सुखी झोपेचा साथी

Submitted by कुमार१ on 19 January, 2020 - 10:51

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते. अशाच एका तुलनेने अपरिचित हॉर्मोनचा परिचय या लेखात करून देत आहे. त्याचे नाव आहे मेलाटोनिन (melatonin).

मेलाटोनिनचे उत्पादन
आपल्या मेंदूत ‘पिनिअल’ नावाची एक ग्रंथी असते. (चित्र पाहा).

pineal wiki.png

डोळ्यातील दृष्टीपटलातून निघालेले काही विशिष्ट चेतातंतू या ग्रंथीत पोचतात. हे तंतू उद्दीपित झाले की त्याच्या प्रतिसादातून ही ग्रंथी एका अमिनो आम्लापासून मेलाटोनिन तयार करते. ही सर्व प्रक्रिया वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. दिवसाचा उजेड संपून जसा अंधार पडू लागतो तसे मेलाटोनिनचे उत्पादन वाढू लागते. मग रात्री ते अत्युच्च पातळी गाठते. जसा पुढचा दिवस उगवतो तसे त्या ग्रंथीचे उद्दीपन थांबते आणि मेलाटोनिनचा नाश होतो. अशी ही या हॉर्मोनच्या स्त्रवण्याची तालबद्धता (rhythm) आहे. मात्र माणसाचे वय आणि सवयी यांनुसार या तालबद्धतेत काही बदल होत असतात ते आता पाहू.

मेलाटोनिन आणि झोपेच्या सवयी

sleep.jpg

“लवकर निजे, लवकर उठे, तयास उत्तम आरोग्य लाभे”, हे आहे पूर्वापार चालत आलेले सुवचन. एकेकाळच्या कृषीप्रधान संस्कृतीत ते पाळले जात होते. पुढे शहरीकरण, औद्योगिकीकरण वगैरे बदलांमुळे आपली जीवनशैली अर्थातच बदलली. जसा कृत्रिम प्रकाश मुबलक उपलब्ध होऊ लागला, तसे आपल्या रात्री उशीरापर्यंत जागण्याचे प्रमाण वाढत गेले. एकंदरीत समाजावर नजर टाकता आपल्याला लोकांच्या झोपण्याच्या वेळेच्या भिन्न सवयी दिसतात.

• जे लोक पहाटे उठतात, त्यांच्या शरीरात रोज मेलाटोनिनचे उत्पादन संध्याकाळी लवकर सुरु होते. या उलट जे रात्री उशिरापर्यंत जागतात, त्यांच्यात ते तुलनेने उशीराच सुरु होते. तसेच ज्यांची झोप जास्तकाळ असते त्यांच्यात मेलाटोनिन अधिक काळ स्त्रवत असते.

• आता माणसाचे वय आणि मेलाटोनिनचे प्रमाण यांचा संबंध पाहू. बाल्यावस्थेत आपली झोप खूप असते आणि त्याचा शरीरवाढीशी संबंध असतो. जसे मूल किशोरवयीन अवस्थेत जाते तसे रोज संध्याकाळची मेलाटोनिनची स्त्रवण्याची वेळ लांबत जाते. त्यामुळे या वयात रात्री अपरात्री जागण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.

• मध्यमवयीन माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकतो तेव्हा मेलाटोनिनचे स्त्रवणे निसर्गतः कमी होत जाते. परिणामी झोप कमी होते. भल्या पहाटे उठून घरात चुळबूळ करणारे म्हातारे तरुणांसाठी त्रासदायक असतात !

