एकटीच @ North-East India दिवस ४

Submitted by सुप्रिया राज जोशी on 1 January, 2020 - 00:50

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984

9th फेब्रुवारी 2019

प्रिय लविना,

अगं तुझा फोन आला तेव्हा त्या दोन पोलिसवाल्यांबरोबर चालत होते. रात्रीचे अकरा वाजून गेले असतील ना? पण माझी रात्रीच्या मुक्कामाची सोय झालीच नव्हती. तुला उगीच टेन्शन येईल म्हणून म्हटलं की नंतर बोलूया.

झालं असं की, टेक्सीने गँगटोकला स्टँड वर तर उतरले. 24X7 रिसेप्शन चालू ठेवतात तसले हॉटेल मला परवडणार नव्हते, मग एवढ्या रात्री हॉटेल कुठे शोधायचे? तरी चालू कॅटेगरी चे हॉटेल शोधत मी चालू लागले! MG रोड च्या बस स्टँड जवळ कुठेतरी सोय होईल असे जीप मधल्या प्रवाशांनी सांगितले होते. तिथे पोहोचले नि एका हॉटेलचा दरवाजा ठोठावला. पण पलीकडून काहीच आवाज नाही. जशी 3/4 मिनिटे उलटली तसा माझा patience संपून. मी जोरजोरात शटर आपटायला सुरवात केली. रात्रीच्या शांततेत दोनच आवाज घुमत होते, एक समोरच्या नाईटक्लब मधले लाऊड म्युसिक आणि जे इथे मी थाडथाड शटर वाजवत होते ! तो माझा गोंगाट ऐकून बाजूच्या दुसऱ्याच एका बजेट हॉटेलचे शटर कोणीतरी आतुन अर्धे उघडले तशी मी पटकन तिथे पळाले.पण मी काही बोलेन याआधीच त्या आतल्या माणसाने वाकून मला पाहिले आणि शटर झटकन बंद केले. त्याला मी शेजारच्या क्लब मधून बाहेर पडलेली बेवडी वाटले का काय?

मग मी माझी इस्टाईल बदलली, शटर ठोठावायच्या ऐवजी शटरसमोर जाऊन शक्य तितक्या सौम्य आवाजात पलीकडच्या माणसाशी संवाद साधू लागले. "मैं अभी अभी गँगटोक पहूँची हूँ। कोई सेफ हॉटेल ढुंड रही हूँ।" तसा पलीकडून त्याने एकदाचा आवाज दिला, "अभी नही, कल सुबह आ जाओ", अरे मी काय ग्लुकोज बिस्कीट विकत घ्यायला आले आहे का? सकाळ पर्यंतची सोय झाली तर याच्याकडे कशाला आले असते?

मग शिरले नाईट क्लब मध्ये, नाचायला नाही ग, माहिती काढायला म्हणून सुद्धा दुसरे काही दिसत नव्हतेच ना! तिथे मला आत शिरायला कोणीही अडवले नाही. मी विचारले, "लेडी टुरिस्ट के लिये इस वक्त गँगटोक में रहनेका क्या बंदोबस्त हो सकता है?" "ये टाइम को तो मुश्किल है..", Whatever... तसेही त्याचा उदासीन अवतार बघून त्याचे उत्तर पुरे होण्याआधीच मी बाहेर पडले. माझी डाळ इथे शिजणार नाही हे मला कळून चुकले होते.

मग मात्र बॅग उचलून मी तरातरा निघाले. एवढ्या तोऱ्यात कुठे चालले होते कोणास ठाऊक? MG Marg वरून चालतच होते की डाव्या हाताला पोलीस चौकी दिसली. मी आत शिरले आणि त्या पोलिसांना सारी कहाणी ऐकवली. त्यांना माझी हिम्मत बघून आलेला अटॅक थोडाफार ओसरला तसे मग माझ्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. त्यांनी त्यांच्या परीने खटपट सुरू केली. तेवढ्यात मला एक मोठ्ठा शोध लागला की तिथे मोबाईल ला नेटवर्क मिळत होते. यु-रे-का ... पुढच्या पाच मिनिटांत मी बॅगपॅकर्स साठी परफेक्ट असलेले Go Hills Guest House शोधले, दोन पोलीस एसकोर्टस् बनून मला गेस्ट हाउस पर्यंत घेऊन गेले आणि ओनरबरोबर व्यवहार पक्का झाला सुद्धा!

