इथे पुस्तके राहतात ...

Submitted by कुमार१ on 27 January, 2020 - 08:25

लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, ‘ कर्‍हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.

त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.

पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.
आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.

अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.

यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !

अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून ‘इंग्लीश वातावरणाचा’ आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.

हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !

सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस

शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !

सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून
मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.

पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.

अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !

पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्‍यांचा अगदी राग यायचा.

इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.

या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:

वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.

हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.

सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
***********************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

लेखाचे नावच अत्यंत आवडले. लेखही सुंदरच. स्थळ काळ व काही ग्रंथालयांची नावे बदलली तर माझेच अनुभव म्हणून खपवता येईल Wink

मिरज येथील मिरज विद्यार्थी संघाचे खरे मंदीर वाचनालय, मिशन हॉस्पिटलच्या आवारातील बायसिंगर मेमोरियल लायब्ररी, हैद्राबादमधील ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी, हैद्राबाद कोटी भागातील रविवारचा पुस्तकांचा जुना बाजार, लकडी पुलावरील इंटरनॅशनल, बुकगंगा ही वेबसाईट यांचे आयुष्यावरचे ऋण मोठे आहे. अंतर्नादच्या जोडीला 'आजचा सुधारक' हे मासिक फार जवळचे होते.

वसतिगृहातील काही मल्लू मित्र मैत्रिणींच्यामुळे इंग्रजी वाचनाला खरी दिशा मिळाली त्यांचेही योगदान अमूल्य आहे माझ्यासाठी. आणि गेली 15वर्षे सातत्याने मायबोलीवरील सदस्यांनी करून दिलेली पुस्तक ओळख, परीक्षण तसेच संदर्भ!

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
ट स,
स्थळ काळ व काही ग्रंथालयांची नावे बदलली तर माझेच अनुभव म्हणून खपवता येईल
>>>>
जरूर खपवा ! मला आवडेल.

‘वाचू आनंदे’ मध्ये एका पानावर ‘’कुणीतरी ब्रिटीश लायब्ररीवर ललित पाडा”, असा प्रतिसाद दिला आहे. त्याला मी या लेखात एका परिच्छेदाचा न्याय दिला आहे. Bw

मस्त लिहीले आहेत. खूप छान.
____
हत्याकांड म्ह्टलं की अभ्यंकर खून खटला/ जक्कल-सुतार- मुनवर शाह व बहुतेक अजुन कोणीतरी चौकडी च आठवते. पैकी मुनवर शाहचे 'आय अ‍ॅम नॉट गिल्टी" वाटतं पुस्तक मी वाचले होते.
________
विविध ग्रंथालयांनी आयुष्य फार फार समृद्ध केलेले आहे हे सत्य आहे.

छान लेख!! शासकीय, बीसीएल आणी काही प्रायव्हेट लायब्ररीज मधून पुस्तकं आणून त्याचा (वाचून) फडशा पाडायचा, रात्र रात्र जागून एकदा हातात घेतलेलं पुस्तक संपवायचं असा वाचनाचा कैफ होता एके काळी.

१० वी ची परिक्षा संपल्यावर सलग तीन दिवसात, आनंद यादवांचं, झोंबी, नांगरणी आणी घरभिंती वाचून काढलं होतं. सनी डेज, आयडॉल्स वगैरे पुस्तकं सुद्धा बहूदा त्याच काळातली. १२ वीच्या प्रिलीम्स च्या आधी एका पुस्तक प्रदर्शनातून राऊ आणलं होतं. प्रिलीम्स झाल्यावर वाचीन असं ठरवून, मग रोज थोडंसं चाळलं तरी चालेल, अशी पळवाट काढत, परिक्षा आणी पुस्तक एकदमच संपवलं होतं. धनंजय कीरांनी लिहीलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर मात्र सलग वाचलं होतं. बाबासाहेब पुरंदर्यांचं राजा शिवछत्रपती कधी हातात आलं आणी कधी (पहिल्यांदा) वाचलं ते आठवतही नाही, इतक्या वेळा ते नंतर वाचलं. असंच कुठल्याश्या (किरकोळ) आजारात शाळा बुडवून घरी बसलो असताना स्वामी वाचली होती. पु. लं. च्या पुस्तकांची तर पारायणं झाली आहेत. इंग्लिश पुस्तकं वाचायची सुरूवात अ‍ॅनिमल फार्म ने झाली की चिकन सूप सिरीज ने ते नक्की आठवत नाही. पी. जी. वूडहाऊस ची काही पुस्तकं वाचली. विनोदाचा एक वेगळाच बाज आहे. सर आर्थर कॉनन डोयल चं शेरलॉक होम्स कधीतरी बूकशेल्फ मधे आलं आणी सलग वाचत त्याचा फडशा पाडला होता - अशा सगळ्या आठवणींना एकदम उजाळा मिळाला.

