वांग्यांची लसूणी भाजी

Submitted by योकु on 11 December, 2019 - 15:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भरली वांगी करायची म्हणून आणलेली वांगी आकारानी त्यामानानी मोठी असतात; मसाला करायला तो वांग्यांत भरून पुढे भाजी करायला वेळही नस्तो आणि कंटाळा + भूक लागलेली असते पण तरीही काहीतरी चविष्ट भाजी खायची असते तेंव्हा ही करून पाहा. कृती त्या तिकडली आहे आणि खास साबांची. तशी करायला सोपीच.
- एक पाव भरल्या वांग्यांकरता लागतात तसली वांगी
- दोन मध्यम बटाटे
- एक लहानसा कांदा
- एक लहानसा टोमॅटो
- बचकभर एकदम ताजी फडफडीत हिरवीगार कोथिंबीर
- दोन चमचे लाल तिखट
- अर्धा चमचा जिरे
- ८-१० (आवडत असतील तर जास्तही) लसूण पाकळ्या
- पाव चमचा सावजी मसाला किंवा गोडा/काळा मसाला
- भक्कम तेल (अर्धी पाऊण वाटी तरी हवंच)
- अर्धा चमचा मोहोरी
- पाव चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- चिमटीभर साखर
- चिमटीभर हिंग
- उकळीचं गरम पाणी

क्रमवार पाककृती: 

बटाटे सोलून उभे चिरून पाण्यात घालून ठेवा
वांगीही उभीच चिरून बटाटे ठेवलेल्या पाण्यातच ठेवावी. यात जरासं मीठ घालून जरावेळ ठेवून द्यावं. तोवर, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
लसणी सोलून घ्यावीत आणि जिरं, लाल तिखटासोबत मिक्सर मध्ये वाटून लसणीचं तिखट तयार करून घ्यावं. (हे आधी आणि जरा जास्तही करून ठेवता येइल; भाज्या, आमट्या, उसळी एकदमच चविष्ट होतात यानी. आठ्वडाभर फ्रिजबाहेर टिकतं कोरड्या हवेत; अर्थात त्याआधीच फुर्र होतं टेस्ट एनहान्सर असल्यानी Happy )
आता बटाटा, वांगी मिठाच्या पाण्यातून काढून घेऊन पुन्हा एकदा धूवून घ्यावीत आणि पाणी निथळून फोडणीत पडण्याकरता तयार ठेवावीत.
- लोखंडी कढई चांगली सणसणीत तापवून त्यात तेल घालून ते गरम होऊ द्यावं आणि मग मोहोरी घालावी. ती तडतडली की हिंग मग कांदा घालावा. तो जरा सोनसळला की टोमॅटो आणि करून ठेवलेलं लसणीचं तिखट घालावं. हा मसाला तेल चांगलं सुटेस्तोवर मंद आचेवर परत परत परतावा. कोरडं शक्यतो होणार नाही पण आधी हेमट्या हातानी तेल घातलं असेल तर पळीभर त्याल वता त्यात आजून.
- आता वांगी, बटाटा घालून आच मोठी करून २-३ मिनिटं हडसून खडसून परतावं. मीठ, साखर आणि थोडी कोथिंबीर घालावी, गोडा मसाला घालावा. एकदा नीट ढवळून मग उकळीचं पाणी बेतानं घालून झाकण घालावं न मंद आचेवर भाजी चांगली शिजू द्यावी. रस् खूप पातळ नको अंगाबरोबर हवा सो त्यामानानी पाणी कमीजास्त करायचंय.
- चांगली शिजली भाजी की दुसर्‍या एखाद्या भांड्यात काढून घ्यावी आणि वर उरलेली कोथिंबीर घालून सजवावी.
लालभडक तवंग असलेली वर हिरवीगार कोथिंबीर घातलेली जराशी तिखट ठसकेबाज भाजी तयार आहे. गरमागरम भाजी फुलके, घडीची पोळी, ज्वारीची पातळ खरपूस भाकरी याबरोबर मस्त लागते. सोबत ताज्या मेथीचा घोळाणा, ताजं थंडगार ताक असेल तर ओहोहो!

