहुण्याने तेंव्हा सांगितली असती तर तेंव्हाच पाठवले असते फार्मसी मध्ये. परंतु त्याने फोन वर बोलताना सांगितले आणि आम्हाला धक्काच बसला.

यास्तव ही घेतलेली अग्रीम खबरदारी आहे

दोन दिवस काहीही औषध दिले नव्हते. >> अहो तुम्हीच लेखात लिहिताय की झटपट बरे व्ह्यायला पेशंट अँटिबायोटिकचा आग्रह धरतात आणि ते बरोबर नाही. आणि मग स्पेसिफिक केस मध्ये दोन दिवसात डॉ. ने अँटिबायोटिक दिले नाही म्हणून तुम्ही इकडून पाठवले हे ही लिहिताय ? काय म्हणू आता याला?? अहो ऑन व्हेरिअस काऊंट्स तुम्ही तुमच्याच लेखाला कॉन्टॅडीक्ट करताय.

व्हायरल तापावर अँटिबायोटिक काम करणार नाही ह्यात काय चूक सांगितलं डॉ ने? अ‍ॅसिटोमिनोफेन (टायलेनॉल) /आयब्युप्रोफेन ( अ‍ॅडव्हिल) जरुरी प्रमाणे फार्मसी मधुन आणुन घ्यायला डॉ. सांगतातच. त्याने ताप कमी होईल. इन्फेक्शन बॅक्टेरिअल आहे का व्ह्यायरल हे ३ दिवसांनी घसा दुखतोय का? कान ठणकतोय का? आणि असेल तर घसा आणि कान टेस्ट (म्हणजे डोळ्याने बॅटरीच्या प्रकाशात टेस्ट... कुठलिही फिजिकल टेस्ट न्हवे) करुन अ‍ॅमॉक्सिसिलिन.... किंवा जे काय ठीक असेल ते अँटिबायोटिक प्रिस्काईब केलंच असतं डॉ. नी.
बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे याची खात्री पटायच्या आधीच औषधे घेणे किती जबाबदार आहे तुम्हीच सांगा.

आधी औषधे प्रिस्काईब करत नाहीत म्हणत होतात... आता महाग आहेत म्हणून पाठवली म्हणताय. महाग आहेत, एकुणच वैद्यकीय मदत महाग आहे, प्रत्येकाला अ‍ॅक्सेसिबल असेलच असे नाही, ती अत्यंत कन्फ्युजिंग आहे, इन नेटवर्क - आऊट ऑफ नेटवर्क यात खर्च किती येणार ह्याचा काहीच अंदाज लागत नाही ... सगळं मान्य. अजिबात दुमत अर्थातच नाही.
मेहुणे तेव्हा नवीन असतील अमेरिकेत आणि लहान मुल आजारी पडलं की गोंधळून आणि घाबरुन जायला होतं हे अर्थात समजू शकतो. पण हाईंड साईट मध्ये आणि ते ही अँटिबायोटिकच्या ओव्हरडोस/ चुकीच्या वापर अधोरेखित करणार्‍या लेखात लेखकाकडूनच विरोधी समर्थन अपेक्षित न्हवतं.

Proud

लोका सांगे ...

अमेरिकेतला पेशंट न बघताच हे ईथून उपचार करणार आणि भारतातील आयुर्वेद वाले काय करतात , ह्यावर टिका करणार .

अमेरीकेत किती ताप असेल तर ताप कमी होण्याचे औषध द्यावे याची मार्गदर्शक तत्वे आहेत. शक्यतो ताप कमी करण्याच्या औषधांचा वापर कमी करण्याकडे कल असतो कारण त्याचेही साईड इफेक्ट्स आहेतच. मात्र १०१ ताप असला तरी फिवर रिड्यूसर नको, भरपूर पाणी/द्रव पदार्थ जावू दे, भरपूर विश्रांती, हवे तर गार पाण्याच्या घड्या ठेवा असे सांगितलेले पालकांना झेपत नाही. यात मी देखील आलेच. आमच्याकडे निदान रात्रीसाठी तरी १०० ताप असेल तर फिवर रिड्यूसर - हे आमच्या समाधानासाठी- असे होते. लेक मोठा झाल्यावर , हायस्कूल पासून भरपूर रेस्ट हे परवडणारे नाही तेव्हा फिवर रिड्युसर घेवून इतर मोठ्यांसारखेच घरुन कामे निपटणे असे सुरु झाले.
अमेरीकेत आरोग्यसेवा महाग आहे आणि त्यात भारतातून ऑन्साईट गेल्यावर बरेचदा सुरवातीचा मोठा डिडक्टिबल या प्रकारामुळे ती अधिक महाग होते. मात्र डॉकला आपली परीस्थिती सांगितल्यास ते जनरिक औषधे, कुठल्या फार्मसीत भरल्यास स्वस्त पडेल वगैरे सांगतात , फार्मसीनुसारही किंमत बदलते. ओवर द काउंटर औषधे बाबत फार्मसीचा स्वतःचा ब्रँड बरेचदा बराच स्वस्त असतो.