कुमार सर इतकं समृद्ध तुमचं वाचन विश्व आहे हे पाहून आनंद झाला. तुमचे वैद्यकीय विषयांवरचे विविध लेख छानच असतात पण मला थोडेसे नीरस वाटतात. आताशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही लिहिता आहात हे बाकी मस्त!

खूप छान लेख. तुमचा वाचन प्रवास खूप समृद्ध असा आहे, आणि त्याची झलक तुमच्या लेखनात बघायला मिळतेच. वैद्यकीय विषयावरील माहिती देखील तुम्ही खूप सोप्या सरळ शब्दात देता हादेखील कदाचित त्याचाच परिणाम असावा. तुमचं लिखाण वाचून मला आमच्या biology च्या शिक्षकांची आठवण येते. त्यांचे कबीराचे दोहे तोंडपाठ होते आणि शिकवताना त्यांचा अगदी ते मुक्तहस्ते वापर करत. कधी कधी जीवशास्त्र विषय न घेतलेलं पब्लिक पण त्यासाठी त्यांच्या लेक्चर्स ला हजेरी लावत असे Happy

स्थळ काळ व काही ग्रंथालयांची नावे बदलली तर माझेच अनुभव म्हणून खपवता येईल Wink >> अगदी अगदी. नाव गाव नि (ब्रिटिश लाय्ब्ररीचे नाव वगळता ) इतर वाचनालये बदलली तर माझ्या नावावर पण लेख खपेल Happy कुमार तुमच्या लेखाच्या निमित्तने जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. टाटसन्स च्या वाचनलायाने ब्रिटीश लायब्ररीबरोबर जय्यत टक्कर दिली होती. अर्थात ब्रिटीश लायब्ररी मधे जेव्हढे क्लासिक्स मिळाले होते तेव्हढे इथे नव्हते पण वॅलेस, शेल्डन, चेस टाईप्स मटेरीयल भरपूर होते. मुंबई मराठी ग्रंथालय नि बीमसी ग्रंथालयाने मराठी वाचनाचा हिस्सा पुरवला होता. आमचे मुंबई मराठी ग्रंथालय आम्ही तिघा चौघांनी बसून टापटिप केले होते नि पूर्ण कॅट लॉग लिहून काढला होता एका सुट्टीत ते आठवते. अमेरिकेत रसिक ची लाय्ब्ररी मिळाल्यावर झालेला आनंद आठवतो. अगदी टीपीकल नसली तरी बरीच हौस भागवली रसिक ने.