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

तेल, तिखट अन लसणात कंजुशी अज्याबात करायची न्हायी.
यात दाण्याच्या/ तिळाच्या कुटाची तशी काहीही गरज नाही. कांदा-टोमॅटोच्या मसाल्यानी जेवढा दाटपणा येतो तेवढा पुर्सा होतो रसाकरता. बटाट्यांमुळेही रस जरा आळतो.
सबां, बायडी च्या हातची ही भाजी फारच अफलातून होते, ते पाहून मीही तेलाचा हिमटा हात सोडला मग अगदी तशी जमायला लागली.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घोळाना म्हणजे काय? मेथी बारीक चिरुन आम्ही मेतकुटात घालतो तस काही का ? >
बर्‍याचे ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. आमच्या इथे मेथीची फक्त कोवळी पानं, जरासा बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याहून जरा जास्त पण मेथीहून कमी या प्रमाणात बारीक चिरलेला टोमॅटो हे एकत्र करून त्याच चवीनुसार लाल तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि थोडं शेंदाण्याचं तेल घालून हातानीच नीट मिक्स करून अगदी लगेचच खायचं. करून अगदी १० मिनिटं जरी ठेवलं तर त्याला पाणी सुटत जातं अन चव जाते.

फारच कोवळी मेथी असेल तर नुसत्या मेथीला तिखट, मीठ, लिंबू, तेल, लावूनही घोळणा मस्त होतो.

नेहेमीची खिचडी असेल तर मेथी, टोमॅटो वगळून नुसता कांदा पातळ उभा चिरून तिखट, मीठ, लिंबू, लावून खावून पाहा एकदा. अफलातून चवीचा लागतो. यात लिंबू जरा जास्त घालायचं सुरेख चव खुलते कांद्याची.

मेतकूट + मेथीचा घोळाणा कसा करतात?

Vangi-Lasuni-Yoku.jpg

आज केली ही भाजी योकु. छान झाली.
(त्याल आन तिखट हेमट्या हातानंच घातल होतं, त्यामुळे लाल तवंग दिसत नाहीय.)

माझी भाजी दिसायला साधारण पण चवीला जबरदस्त होती. मी प्रयत्न केला तरी तेलाला हात सढळ होत नाही, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ढांसु फोटो आला नाही.

मानव, ते बाजूला भाजीला सुटलेले पाणी आहे की तेल? तुम्हाला कमी तिखट पण जबरदस्त रंग हवा असेल तर नंदुरबारच 'रसगुल्ला' तिखट आणून ठेवा. नावाप्रमाणेच तिखट नसतं पण रंग मात्र मस्त येतो. लाल तिखटाच्या भाज्या, पावभाजी याना रंग न घालता मस्त रंग येतो. इथे मिळत नाही, पण मी खूप प्रयत्न करून मिळवलं आहे.

सुटलेले पाणी आहे ते.
ते रसगुल्ला तिखट इथे हैद्राबादला मिळेल का शंकाच आहे.
ऑनलाईन मिळते का बघावं लागेल.

मस्तच फोटो सगळ्यांचे. आमच्या कडे कांद्याच्या पातीचं घोलाणं करतात. कोवळी कांद्याची पात, आणि कांदा बारीक चिरुन त्यात तिखट मीठ थोड काळा मसाला , बास. मस्त लागतो पोळि बरोबर.

तुमची लिहिण्याची पद्धत ठसकेबाज आहे . एकदम कडक . ताजी फडफडीत(??) हिरवीगार कोथिंबीर, लोखंडी कढई चांगली सणसणीत तापवून, मग कांदा घालावा. तो जरा सोनसळला की, आता वांगी, बटाटा घालून आच मोठी करून २-३ मिनिटं हडसून खडसून परतावं वगैरे वगैरे . एकदमच ठणठणीत आणि ठसकेबाज.मला वाटलं आता गिरक्या बिरक्या घेते कि काय तुमची भाजी . मस्त Happy

Pages