सुखी झोपेचा साथी

Submitted by हेमंतकुमार on 19 January, 2020 - 10:51

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).

मेलाटोनिनचे उत्पादन
आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).

pineal wiki.png

डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.

मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी

sleep.jpg

“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.

• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.

• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.

• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !

प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.

मेलाटोनिनची अन्य कार्ये

झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स

वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.

melat tabs bott (2).jpgनिद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:

१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.

३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.

c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.

५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.

मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.

याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे.

शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.
सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
*************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप माहीतीपूर्ण लेख. धन्यवाद डॉक्टर ! एक प्रश्न आहे, एका मित्राने मेधावटी नावाचं 'औषध' घ्यायचा सल्ला दिला. नावावरुन हे एक आयुर्वेदीक औषध आहे असे वाटले. घटक पदार्थ काय आहेत ते पाहायला गूगल केलं तर अशी काही यादी दिसली नाही. आपल्याइथे औषधांवर घटक लिहीणे बंधनकारक नाही आहे का? आपल्यापैकी कोणाला काही माहीती आहे का ह्या 'मेधावटी' बद्द्ल? link here - https://www.patanjaliayurved.net/product/ayurvedic-medicine/vati/divya-m...

साद,
तुमच्या म्हणण्यात तथ्य असू शकेल. माझ्या माहितीनुसार अक्युप्रेशरमध्ये शरीराचे ठराविक ‘बिंदू’ दाबायला सांगतात. खसाखसा चोळणे हा प्रकार वेगळा आहे.
अर्थात संबंधित तज्ञाचे मत महत्वाचे.

पल्वली ,
धन्यवाद. तुमचा तो दुवा पाहिला. औषधाचे घटक दिलेले नाहीत खरे. ‘एक्स्ट्रा पावर’ हा जाहिरातीचा भाग असू शकतो.
अर्थात संबंधित तज्ञाचे मत महत्वाचे.

.तेव्हा टाळूवर खोबरेल तेल ओतले आणि ते खसाखसा चोळून जिरवलं.लगेचच डोकं दुखायचं थांबलं

मूळ डोकं दुखणं म्हणजे काय ते लक्षात घ्या

मेंदू कापला तरी तुम्हाला दुखणार नाही कारण मेंदू मध्ये वेदनेच्या नसा नसतातच.

ते मेंदूची आवरणे (meninges) आणि कवटीच्या बाहेरील स्नायू यांच्यावर ताण आला तर डोके दुखते.

मेंदूत पाणी झाले किंवा मेंदूचा ट्युमर झाला तर मेंदूची आवरणे (meninges) ताणली जाऊन डोके दुखते.

आणि मानसिक ताण / भांडण झाले तर मानेचे स्नायू आखडतात(spasm) त्यामुळे डोके दुखते. हा प्रकार बायकांत जास्त होतो. शेजारणीशी सासूशी /सुनेशी/ नवऱ्याशी भांडण झाले कि डोके दुखते. आणि एकदा दुखायला लागले कि थांबत नाही.

झोप झाली नाही किंवा डोळ्याला ताण पडला तर डोळ्याचे स्नायू यावर ताण पडतो. त्यामुळे डोके दुखते.

दुःख हि संवेदना सावकाश जाणाऱ्या नसातून जाते(nonmyelinated) तर दाब(pressure) आणि कम्प( vibration) या संवेदना वेगाने जाणाऱ्या नसातून जातात.(myelinated).

तेंव्हा केसातून नुसता हात फिरवला किंवा डोके चेपले/ मालिश केले तर या दाब(pressure) आणि कम्प( vibration) यातून संवेदना मेंदूपर्यंत जातात आणि जाताना त्या दुःख या संवेदनेला प्रवेश बंद करतात. यामुळे आपले डोके दुखणे थांबते.