प्रकाशाचा प्रकार आणि मेलाटोनिनचे प्रमाण
पृथ्वीवर जिथे उत्तम सूर्यप्रकाश ठराविक काळ उपलब्ध असतो तिथे मेलाटोनिनचे नैसर्गिक दैनंदिन चक्र व्यवस्थित काम करते. कृत्रिम प्रकाश आणि मेलाटोनिन उत्पादन यांचे नाते जरा गुंतागुंतीचे आहे. कुठल्याही ‘प्रकाशाचे’ अंतर्गत घटक असतात आणि त्यांच्या विशिष्ट तरंगलांबी असतात. त्यापैकी ४६०-४८० nm या पट्ट्यातील लांबी असलेला ‘नीलप्रकाश’ शरीरातील मेलाटोनिनचे उत्पादन दाबून टाकतो. त्यादृष्टीने आपल्या वापरातील कृत्रिम प्रकाशाचे प्रकार गेल्या शतकभरात कसे बदलत गेले ते पाहणे रंजक ठरेल. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगभरात बहुतांश लोक पिवळा प्रकाश देणारे बल्ब (incandescent ) वापरत. त्याच्या प्रकाशात ‘नीलप्रकाशाचे’ प्रमाण खूप कमी होते. आता अलीकडील काही वर्षांतील चित्र पाहा. पिवळ्या बल्ब्सचा वापर झपाट्याने कमी होत गेला आणि LED-बल्ब्सचा वापर वाढता राहिला. या आधुनिक बल्ब्सच्या प्रकाशात नीलप्रकाशाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जर आपण रात्री अशा प्रकाशात – त्यातही झगमगाटात- अधिक काळ वावरलो, तर त्यामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. परिणामी निद्रानाश होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत तर आपला विविध इ-साधनांचाही वापर खूप वाढला. या सर्व उपकरणांकडे बघत राहिल्याने डोळ्यात नीलप्रकाशाच्या लहरी मोठ्या प्रमाणात जातात.

मेलाटोनिनची अन्य कार्ये

झोपेच्या प्रक्रियेव्यतिरिक्त हे हॉर्मोन शरीरातील अन्य काही यंत्रणांवरही सकारात्मक परिणाम करते. त्या यंत्रणा अशा आहेत:
१. हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य
२. श्वसनयंत्रणा
३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे
४. पेशींतील ऊर्जानिर्मिती आणि antioxidant कार्य
५. अन्य हॉर्मोन्सवर प्रभाव : विशेषतः जननेन्द्रीयांशी संबंधित हॉर्मोन्स

वरील सर्व कार्ये बघता मेलाटोनिनचा काही आजारांत औषधी उपयोग होऊ शकेल का ही उत्सुकता निर्माण होते. त्या अनुषंगाने वैद्यकात काही संशोधन झालेले आहे. त्यापैकी बरेचसे प्रयोग प्राण्यांवर झालेले आहेत. त्या तुलनेत मानवी अभ्यास अद्याप पुरेसे झालेले नाहीत. संशोधनाचा मुख्य रोख अर्थात मेलाटोनिन हे निद्रानाशावर उपयुक्त आहे का, यावर आहे. या मुद्द्याचा आता आढावा घेतो.

melat tabs bott (2).jpgनिद्रानाश आणि मेलाटोनिनचा औषधी उपयोग
समाजातील अनेकांना झोपेच्या समस्यांनी ग्रासलेले असते. त्यामध्ये रात्री उशीरापर्यंत झोप न लागणे, अपुरी झोप इत्यादी समस्या आढळतात. त्यावर उपाय म्हणून जीवनशैलीतील बदल आणि काही पारंपारिक घरगुती तसेच वैद्यकीय औषधे उपलब्ध आहेत. गेल्या दोन दशकांत त्यांत मेलाटोनिनची भर पडू पाहत आहे. प्रयोगशाळेत रासायनिक पद्धतीने तयार केलेले हे हॉर्मोन आता गोळ्या आणि द्रवाच्या रूपांत उपलब्ध आहे. अनेक देशांत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीविना दुकानांतून सर्रास विकले जात आहे. त्याच्या पुरस्कर्त्यांनी या औषधाला अगदी प्रचारकी स्वरूप आणले आहे. पण निद्रानाशासाठी ते खरंच उपयुक्त आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. तज्ञांची मतेही काहीशी उलटसुलट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार काही मुद्दे असे आहेत:

१. खूप लांब पल्ल्याच्या विमानप्रवासानंतर काही काळ लोकांना ‘जेट- लॅग’ जाणवतो. त्यामुळे संबंधित माणूस अवेळी झोपू लागतो. त्यातून त्याचे नैसर्गिक झोप-जाग हे चक्र बिघडते. अशा प्रसंगी मेलाटोनिनच्या वापराचे काही प्रयोग झाले आहेत. पण या समस्येला मुळात ते द्यावे का, हाच मूळ मुद्दा आहे.
२. निद्रानाश या समस्येसाठी रोज झोपेच्या वेळेआधी ४५ मिनिटे मेलाटोनिन घ्यावे असा एक मतप्रवाह आहे. पण हा उपाय प्रत्येकाला लागू पडतोच असे नाही. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो.

