एकटीच @ North-East India दिवस - ६

Submitted by सुप्रिया राज जोशी on 7 January, 2020 - 00:17

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

11 फेब्रुवारी 2017

प्रिय शारदा,

काल आपल्या अनघाचा साखरपुडा झाला. मी येऊ शकले नाही. तू माझ्यावर रागावणार नाहीस, उलट तुला माझ्या प्रवासाबद्दल माहीत असतं तर तू स्वतःहून मला घरचा समारंभ सोडून इथे पाठवलं असतसं, असं मला वाटतं. माझे जे जे उद्योग चालू असतात त्याच्याबद्दल तुला कुतूहल नि कौतुक असते हे मला माहित आहे, आणि हे ही चांगलेच माहित आहे की तुझ्या दुःखाच्या, आनंदाच्या प्रसंगात मी जवळ असले की तुला आधार वाटतो. म्हणूनच या पत्राद्वारे तुझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करते आहे.

प्रवास मस्तच चाललाय. एकटेपण हे कधीकधी वरदान असतं, जवळ कोणीच जिवाभावाचं नाही मग फक्त तेव्हाच आपल्या स्वतः च्या गरजा आपल्याला नीट कळतात. त्या भागवण्यासाठी काय पाऊल उचलावे हा विचार करायचा अवधी मिळतो. रोजच्या जीवनात संसाराच्या एकेक जबाबदाऱ्या पार पाडतापडता स्वतः शी अशी मैत्री साधता येईल का? म्हणून वरदान म्हटलं.

आज पहाटे पहाटे जाग आली. तंबूमधून बाहेर डोकावून पाहिल तो नजारा सुंदर दिसत होता.
WhatsApp Image 2020-01-07 at 10.39.46 AM.jpeg

नदीच्या लगत जी दाट हिरवी झाडी आहे ती पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळत होती. जशी माझी चाहूल लागली तसे माझा राखणदार कुत्रा शेपूट हलवत माझ्याजवळ आला. वेळ माहित नाही पण निरव वातावरण होते. नदीकिनारी आम्ही दोघांनी वरच्या टोकाच्या त्रिवेणीपर्यंत फेरफटका मारला. संगमाच्या कुशीतच दगड लहानसे बेट तयार झाले आहे तिथली दगडगोट्यांचे एकापेक्षा एक नमुने बघून तर मला हिरेमाणके सापडल्या सारखा आनंद झाला. खरेच, राधाला तर असे दगड रत्न माणकांपेक्षा मौल्यवान वाटतात. मला तिच्यासाठी किती दगड वेचू नि किती नाही असे झाले.

फेरफटका मारताना मधे मी टॉयलेटला गेले तर तो कुत्रा माझे आटपेपर्यंत तिथेच थांबून राहिला. अनोळखी जागी अनोळखी कुत्रे वाटाड्या बनून अशी सोबत करतात हे अनेकांनी अनुभवले आहे. या कुत्र्याला मी कुठच्या जमातीतली वाटले, कुत्राच जाणे कारण फिरून परत आले तशी त्याने मला अंगभर चाटून त्यांच्या टाईपची अंघोळ घातली.

एक couchsurfing नावाची community आहे. त्याचे मेम्बर्स आपापल्या रहात्या ठिकाणी भेट देणाऱ्या माझ्यासारख्या प्रवाशांना मदत करतात. समुदायातील अनोळखी लोकाबद्दल परस्पर मैत्री आणि विश्वास हे रहिवासी आणि प्रवासी दोघेही जोपासतात. याच समुदायातील एक अनोळखी प्रवासी मुंबईवरून गाडी घेऊन North East ची रोडट्रीप करायला येणार आहे हे मी तेथील फोरम वर वाचले. आज त्याला भेटून त्याच्याच गाडीतून गंगटोक ला जायचे असा प्लान केला होता, त्यानुसार तो मला इथे भेटला. निसर्गरम्य त्रिवेणीच्या काठावर कोणीही तासनतास निवांत बसावे. पण थोड्याच वेळात तिथे लोकांची ये जा सुरु झाली. आपल्याकडे कशी गणेशविसर्जनाची धुमधाम असते, तशीच सरस्वती विसर्जनासाठी त्रिवेणी संगमावर गर्दी होऊ लागली. अर्थात नदीच्या गुणधर्मा नुसार ती कुठचेही प्रदूषण पोटात ठेऊन घेणार नाहीच. पण नदीचे एवढे नितांत सुंदर रूप पाहिल्यावर त्याच प्रवाहात इकडून तिकडे वाहणाऱ्या मुर्त्याचे दृश्य बघायला जीवावर आले. मग आम्ही इथून काढता पाय घेतला.
saraswati.jpg

