शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).
मेलाटोनिनचे उत्पादन
आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).

डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.
मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी

“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.
• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.
• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.
• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !
प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.
मेलाटोनिनची अन्य कार्ये
झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स
वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.
निद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:
१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.
३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.
c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !
४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.
५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.
मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.
याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे.
शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.
सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
*************************************************************************************
>>नवीन Submitted by बुन्नु on
>>नवीन Submitted by बुन्नु on 22 January, 2020 - 09:38<<. +१
सरते शेवटी प्रत्येकाला दिवसाचे २४ तासच मिळतात, त्याचा विनिमय तुम्ही कसा करता यावर तुमचं भविष्य्/प्रगती इ. अवलंबुन असते...
वर दुपारच्या झोपेचा (वामकुक्षी) ओझरता उल्लेख आला आहे. ती सुद्दा आरोग्या करता चांगली असते असं काहि स्टडीज वरुन सिद्द झालेलं आहे. १५-२० मिनिटांची पावरनॅप उरलेल्या दिवसाची कार्यक्षमता वाढवते असा त्यांचा दावा आहे...
आरोग्य करता काय चांगले आणि
आरोग्य करता काय चांगले आणि काय वाईट हे 100% टक्के कोणीच सांगू शकत नाही..
फक्त विष सोडलं तर कोणत्याच गोष्टीचा परिणाम प्रत्येक व्यक्ती वर एक सारखा होत नाही
फक्त सरसारी वरून काही ठोक ताळे मांडले जातात.
प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळे असते .
प्रत्येक व्यक्ती च्या शरीरावर एकच गोष्टी चा वेग वेगळा परिणाम होतो.
हे माझे अनुभव आणि निरीक्षण ह्या वरून तयार झालेले मत आहे
घोरणे या समस्येवर एकदा लिहा.
घोरणे या समस्येवर एकदा लिहा. त्याला काही वैद्यकीय उपाय आहे का? अगोदर मी घोरत नव्हतो.>> मी अगोदर प्रचंड घोरायचो. व्यायाम करून वजन ६-७ किलो कमी झाल्यावर घोरणे बंद्/नगण्य झाले आहे. (अर्थात मला ऐकू येत नसल्यामुळे हा बायकोचा फीड्बॅक आहे.)
जी मंडळी खूप घोरतात त्यांनी वजन कमी करण्याचा उपाय/प्रयत्न करून बघावा.
गुगलून पाहिल्यावर इथे काही
गुगलून पाहिल्यावर इथे काही घोरणे कमी करायचे जिभेचे व्यायाम सापडले.
https://www.mdedge.com/chestphysician/article/102780/sleep-medicine/orop...
सकाळी उठून काय करता *हेच
सकाळी उठून काय करता *हेच जास्त* महत्त्वाचे आहे. उगाच लवकर उठे लवकर निजे चा गजर करण्यात काय अर्थ आहे?
आवडीने पहाटे उठणार्यांना नाउमेद करण्याची गरज नाहीच परंतु रात्री जागणाऱ्या आणि उशिरा उठणाऱ्या माणसांना दूषणे देणारी माणसे मात्र सर्वत्र दिसतात.
लहानपणापासून उशीरापर्यंत झोपल्याबद्दल किती जणांची बोलणी ऐकावी लागतात ते पहा.
मी स्वतः एम बी बी एस चा अभ्यास पहाटे पाच वाजेपर्यंत जागून केला आहे. ज्या वेळेला लेडीज हॉस्टेल मधल्या पोरींचे गजर किर्रर्र कुर्र वाजू लागत तेंव्हा मी झोपत असे आणि माझं काही वाईट झालं नाहीये. ))=((
राजेश जी +१०० सुबोध जी +१००
राजेश जी +१००
सुबोध जी +१००
छान लेख आणि प्रतिसाद
छान लेख आणि प्रतिसाद
मॅथ्यू वॉकर चं Why We Sleep हे पुस्तक पण छान आहे.
ऑडिओबुक पण आहे ह्याचं. युट्युबवर बरेच चांगले व्हिडिओज आहेत मॅथ्यू वॉकरचे याबद्दल.