३. झोप व्यवस्थित लागण्यासाठी औषधापेक्षाही रोज संध्याकाळ नंतर प्रकाश-नियंत्रणाचे उपाय सुचवले गेले आहेत :
a) सध्या लोकांचा मोबाईल आणि संगणकाचा वापर खूप आहे. ही उपकरणे रात्री ८ नंतर वापरताना त्यांच्या पटलावरील प्रकाश हा मंद करण्यात यावा. काही उपकरणांत तो नारिंगी रंगछटेकडे झुकवता येतो.
b) काही लोकांना रात्री ८ नंतर भव्य दुकानांत जाण्याची सवय असते. अशा ठिकाणी LED दिव्यांचा अक्षरशः झगमगाट असतो. लेखात वर दिल्याप्रमाणे या प्रकाशझोतात नीलप्रकाशाचा मोठा वाटा असतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांनी अशा ठिकाणी वावरताना डोळ्यांवर नीलप्रकाशाला अवरोध करणारे गॉगल्स वापरावेत.

c) एक महत्वाची सूचना तर दखलपात्र आहे. ती म्हणजे आपल्या झोपेच्या वेळेच्या तासभर आधी सर्व प्रकारच्या इ-उपकरणांचा वापर बंद करावा !

४. मेलाटोनिन हे औषध म्हणून उपयुक्त ठरण्यासाठी शरीरातील अनेक घटकांचा विचार करावा लागतो. रुग्णाचे वय आणि शारीरिक अवस्था हे प्राथमिक घटक आहेत. त्याच्या पचनसंस्था, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तसेच एखादा दीर्घकालीन आजार असल्यास मेलाटोनिनच्या उपयुक्ततेवर परिणाम होतो. रुग्ण जर अन्य काही औषधे रोज घेत असेल, तर मेलाटोनिन दिल्यानंतर त्या औषधांचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो.

५. वरील सर्व मुद्दे बघता मेलाटोनिनच्या औषधी उपयुक्ततेबद्दल बऱ्याच शंका उपस्थित होतात. एक औषध म्हणून प्रमाणित मात्रेत ते प्रौढासाठी सुरक्षित आहे. मुलांत आणि किशोरावस्थेत मात्र त्याचा वापर टाळलेला बरा. मुळात त्याची गरज आणि उपयुक्तता वादग्रस्त आहे. सध्या तरी निद्रानाशाच्या रुग्णासाठी पारंपरिक औषधांचाच वापर करावा. सर्व नेहमीचे उपाय थकले असतील तरच मेलाटोनिनच्या पर्यायाचा विचार व्हावा, असे तज्ञ सांगतात. मुळात ते झोप ‘आणणारे’ औषध नसून झोपेचे एक नियंत्रक आहे.

मेलाटोनिनचे अन्य औषधी उपयोग
काही प्रकारच्या डोकेदुखींत त्याचा उपयोग होऊ शकतो. मेलाटोनिनच्या antioxidant गुणधर्माचा एका क्षेत्रात चांगला वापर करता येतो. ज्या लोकांना किरणोत्सर्गाला जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते, त्यांच्यात किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी मेलाटोनिनचा वापर गरजेनुसार करता येतो.

याव्यतिरिक्त अन्य काही आजारांत मेलाटोनिन उपयुक्त असल्याचे जे काही दावे केले आहेत त्यात मात्र तथ्य नाही. असे काही आजार म्हणजे कर्करोग, फिट्सचा विकार, मासिक पाळीतील वेदना आणि काही मनोविकार. यासंदर्भात अजून भरपूर संशोधनाची गरज आहे.
गेल्या १० वर्षांत प्रगत देशांत मनःशांतीसाठी (!) उठसूठ मेलाटोनिन घ्यायची लाट आलेली दिसते. हे हॉर्मोन अधिकृत औषधाव्यतिरिक्त खुल्या बाजारात देखील ‘’वनस्पतीजन्य’ वगैरे लेबले लावून विकले जाते. ते जीवनसत्व असल्याचा अपप्रचार देखील होत असतो. त्यामुळेच त्याचा गैरवापर वाढत गेला. बिगर औषधी स्वरूपातल्या मेलाटोनिनच्या गोळ्यांमधील शुद्ध मेलाटोनिनचे प्रमाण नियंत्रित नाही. त्यामध्ये अन्य हॉर्मोन्स वा रसायनांची भेसळ आढळली आहे.