जिज्ञासूंनी गेट थिअरी वाचून पहा.
https://en.wikipedia.org/wiki/Gate_control_theory

शिवाय मानेला आणि डोक्याला मालिश केले तर डोक्याचे आणि मानेचे आखडलेले(spasm) स्नायू मोकळे होतात आणि आपले दुखणे थांबते.

अमृतांजन/ टायगर/ झंडू बाम यात अशीच क्रिया करणारे (counterirritation) औषध (मेंथॉल किंवा कापूर किंवा मिथाईल सॅलिसिलेट) असते. हे औषध लावून डोके चोळले तर यामुळेच बरे वाटते.

बायका अतिविचार करतात त्यामुळे डोक्याचे आणि मानेचे स्नायू आखडतात यामुले त्यांना झोप लागण्यास जास्त वेळ लागतो. डोक्याला मालिश केले कि हे स्नायू मोकळे होतात.

ऍक्यूप्रेशरने हेच होते. बनफुल किंवा नवरत्न तेलात मेंथॉल असते त्यामुळे नुसतेच मालिश नव्हे तर (counterirritation) मुळे पण डोके दुखणे थांबून डोके हलके झाल्याची सुखद संवेदना पसरते. https://en.wikipedia.org/wiki/Counterirritant

तेंव्हा कोणत्याही तेलाने मालिश करताना केवळ डोकेच नव्हे तर मन आणि पाठीचा वरचा भाग यावरही दाब दिला तर जास्त लवकर डोके थांबते आणि सुखद लहर शरीरभर पसरल्याची जाणीव होते.

करून पहा

कोविदने लादलेल्या संचारबंदीमुळे लोकांच्या झोपेवर काही परिणाम झाल्याचे दिसले. त्यातील काही निरीक्षणे:

१. रोज सकाळी उठून कामावर जायचे नसल्याने ‘उशीरा झोपे, उशीरा उठे’ अशी सवय लागतेय. त्यातून आळशीपणा अंगात मुरतोय.
२. ज्यांनी घरकाम व छंदात रमवून घेतले आहे त्यांची झोप छान होत आहे. पण ज्यांना ‘घरी बसून काय करू’ या प्रश्नाने छळले आहे, त्यांची झोप मात्र बिघडते आहे.

३. कॉलेज तरुण/ तरुणी जाम खूष आहेत. रात्री हवे तेवढे जागून सकाळी मनाप्रमाणे केव्हाही उठता येतंय. हे त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे !

४. एकूणच मोबाईल व कम्प्युटरचा वापर वाढल्याने डोळ्यांवरचा ताण वाढतो आहे.

..... एकूण आपले जैविक घड्याळ अनियमित होताना दिसतंय.

>>>>
कॉलेज तरुण/ तरुणी जाम खूष आहेत. रात्री हवे तेवढे जागून सकाळी मनाप्रमाणे केव्हाही उठता येतंय. हे त्यांच्यासाठी स्वर्गसुख आहे ! >>>
अगदी. पाहतोय घरी व आजूबाजूस.

मी सध्या एक दीड च्या सुमाराला झोपते आणि सकाळी दहा साडे दहाला उठते. Happy वेळ मिळत असल्याने भरपूर व्यायाम आणि डाएट मात्र सुरू आहे, सो ३ किलो कमी झाले या काळात Happy

ज्येष्ठांची दुपारची झोप आणि त्याचा आकलनक्षमतेवरील परिणाम हा एक संशोधनाचा रोचक विषय आहे. यावर आतापर्यंत अनेक संशोधने झालीत आणि त्यांचे निष्कर्ष उलट-सुलट आहेत. त्यांचा आढावा घेणारा एक शास्त्रीय लेख नुकताच वाचला. त्यातील काही मुद्दे :

१. वाढत्या वयानुसार शरीरातील दाहप्रक्रिया वाढत जातात. शरीराचा यावरील एक नैसर्गिक प्रतिसाद म्हणून झोप काम करते. दाहाच्या प्रमाणानुसार झोपेचे प्रमाण वाढते.

