सुखी झोपेचा साथी

Submitted by कुमार१ on 19 January, 2020 - 10:51

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).

मेलाटोनिनचे उत्पादन
आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).

pineal wiki.png

डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.

मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी

sleep.jpg

“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.

• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.

• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.

• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !

प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.

मेलाटोनिनची अन्य कार्ये

झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स

वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.

melat tabs bott (2).jpgनिद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:

१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.

३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.

c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.

५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.

मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.

याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे.

शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.
सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
*************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम लेख.
मी, स्ट्रेस मुळे कमी झोप व त्यामुळे पचन खराब मग ह्या प्रकाराने हैराण होते , तेव्हा सगळी हर्बल प्रकार( सगळे झोपेचे चहा प्रकार ) करून झाल्यावर , शेवटी मेलाटोनिन घेतली. बराच फरक झाला. पण तोच उपाय, आईला लागू नाही पडला. म्हणजे, मेलाटोनिन घेवून सुद्धा ती जागीच.. तात्पर्य हेच की, प्रत्येकाचा शारीरीक प्रतिसाद वेगळा असतो.
मी काही काळापुरतीच घेतली, अगदीच शेवटचा उपाय म्हणून..

आता, फोन दुसर्‍या रूममधे ठेवते आणि बर्‍याच नातेवाईकांच्या कस्क काय ग्रूप मधून बाहेर पडले. आता शांत झोपते.

फारच छान लेख. यावेळेस जेट लॅग अतोनात अतोनात जाणवला. एनीवे बायपोलर डिसॉर्डरमध्ये झोपेची सायकल नियंत्रित करणारी 'सर्कॅडिअन (circadian rhythm)' दोषपूर्ण असते त्यात जेटलॅग म्हणजे आधीच मर्कट , त्यात मद्य प्यायले, नंतर विंचू चावला गत!!
_________
मेलॅटोनिनचा जननेंद्रियाशी संबंधित हार्मोन्स्शी संबंध असतो हे माहीत नव्हते. हे वाचण्यासारखे असेल. मला कुतूहल आहे.
_________
तुमचे सर्व लेख आवडतात.

>>तुमचे सर्व लेख आवडतात.
+१

>> आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !
महत्त्वाचे!

ही सर्व माहीती नविनच आहे माझ्यासाठी. काहीच माहीत नव्हते. झोपेचा आजवर कधी त्रास झाला नाही त्यामुळे निद्रानाशवाल्यांचे दुःख माहीत नाही.

सुंदर लेख.
निद्रानाश असणार्यांनी रात्री 8 नंतर मोबाईल संगणक दूरदर्शन पाहू/वापरू नये.
मोबाईल मध्ये आजकाल एक नाईट मोड म्हणून येते ज्यात निळा प्रकाश गाळला जातो त्याचा ही नक्की वापर करावा
स्वानुभव-- मला झोपेची अजिबात तक्रार नाही परंतु आताशा रात्री 7 नंतर चहा किंवा कोफी घेतली तर झोप यायला फार उशीर होतो (रात्रीचे 2 वाजतात)
यास्तव चाळीस च्या वरील लोकांना ज्यांना कोप कमी लागते त्यांना मी रात्री चहा कॉफी सारखी उत्तेजक पेये घेऊ नका असाच सल्ला देईन

माहितीपूर्ण लेख.
ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते>>> हो त्यामुळे अंध व्यक्तिंना कायम झोपेची समस्या असते. त्यांचे बायोलॉजीकल घड्याळ काही महिन्यांनी थोडे पुढे-मागे होत असते.
माझ्या मूलासाठी (तो ३ वर्षाचा होता तेव्हाही) ब-याच लोकांनी मेलाटोनिन वापरण्याचा सल्ला दिला होता. पण असे औषध देऊन झोपवणे व त्याची सवय लावणे मला पटत नाही.
खेळ, अभ्यास, जेवणाच्या वेळा पाळल्या तरी वेळेत झोप येईल असे नाही. त्यातल्या त्यात २४ तासांमधे ९-१० तास झोपतो हिच जमेची बाजू.

छान माहितीपुर्ण लेख! Happy

एक निरिक्षण- आजही गावी गेल्यावर डोळ्यावर 8-8.30 लाच झोप यायला सुरवात होते. पण इकडे घरी असताना मात्र 1.30- 2.00 पर्यत निद्रादेवीची आराधना करावी लागते.. गावी आजही संध्याकाळ झाली कि पिवळे बल्ब वापरले जातात.पण घरात एलईडी लाईट्स आहेत. कदाचित त्यामुळे देखील थोडाफार फरक पडत असावा.. असे वाटते.