सकाळी उठून काय करता *हेच
सकाळी उठून काय करता *हेच जास्त* महत्त्वाचे आहे>>>>>>>>>>>> बरोबर. ५.३० ला उठून जर नुसता फोनच बघणार असाल तर काही मतलब नाही.
लहानपणापासून उशीरापर्यंत झोपल्याबद्दल किती जणांची बोलणी ऐकावी लागतात ते पहा.>>>>>>>>>>>>> मी अजूनही ऐकते.
उगाच लवकर उठे लवकर निजे >>>>>> मला ही हे कधी जमलं नाही आणि जमणारही नाही.
जोपर्यंत माझी कमीत कमी ७ तास झोप होत नाही माझे डोळे उघडतच नाही.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
'Why We Sleep' बद्दल वर दोघांची शिफारस आलेली आहे. ज्यांनी ते वाचलंय त्यांनी 'वाचू आनंदे' मध्ये जरूर काही लिहा त्याबद्दल.
काही जणांना कधीकधी स्वप्ने
काही जणांना कधीकधी स्वप्ने पडतात. काहींना रोज. तर काहींना मुळीच पडत नाहीत. काहींना ही स्वप्ने लक्षातही राहतात.स्वप्ने पडलेली झोप चागली की बिन स्वप्नाची. जास्त मानसिक त्रास असेल तर स्वप्ने पडतात का?
Cuty, तुमच्या प्रश्नांची
Cuty, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी सवडीने संबंधित अभ्यास करून देईन.
………………………………..
इथल्या चर्चेतून एक लक्षात आले. मेलाटो. हे ऑनलाईन खुल्या बाजारात देखील मिळत असल्याने काही लोक ते वैद्यकीय सल्ल्याविना घेत आहेत; जे योग्य नाही. त्या अनुषंगाने काही नव्या संशोधनाची भर घालतो:
१. अंथरुणात पडल्यावर झोप येण्यास जो बराच वेळ लागतो, तो मेलाटो.च्या वापराने फक्त १० मिनिटे कमी होतो.
२. मेलाटो.हे निद्रानाशापेक्षाही दाह प्रतिबंधक आणि कर्करोगोपचार-पूरक म्हणून अधिक उपयुक्त ठरू शकेल.
३. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मेलाटो.चा स्व-वापर टाळावा. कारण त्या आजाराची औषधे आणि मेलाटो. यांची शरीरात अनिष्ट मारामारी होऊ शकते.
४. काही संधिदाह आणि ऑटोइम्यून आजारांच्या रुग्णांनीही त्याचा वापर टाळावा.
झोपेची तीव्रता आणि किती वेळ
झोपेची तीव्रता आणि किती वेळ झोपल्या वर झोप पूर्ण होते ह्याचा
काही तरी संबंध असावा.
ज्याला गाढ झोप लागते त्याची कमी वेळात झोप पूर्ण होते .
आणि ज्याची गाढ नसते त्याला जास्त वेळ झोपावे लागत.
सकाळी लवकर उठणे ही गोष्ट आरोग्य साठी चांगलच असावे.
लघवी ल तीव्र लागून सुद्धा
इतक्या वर्षा च्या उत्क्रांती नंतर माणसाचे biological clock tayar झालेलं आहे.
रात्री झोप आणि दिवसा जगणे ह्या वेळा जैविक घड्याळ मध्ये फिट असाव्यात.
आणि त्यानुसार शरीरात चालणाऱ्या जैविक क्रिया होत नसतील कशा वरून .
चयापचय,
स्मृती ची उजळणी आणि साठवणूक.
विविध स्नायू,अवयव,ग्रंथी ह्यांना आराम .
हे सर्व आपल्या रात्री जागल्या मुळे बिघडत असेल का .
असा प्रश्न विचाराासा वाटत आहे.
>>>> लघवी ल तीव्र लागून
>>>> लघवी ल तीव्र लागून सुद्धा तुम्ही उठला नाहीत तर लघवी करतोय टॉयलेट मध्ये अस स्वप्न पडून
>>>>>
अगदी, अगदी . लै डेंजर असतात अशी स्वप्ने. आळस न करता उठलेले चांगले अशा वेळी.