छान गप्पा मारत गँगटोक ला पोहोचतच होतो की आमचा रस्ता चुकला आणि दूरचा पल्ला पार करावा लागला. गंगटोकलगतच्या डोंगराला वळसा घालून पूर्ण प्रदक्षिणा घालून पार दुसऱ्या टोकाने आता शहरात एन्ट्री मारावी लागणार होती. चुकूनच चुकलेल्या ह्या वाटेवर गंगटोक टेकडी चा वेगळाच देखावा पहाता आला तो विलोभनीय होता.
51849522_10156862330487778_381792343159734272_n.jpg

ही वाट गर्द जंगलातून जाते ती पार करताना प्राकृत निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळाले. रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीने त्याच्या एका कवितेचा सुरेख शेवट केलाय ,"Two roads diverged in a wood, and I took the one less traveled by, and that has made all the difference."
या चुकलेल्या वाटेच्या निमित्ताने त्या ओळींची आठवण झाली खरी, पण तुला काय नि मला काय नि कोणाला काय ... आपल्या नेहेमीच्या परिघाबाहेर पाऊल टाकून काहीतरी वेगळे करायच्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी या ओळी मोठी प्रेरणा देतील.

हॉस्टेल वर पोहोचताच बांगलादेशी हॉस्टेल मेटने (त्याला मी डेल्टा म्हणायचे पण त्याचे खरे नाव रुबेल) माझा ताबा घेतला. "ताई मी तुला एक दिवस केवढे मिस केले." एक दिवसाच्या ओळखीवर दुसऱ्याच दिवशी सहवास तुटला तरी अशी आठवण येते? मग आयुष्यभराचा सहवास सोडून कोणी जिवलग दूर गेले असेल तर कसे करमायचे? मला तुझे दुःख कळते आणि इथे दूर असले तरी कालच्या दिवशी तुझी आठवण सतत मनात होती. दोघेजण एकमेकांहून किती अंतर दूर आहेत यावर कोणी कोणाच्या हृदयाच्या जवळ आहे नाही हे ठरत नसतं. हे फक्त तुझ्यामाझ्या साठी नाही, दुसऱ्या जगात निघून गेलेल्या तुझ्या जीवलगासाठीही लिहिले आहे. रुबेल ची बडबड थांबणार नव्हती मग सरळ पंघरुणाच्या आत शिरून पत्र लिहायला घेतले. आज पत्र लवकर संपवून लवकर झोपायचा बेत आहे .
अनघाला खूप खूप शुभेच्छा! उद्या एक सुंदर प्रार्थना स्थळाला भेट देणार आहे, तेव्हा सर्वांसाठी प्रार्थना करेन.

तुझी
(तुमच्याकडच्या तीन पिढ्या मला ताई म्हणूनच हाक मारतात, गम्मत आहे ना D)
सुप्रियाताई .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते रंगेबीरंगी दगड लहानपणी मीपण गोळा करायचे..
अनोळखी जागेवर अनोळखी कुत्रे>> अनोळखी असले तरी जीव लावतात. नंतर कायम गोड आठवण म्हणुन सोबती होतात.. Happy
छान झालाय हा भाग.. पुभाप्र!

मस्त.

तंबूतून बाहेर आलेल्या डोक्याचा फोटो कोणी काढला?

वाचतोय. आवडतंय.

तंबूतून बाहेर आलेल्या डोक्याचा फोटो कोणी काढला? >>>>> मलाही अगदी हाच प्रश्न पडला होता पण टायमर लावून सेल्फी काढता येते हे इतक्यात माहीत झाल्याने विचारला नाही.

मलाही तोच प्रश्न पडलेला पण नंतर एक जोडपे आले असा उल्लेख वाचला, त्यांनी नंतर काढून दिला असणार असे समजून घेतले.

पहाटेचा तंबूतून बाहेर आल्यानंतरचा क्षण कायम लक्षात रहावा म्हणून action replay करून काढलाय. माझा फेवरेट आहे म्हणून इथे टाकलाय Lol

छान सुरु आहे. तंबूतला फोटो छान निघाला आहे पण फोटो कसा काढला हा प्रश्न मलाही पडलेला,खरंतर तुम्ही तुमचे फोटो कसे काढलेत तेसुध्दा वाचायला आवडेल.

या कुत्र्याला मी कुठच्या जमातीतली वाटले, कुत्राच जाणे कारण फिरून परत आले तशी त्याने मला अंगभर चाटून त्यांच्या टाईपची अंघोळ घातली.>> अरे बापरे. कुत्र्या च्या अंगावर व लाळेत विषाणू व इतर जर्म्स पॅरासाइट्स असतात. काळजी घ्या. ते रस्ता चुकल्याचे पण उदात्ती करण हे ग्रेटच आहे.