शालेय वयातील मुलांनी त्याचा अनियंत्रित वापर केल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यातून त्यांना डोकेदुखी, वर्तणुकीतील बदल, प्रमाणाबाहेर झोपणे आणि झोपेत अंथरुणात लघवी होणे असे दुष्परिणाम झाल्याचे दिसते.
सरतेशेवटी एक महत्वाचा मुद्दा. आपली रोजची झोप लागण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये अनेक चेतातन्तूंची कार्ये आणि बरीच रसायने भाग घेतात. त्या सर्वांच्या समन्वयातून आपले नैसर्गिक ‘झोप-जाग’ चक्र कार्यरत असते. मेलाटोनिन हा या मोठ्या प्रक्रियेतील फक्त एक घटक आहे. तेव्हा विविध निद्राविकारांवर तो काही एकमेव रामबाण उपाय होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्यावरील मानवी संशोधन अजूनही अपुरे आहे. सामान्यजनांनी त्यासंबंधीची प्रसारमाध्यमांतील अर्धवट आणि प्रचारकी माहिती वाचून वैद्यकीय सल्ल्याविना त्याचा औषध म्हणून स्व-वापर करू नये हे उत्तम.
*************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

साद,
म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडेच प्रवास केल्यावर असं होते का? >>>>

माझा भूगोलाचा अभ्यास नाही पण एक अंदाज सांगतो.
आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे येऊ लागतो तसतसे सतत सूर्योदय आपल्याला लागतो. त्यात निघताना रात्रीच प्रवास सुरु झाला असेल ,तर मग झोप पूर्ण बुडते .
उलट्या दिशेच्या प्रवासात आपण अधिकाधिक अंधाराकडे जात राहतो आणि अधिक झोप मिळत राहते. म्हणून प्रवाससुस्ती होत नसावी.
तज्ञांचे मत वाचण्यास उत्सुक.
*मंजूताई,
शुभेच्छा !

दुपारी मात्र झोपले की रात्र बेक्कार गेलीच म्हणून समजा त्या धास्तीपायी दुपारी आडवीपण होत नाही. >>
+१११११११ .... मग रात्री ठार मेलोच समजा !

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख!
सुबोधजी आपल्या प्रतिक्रीयाही छानच. माझा झोपेचा उलट प्रॉब्लेम आहे, कधीही झोपा.. त्याच्या पुढे ८ तासांनी जाग येणार.. त्यामुळे कार्यक्रम ठिकाणी जेंव्हा जेंव्हा रात्री जागून सकाळी लवकर उठायचे असेल तर माझी पंचाईत होते. बर सकाळी तसेच उठलो तरी झोप आवरत नाही आणि दिवसभर येत रहाते. कधीकधी रोजच्या रुटीन मधे सुद्धा हा प्रोब्केम येतो कारण रात्री जागले तरी दुसर्या दिवशीच्या रुटीन साठी लवकर उठावे लागते जे जमत नाही.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !

* कधीही झोपा.. त्याच्या पुढे ८ तासांनी जाग येणार.. >>
सुखी आहात ! झोपत जा दणकून ...... वर '“यथेच्छ झोपा' चा संदर्भ दिला आहेच.

* जागा बदलली की अजिबात झोप येत नाही कितीही दमलेलं असलं तरी >>>

अगदी हो अगदी ! हल्ली मला रात्रीच्या प्रवासात अजिबात झोप येत नाही. अगदी खालचा बर्थ घेतलेला असला तरी.