२. दुपारच्या झोपेचा कालावधी दहा मिनिटे ते दीड तास असल्यास त्याचा आकलनक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र दोन तासांहून अधिक काळ असल्यास दुष्परिणाम होऊ शकतो.

३. रात्रीची झोप कमी झाल्यास पुढच्या दिवशीची दुपारची झोप जास्त येणे हे नैसर्गिकच. पण रात्रीची व्यवस्थित असूनही जर दुपारची दीर्घकाळ होत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Benzodiazepines गटातील झोप येण्याची औषधे टाळावीच हे सुचविणारे एक छान व्यंगचित्र :

fig6.jpg

ती घेणे म्हणजे मेंदूवर हातोडा मारून त्याला चूप बसवणे !

चिन्मयी, चांगला प्रश्न.

एखाद्या व्यक्तीच्या घोरण्याची तक्रार फक्त त्याच्या शयन जोडीदाराकडूनच येत असेल, आणि संबंधित व्यक्तीला दिवसा गुंगी येणे किंवा अन्य काही आजार नसतील, तर मग तसे काळजीचे कारण नसते.

अशा घोरण्यासाठी काही सोपे उपाय असे :
१.पलंगावर झोपल्यावर कटाक्षाने पाठीवर न झोपणे. डाव्या कुशीवर झोपण्याची सवय अधिक चांगली.

२. लठ्ठ असल्यास वजन कमी करणे. रक्तदाब अधिक असल्यास त्यावरही उपचार करणे.
३. या उपायांनी फरक न पडल्यास तज्ञांचा सल्ला घेता येईल. अलीकडे डोक्याखाली घ्यायची विशिष्ट उशी मिळते. त्यामुळे डोक्याची विशिष्ट अवस्था ठेवली जाते आणि तोंड बंद राहू शकते. अर्थात गाढ झोप लागल्यानंतर त्याची उपयुक्तता तितकी राहत नाही.

४. तोंडामध्ये ठेवण्याची काही उपकरणेही निघाली आहेत (dental devices). त्याबद्दल संबंधित तज्ञ सांगू शकतील.

नवरा प्रचंड घोरतो. अगदी दुसर्या रुममधे जाऊन झोपला तरी आवाज येतोच. विशेष म्हणजे अंथरूणावर पडल्यापडल्या लगेच ५-६ सेकंदात घोरणं चालू. म्हणजे एवढ्या लगेच झोप कशी लागते देव जाणे. हल्लीच त्रास वाढलाय. त्याला वरचेवर सर्दी होते थोडी थोडी. मला झोप मिळत नाहीच नीट पण मुलगी लहान आहे १८ महिन्यांची आणि तिची पण झोप चाळवली जाते त्याच्या आवाजाने. कधीकधी घाबरून जागी होते आणि रडते ती. कुशीवर झोपून पण घोरतोच. Amazon वर नाकात लावायचे क्लीप्स आहेत त्याचा उपयोग होतो का? डॉक्टरकडे जाऊन काही फरक पडू शकतो का? इथे कुणाला असा त्रास झालाय का?

माझी झोप चांगली आहे पण विचित्र वेळी येते
खूप वर्षे रात्री उशिरा ड्युटी केल्याने आता कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप येतच नाही
रात्री मी एकदम फ्रेश असतो, लोकं सकाळी उठल्यावर असतात तसा
त्यामुळे माझा दिवस उशिरा सुरू होऊन उशिरा संपतो
मला एकाने मेलटनिंन सांगितले म्हणून 3 mg घेऊन पाहिले
काही फारसा फरक जाणवला नाही
एक दोन दिवस मस्त जांभया येऊन झोप आली
पण त्याचे असे आहे की झोप येतोय असे कळतच पटकन झोपावं लागत
एकदा ती ट्रेन सुटली की मग लवकर परत झोप येत नाही

सोबत कुणी घोरत असेल तर स्वतःच्या कानात कापसाचे बोळे घालून झोपावे. Light 1 (लहान मूल असेल तर लागू नाही.)

