आंबटगोड खिचडी + अक्रोड, द्राक्षांचं रायतं

Submitted by योकु on 24 December, 2019 - 13:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हे रायतें संजीव कपूर च्या कुक-स्मार्ट मध्ये पाहिलं तेव्हापासून करून चाखून पाहायचं होतं. तर सोबत काय करायचं तर आज ही जरा वेगळ्या धाटाची खिचडी केली. खिचडीचे घटक तेच असले तरी चवीत बर्‍यापैकी फरक आहे. कँपातल्या इस्कॉन मंदीरात त्यादिवशी संध्याकाळी प्रसादाकरता होती. आणि रायतं तर फारच चविष्ट लागतं. दोन्ही प्रकार करायला अतिशय सोपे आहेत. तर साहित्य -

खिचडीकरता
१ वाटी तांदूळ, १ वाटी तुरीची किंवा मुगाची डाळ
१ आक्खं लिंबू
२ हिरव्या मिरच्या
१ चमचाभर जिरं
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
जरासं तेल
चवीनुसार मीठ आणि जरा गोडासर चव पुढे येइल त्यामानानी गूळ किंवा साखर
आधणाचं गरम पाणी ४ वाट्या

रायत्याकरता
दीड ते दोन वाट्या साधं दही
अर्धी - पाऊण वाटी अक्रोडाचे अर्धुकं
वाटीभर द्राक्षे
दोन चमचे जिरं
पाव चमचा लाल तिखट
मीठ, साखर चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

डाळ + तांदूळ पाण्यात १०-१५ मिनिटं भिजत घालावेत, नंतर दोन-तीन पाण्यातून धूवून, पाणी निथळून फोडणीत पडण्याकरता तयार ठेवावेत.
कुकर गरम करत ठेवावा आणि जरासं तेल घालून चमचाभर जिर्‍याची फोडणी करावी. ते फुललं की जरा हिंग घालावा आणि तो फसफसला की मिरच्यांचे हातानीच मोडून मोठाले तुकडे टाकावेत, वर डाळ तांदूळ आणि हळद घालून मिनिटभर परतावं आणि उकळीचं पाणी घालून नेहेमी प्रमाणे खिचडी शिजवून घ्यावी.

कुकर चं प्रेशर पडून तो उघडला की खिचडी बुडेल इतकं गरम पाणी परत घालावं आणि गरम करत ठेवावी. यात आता एका संपूर्ण लिंबाचा रस, मीठ आणि साखर घालून चांगली घोटून ढवळून रटरटू द्यावी. पाच एक मिनिटांनंतर आच घालवून अगदी गरमच वाढावी. वर साजुक तूप चांगला मोठा चमचाभर घालायला विसरायचं नाही. हवी असेल तर वाढतेवेळी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर वर पेरावी. ताज्या कोथिंबीरीचा स्वाद चांगला लागतो आणि खिचडीचा हलका पिवळा अन कोथिंबीरीचा हिरवागार रंग दिसायलाही मस्त दिसतं.

रायत्याकरता
दही घोटून एकदम गुळगुळीत करून घ्यावं आणि चवीनुसार साखर, मीठ घालून नीट ढवळून गार करत ठेवावं.
जिरं एका जाड बुडाच्या पॅन मध्ये अगदी मंद आचेवर चांगलं काळपट - तपकिरी होईस्तो भाजावं (इथेच खरी मेख आहे, जिरं जळता अजिबात कामाचं नाही. पूर्ण पेशंस ठेवून आणि नजर पॅन वरून न हटवता हे काम करायचं; नाहीतर पुढे रायतं काळपट तर होईलच पण जळकट वासही लागेल). जरा निवलं की भरडं भरडं (दरदरा) वाटून घ्यावं.
अक्रोड चांगले खुटखुटीत हवेत. नसतील तर तेही जाड बुडाच्या पॅन मध्ये अगदी मंद आचेवर ४-५ मिनिटं शेकवून घ्या. नंतर अर्धुकं एकाचे दोन - तीन तुकडे होतील असे मोडून घ्या.
द्राक्षं एकाचे दोन असे चिरून घ्या
आता दह्यांत द्राक्षं, अक्रोड, जिर्‍याची पूड घालून नीट हलवून घ्या आणि अगदी वर लाल तिखट शिवरून (दिसयला सुरेख दिसतं बाकी काही नाही; अर्थात चवही साधते) थंडगारच वाढा.

वाढणी/प्रमाण: 
जेवण म्हणून
अधिक टिपा: 

खिचडीत, जिरं लिंबू अन साखर यांत हात सढळ हवा. लिंबामुळे चव मस्त खुलते. पळीवाढी टाइप हवी खिचडी तर त्यामानानी गरम पाणी घालून पोत अ‍ॅडजस्ट करा. कुकरमध्ये जास्त पाणी घालता येत नाही म्हणून ही वरून पाणी घालायची आयड्या.
खिचडी मध्ये आवडत असेल तर बारीक चिरलेली फुलकोबी, गाजर इ. आणि/किंवा मटार, मक्याचे दाणे, शेंगदाणे इ. प्रकार आवडीनुसार, चवीनुसार घालता येतील.

रायत्यात जिरं भाजताना जपून. भाजतांना जळता कामा नये आणि दाक्षं, अक्रोड अतीही नकोत. या दोन्हींपेक्षा दही जास्त हवं

माहितीचा स्रोत: 
रायतं - संजीव कपूर चा कुकस्मार्ट शो, खिचडी इस्कॉन मंदीरात प्रसाद म्हणून चाखली होती त्यावरून अंदाजे बनवून पाहीली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, मस्त.
फोटो नसल्याने जास्तीचे मार्क देण्यात आले आहेत. Wink

योकु छान रेसीपीज. अशी लिंबु घालुन कधीच नाही केली. लवंगा घालून घरी करतात.
रायत एकदम वेगळ आहे. चांगल लागत असणार आहे हे काँबो.
ऑफिसात बरेचदा साईड म्हणुन वॉलनट ग्रेप सॅलड असत. गोड असत एकदम. योगर्ट, ब्राऊन शुगर आणि त्यात वॉलनट्स , ग्रेप्स घालून . वॅनिला इसेन्स असतो. सॅलड पेक्षा मला ते डेझर्ट जास्त वाटत. पण मस्त लागत जे काही असेल ते.

खिचडीत आक्खं लिंबु?! खुप आबंट लागेल. असं वाटतंय..
रायता interesting वाटतंय करुन बघते.. Happy

रायता छान वाटतोय, खिचडीत एवढ लिन्बु? मी मुगाच्या डाळिची आसट किवा घोटिव( पळिवाढी) खिचडी करते त्यात टोमॅटो घालते .

लिंबाचा रस पदार्थ शिजताना घातला तर आंबटपणा टिकत नाही. म्हणून आयत्या वेळीच लिंबू व तूप घातलं तर जास्त बरं होईल असं वाटतंय. बाकी पाकृ मस्तच.