पुस्तकं राहतात तिथे शेजारी राहणे भाग्याचं.
-----------
मी सहावीत असताना मैदानाजवळच्या भाटिया वाचनालयात बसून चांदोबा वाचायचो. मग हिंदी पुस्तकातील काही गोष्टी. गुजराती चांदोबा आणि चित्रलेखातील (तेव्हा मराठीत नव्हतं) तारक महेता आणि नारद याचे लेखन रमटप अक्षरं लावत शिकलो.
दादर सार्वजनिक वाचनालय आणि मुं मराठी ग्रंथसंग्रहालयात काय नाही ते विचारा. मग बिसीएलमधून चर्चिलची पुस्तके वाचली. ती कुठेच नसतात. मग फिश ट्यान्क, मधमाशी पालन वगैरे पुस्तके.
त्याकाळी पुस्तकेच हा आधार होता आणि महागडी पुस्तके विकत कोण घेणार?
मराठी विश्वकोश डोंबिवलीच्या गणेश वाचनालयात मिळाले. तसेच ज्योतिषाची तीन कपाटे भरून पुस्तकं होती. वर्षाची फी २१ रुपये आणि रोज आठ तास उघडे!
पर्यटनाचे लेख वाचणे यावर भागवावे लागे. रंगीत चित्र देणे पुस्तकात परवडत नसल्याने काव्यमय वर्णन असे. 'लाल माती निळे आकाश', अपुर्वाई इत्यादी. आता राज्ये आणि हॉटेले सचित्र माहितीपत्रके आणि पुस्तकेच प्रसिद्ध करतात. त्यांच्या माहिती केंद्रांत अथवा प्रदर्शनात देतात.
( असे प्रदर्शन ३-४-५ फेब्रुवारी बॉम्बे एक्सिबिशन सेंटर, एनएसई, गोरेगाव पूर्व येथे. ४ फे दोन ते। सात,आणि ५ फे अकरा ते सात सर्वांसाठी. साइट ttfotm dot com.)
-------
लेख आवडला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

सर्व नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार !

* रात्र रात्र जागून एकदा हातात घेतलेलं पुस्तक संपवायचं असा वाचनाचा कैफ होता एके काळी. >>>> +१११
* रा _बी, प्रामाणिक मत आवडले.

* टाटसन्स च्या वाचनलायाने ब्रिटीश लायब्ररीबरोबर जय्यत टक्कर दिली होती.
>>> ही नवी माहिती मिळाली.
* पुस्तकं राहतात तिथे शेजारी राहणे भाग्याचं. >>>> अगदी !
सर्वांचेच वाचनानुभव रोचक .

छान. आवडलं.

माझ्या लहानपणी घरासमोरच एक वाचनालय होतं. तिथे बसून वाचायला काहीही पैसे पडायचे नाहीत. मी चौथी-पाचवी ही दोन वर्षं तिथे जाऊन वाचत बसायचे. हॅन्स अँडरसनच्या परिकथा आणि अ‍ॅलिस इन वंडरलँड या दोन पुस्तकमालिका (मराठीत अनुवादित) तिथे प्रथम बघितल्या. त्यातली काही पुस्तकं वाचल्याची आठवतात. पण एकूण परिकथा हा प्रकार विशेष आवडला नव्हता. (हे स्टेटस आजपर्यंत तसंच आहे. Lol )
लहान मुलांची पुस्तकं घरी नेऊन वाचायची असतील तर तिथे महिना ५ रुपये वर्गणी असायची. पुढची १-२ वर्षं तशी वर्गणी भरून पुस्तकं वाचली. फास्टर फेणे, टारझन, वगैरे.

त्याच वाचनालयात आईचं सभासदत्व होतं. पुढे माझं बालवाचनालय मागे पडलं; मात्र आईनं आणलेल्या पुस्तकांपैकी काही आठवतात - सुमति क्षेत्रमाड्यांची एक मोठी ठोकळा कादंबरी (नाव आठवत नाही), ययाति - ही दोन्ही पूर्ण वाचून काढली होती. आणखीही काही होती. पूर्णिया, अ‍ॅना कॅरेनिना ही पुस्तकं चाळली होती. पूर्णिया पुस्तकाबद्दल आई कुणाशी तरी भारावून जाऊन बोलत असताना ऐकलं होतं. तेव्हा ठरवलं होतं, की पुढे आपण हे पुस्तक वाचायचं.