@अमितव
हे धादांत आणि निखालस खोटं अतिरंजित बेजबाबदार आणि ग्रोस जनरलायझेशन करणारं वक्तव्य आहे.

असं आपण कोणताही पुरावा नसताना म्हटलं आहे त्यानंतर मी जी वस्तुस्थिती होती ते मांडून आपलं वक्तव्य चूक आहे हे दाखवलं यावर आपण केलेल्या गोल आणि बिनबुडाच्या वक्तव्याचे खंडन करण्याची माझी अजिबात इच्छा नाही.

आपले भले होवो-__/\__

@blackcat
पच पच करणे हा आपला स्वभाव आहे.
व्हिडीओ कॉन्फरसिंग हे नाव आपण ऐकलं आहे का?
भाऊ आपल्या 2 वर्षाच्या मुलासाठी अपरात्री आपल्या डॉक्टर बहिणीकडून व्हिडीओ काँफेरेन्स करून काही तात्पुरते उपचार करू शकतो हे आपल्यास पचत नसेल तर त्याला कोण काय करणार?
असो
आपले भले करणे आपल्याच हातात आहे

गार पाण्याच्या घड्या ठेवा

मुळात ताप का येतो?

जर माणसाला जंतुसंसर्ग झाला तर त्याचे शरीर जंतूंशी सामना करू लागते यात त्या काही जंतूंचा आणि शरिरातील पंढऱ्यांपेशींचा मृत्यू होतो या प्रक्रियेत निर्माण झालेल्या रसायनांमुळे(pyrogens)
आपल्या मेंदूतील तापमान नियंत्रक यंत्रणा(thermostat) वरच्या तापमानाला सेट होते. यामुळे आपल्याला थंडी वाजून आणि कुडकूडून ताप भरतो. आणि हे शरीराचे तापमान वाढवण्यासाठी आपल्याच शरीरातील ऊर्जा खर्च होते.

लहान बालकांच्या शरीराचे क्षेत्रफळ वजनापेक्षा जास्त असते. त्यामुळे बालकाच्या शरीरातून प्रारणाने(radiation)उष्णता लवकर बाहेर पडते. आणि ही उष्णता परत निर्माण करण्यासाठी लागणारी ऊर्जा बालकाच्या शरीरातूनच घेतली जात असल्यामुळे बालकाला फार लवकर अशक्तपणा येतो.
ताप फार चढला तर डोक्यात जाऊन बाळास फेफरे येण्याची शक्यता असते(febrile convulsions)

अशा वेळेस गार पाण्याने अंग पुसून घेणे किंवा गार पाण्याच्या घड्या ठेवणे हा "इतर उपायांनी ताप कमी होईपर्यंतच" करण्याचा तात्पुरता उपाय आहे.

एकाच वेळेस शरीर आतून गरम होतं आहे आणि आपण बाहेरून ते थंड करत आहात हे
एकाच वेळेस ब्रेक आणि अक्सीलरेटर वर पाय ठेवून मोटार चालवण्यासारखे आहे.

तेंव्हा औषधांचा परिणाम होईपर्यंत ताप कमी करण्यासाठी गार पाण्याच्या घड्या ठेवणे हा फारच (30-45 मिनिटे) तात्पुरता उपाय आहे. तासन तास गार पाण्याच्या घड्या ठेवणे हे बालकांवर (आणि पालकांवर) अत्याचार करणेच आहे. आणि असा उपाय तासन तास करण्याला कोणताही शास्त्राधार मला आजतागायत सापडलेला नाही.