>>>> लघवी ल तीव्र लागून
ड पो
मला वाटलं सभ्य पोस्ट नाही
मला वाटलं सभ्य पोस्ट नाही म्हणून delete keli
लघवी ल तीव्र लागून सुद्धा
लघवी ल तीव्र लागून सुद्धा तुम्ही उठला नाहीत तर लघवी करतोय टॉयलेट मध्ये अस स्वप्न पडून अथरूनावर वर च तो कार्य क्रम होतो
कुमार sir
इथे मेंदू कसा कार्यान्वित होतो.
सांगाल का
जाग येत असताना जर कुठे काही
जाग येत असताना जर कुठे काही गाणे वगैरे लागले असेल तर स्वप्नात आपण ते गाणे स्वतः गात असतो किंवा कुठेतरी मैफीलीत एखाद्या गायकासमोर बसुन ऐकत असतो व जाग येते. जागे झाल्यावर समजते की तो टिव्हीवर वगैरे लागलेला ट्रॅक आहे.
मला स्वप्नाचा एक चमत्कारीक अनुभव आहे. कॉलेजला असताना मी हार्मोनियम शिकत होतो. गावातील भजनात एकदा कुठल्याशा रागात मी एक भजन ऐकले. घरी येवून मी त्या भजनाचे नोटेशन काढायचा खुप प्रयत्न केला पण मला स्वर तर बाजूला त्या भजनाचे स्केलही ठरवता येईना. खुप प्रयत्नांनंतर मी तो विषयच सोडून दिला. दोन दिवसांनी मला स्वप्न पडले की मी हार्मोनियमवर तेच भजन वाजवत आहे. गम्मत म्हणजे मला स्वप्नात हेही समजत होते की मला हे भजन वाजवता येत नाही. त्यामुळे मीच माझे वाजवणे अतिशय बारकाईने पहात राहीलो. सकाळी जाग आल्यावर मला त्यातले बरेचसे सुर आठवत होते. मी लगेच हार्मोनियम काढून पुन्हा नोटेशन काढायचा प्रयत्न केला व मला ते अगदी व्यवस्थित सापडले. मला या मागचे कारण अजुन समजले नाही.
हा धागा अगदी उपयुक्त आहे.

राजेश,
राजेश,
तुमचा ‘स्वप्नातील लघवी’ हा विषय महत्वाचा आणि प्रातिनिधिक आहे. ती समस्या गुंतागुंतीची आहे.
हरिहर,
रोचक अनुभव.
……………
या लेखाचा केंद्रबिंदू ‘मेलाटोनिन’ आहे. त्याचा झोपेशी संबंध, उपयुक्तता आणि समाजातील गैरवापर इतकीच या धाग्याची व्याप्ती होती.
परंतु, इथल्या सुरेख चर्चेतून असे दिसलेय, की बऱ्याच जणांना झोपेचे शास्त्र, झोप आणि आरोग्य, स्वप्ने आणि संबंधित मेंदूची कार्ये या सगळ्यांत रुची आहे. तसे काही प्रश्न वर आलेले आहेत. त्या प्रश्नांचा घाईने जालशोध घेऊन जुजबी उत्तरे देणे मला पसंत नाही.
सवडीने या विषयाचे सखोल वाचन करून एक वेगळाच धागा (झोप आणि शरीरशास्त्र) काढावासा वाटतोय. तेव्हा ही सगळी चर्चा करू.
तोपर्यंत.....
यथेच्छ झोपा !
काल सहज डोक्याला खोबरेल
काल सहज डोक्याला खोबरेल तेलाने मसाज करून झोपले (आतापर्यंत कधीच हेडमसाज करून झोपले नव्हते). अतिशय शांत झोप लागली व सकाळी पहाटे जाग आली. इतक्या कमी वेळात झोप कशी झाली हेच कळलं नाही. ४ वर्षाच्या मुलालाही हेडमसाज केला होता तर तो सुद्धा लवकर उठला. नेहमीप्रमाणे उठल्यावर चिडचिड केली नाही. काय लॉजिक असेल क्रुपया यावर प्रकाश टाकावा.