51912012_10156855311027778_2691221169029251072_n.jpg

पोलीस ड्युटीवर गेले तसे तुला फोन केला म्हणजे तू ही निशंकपणे झोपशील. गोडू, किती काळजी करतेस माझी, नि त्यापेक्षा जास्त प्रेम देतेस. कोणाला लहान बहीण मिळावी तर तुझ्यासारखी! व्हिडीओ कॉल वर सगळे पाहिल्यावर तरी काळजी मिटली ना? की वाढली? काळजी करण्यासारखे काहीच नाही. इथे अनेक देशातले लोक रहायला आहेत. आणि सर्वाना त्याची सवय आहे आपल्या डोर्म मध्ये एक female येऊन झोपली आहे त्याची कोणाला काही पडली नाही. कोणी कोणाच्या वाटेला जात नाही. एकमेकांची एकमेकांना सोबत वाटते, threat नाही.
पावसामुळे हीSS कडाक्याची थंडी पडली. मी दोन गाद्या ओढून झोपले. खोकला कलकत्यातच मला सोडून गेला. 50 तासांनंतर मला रात्रभर झोप मिळाली. सकाळी खूप उशीरा जाग आली. डोंगराळ बॉर्डर एरियाला पोहोचण्यासाठी जे परमिट लागते ते सक्काळी 7.30 ला मिळते. मी फटाफट आवरून बाहेर पडले तर काय, ढग पृथ्वीवर रहायला आले होते, पाऊस पडत होता, नि लोक जॅकेट आणि शूज न घालता रस्त्यावरून तुरुतुरु पळणारं ध्यान बघून मला हसत होते.

'रस्ते बर्फाने ब्लॉक झाले आहेत. आता वातावरण क्लिअर होईपर्यंत परमिट इशू करणार नाहीत', एवढीच माहिती मिळाली. मग मी वाट दिसेल तिथे पायी पायी गँगटोकच्या रस्यांवरून खूप भटकले. वाटलं की दुकानात शिरायचं, सिक्कीम ..गँगटोकच्या गोष्टी ऐकायच्या. सिक्कीमची सर्वात मोठी रुमटेक मॉनेस्ट्री पहाण्यासारखी आहे असं कळलं तशी मझ्या भटकांतीला आजच्या पुरती दिशा मिळाली.
a83565b1-dd26-441f-ba29-500b75a77c54.jpg

शहरापासून तासाभराच्या अंतरावर डोंगरांनी चारही बाजूंनी या मॉनेस्ट्री ला कुशीत उचललं आहे. पण या अवेळी पाडलेल्या पावसात डोंगरांना वाटलं असावं हिला थंडी लागली तर? मग आज त्यांनी तिला ढगांची दुलई पांघरली. त्या दुलईत शिरून मी तिला जवळून भेटले. तीन तास तिथेच रमले होते. देवळाच्या बाहेर चारही दिशांनी रक्षण करणाऱ्या रक्षकांची चित्रे, गौतम बुद्धाच्या 1000 मूर्ती, मूळ scripture च्या शेकडो प्रति! जेवणाची वेळ झाली तरी मी तिथेच भटकते आहे ते पाहून एक माँक मला खायला घेउन गेला. त्याने एकेक गोष्ट नीट समजावून सांगितली. त्यातून मनाला पडलेल्या एकेक प्रश्नाचे उत्तर जणू आपसुख मिळत होते. संभाषणाच्या शेवटी तर मन इतके शांत झाले होते की वाटले, साप कात टाकतो तशी वेळ आली. झाले-गेले सारे जणू गळून पडते आहे. नव्या आशेने, नव्या अर्थाने, पुन्हा एकदा आयुष्य जगायला सुरवात होते आहे ... मला नीट नाही सांगता आली पण मनाची स्थिती बरीचशी अशीच काहीतरी होती.

51818554_10156855312787778_6890933658136346624_n.jpg

या इथे गौतम बुद्धांच्या शिकवणीचा अभ्यास करण्यासाठी लहान लहान मुले येऊन रहातात. ते लाल वेशात केवढे गोड दिसतात गं. त्यांची सध्या सुट्टी चालू असल्यामुळे खूप मस्ती चालू होती. मला आपल्या शेल्टरच्या मुलांची आठवण आली. माझ्या दोन बाळांची तर खूप जास्त आठवण आली. पुरातन काळात ज्ञानी संतांनी लिहिलेले जे आजच्या आधुनिक समस्यांचेही समाधान करते, ते आयुष्याचे बेसिकस् शिकल्याशिवायच आपली मुले नुसतीच पुस्तके वाचतायत, आणि ते सर्वोत्तम शिक्षण घेतायत याबद्दल आपण निःशंक आहोत, असं काही काही मनात घोळत राहिलं.
परत गंगटोक ला यायला गाडी मिळणं मुश्किल झालं. पाऊस चालूच होता. आस्थेने विचारपूस करणाऱ्या लोकांना मी तोंडाने कितीही all is well सांगितले तरी माझ्या उघड्या हातावरचा काटा जो हेरायचा त्याला काय कळायचे ते कळत होते. थंडीने गारठून गेले होते मी, पण तक्रार कोणाची, कोणाकडे करणार? या तक्रारीची एक गम्मत असते, ज्याची करायची तो दुसरा असावा लागतो, आणि ज्याच्याजवळ करायची तो आपलाही असावा लागतो, नाहीतर तक्रारीची नोंद करायला मन मानत नाही.