<< लवकर परत झोप येत नाही >>
पडल्या पडल्या झोप लागणे आणि लगेच शौचाला होणे, ही सुखी माणसाची लक्षणे आहेत.

भरत , त्या महत्त्वाच्या आजाराबद्दल मी लिहिलेले नाही .अभ्यास करावा लागेल
धन्यवाद
....
आत्ताच बप्पी लाहिरींची कोशिशसे कामयाबी तक कार्यक्रमातली जुनी मुलाखत पाहिली
आदरांजली !

हा लेख मुळात मेलाटोनिन संबंधी आहे. या संदर्भातील काही नवे संशोधन:

गेल्या दशकात मेलाटोनिन औषधाचा खप प्रगत देशांमध्ये सुमारे पाचपट वाढला आहे (बऱ्याच ठिकाणी ते डॉक्टरांच्या चिट्ठीविना मिळत असल्यामुळे). हे औषध म्हणून घेणे सर्वांसाठी सुरक्षित नाही - विशेषता मधुमेही आणि मधुमेहपूर्व अवस्था असलेले लोक.

मेलाटोनिनची शरीरातील पातळी वाढली असता ते इन्सुलिनला काही प्रमाणात विरोध करते. काही लोकांना रात्री उशिरा जेवायची सवय असते आणि त्यानंतर तर ते पुरेसे वेळाचे अंतर न ठेवता झोपी जातात. जसजशी रात्र वाढत जाते तसे मेलाटोनिनचे प्रमाण निसर्गता वाढते. खूप उशिराने जेवण केल्यास ग्लुकोजचा चयापचय बिघडतो. त्यातूनच ग्लुकोज- रक्तपातळी वाढण्याकडे कल होतो.

>>> औषध म्हणून घेणे सर्वांसाठी सुरक्षित नाही - विशेषता मधुमेही आणि मधुमेहपूर्व अवस्था असलेले लोक.>>>
हे महत्वाचे. उपयुक्त माहिती.

अमेरिकेत गेली कित्येक वर्षे दोन भिन्न मोसमांत ‘डे-लाइट सेविंग टाइम (DST)' ची संकल्पना राबवली जाते. यानुसार दरवर्षी Spring मध्ये घड्याळे एक तास पुढे नेली जातात, तर Autumn मध्ये ती पुन्हा पूर्ववत केली जातात. व्यवसाय आणि विरंगुळा या दोन्ही दृष्टीने त्याचे काही फायदे असल्याने ही कल्पना अस्तित्वात आली.

नुकतेच अमेरिकेच्या संसदेने ‘कायमस्वरूपी डीएसटी’ हे विधेयक मंजूर केले आहे. परंतु या निर्णयाविरोधात निद्रातज्ञांच्या वैद्यकिय संघटनेने आवाज उठवला आहे. त्यांच्या मते असा कायमस्वरूपी बदल वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी चांगला नाही. आपल्या शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ सूर्यानुसार चालत असते. आपण जेव्हा कृत्रिमरीत्या घड्याळाच्या वेळा बदलतो त्यातून हृदय व मेंदूकार्यात बिघाड, काही मनोविकार आणि वाहनांचे अपघात या सर्व गोष्टींमध्ये वाढ होते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

1. https://jcsm.aasm.org/doi/10.5664/jcsm.8780
2. https://www.wsj.com/amp/articles/why-permanent-daylight-saving-time-is-b...