नंतर दुसर्‍या शहरात राहायला गेलो. दरम्यान कॉलेज सुरू झालेलं होतं. कॉलेजच्या वाचनालयातून बरीच पुस्तकं आणून वाचली. मग घराजवळ एक झकास लायब्ररी सुरू झाली. तिथला ग्रंथपाल अत्यंत उत्साही मनुष्य होता. वाचनालयात येणार्‍यांच्या आवडीनिवडी त्याला ठाऊक असायच्या. आपण पुस्तकांच्या कपाटापाशी उभं राहून एखादं पुस्तक पाहायला हातात घेतलं, की तो 'वाच ते नक्की, आवडेल तुला' / 'तुला आवडायचं नाही ते फारसं, त्यापेक्षा त्याच लेखकाचं/त्याच विषयावरचं हे वाच' असं सुचवायचा. एकदा मी असंच 'पर्व' पुस्तक हातात घेतलं. तोवर भैरप्पा हे नाव कधीही ऐकलेलं नव्हतं. मात्र ग्रंथपाल तत्काळ म्हणाला- नक्की वाच, सुंदर पुस्तक आहे. (या अभिप्रायासाठी मी आजही त्याला जाऊन थँक यू म्हणायला तयार आहे.) या वाचनालयात इंग्रजी पुस्तकंही बरीच वाचली. त्या वयात आवडणारी, पण इंग्रजी मजकूर वाचण्याची खरी सवय तिथे लागली.

लग्नानंतर महाराष्ट्राबाहेर गेले. तिथे थोड्या ओळखी झाल्यावर कळलं, की एक वयस्कर गृहस्थ फिरतं वाचनालय चालवतात. मी ताबडतोब त्यांना गाठलं. तर ते केवळ मासिकं द्यायचे असं कळलं. म्हटलं, मासिकं तर मासिकं. स्पोर्ट्सस्टार, रीडर्स डायजेस्ट ही आवडीची मासिकं त्यांच्याकडे असायची; त्यामुळे मी खूष! पण तेव्हा फेमिना वगैरे सुद्धा अथपासून इतिपर्यंत वाचायचे Lol वाचायला काहीतरी आहे, हेच समाधान होतं. ते वाचनालय वर्षभर सुरू होतं. आम्ही पुन्हा मुक्कामाचं शहर बदललं. त्यानंतर जवळपास १० वर्षं वाचन पूर्णपणे ठप्प पडलं होतं. त्या १० वर्षांत आम्ही ३ शहरं बदलली.

दरम्यान नवर्‍याच्या डेस्कवर इंटरनेट आलं. गूगल सर्च नवीन होतं. पुस्तकाचं नाव सर्च बॉक्समध्ये टाकलं की त्याबद्दल काही ना काही माहिती येते, हे अद्भुत होतं. त्यातच रसिकसाहित्यची ऑनलाइन पुस्तकखरेदी सुरू झाल्याचं दिसलं. मग तिथून अधाश्यासारखी १० पुस्तकं पोस्टाने मागवली. पुढे काही वर्षं तुरळक पुस्तक खरेदी सुरू होती.

१४-१५ वर्षांनी महाराष्ट्रात परतल्यावर पुन्हा एकदा वाचनालय शोधलं. तिथे भरपूर पुस्तकं वाचली. १-२ वर्षं ते सुरू होतं. घरं बदलली गेली तसं ते लांब लांब जात गेलं. मग परत काही वर्षं तुरळक पुस्तक खरेदी सुरू राहिली.

आता, मैं और मेरी किंडल लायब्ररी !! Blush

-----------------------

कुमार, हे लिहायला मला खूप मजा आली. जुन्या आठवणी निघाल्या. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. Happy

लेख आवडला.