रात्रीचे जेवण उरकले. गेस्ट हाऊस मध्ये परतले आणि पत्र लिहायला बसले. हे पत्रलेखन म्हणजे जणू एक दिनक्रम होऊन बसला आहे. पण छान आहे विरंगुळा! दिवसभर दमल्यावर जेव्हा कोणी कालचे पत्र वाचले, फोटो पाहिले, एखादे वाक्य माझ्यासाठी लिहिले... तेच डोक्यात घोळवत मी निजून जायचे, असा नाद लागला आहे.

मम्मी डॅडी ला माझी खुशाली कळव. त्यांची आठवण काढली असं सांगितलं की केवढे खुश होतील बघ. काळजी घे स्वतःची आणि कधी बोलावसं वाटलं तर लगेच फोन जोड.

तुझीच ताई.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या तक्रारीची एक गम्मत असते, ज्याची करायची तो दुसरा असावा लागतो, आणि ज्याच्याजवळ करायची तो आपलाही असावा लागतो, नाहीतर तक्रारीची नोंद करायला मन मानत नाही.
हे खुप भावलं.

छान चाललाय तुमचा प्रवास. वाचतोय सगळं काही.

मस्तच.
लिटील मॉन्क्सबरोबरचा फोटो छानच. Happy

Awesome
धक्का बसायचं हळूहळू कमी होतंय, तुमच्या new normal ची सवय होते आहे.
रेग्युलर भाग येत आहेत त्यामुळे लिंक तुटत नाही.

Gr8 Going.

लेख मस्तच! Happy

अवांतर :

तुमचे अनुभव वाचताना माझ्या डोक्यात "असाच प्रवास एकदातरी करुन बघुयाच!" असा किडा वळवळायला लागलाय! Proud आणि आता अस काहीतरी केल्याशिवाय तो किडा शांत बसणार नाही.अस वाटतंय.. Happy

वा... खुप छान.
प्रवास करताना ज्या अडचणी येतात त्याचा उगाचच बाउ न करता काही
ना काही तरी मार्ग काढतात किंवा प्रयत्न करतात. एकटं प्रवास करताना खुप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या साठी विशेष कौतुक...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

अनवाणी प्रवास केलात?

तुम्ही लष्कर / पोलीस किंवा गेला बाजार निदान रेड क्रॉस पथकात सामील होऊ शकाल. मानसिक आणि शारीरिक क्षमता जबरदस्त आहे.

या तक्रारीची एक गम्मत असते, ज्याची करायची तो दुसरा असावा लागतो, आणि ज्याच्याजवळ करायची तो आपलाही असावा लागतो, नाहीतर तक्रारीची नोंद करायला मन मानत नाही.
हे खुप भावलं. + 111

मस्त चालू आहे मालिका. पण स्वेटर / जॅकेट शिवाय इतक्या थंडीत कसा निभाव लागला?

वेळेची थोडी गल्लत झालीये का? ही काही मागच्या भागातली वाक्ये...
"मॅडम दो बजे के बाद इधरसे कोई बस नाही निकलती"
"फिर शेअर जीप में जाऊंगी
"अभी इतनी रात को किधर मिलेंगे पॅसेंजर" >>> म्हणजे रात्री २ नंतर तुम्ही एअरपोर्टवरून निघालात आणि सकाळी १० वाजता गंगटोकला पोहचणार असे लिहीलंय ("गंगटोक ला पोहोचेपर्यंत दहा वाजणार होते."). मग या भागात म्हटल्याप्रमाणे रात्री हॉटेल शोधावे का लागले?

माधव, मी हाडाची प्रवासी आहे अस म्हटल तर चालेल. वर्षानुवर्ष प्रवास करते आहे आणि मला थंडी, वारा, पाउस सारे अंगावर झेलायला आवडते.
दुपारी दोन नंतर सहसा लांब पल्ल्याच्या बसेस नाही निघत. संध्याकाळी सहा नंतर ते लोकल लोक रात्र म्हणतात. रात्री दहा ला पोहचले म्हणजे काय असेल आता अंदाज आला ना? Lol