लेख छान , नेहेमीप्रमाणेच. जायफळ घातलेली पक्वन्ने आणि नन्तर येणारी सुस्ती याचा मेलाटोनिनशी काही संबंध आहे का ? अजुन एक माहिती हवी आहे; की नीलप्रकाश /तरंगलांबी इ. गोष्टी नाईट लँप मध्ये विचारात घेतलेल्या अस्तात का ?

जागा बदलली की अजिबात झोप येत नाही

हा प्रश्न स्त्रियांना जास्त करून जाणवतो.

याचे कारण स्त्रिया नैसर्गिकरित्या स्वतःच्या घराबाहेर जास्त "सावध" असतात.

यामुळे अंतर्मन जागेच असते आणि जरा कुठे खुट्ट वाजले कि ़ जाग येते आणि परत झोप लागायला वेळ लागतो.

अशी तुकड्यातुकड्यात झोप मग पूर्ण होत नाही आणि दुसरा दिवस त्रासदायक जातो.

अशीच स्थिती रेल्वे, बस, लग्नाचे कार्यालय इ ठिकाणी होते.

रावी,
जायफळ घातलेली पक्वन्ने आणि नन्तर येणारी सुस्ती >>>
नाही, त्याचा मेलाटो. शी संबंध नाही. जायफळात Trimyristin असते.
रात्रदिवे आणि तरंगलांबी यावर माझा अभ्यास नाही.
वाचून बघतो.

हल्ली मला रात्रीच्या प्रवासात अजिबात झोप येत नाही. अगदी खालचा बर्थ घेतलेला असला तरी.

मला बाहेर कुठे ही झोप येते. परंतु कोणी घोरत असले तर मध्येच जाग आली तर झोप लागायला फार त्रास होतो.

यात रेल्वेच्या वातानुकूलित डब्याचा समावेश आहे. तेथे तर ६७ जणांपैकी बरेच लोक वेगवेगळ्या रागात आणि तालात घोरत असतात आणि दाब बंद असल्याने आवाज घुमत राहतो.त्यामुळे गेल्या बऱ्याच वर्षात मी रेल्वेने रात्री प्रवास केलेला नाही. नुसत्या (दुसरया वर्गाच्या) स्लीपरच्या डब्यात घोरण्याचा आवाज गाडीच्या आवाजात लपून जातो त्यामुळे तेथे त्रास होत नाही अशी विचित्र परिस्थिती आहे.

एका सासरकडच्या लग्नात कार्यालयात अशी स्थिती झाली. तेंव्हा मी सरळ अंथरूण पांघरून घेऊन खोलीच्या बाहेर हॉल मधल्या स्टेज वर जाऊन झोपलो.
यानंतर मी कुठेही लग्नाला गेलो तर फक्त बायकोबरोबर वेगळ्या खोलीत झोपतो.( आम्ही दोघे घोरत नाही आणि दोघांना कुणी घोरत असले तर झोप येत नाही) मागच्या वर्षी हा त्रास नको म्हणून मी जवळच्या लग्नात सरळ हॉटेल रुम घेऊन शांत झोपलो.

@साद - मला दोन्ही वेळेला जेट लॅग होता. पुर्व टु पश्चिम व पश्चिम टु पूर्व.
__________
घोरण्याचा व लठ्ठ्पणाचा घनिष्ठ संबंध आहे असे ऐकून आहे.

>>माझा भूगोलाचा अभ्यास नाही पण एक अंदाज सांगतो.<<
माझ्या माहिती नुसार प्रवासात तुम्ही २/३ पेक्षा जास्त टाइम झोन्स ओलांडले कि जेटलॅग होण्याची शक्यता असते. आणि त्या मागचं कारण तुमचं बायॉलॉजिकल क्लॉक हे आहे. नविन टाइम झोनमध्ये झोपेची सायकल अ‍ॅडजस्ट व्हायला काहि वेळ लागतो - तोच जेटलॅग...

डॉक्टरसाहेब, लेख नेहेमी सारखा मस्त. झोपेचं महत्व लोकांना हळुहळु समजल्याने स्लीप ट्रॅकिंग डिवायसेसचा वापर वाढतोय, जी चांगली गोष्ट आहे. बिझी लाइफ्स्टाइल असणार्‍यांचे, अपुर्‍या झोपेमुळे झालेलं नुकसान (काहिंचा मृत्यु) डोळ्यासमोर आहे...