शाळेत वेगळं वाचनालय असं नव्हतं, पण एके वर्षी वर्गातच आणून पुस्तके वाटली जायची . दर आठव ड्याला पुस्तके बदलायची. यात काही इंग्लिश क्लासिक्स होती असं आठवतं.
कॉलेजातली सगळ्यात आवडती जागा लायब्ररी होती. मी बहुतकरून काव्यसंग्रह वाचत असे. त्यातल्या अनेक कविता वहीत उतरवूनही ठेवल्या होत्या. छावा, मृत्यूंजय सारखी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय पुस्तके कधी वाचावीशी वाटली नाहीत. तेच चिंत्र्यंचं बरंचसं लेखन कॉलेजातच वाचलं होतं.
अभ्यासाच्या विषयांसाठी आपल्याकडच्या टेक्स्टबुक्सम ध्ये दिलेले विदेशी संदर्भग्रंथ लायबरीतून घेऊन वाचायला आणि त्यावरून नोट्स काढायला आवडायचे.
लायब्ररीत प्राध्यापकांसाठी तळघरासारखा एक वेगळा कक्ष होता. तिथे एकदा जायला आणि एका प्राध्यापिकेशी बसून गप्पा मारायला मिळालं होतं.

गेले दशकभर मुंमग्रंसं चा सभासद आहे. तिथे नवे कवितासंग्रह विकत घेतले जात नाहीत, याचं वाईट वाटतं. माझी वेगळी आवड आणि निवड तिथल्या कर्मचा र्‍यांना माहितीची झाली आहे.

मुलांसाठी काम करणार्‍या एका जागेशी संबंध आला. तिथे बूकवाला नावाच्या संस्थेने वाचनालय सुरू केले होते. त्यातली बहुतेक पुस्तके अमेरिकेतून आलेली होती. ती चाळायला आवडायचे. विश्वकोश, ज्ञानकोशाचे अनेक खंड तिथे होते. पण अगदी मेडिकल, इंजिनीयरिंगच्या अभ्यास क्रमातले ग्रंथही कोणी घरातली अडगळ म्हणून तिथे देणगी दिल्याचे दिसले.

तिथल्या मुलांसाठी मीही मराठी + इंग्रजी पुस्तके घेऊन वाचनालय चालवायचा प्रयत्न केला होता. पुस्तकांसाठी मागे लागणारे दोन का होईना मुलगे होते. वाचनाची आवड असलेल्या सहा मुलांना एकदा पुस्तक प्रदर्शनात नेऊन त्यांच्या पसंतीने प्रत्येकी दोन पुस्तके लायब्ररीसाठी विकत घेतली होती.

अगदी लहानपणी शेजारच्या मुलां सोबत घराजवळच्या अशाच एका घरगुती लायब्ररीत गेलेलो. तिथे फक्त कॉमिक्सच होती. माझ्या वाचनात हा टप्पा कधी आला नाही, त्यामुळे तिथे पुन्हा जाणे झाले नाही.

घरातल्या पुस्तकसंग्रहातून वाचनालय चालवावे असे क्वचित डोक्यात यायचे हे तुमच्या लेखातल्या दोन घरगुती वाचनालयांच्या आठवणीवरून मला आठवले.

इंग्रही पुस्तकांसाठी भारी वाचनालय जवळ नाही, याची खंत वाटते. चर्चगेटला ऑफिस होते, तेव्हा युसिस जवळच होते. पण तेव्हा वाचायला वेळ नव्हता. ऑफिसातली एक मैत्रीण पेटिट लायब्ररीची मेंबर होती. तिच्यासोबत दोन तीन वेळा तिथे गे लो होत. भव्य लायब्ररीची ती एक आठवण

सर्व नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार !
आता, मैं और मेरी किंडल लायब्ररी >>>
कालानुरूप बदल !

• बकरी जसा झाडाचा पाला खाते तशी पुस्तके खाते >
>>
व्यवस्थित पचवली म्हणजे झाले !

• घरातल्या पुस्तकसंग्रहातून वाचनालय चालवावे
>>>
चांगली कल्पना आहे. आजूबाजूची काही माणसे ओळखीखातर का होईना, थोडेफार वाचू लागतात.