माझे मत चुकीचे आढळले तर ते मी बदलेनच

पॅरासेटेमॉल (किंवा तत्सम) औषध घेतल्यामुळे पायरोजनचा मेंदूतील तापमान नियंत्रकावर होणारा परिणाम ब्लॉक केला जातो त्यामुळे आपल्याला घाम येऊन ताप उतरतो. पॅरा सेटेमॉल चा परिणाम फार तर 8 तास राहतो. यामुळे हे औषध दिवसात तीन वेळेस घ्यावे लागते.

हे औषध गरोदर स्त्रियांना सुद्धा सुरक्षितपणे घेता येते. त्याचा गर्भावर किंवा नवजात बालकांवर कोणताही दुष्परिणाम आढळलेला नाही.

बाकी भरपूर द्रव पदार्थ देणें हे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून नक्कीच करावे आणि विश्रांती घेणे हेही योग्यच आहे.

भारतात 20-25 रुपयाला मिळणारे औषध 10 डॉलर्स किंवा युरो देऊन घेणे भारतातून तात्पुरते गेलेल्या माणसाला जीवावर येते.

कारण ऑन साईट कुटुंबासाहित जाणे हे एकंदर महाग पडते हे खरे आहे.

"Some parts of the immune system work better at a higher temperature, which strengthens resistance to infection and increases the odds of survival. "

या बद्दल काय मत आहे डॉक्टर?
असे असेल तर इन्फेक्शन कमी होण्या आधी गोळ्या देऊन / अन्य मार्गे ताप उतरवणे उलट इन्फेक्शन वाढवण्यास मदत करणार नाही का?
थोडक्यात ताप कुठल्या कारणाने आला आहे हे बघुन, योग्य तेव्हाच paracetamol द्यायला हवे का?

>>तेंव्हा औषधांचा परिणाम होईपर्यंत ताप कमी करण्यासाठी गार पाण्याच्या घड्या ठेवणे हा फारच (30-45 मिनिटे) तात्पुरता उपाय आहे. >>
तेच अपेक्षित असते. तासंतास घड्या ठेवा असे इथलेही डॉक सांगत नाहीत. गरज लागल्यास फिवर रिड्युसर हे इथेही आहेच.

मी तेच लिहिलं होतं.

माझ्या मेहुण्याच्या मुलाला 101 ताप असताना दोन दिवस साधं पॅरासेटेमॉलसुद्धा दिलं नाही. मेहुणा आणी त्याची बायको अगतिक झाले होते.
त्यांनी आम्हाला ही गोष्ट 8-10 दिवसानंतर सांगितली अन्यथा त्यांना तेंव्हाच आम्ही पॅरा सेटेमॉल घ्यायला सांगितले असते.

Some parts of the immune system work better at a higher temperature,

हे अगदी बरोबर आहे.
तापमान वाढल्यावर रासायनिक प्रक्रिया जलद होतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगलं काम करते.
परंतु ताप फार वाढला तर बालकात येणारा अशक्तपणा हा प्रतिकरशक्तीस कमजोर करू शकतो किंवा ताप फार वाढल्यास मेंदूत जाऊ शकतो अशा वेळेस ताप औषधाने खाली आणणे गरजेचे आहे.

आधुनिक औषध उपचार आणि रोगाचे निदान हे एक शास्त्र आहे,अनेक प्रयोग करून आणि नंतर निष्कर्ष काढून सिद्ध झालेलं.
रोगाचे निदान कसे करावे आणि त्या वर काय उपचार करावेत हे अभ्यास करून शोधले आहे आणि औषध शास्त्र सुद्धा मदतीला आहे ते औषध नक्की कसे कार्य करते हे सुद्धा सविस्तर डॉक्टर ना सांगत तरी पण एकच प्रकारच्या आजारावर काय औषध द्यावे किंवा देवू नये हे ठरवताना दोन डॉक्टर मध्ये मतभेद का होतात.

दोन डॉक्टर मध्ये मतभेद का होतात.

भौतिकशास्त्र हे एक बऱ्यापैकी सुस्पष्ट आणि अचूक शास्त्र असतानाही क्वांटम थिअरी नुसार प्रकाश हा कणांचा बनलेला आहे कि तरंगांचा याबद्दल एवढा वाद आहे.