@ चामुंडराय
व्हाईट नॉईजचा झोपेसाठी उपयोग होतो. माझा येथेच यावर धागा आहे. शोधावा लागेल.

@ खरे डॉक, मी तर आता कुणाही लग्नाला मुक्कामाला जायचेच नाही हा प्रण केलेला आहे.

डॉक. कुमार यांचा मी चाहता आहे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! छान पूरक माहिती.
.........

सामो,
घोरण्याचा व लठ्ठ्पणाचा घनिष्ठ संबंध आहे असे ऐकून आहे.
>>>> होय, आहे ! आता यातले शास्त्र समजून घेऊ.

१. नुसता लठ्ठपणा बघून चालत नाही. शरीरातील अतिरिक्त चरबीची ठिकाणे महत्वाची.
२. मानेचा घेर महत्वाचा; तसेच पोटावरील चरबीही (ढेरी)

३. वरील दोघांमुळे वरच्या श्वासमार्गाला अडथळा होतो; तो संकुचित होतो.

४. साधारण घोरायचे प्रमाण पुरुषांत जास्त, पण.....
५. स्त्रियांत देखील २ गट महत्वाचे ; एक गरोदर स्त्री (कारण उघड आहे, पोटाचा दाब) आणि मासिक पाळी संपल्यानंतरचे वय.

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख.
झोप कशी येते ह्याची शास्त्रीय बाजू माहीत पडली.
आणि झोपेचा आणि प्रकाश चा संबंध सुधा माहीत पडला.
पण माझा स्वतःचा अनुभव झोपे विषयी व्यक्त करावा असं वाटलं.
झोपेचे पण प्रकार असावेत त्यातील एक गाढ झोप ही कमी वेळ जरी मिळाली तरी थकवा दूर होतो.
नशीब नी मी गाढ झोपणार आहे.
आणि किरकोळ आवाज माझी झोप मोड करू शकत नाहीत..
दुसरी साधी झोप(नक्की काय शब्द वापरावा हेच समजल नाही) ही किती ही घेतली तरी पूर्ण होत नाही अजुन झोपावे अस वाटत.
जास्त झोपल्या मुळे आळस येतो हा पण माझा अनुभव आहे.
बाकी योग्य झोप ही खूप महत्वाची आहे.
७ दिवस च माणूस झोप शिवाय जगू शकतो असं वाचनात आलेलं आहे.

झोप आणि प्रकाश यांचा संबंध खूप महत्त्वाचा आहे
नुकताच दिलीप कुलकर्णी यांच्या गतिमान संतुलन या मासिक अंकात त्यांचा स्वतःच्या मुलाबद्दल अनुभव वाचला. गावाकडून शहरात आल्यावर त्यांच्या लहान मुलाला रात्री लवकर झोप येत नसे, मग त्यांनी दिवे मालवून , पडदे लावून अंधार केला व काही दिवसातच तो लवकर झोपी जाऊ लागला
शहरात प्रकाश प्रदूषण खूपच आहे, त्यामुळेच आपल्याला आकाशनिरीक्षणासाठी शहराबाहेर जावे लागते

नमस्कार कुमार सर...तुमचे लेख नियमित वाचते ....नेहमीच नवीन माहिती मिळते..।धन्यवाद......मुलीला muscular dystrophy मुळे relax व्हायला खूप वेळ लागतो....रोजच अडीच ग्रम मेलटोनिन देतो... नाही तर ती रात्री उशिरापर्यंत झोपू शकत नाही.. आणि शाळेत जायला चिडचिड करते...तिच्या neurologist ला ok वाटते...But pulmonogist said try to avoid....तिला दुसरा काही पर्याय आहे का...आम्ही दुसर्या दिवशी शाळा नसेल तर देत नाही... पण तिची अवस्था दयनीय आहे...

* पाभे,
उपयुक्त माहिती. आवडली.
* VB ,धन्यवाद.
* राजेश,
तुमच्या निरीक्षणाशी सहमत.
* ऋतुराज,
बरोबर. ‘गतिमान’ च्या आठवणी जागविल्याबाद्द्ल धन्यवाद. पूर्वी मी त्यात लिहीत असे.

