वांग्यांची लसूणी भाजी

Submitted by योकु on 11 December, 2019 - 15:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भरली वांगी करायची म्हणून आणलेली वांगी आकारानी त्यामानानी मोठी असतात; मसाला करायला तो वांग्यांत भरून पुढे भाजी करायला वेळही नस्तो आणि कंटाळा + भूक लागलेली असते पण तरीही काहीतरी चविष्ट भाजी खायची असते तेंव्हा ही करून पाहा. कृती त्या तिकडली आहे आणि खास साबांची. तशी करायला सोपीच.
- एक पाव भरल्या वांग्यांकरता लागतात तसली वांगी
- दोन मध्यम बटाटे
- एक लहानसा कांदा
- एक लहानसा टोमॅटो
- बचकभर एकदम ताजी फडफडीत हिरवीगार कोथिंबीर
- दोन चमचे लाल तिखट
- अर्धा चमचा जिरे
- ८-१० (आवडत असतील तर जास्तही) लसूण पाकळ्या
- पाव चमचा सावजी मसाला किंवा गोडा/काळा मसाला
- भक्कम तेल (अर्धी पाऊण वाटी तरी हवंच)
- अर्धा चमचा मोहोरी
- पाव चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- चिमटीभर साखर
- चिमटीभर हिंग
- उकळीचं गरम पाणी

क्रमवार पाककृती: 

बटाटे सोलून उभे चिरून पाण्यात घालून ठेवा
वांगीही उभीच चिरून बटाटे ठेवलेल्या पाण्यातच ठेवावी. यात जरासं मीठ घालून जरावेळ ठेवून द्यावं. तोवर, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
लसणी सोलून घ्यावीत आणि जिरं, लाल तिखटासोबत मिक्सर मध्ये वाटून लसणीचं तिखट तयार करून घ्यावं. (हे आधी आणि जरा जास्तही करून ठेवता येइल; भाज्या, आमट्या, उसळी एकदमच चविष्ट होतात यानी. आठ्वडाभर फ्रिजबाहेर टिकतं कोरड्या हवेत; अर्थात त्याआधीच फुर्र होतं टेस्ट एनहान्सर असल्यानी Happy )
आता बटाटा, वांगी मिठाच्या पाण्यातून काढून घेऊन पुन्हा एकदा धूवून घ्यावीत आणि पाणी निथळून फोडणीत पडण्याकरता तयार ठेवावीत.
- लोखंडी कढई चांगली सणसणीत तापवून त्यात तेल घालून ते गरम होऊ द्यावं आणि मग मोहोरी घालावी. ती तडतडली की हिंग मग कांदा घालावा. तो जरा सोनसळला की टोमॅटो आणि करून ठेवलेलं लसणीचं तिखट घालावं. हा मसाला तेल चांगलं सुटेस्तोवर मंद आचेवर परत परत परतावा. कोरडं शक्यतो होणार नाही पण आधी हेमट्या हातानी तेल घातलं असेल तर पळीभर त्याल वता त्यात आजून.
- आता वांगी, बटाटा घालून आच मोठी करून २-३ मिनिटं हडसून खडसून परतावं. मीठ, साखर आणि थोडी कोथिंबीर घालावी, गोडा मसाला घालावा. एकदा नीट ढवळून मग उकळीचं पाणी बेतानं घालून झाकण घालावं न मंद आचेवर भाजी चांगली शिजू द्यावी. रस् खूप पातळ नको अंगाबरोबर हवा सो त्यामानानी पाणी कमीजास्त करायचंय.
- चांगली शिजली भाजी की दुसर्‍या एखाद्या भांड्यात काढून घ्यावी आणि वर उरलेली कोथिंबीर घालून सजवावी.
लालभडक तवंग असलेली वर हिरवीगार कोथिंबीर घातलेली जराशी तिखट ठसकेबाज भाजी तयार आहे. गरमागरम भाजी फुलके, घडीची पोळी, ज्वारीची पातळ खरपूस भाकरी याबरोबर मस्त लागते. सोबत ताज्या मेथीचा घोळाणा, ताजं थंडगार ताक असेल तर ओहोहो!

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

तेल, तिखट अन लसणात कंजुशी अज्याबात करायची न्हायी.
यात दाण्याच्या/ तिळाच्या कुटाची तशी काहीही गरज नाही. कांदा-टोमॅटोच्या मसाल्यानी जेवढा दाटपणा येतो तेवढा पुर्सा होतो रसाकरता. बटाट्यांमुळेही रस जरा आळतो.
सबां, बायडी च्या हातची ही भाजी फारच अफलातून होते, ते पाहून मीही तेलाचा हिमटा हात सोडला मग अगदी तशी जमायला लागली.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे रेसिपी. गोडा मसाला की गरम मसाला की सावजी मसाला यानुसार चव बरीच बदलेल ना पण.

मग वांगीबटाट्याचा रस्सा म्हण की सरळ! Proud
मस्त.

यात तुझ्या लसणीच्या वाटणाऐवजी कांदा-लसूण मसालासुद्धा चालेल - आणि तो घातला तर बाकी कुठला मसाला नाही घातला तरीही चालेल.
बाकी वाटण करायला वेळ आहे आणि वांगी भरायला वेळ नाही होय तुला! Proud

मै, तो मसाला अगदी नावाला आहे. अर्थात जरा चव बदलेल हे ही खरं.