ग्रेटच आहे.
नवीन Submitted by अमा on 7 January, 2020 -
+१००१

तंबूतून बाहेर आलेल्या डोक्याचा फोटो कोणी काढला? >>> कसा का काढला असेना पण आलाय खूप छान

ते विराट अनुश्का सुट्टीवर गेले की सोबत प्रोफेशनल फोटो ग्राफर अस्तो जसे सारा अली खान चे आत्ता चे मालदीव मधले फोटो. म्हणून ह्यांचे कॅम्डिड फोटो , सेल्फी पण फार उच्च दर्जाचे येतात. तसे काहीअसेल. तो समोरचा नजारा नक्की काय असेल असे कुतुहल आहे मला.

>>>>अरे बापरे. कुत्र्या च्या अंगावर व लाळेत विषाणू व इतर जर्म्स पॅरासाइट्स असतात. काळजी घ्या. ते रस्ता चुकल्याचे पण उदात्ती करण हे ग्रेटच आहे.>>>> अगदी अगदी!!!

भरत Happy
तरीही जजमेंटल होवून लिहावस वाटलच . (सुप्रिया , भारतात परिस्थिती वेगळी आहे आणि तुम्ही नेमकी सुरक्षेची तयारी कशी केलेली मला माहित नाही. त्यामुळ हे तुमच्यासाठी कदाचीत लागु होणार नाही. )
बरेचदा इथे हायकर्स वगैरे असेच एकटे जीवाची पर्वा न करता ट्रेक करायला जातात. जेव्हा आपत्तीत सापडतात तेव्हा त्यांना शोधण्यासाठी कॉप्स, सिक्युरिटी कामाला लागते. स्वतःचा जीव धोक्यात घालते. मिलिअन्स खर्च होतात. आणि हा सगळा खर्च टॅक्स पेअर्स च्या पैशातून होतो. कितीतरी चांगल्या गोष्टी या पैशातून होवू शकल्या असत्या. अ‍ॅडव्हेंचर म्हणुन ठिक आहे पण हा स्वार्थीपणा वाटतो बरेचदा.
अ‍ॅक्सिडेंट, नॅचरल डिझास्टर अशा गोष्टींसाठी या यंत्रणा आहेत. त्यांचा उपयोग त्यासाठी होवुदे. तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर करायचे आहे ते ही करावे. पण थोडे तारतम्याने आणि आपल्यामुळ सिस्टीम वर किती भार पडू शकतो याचा विचार करून करायला हवा अस वाटत. याचा अर्थ असा मुळीच नाही कि अ‍ॅडव्हेंचर करायला जाऊच नये. मला अज्जिब्बातच तसे म्हणायचे नाही. पण साहस ज्याच्यामुळ इतरांचा जीव धोक्यात येवू शकतो, खुप मोठ्या प्रमाणावर रिसोर्स ची हानी होवु शकते अस काही खरच केल पाहिजे का अस वाटत.

सुप्रिया, खूपच आवडतोय हा प्रवास. स्वतःला शोधायला किंवा स्वतःबरोबर रमायला प्रत्येकाचं निराळं तप. ते प्रत्येकाने स्वतःला साजेसे, झेपेल तसे साधायचे.
माझा मार्ग वेगळा असला तरी मला तुमचा प्रवास वाचून तुमचं तप समजतंय, भावतंय.

मला ह्या लेखमालिकेवर अजूनही येणाऱ्या नेगेटिव्ह कंमेंट बद्दल खुप आश्चर्य वाटतं आहे. पहिला भाग वाचल्यानंतर ह्या प्रतिक्रिया काही प्रमाणात ठीक होत्या पण 6 व्या भागालाही अश्याच प्रतिक्रिया? कशासाठी? जगु द्या कि लोकांना आपापले मापदंड घेऊन. प्रत्येकाचं रिस्क अपेटाइट वेगळं असेल ना?
खरंतर हा प्रवास होऊन गेलाय, आता काळजी घेण्याचे किंवा तुम्ही खुप रिस्क घेतलीत सल्ले हे अस्थायी आहेत. मागील काही रेफरन्स वरून लेखिकेला एक मोठी मुलगी आणि नवरा, मित्र मैत्रिणी, इत्यादी कुटुंब, जिव्हाळ्याची माणसे देखील आहेत. म्हणजे लेखिका अगदीच आली लहर केला कहर असच काही करेल अस वाटतं नाही.
मग तिच्याबरोबर आपणही हा प्रवास एन्जॉय करूयात. बॅगपॅकर्स चा विश्व जाणुन घेऊयात कारण माझ्यासारख्या कित्येकांसाठी हे कदाचित अनुभवकक्षेच्या बाहेर असेल.
सुप्रिया, जमलं तर तुम्ही देखील तुम्ही घेतलेली काळजी, किंवा बॅगपॅकर्स कॅम्युनिटीचे नीतिनियम, अडीअडचणी, प्रवासाची तयारी, हा प्रवास का करावासा वाटला, ह्यावर शेवटी एक भाग लिहाच. हि लेखमाला वाचून कोणाला स्फुर्ती आलीच तर त्याचा नक्कीच खूप फायदा होईल.
शिवाय होमस्कूलिंग बद्दल अजून एक वेगळी लेखमालिका येउदेत.