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
आपणा सर्वांना आयुष्यभर उत्तम नैसर्गिक झोप मिळो !
झम्पी, तुमचे उपाय आवडले.

सामो,
मेलॅटोनिनचा जननेंद्रियाशी संबंधित हार्मोन्स्शी संबंध >>>>>
चांगला मुद्दा असल्याने दखल स्वतंत्र प्रतिसादात घेईन.

सुबोध, चहा कॉफीच्या वेळेशी सहमत.
सोनाली, अंधांचा मुद्दा बरोबर.

मन्या, दिव्यांचा मुद्दा +१
चामुंडराय, वाचून बघतो.

तुमचे सगळेच लेख मी नियमित वाचते, कदाचित प्रतिक्रिया द्यायच्या राहून जातात, पण सगळे लेख आवर्जून वाचते. बऱ्याचदा अनेकवेळाही वाचले आहेत आणि बऱ्याच जणांना लेख वाचायला लिंक्स देते. माझ्यासारखेच सगळ्याना लेख अतिशय आवडतात.

तुमच्या आरोग्य सिरीजमधला हाही एक माहितीपूर्ण लेख. माहिती आवडली आणि झोपेचे नियम अमलात आणायचा निश्चय केला आहे. डॉ सुबोधच्या रात्री कॉफी पिण्याच्या टीपबद्दल आभारी. यापुढे मी संध्याकाळी कॉफी प्यायची सवय बंद करते.

मानव, मीरा
धन्यवाद ! २०२० मध्ये तुमची प्रथमच भेट होत असल्याने आवर्जून शुभेच्छा !

एक विनंती :

जेट- लॅग ला मराठी शब्द सुचवा !
जालकोश 'जेट अंतर' असे म्हणतोय. ते पटत नाही.

सामो,

आता मेलाटोनीन आणि जननेन्द्रिये यांचा संबंध पाहू. अद्याप यासंदर्भातले बरेचसे संशोधन प्राण्यांत झालेले आहे. त्यामुळे त्याचे सर्व निष्कर्ष माणसाला घाईने लावता येणार नाहीत.
पुरुष व स्त्री बीजांडे यांना नियंत्रित करणारी FSH LH ही हॉर्मोन्स मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून स्त्रवतात. मुलेमुली वयात येण्याच्या दरम्यान तर या दोघांचे कार्य अतिशय महत्वाचे ठरते. मेलाटोनीनचा या २ हॉर्मोन्सच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मुलांत त्याचा वापर टाळावा अशी शिफारस आहे.
........
ऋतुराज, उ बो
धन्यवाद.

मला कधीच माझी झोप पूर्ण झाली असं वाटत नाही. रात्री अधून मधून कूस बदलताना जाग येते पण लगेच झोप लागते. रात्री ११ वाजता झोपले तरी सकाळी ७:३० ते पावणेआठला मुश्किलीने उठते. दुपारी झोपत नाही. उठल्यावर फ्रेश वाटत नाही. या सगळ्यात जसं रुटीन पाहिजे तसं मॅनेज होत नाही. या अति झोपेवर काही उपाय आहे का?

छान लेख!

मला रात्री लिहायला बसायचा मूड असेल तर मी कॉफी घेते. झोप येवुन लिंक तुटत नाही. Happy
झोपेची समस्या नाहीये, त्यामुळे इतरांचे अनुभ्व वाचायला आवडतील.

नौटंकी,
तुम्हाला बाकी जर कुठला शारीरिक/ मानसिक आजार नसेल, तर अतिझोप हा आजार म्हणता येत नाही. मेंदूला जेवढी विश्रांतीची आवश्यकता असते तितकी तो घेतो, असे साधारण म्हणता येईल. वाढत्या वयानुसार ती कमी होऊ शकेल.

‘झोपशास्त्र’ ही आता वैद्यकाची एक स्वतंत्र शाखा म्हणून विकसित होत आहे. महानगरांत असे काही तद्न्य उदयास आलेले आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार विशिष्ट तपासण्या उपलब्ध असतात. निद्रानाश खूप छळत असल्यास अशा तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
उ बो,
छान सुचवणी. यावरून आमच्या शालेय पाठ्यपुस्तकातील “यथेच्छ झोपा” हा अनंत काणेकरांचा लघुनिबंध आठवला.
विनिता , आभार !