सायो, केला बदल शीर्षकात

स्वाती, हे लसणीचं तिखट शक्यतो घरी असतं म्हणून पटकन वापरता येतं. इथे साग्रसंगीत लिहायची म्हणून वाटण इ. आलं आहे.

हेमटा हात म्हणजे आखडता का मोकळा?
छान आहे भाजी, जास्तीचा लसूण न घालता करतोच पण बिन-कुटाची, खोबऱ्याची नाही. हिंमत करावी लागणार कूट न घालण्यासाठी. बोलणी ऐकायची तयारी ठेवूनच करावी लागेल.

फडफडीत हे विशेषण दोन पदार्थांबाबत ऐकले होते - भात आणि मासे. भाताच्या बाबतीत त्याचा अर्थ मोकळा, चिकट नसलेला असा होतो आणि मासे असतील तर ताजा (बहुतेक) असा होतो. आता फडफडीत कोथिंबीर म्हणजे काय? सणसणीतशी यमक जुळायला पाहिजे म्हणून वापरला आहेस का?

हा रस्सा खाल्लाय पण त्याला भरल्या वांग्याच्या मसाल्याची सर काही येत नाही. अर्थात मी दोन्ही प्रकारातला फक्त मसाला/रस्सा अणि बटाटे खातो. वांगी ही फक्त भरताकरता (रामाचा भाऊ नव्हे) वापरायची गोष्ट आहे.

मस्त.
कालच हिरवी वांगी आनली हायत, उद्या नाय तं परवा करून पायतो हे भाजी.

कालच हिरवी वांगी आनली हायत, उद्या नाय तं परवा करून पायतो हे भाजी.>>

मानव, आपल्या इथे छान काटेरी वांगी मिळत नाहीत. किमान मी राहतो तिथे तरी नाही दिसली कधी. सगळी गिळगिळीत वांगी मिळतात.

कृष्णा आमच्या भागात हिरवी वांगी चांगली मिळतात.
रविवारी येणार आहात तर घेऊन जा, आणुन ठेवू का किलोभर?

अहो कृष्णा काठची वांगी प्रसिद्ध! ते दुसरीकडून कशाला आणतील Wink
बाकी रेस्पी छान, मी टोमॅटो नाही बाबा घालत वांग्याच्या भाजीत

अरे हो की.
मी पण टोमॅटो नाही घालणार.

मस्त आहे रेसीपी योकु. करतेच. घोळाना म्हणजे काय? मेथी बारीक चिरुन आम्ही मेतकुटात घालतो तस काही का ?

>>>>वांगी ही फक्त भरताकरता (रामाचा भाऊ नव्हे) वापरायची गोष्ट आहे. >>> अरे देवा.
वांगी हा माझा जगात सर्वात आवडता पदार्थ असल्याने सॉलिड निषेध.

योकु भरताची वांगी संपत नसतील तर मांचुरिअन सॉस मध्ये तळलेली वांगी घालुन बघ. पी एफ चँग ची रेसीपी आहे.

लसणीचं तिखट करुन ठेवायची युक्ती मस्तच.
पाककृती वाचुनच चविष्ट आहे हे कळतंय. Happy
हल्ली तेलाचा हेमटा हात असायचा ते जरा बंद केलय त्यामुळे करुन पहाणार.

वांग्यांची भाजी का लिहायला सांगितलंस सायो? आपण तर एकवचनीच म्हणतो की नेहमी. जसे बटाट्याची भाजी, ढब्बू मिरचीची भाजी, भेंडीची भाजी.

रेसिपी छानच आहे पण आता फोटो टाकायचं मनावर घ्या योकुसाहेब :खिदी:

योकु काल अशी भाजी बनवली. खूप छान झाली होती. रंग सुपर्ब आला होता. आणि जास्त तेल (त्याल?) टाकल्यामुळे फार तिखटही लागत नव्हती. लोखंडी कढई नसल्यामुळे कुकरात बनवली. रेसिपी साठी धन्यवाद.

एक नंबर भारी भाजी होत असणार ही.

लसणीचं तिखट करुन ठेवायची युक्ती मस्तच. >>>> हो खरंच. मला अगदी ही टीप आवडली आहे.

या भाजीचा फोटो हवा होता यार. एवढा सेक्सी फोटो आला असता ना. आता भाजी करून मीच करून टाकला असता पण मला फोटो अपलोड करता येत नाहीत आणि तेल काही सढळ हाताने वापरलं जाणार नाही, त्यामुळे भाजी जशी दिसायला हवी तशी सणसणीत दिसणार नाही.

माबोवर फोटो टाकणं फार सोपं आहे.

• फेसबुकवर Only me अपलोड करायचा फोटो.
• त्याला View Full Size करायचं.
• तिथे ऍड्रेस बारमधे मिळणारी लिंक कॉपी करून खालील " " मधे टाकायची
img src=" " width="100%" height="100%"
• हे सगळं < > मधे टाकायचं

Pages