@ कुमार सर, सामो आणि राज :
जेट लॅगच्या माहितीसाठी धन्यवाद. म्हणजे दिशा महत्वाची नसून टाईम झोनची संख्या पाहिली पाहिजे.
उपयुक्त चर्चा

आदिश्री, धन्यवाद.

तुमच्या मुलीची अवस्था समजू शकतो. काही आजार चमत्कारिक असतात खरे. आधुनिक वैद्यकातील काही औषधांच्या बाबतीत अगदी गोची होते. ते औषध मूळ लक्षणासाठी द्यावे लागते आणि महत्वाचेही असते. पण, त्याचा एखादा दुष्परिणाम वाईट असतो. तेव्हा दोन वेगळ्या तज्ञांची मते त्यांच्या विषयानुसार बरोबर असतात.

तुमच्या बाबतीत त्या दोन्ही मतांचा आदर करणे भाग आहे. फक्त झोप या मुद्दयासाठी इतर उपचारपद्धती वापरून बघावी इतकेच सुचवतो.

लाडली,
तुम्ही सुचवलेला REM झोप हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मला त्याचा अभ्यास करावा लागेल. सवडीने पाहतो.
धन्यवाद.
............................................................................
इथल्या चर्चेत घोरण्याबद्दल बरेच जणांनी लिहीले आहे. त्या अनुषंगाने ही थोडी भर:
दीर्घकालीन घोरण्याचा त्रास असल्यास भविष्यात ‘झोपेतील श्वसनरोध’ (OSA) हा विकार होऊ शकतो. यात स्थानिक कंपन होऊन घशातील चेतातंतूना इजा होऊन ही समस्या उद्भवते. या विकारात जनुकीय घटकांचाही वाटा आहे. सतत घोरणाऱ्या व्यक्तींनी खालील काळजी घेणे हितावह असते:

१. वजन नियंत्रणात ठेवणे
२. झोपताना जास्तीत जास्त कुशीवर झोपणे.
३. जास्त काळ पाठीवर झोपल्यास जीभ घश्यात मागे पडते आणि श्वसनास अडथळा होतो.

मी रोज दुपारी सुद्धा झोपतो आणि शक्य असेल तेवढेच(कमीत कमी) काम करतो>>किती म्हणून धन्यवाद देऊ डॉक्टर खरे.. मी असंख्य लेखांत वाचून पकले होते की दुपारी झोपू नका, आरोग्य बिघडतं इ. इ.
डॉक्टर कुमार १, नेहमीप्रमाणे उत्तम लेख आहे.

बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये जागृतावस्था आणि निद्रावस्था या एकीमागून एक अशा अनुक्रमाने येतात आणि त्यांच्यामध्ये एक तऱ्हेची लयबद्धता असते. बहुतेक सस्तन प्राणी आणि पक्षी यांच्या झोपेचे स्वरूप मनुष्याच्या झोपेसारखेच असते. झोपेच्या वेळी त्यांच्या शारीरिक क्रियेत घडून येणारे फरकही मनुष्याच्या झोपेतील शारीरिक क्रियेतील फरकांप्रमाणे असतात, शरीरावर परिणाम करणाऱ्या संवेदनांचे प्रमाण कमी केले असता मेंदूचे उद्दीपन कमी होऊन त्या प्राण्यांना झोप आणता येते, परंतु प्राण्यांमध्ये निद्रावस्था आणि जागृतावस्था यांमध्ये लयबद्धता नेहमी दैनिक असतेच असे नाही. पुष्कळ प्राण्यांत ही लयबद्धता एका दिवसात अनेक वेळा दिसून येते. घुशी दिवसातून १० वेळा, उंदीर ९ वेळा आणि ससे १६ ते २१ वेळा झोप घेतात. इतर काही प्राण्यांत ही लयबद्धता २४ तासांची असते. अस्वलासारखे काही प्राणी हिवाळ्यात दीर्घ अशी शीतनिद्रा घेत नाहीत परंतु सर्व हिवाळ्यात मधून मधून एकाच वेळी २४ तास अथवा त्यापेक्षाही जास्त वेळ झोप घेतात.