थोडे अवांतर:मलापण खोबरेल
थोडे अवांतर:मलापण खोबरेल तेलाचा एक अनुभव आहे.एकदा डोकं प्रचंड दुखत होतं.तेव्हा टाळूवर खोबरेल तेल ओतले आणि ते खसाखसा चोळून जिरवलं.लगेचच डोकं दुखायचं थांबलं
> 'Why We Sleep' बद्दल वर
> 'Why We Sleep' बद्दल वर दोघांची शिफारस आलेली आहे. ज्यांनी ते वाचलंय त्यांनी 'वाचू आनंदे' मध्ये जरूर काही लिहा त्याबद्दल.> +१
झोपेचे सुख माझ्या सासरच्यांना
झोपेचे सुख माझ्या सासरच्यांना दैवी देणगी म्हणून लाभले आहे.ते सर्व कधीही, कुठेही, केंव्हाही,आणि कसेही दोन मिनिटात झोपतात.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
नौटंकी व कनिका ,
तुमच्या अनुभवाचे शास्त्रीय स्पष्टीकरण आधुनिक वैद्यकात मला तरी मिळालेले नाही. पण अन्य पद्धतीच्या तज्ञाने यावर काही मत दिल्यास मलाही जाणून घ्यायला आवडेल.
तोपर्यंत आपण त्याला 'वैयक्तिक उपयुक्त अनुभव' असे म्हणूयात.
छान माहितीपर लेख डॉ.
छान माहितीपर लेख डॉ.


झोप जिव्हाळ्याचा विषय. लग्नाआधी खुप झोपायचे मी. खुपच.
आता प्रमाण कमीच झालंय. ५-६ तासच झोप मिळते.
सुट्टीच्या दिवशी पण दुपारी बाकी सगळे झोपलेले असताना, अगदी कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नाही कधीकधी. मग मी झोपलेल्यांवर चिडते
निकोनि नावचं एक हेअर ऑइल आहे. माझी पार्लर वाली केसगळती, डॅण्ड्रफ आणि इतर केसांच्या समस्यांसाठे तेल घे म्हणत होती. मी घेते घेते म्हणून टाळत होते. मागच्या विजिटला ती एका बाईला सांगत होती ती हे तेल लावलं की काय झोप येते शांत. एकदम गाढ.
आता मी तेल ऑर्डर केलंय
हरकत नाही, लावून बघा ते तेल
हरकत नाही, लावून बघा ते तेल आणि मग लिहा अनुभव !
चांगला अनुभव ऐकायला इथे बरेच जण उत्सुक आहेत.
झोपेचे सुख माझ्या सासरच्यांना
झोपेचे सुख माझ्या सासरच्यांना दैवी देणगी म्हणून लाभले आहे.ते सर्व कधीही, कुठेही, केंव्हाही,आणि कसेही दोन मिनिटात झोपतात.>> झोपेचे सुख हा इफेक्ट आहे मॅडम. त्यांना दैवी देणगी म्हणून चांगली सून मिळाली आहे हे त्याचे रूट कॉज आहे अस दिसतय.
समई यांनी लिहिलेले माझ्या
समई यांनी लिहिलेले माझ्या माहेरी लागू आहे. वडील, आत्या, काका सगळे नशीबवान आहेत. कधीही हुकमी झोप येते त्यांना. आजोबा तर अंगणातल्या जरा तापलेल्या कट्ट्यावर अहाहा म्हणून पाठ शेकत झोपत असत. आईचा वारसा मात्र माझ्याकडे आलाय. लहानशा आवाजानेही झोपमोड होते. आणि दुपारच्या झोपेत असे व्यत्यय हमखास आणणारे लोक नेहमीच असतात. मग जरा वैताग येतो.
परत एकदा हेडमसाज करून झोपले.
परत एकदा हेडमसाज करून झोपले. नाजूक बोटांनी नाही. चांगलं खसाखसा डोकं चोळले. अतिउत्तम झोप लागली.
@नौटंकी :
@नौटंकी :
मी काही यातला तद्न्य नाही. पण मला असे वाटते की डोके चोळण्यामुळे अक्युप्रेशर होत असावे. चोळताना तेलाचा उपयोग वंगणासारखा होत असावा.
Pages