जीवशास्त्र हे तितके गणिती खाक्याने चालणारे शास्त्र नाही

दोन माणसे एकमेकांशी अजिबात जुळत नसताना त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार समानच असतील हे कसे गृहीत धरणार.

कोणत्याही दोन माणसांचे हाताचे ठसे सुद्धा जुळत नाहीत

एका मारुती मोटारीचा सुटा भाग दुसऱ्या तशाच मोटारीला जुळतोच आणि ती व्यवस्थित चालते परंतु आईने दिलेला अवयव मुलात रोपण केला तर औषधांविना तो तिथे टिकत नाही. मुलाचे शरीर तो अवयव त्याग करते.

अशी स्थिती असताना दोन डॉक्टर एकाच रोगावर दोन थोडेसे भिन्न उपचार करतात यात काहीच आश्चर्य नाही.

एखाद्या रुग्णाला जोराचा ताप येत असेल तर एक डॉक्टर मलेरिया आहे असे गृहीत धरून त्याला क्लोरोक्वीन देतो( अशी भारतीय सरकारच्या आरोग्य खात्याची शिफारस आहे) तर दुसरा त्याची रक्त तपासणी करून मलेरियाचे जंतू असल्याचे दिसेपर्यंत देत नाही.

दोन्ही डॉक्टर आपापल्या जागी बरोबर असू शकतात.

आमच्या वर राहणारे काका ज्यांची दोन्ही मुले अमेरिकेत आहेत आणि आता काकांनाही अमेरिकन नागरिकत्व मिळालेले आहे. ते माझ्याकडे आले होते आणि सांगत होते कि सुबोध मला वाटतंय कि मला जंत झाले आहेत तर मी शौचाची तपासणी करून घेऊ का?

मी त्यांना शांतपणे म्हणालो, "काका तुम्हाला ३०० रुपये घालवायचे असतील तर तपासणी करून घ्या. मला विचारलं तर बाजूच्या औषधाच्या दुकानात जाऊन ५ रुपयाला मिळते ती बेन्डेक्सची गोळी(जंतांचे औषध) घ्या आणि थंड बसा. कारण जंतांची अंडी ४० % वेळेसच शौचाच्या तपासणीत आढळतात. कारण जंत हे मधून मधून आपली अंडी घालत असतात.

अमेरिकेतील डॉक्टर शौचाची तपासणी करून त्यात जंतांची अंडी दिसत नाहीत तोवर आपल्याला हे औषध देणार नाहीत.

दोन्ही डॉक्टर आपापल्या जागी बरोबर असू शकतात.

हे पटले.बरेचदा हे रुग्णाच्या एरिया आणि आर्थिक स्थिती वरूनही ठरत असावे.एखाद्या गरीब रुग्णाला 5 रु ची आयर्न गोळी चालू करायची की नाही ठरवायला 500 रु चा हेमोग्राम करायला सांगता येणार नाही.अमेरिकेत सोशल इन्श्युरन्स मध्ये टेस्ट चे पैसे कव्हर होत असतील त्यामुळे टेस्ट करून औषध सुचवणे परवडत असावे.

बरेचदा हे रुग्णाच्या एरिया आणि आर्थिक स्थिती वरूनही ठरत असावे.
अर्थातच

कॉर्पोरेट रुग्णालयात येणाऱ्या आणि गुगल आणि व्हॉट्स ऍप्प मधनं पी एच डी केलेल्या रुग्णांना रक्तातील हिमोग्लोबिनच नव्हे तर लोहाचे प्रमाण, लोह वाहून नेण्याची क्षमता इ सर्व तपासून घेतल्याशिवाय कोणतेही औषध देता येत नाही त्याशिवाय ज्या औषधाने ऍसिडिटी होणार नाही असे त्याच्या लेबलवर लिहिलेले आहे इ सर्व दाखवूनच औषध द्यावे लागते. मग त्या औषधाची किंमत एका गोळीसाठी २० रुपये असली तरी चालते.

हेच गरीब रुग्ण सरकारी पुरवठ्यातील (विनामूल्य) फेरस सल्फेट आनंदाने घेण्यास तयार असतात.त्याना फक्त समजावून सांगावे लागते कि हे औषध जेवणानंतरच घ्यायचं नाही तर "गरम" पडेल.