>>>नुकतेच अमेरिकेच्या संसदेने ‘कायमस्वरूपी डीएसटी’ हे विधेयक मंजूर केले आ>>>>
अजून त्यावर राष्ट्राध्यक्षांची सही व्हायची आहे असे दिसते.
https://www.reuters.com/world/us/us-senate-approves-bill-that-would-make...

https://www.youtube.com/watch?v=3nplKb46RDM
कालच बहिणीशी बोलणे झाले होते वरच्या युट्युब व्हिडीओविषयी. स्वामी सवितानंद यांनी झोप न लागण्याविषयी दिलेले स्पष्टिकरण आहे. आज हा लेख वर आला अन उत्सुकतेने वाचले तर अगदी डॉ. कुमार यांनी दिलेल्या माहितीशी मिळतेजुळते वाटले. कि अंधार पडु लागतो तसतसे हे हार्मोन स्त्रवायला सुरुवात होते, अन कमीत कमी प्रकाशाची सवय करुन घ्यावी.
मलासुद्धा रात्रभर झोप निट न लागण्याचा त्रास होता. आता स्क्रीन टाईम कमी करुन रात्री साडे दहालाच झोपायची सवय केली. तरीही पहिली झोप चांगली लागते. पुन्हा रात्री अडीच- तीनला उठुन मोबाईल चेक कराय्चे. आता तेही बंद केले तेव्हा आता पहाटे ५ ला उठले तरी फ्रेश वाटते.
वरच्या लिन्कमधे १६ व्या मिनिटापासुन बघा. Happy

१६ व्या मिनिटापासुन बघा
>>> छान. आवडले.

पुन्हा रात्री अडीच- तीनला उठुन मोबाईल चेक कराय्चे. आता तेही बंद केले

>>> वा, अभिनंदन !!

दक्षिण कोरिया : निद्रानाशाची गंभीर समस्या

*जागतिक अर्थव्यवस्थेत पहिल्या दहा क्रमांकात मोडणारा हा देश. कित्येक नागरिक दिवसाचे १४ तास किंवा अधिक काळ कार्यालयीन काम करतात.
* मात्र इथे काही लाख नागरिकांना निद्रानाशाची समस्या भेडसावते आहे. त्यातील कित्येक जण झोपेच्या गोळ्यांचे व्यसनी झालेले आहेत.
* काही लोकांच्या झोपेत चालत जाण्याच्या सवयीने अपघातही होत आहेत.

* एकंदरीत इथला निद्रानाश-संबंधित उद्योग (औषधे, विशिष्ट गाद्या, उश्या, इ.) भरभराटीस आला आहे.

https://youtu.be/PLxQg1tYjWU

"मध्यरात्रीनंतरचे" मन या गृहीतकावर आधारित एक संशोधन वाचनात आले.
मध्यरात्रीनंतर झोप न लागल्यामुळे जागे असणे हे तब्येतीस हानिकारक आहे.

नैसर्गिक जैविक घड्याळाच्या विरुद्ध वागल्यास अशा समस्या उद्भवतात:
१. नकारात्मक विचार
२. निर्णयक्षमतेवर विपरीत परिणाम
३.मनात धोकादायक कल्पनांचा संचार

https://www.frontiersin.org/articles/10.3389/fnetp.2021.830338/full

नारकोलेप्सी नावाचा एक दीर्घकालीन निद्राविकार असतो. यामध्ये दिवसा प्रचंड झोप वारंवार येत राहते परंतु रात्री ती लागण्यास खूप वेळ लागतो. अशा लोकांमध्ये स्नायू देखील एकदम शिथिल पडतात.
या विकाराच्या कारण मीमांसेत orexin या रसायनाचा अभाव आढळून आला आहे. त्यासाठी काही जनुकीय घटक जबाबदार असतात.

त्यांच्यावरील उपयुक्त संशोधन केल्याबद्दल शरीरविज्ञानातील ब्रेक थ्रू हा मानाचा पुरस्कार अमेरिका व जपानच्या प्रत्येकी एक संशोधकांना २०२३ साठी एकत्रित जाहीर झाला.

https://www.newscientist.com/article/2339153-scientists-who-discovered-c...

Pages