जमलं तर तुम्ही देखील तुम्ही घेतलेली काळजी, किंवा बॅगपॅकर्स कॅम्युनिटीचे नीतिनियम, अडीअडचणी, प्रवासाची तयारी, हा प्रवास का करावासा वाटला, ह्यावर शेवटी एक भाग लिहाच. >> +१०००
लेखमाला आवडत आहे. लेखिकेच्या प्रवासाबद्दल आश्चर्य वाटते, मिनीमल प्लॅनिंग अप्रोच बद्दल काळजीही वाटते. तिचे वय लक्षात घेता हा तिचा शेवटचा प्रवास असेल म्हणवतही नाही त्यामुळे ती पुन्हा असे काही करेल/ सध्या करत ही असेल अशी आशा ही आहे Happy . आपण तिला कितीही काही म्हणले (आणि त्या बद्दल कुणी आपल्याला काही म्हणले) तरी शेवटी महत्त्वाचे काय? ह्या प्रवासातून आणि नंतरच्या चर्चेतून तिचे तिला मिळालेले धडे मोलाचे. केवळ विचारांचा बदल नाही तर व्यावहारिक आचाराचाही बदल. ते तिच्या पुढच्या प्रवासाची शिदोरी. ते इतरांपुढे मांडल्याशिवाय लेखमाला संपू नये असे आभाप्रमाणे मलाही वाटते.

Mostly it is out of concern for her well-being as she is alone. Such traveling has its own value in a person's growth journey. She comes across as a mature sensitive lady. This recounting is scary but liberating.

perspective matters.
लेखिका जिथे त्या अनोळखी कुत्र्याने सोबत केली असं म्हणतेय तिथे तुम्हांला कुत्र्याच्या अंगावरचे आणि लाळेतले जर्म्स दिसताहेत.

भरत आणि आभा परफेक्ट.
कुणी काही लिहिलं आणि जर ते करा वेगळं असेल की लोक लग्गेच लेखकाला मुर्खात काढायला अक्कल शिकवायला लागतात.

काळजी असणं चांगलंच आहे. इनफॅक्ट एखाद्या अनोळखी व्यक्तीलादेखील आपली काळजी वाटली किंवा वाटू शकते हि भावना सुखद असू शकेल. फक्त आपल्या प्रतिक्रिया ह्या एखाद्याला डिस्करेज करणाऱ्या नाहीत ना हे महत्वाचे. असो, पुढचा भाग लवकर येउदेत.
आणि सुप्रिया, तुम्ही सुद्धा लोकांच्या भावना / आपुलकी लक्षात घेऊन शेवटचा अध्याय लिहाच. जेणेकरून पुढच्या बॅगपॅकर्सला सुधारित आवृत्तीनुसार प्रवास करता येईल.

लेखिका जिथे त्या अनोळखी कुत्र्याने सोबत केली असं म्हणतेय तिथे तुम्हांला कुत्र्याच्या अंगावरचे आणि लाळेतले जर्म्स दिसताहेत.>> अहो नॉलेज ऑल्सो मॅटर्स. कारण कुत्रा सोबत करणारच. तो त्याचा स्वभाव धर्म आहेच. अधिक काय सांगावे. पण अगदी एक स्ट्रे पपीच्या एका चाटण्यातून पन इन्फेक्षन होउन जीव गमावलेले लोक लहान मुले माहीत आहेत. त्यात तो दुर्गम भाग इन्फेक्षन झाले तर लगेच मेडिकेअर उपलब्ध नसेल. म्हणून काळजी वाटली एकदम . हा इथे लिहायचा विषय नाही वेगळा बाफ काढून लिहीते.

छान लिहिलेय.
---
लेखिका जिथे त्या अनोळखी कुत्र्याने सोबत केली असं म्हणतेय तिथे तुम्हांला कुत्र्याच्या अंगावरचे आणि लाळेतले जर्म्स दिसताहेत.
Submitted by भरत. on 8 January, 2020 - 09:11
--
Lol

Pages