अर्थातच

कॉर्पोरेट रुग्णालयात येणाऱ्या आणि गुगल आणि व्हॉट्स ऍप्प मधनं पी एच डी केलेल्या रुग्णांना रक्तातील हिमोग्लोबिनच नव्हे

हे अशा प्रकारचे रुग्ण हे डॉक्टर साठी मोठी डोकेदुखी असतात.
डॉक्टर नी दिलेली गोळी सुद्धा हे गूगल वर तपासणार ,
Blood report cha arth Google var तपासणार .
आणि स्वतःचाच गोंधळ उडवून घेणार.
अशा रुग्णांचा कशावरच विश्वास नसतो..गूगल वरची माहिती खरी च असते असे काही नाही.

मीही गोळी गुगल वर बघते.या गोळीने नक्की काय काय होतं वगैरे.
गुगल ची विश्वासार्हता आणि मेडिकल+एमडी डिग्री याची बरोबरी कुठेही होऊ शकत नाही याची जाणीव आहे.डॉ वर पूर्ण विश्वास ठेवते.
एकदा ग्लोब नावाच्या फॉलिक ऍसिड गोळी ऐवजी एका मेडिकल वाल्याने बिनधास्त 'चालते, तशीच वेगळ्या कंपनी ची आहे' सांगून ग्लेवो नावाची गोळी दिली होती, जी पूर्ण वेगळ्या कारणांची होती.गुगल करून गोळी घेणे टाळलं.(थोडा अजून असर्टीव नेस दाखवला असता तर ती विकतच घेणं टाळता आलं असतं)

लेख चांगला आहे, माहितीपूर्ण. पण खालील प्रतिसाद वाचून थबकले.

आजाराचे निदान चुकणे
ही एक बऱ्याच वेळेला घडणारी घटना आहे.
मानवी शरीर हे यंत्र नाही. एक शरीर दुसऱ्या सारखे कधीच नसते.

निदान चुकवून चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचा 1 दिवसात मृत्यू झाल्याची घटना घडलेली नुकतीच पाहिली आहे. ज्यांच्या बाबतीत घडली ते कुटुंब गप्प बसले, घरात कोणी भांडणारे नसल्यामुळे.

इतर पॅथीवाले फसवतात ते फसवतात पण अलोपॅथीमध्येही रुग्णांना फसवणारे भरपूर डॉक्टर भरलेले आहेत.

दोन अलोपॅथी डॉक्टरचेही एकमत होत नाही हे वर प्रतिसादांमध्ये दिसतेय. दोघांनीही स्टॅंडर्ड एमबीबीएस हाच कोर्स केला असावा. तरीही मतांमध्ये इतके विरोधाभास. रुग्णाने नक्की कोणाचे ऐकून औषधोपचार घ्यावेत? डॉक्टर तर प्रॅक्टिस करत असतो. त्याचा परिणाम रुग्ण भोगतो.

<< डॉक्टर तर प्रॅक्टिस करत असतो. त्याचा परिणाम रुग्ण भोगतो. >>

मुळात अपेक्षा अशी असते की डॉक्टरने जादूची कांडी फिरवून पेशंटला क्षणात बरे करावे. गंमत म्हणजे पेशंट आधी नीट लाइफस्टाइल ठेवत नाही, बकाबका खाणार, व्यायाम करणार नाही, चालणे करणार नाही, दर वर्षी चेकअप करणार नाही, अगदी गळ्याशी आल्यावरच डॉक्टरकडे जाणार, इंटरनेटवर काहीतरी वाचून स्वतःवरच प्रयोग करणार असे असले की सगळा दोष डॉक्टरचा कसा? याउलट सगळेच डॉक्टरपण संत-महात्मा आहेत असे मी म्हणणार नाही. कट-प्रॅक्टिस, अनावश्यक ट्रीटमेंट वगैरे अनेक प्रकार चालतात, नाही असे नाही. टाळी दोन्ही हाताने वाजते.

लेख आवडला व पटलाही.
होमियोपॅथी / आयुर्वेद / युनानी वाले आमच्या औषधाचे साईड इफेक्ट्स नाहीत हे संगतात तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते कि तुमच्या औषधाचे मुळात इफेक्ट्सच नाहीत, मग साईड इफेक्ट्स कसले आलेत ?

Pages