पाळीव प्राण्यांनाही झोपेची आवश्यकता असते आणि तिच्यामुळे शरीराला विश्रांती मिळते. सर्वसाधारणपणे मांसाहारी पशूंना शाकाहारी पशूंपेक्षा जास्त प्रमाणात झोपेची आवश्यकता असते, असे दिसून येते, कुत्रा व मांजर हे प्राणी बराच काळ झोपेमध्ये घालवतात, तर शाकाहारी जनावरे एका वेळी थोडी थोडी झोप घेताना दिसतात. दोन्ही गटांतील प्राणी माणसाप्रमाणे गाढ निद्रा घेत नाहीत. कुत्रा व मांजर यांना भोवती गोंगाट चालू असताना झोप घेता येत नाही. घोड्याची झोप फारच सावध असते. पावलांच्या जराशा आवाजानेही तो जागा होतो. तो डोळे उघडे ठेवून किंवा अर्धवट उघडे ठेवून झोप घेतो. बहुधा तो जमिनीवर आडवा पडून झोप घेतो, तथापि तो उभ्यानेही झोप घेऊ शकतो. त्याला फार थोडी झोप पुरते, पण ती शांत असावी लागते.

सौजन्य
मराठी विश्व कोश

* प्राचीन, धन्यवाद.
दुपारी झोपू नका, आरोग्य बिघडतं >>>

यावर अनेक तज्ञांची मते ऐकल्यावर मी असा निर्णय घेतला:
जेवणानंतर २ तास मी सरळ बसतो. त्यानंतर फक्त अर्धा तास आडवा होतो. तेव्हा दुपारचे ४ वाजून गेलेले असल्याने पूर्ण झोप येत नाही. त्याचा फायदा रात्री नक्की होतो.

२ तास सरळ बसण्यामागे विचार असा: जेवणानंतर जठरातले अन्न पूर्णपणे आतड्यांत सरकण्याचा काळ दोन ते अडीच तास असतो. ज्यांना जठराम्ल-अधिक्य व तत्सम त्रास आहेत, त्यांना हे उपयुक्त ठरते, हा स्वानुभव.
एका वैद्यकीय तज्ञांचे मत मला खूप आवडले : दुपारची झोप (हवीच असल्यास आरामखुर्चीत घ्या, आडवे होऊन नको) !
.......
* राजेश,
उपयुक्त माहिती.

माझ्या सुदैवाने मला झोपेचा काही त्रास नाही. म्हणजे कमी वेळ असेल तर कमी सुद्धा झोप चालते. (अगदी ४ तास सुद्धा). शनिवार रविवारी भरपाई करून परत रात्री डाराडूर. विमान, जहाज, एस्टी , गाडीत , खुर्ची, कुठेही अगदी भर लग्नात पण निद्रादेवी प्रसन्न असते. कॉलेजमधे असताना तर एसटीत खाली वर्तमानपत्रावर झोपलो आहे. आता कळल पिनियल ग्लँड ची कृपा. जेट लॅगचा मात्र दोन तीन दिवस (च) त्रास होतो.

कुमार सर - खाण्या पिण्याच्या कुठल्या सवयी पिनियल ग्लँडच्या कार्यावर परिणाम करतात.
माझ एक निरीक्षण . श्रावण महिना पाळल्यामुळे ( अपेयपान बंद) झोप जरा जास्तच यायची. ( Both quality and quantity was improved. Happy . अपेयपान बंद असल्याने बायकोची कटकट कमी हे काही याचे कारण नाही, काही तरी शास्त्रीय कारण असले पाहिजे.)

साद,
दम्याचे बाबतीत खालील मुद्दे लक्षात घ्यावेत:

१. तो आजार नियंत्रित आहे की अनियंत्रित ?
२. अनियंत्रित असलेल्या रुग्णांसाठी आडवे पडणेच त्रासदायक असते. रुग्णालयात त्यांचेसाठी विशिष्ट पाठीचा बसण्याचा कोण ठरवणारे पलंग असतात.
........
विक्रम, धन्यवाद
उत्तर जरा वेळाने.
३. बऱ्याच अशा रुग्णांना जठराम्ल वर अन्न्ननलीकेत यायचा त्रास असतो. त्यामुळे त्यांनी दुपार काय किंवा रात्र काय, जेवणानंतर ३ तासांनी आडवे पडावे.

Pages