अति झोपेवर काही उपाय आहे का?

कशाला उपाय करताय?

सुखाने झोपा.

झोप हे असे एकच सुख आहे जे अक्षरशः फुकट मिळते. आणि ते कित्येंकांच्या नशिबात नसते.

झोपेत आपले एक तृतीयांश आयुष्य फुकट जाते असे म्हणणाऱ्यां लोकांच्या नादाला उगाच लागू नका.

मी रोज दुपारी सुद्धा झोपतो आणि शक्य असेल तेवढेच(कमीत कमी) काम करतो.

जगात मेहनतीची किंमत असती तर गाढव हे प्राण्यांचा राजा झाले असते.

उगाच नाही 'प्राण्यांचा राजा' सिंह दिवसात २० तास झोपतो.

Male lions sleep an average 20 hours per day.

https://www.edge.org/conversation/nathan_myhrvold-lions-africas-magnific...

मला कधी कधी संगणका च्या खुर्चीवरच झोप लागते. खर तर गुंगी , दिवस आहे कि रात्र हे कळत नाही.

डॉ कुमार, तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

डॉ सुबोध, देव करो आणि मला आणि सगळ्यांनाच तुमच्यासारखे cool डॉक्टर भेटोत. मस्त सल्ला आहे. Happy खरचच शांत आणि पटकन झोप लागण खूप महत्त्वाचं आहे.

नेहमीप्रमाणेच उत्तम माहितीपूर्ण लेख. >>> + ९९९

मला जेट lag बद्दल एक शंका आहे. साधारण अमेरिकेचा माणूस भारतात आला की ही तक्रार दिसते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडेच प्रवास केल्यावर असं होते का? उलटीकडेच्या प्रवासात तसे होत नाही का?
समजा भारतातून न्यूझीलंड ला गेल्यावर काय वाटते ? इथे बरेच प्रवास अनुभवी आहेत म्हणून विचारतो.

सुबोध, तुम्ही जे झोपेबद्दल बोललात ते मला कोणी पूर्वी सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं! माझ्या आयुष्यातला शांत झोपेबद्दल चा गिल्ट कमी झाला असता. मला नेहमी टोमणे असतात मी कधीही झोपू शकायचे. आता माझी झोप खूप कमी झाली आहे. छान, शांत झोप लागावी म्हणून आता मी वाट पाहते. आजकाल बिन-गजर 5-6ला सुट्टीच्या वारी पण जाग यायला लागली आहे.

उत्तम माहिती !

काही लोकांना कमी झोप पुरते (५-६ तास झोप मिळाली तरी ते दिवसभर फ्रेश असतात, त्यांना इतर कुठलेही त्रास होत नाहीत.) माझ्यासारख्यांना किमान ८-९ तास झोप आवश्यक असते, ती मिळाली नाही, तर पुढचा दिवस बेकार जातो. यासाठीची कारणं वेगळी असावीत.

ललिता, धन्यवाद.
बरोबर. प्रत्येकाचे झोप -जाग चक्र आणि मेंदूतील जैविक घड्याळ वेगवेगळे असते. त्यामुळे अमुक इतके तास झोपलेच पाहिजे असा काही दंडक नाही ! कामाच्या गरजेनुसार अंतर्गत घड्याळाचे ‘सेटिंग’ होत राहते.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख! त्यावर डाॅ सुबोध आयसींग करतात ते फार आवडतं.मलाही झोपेची विशेष समस्या नाही क्वचित पंधरा वीस दिवसात एखादे वेळेस निद्रानाश सतावतो. दोनतीन तासच झोप लागते. दुसऱया दिवसावर त्याचा मात्र काही परिणाम होत नाही. दुपारी मात्र झोपले की रात्र बेक्कार गेलीच म्हणून समजा त्या धास्तीपायी दुपारी आडवीपण होत नाही. सकाळी पाचलाच जाग येते रात्री कितीही वाजता झोपले तरी! स्वप्न पडत नाही.... अशी आमची निद्रादेवीची कथा ...
नवीन वर्षात असे अनेक आरोग्य विषयक लेख तुमच्याकडून वाचायला मिळोत .... शुभेच्छा!

Pages