मलाही घरातल्या पुस्तकसंग्रहातून लहानशी लायब्ररी सुरू करावी असं अनेकदा वाटतं.
पण कुणी पुस्तकं नीट वापरली नाहीत, कोपरे दुमडून परत केली, परतच केली नाहीत... मुळात लायब्ररीत फारसं कुणी आलंच नाही, तर मला फार फ्रस्ट्रेशन येईल Lol

>>>>>
लेखाचे नावच अत्यंत आवडले. लेखही सुंदरच >>>> +९९९
अधूनमधून ग्रंथालयांचा लाभ घेतलेला आहे.
>>>>>> अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते. >>>
+१११, पटेश.
>>>सॉमरसेट मॉम >>>>
डॉ, फार सुरेख आठवणी जागविल्यात. मॉमची ‘रेन’ ही दीर्घकथा केवळ अप्रतिम. ती प्रसिद्ध होण्यापूर्वी चाळीसेक प्रकाशकांनी नाकारली होती म्हणे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे मनापासून आभार !

माझी एक शंका:
आपण ग्रंथालय आणि वाचनालय हे शब्द साधारण एकाच अर्थी वापरतो.
ज्या ग्रंथालयात बसून वाचायची पण सोय असते, तेच वाचनालय ना ?

ज्या ग्रंथालयात बसून वाचायची पण सोय असते, तेच वाचनालय ना ? >>

वाचनालयात ग्रंथ असायलाच हवेत असे नाही. पुर्वी गणेश उत्सव मंडळांतर्फे चालवली जाणारी फक्त वर्तमानपत्राची वाचनालये कोपर्‍याकोपर्‍यावर असत.

महाबळेश्वरला एका ठिकाणी पुस्तकपंढरी आहे। नाव विसरलो. मला वाटलं त्याचाच लेख आहे.
---
गणेश मंदिर वाचनालयाचा उल्लेख केला तिथे शंभरेक मुलं अभ्यासासाठी बसायला येतात आपापली पुस्तके घेऊन. तिथेच मी तिथली पुस्तके वाचत असे. वार्षिक वर्गणीतच ज्ञानकोश वाचत असे. पुण्यात नपा वाचनालयात कुठे हेच ज्ञानकोश प्रत्येकवेळी पाचदहा रु भरुन वाचायला घ्यावे लागतात(?).
----------
बकरीची उपमा भयानकच हो!

>>> ग्रंथालय आणि वाचनालय>>>

मला असे वाटते की खालील गोष्टी असतील , तर ते ग्रंथालय:
व्यापक पुस्तक संग्रह, त्याची शास्त्रशुद्ध मांडणी, शोधसूची आणि प्रशिक्षित ग्रंथपाल.

.....नाहीतर वाचनालय.

हर्पेन, साद
सहमत. धन्यवाद.

मॉमची ‘रेन’ ही दीर्घकथा केवळ अप्रतिम.
>>> अगदी !

आवडला लेख. शीर्षकही समर्पकच. बर्याच आठवणी वर सांगितल्याप्रमाण् आहेत. फरक स्थळाचा. माझ्या लहानपणी आम्ही राहात होतो त्या जागेच्या तळमजल्यावर वाचनालय आणि ते चालवणार् काका नसते तर मला इतकी पुस्तकं पाहायलाही मिळाली नसती. त्यांचे या निमित्ताने जाहीर आभार मानू न घेते.

छान लेख! या निमित्ताने माझ्याही जुन्या आठवणी उजळल्या. लहान गावातून पुण्याला आल्यावर बिसीएलची मेंबरशिप मिळाली आणि खजीनाच हाती यावा असे झाले होते.

स्वाती, धन्यवाद.
.............................................
लेखात पी जी वुडहाउस यांचा उल्लेख आहे. त्याबद्दलची एक आठवण.

काही काळ एक ब्रिटीश डॉ. वुडहाउस यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये काम करीत होतो. त्यांच्या व माझ्या पहिल्या भेटीत मी त्यांना अगदी ठराविक प्रश्न विचारला, “ ते लेखक वुडहाउस तुमचे कोण?” त्यावर त्यांनी मंद स्मित करीत उत्तर दिले, “कोणीच नाही, आडनावबंधू देखील नाही. कारण,

I am Woodhouse and he is Wodehouse !”

हा स्पेलिंगचा बारकावा मला ‘पीजी’ यांची अनेक पुस्तके वाचूनही कधी लक्षात आला नव्हता.

Pages