कव्वाली: तुला पाहिले की

Submitted by पाषाणभेद on 5 December, 2019 - 09:12

कव्वाली: तुला पाहिले की

किती तुझी आठवण यावी किती मी तुझ्यासाठी झुरावे
काही बंधन नाही त्याला तुझ्यासाठी मी मरावे
दुर जरी असशील तू माझ्या मनाला तू ओढून नेते
पण तुला पाहिले की काळजात धकधक होते

किती तू वार केले माझ्या हृदयावर
खोल जखमा वरून केल्या त्यावर
नाही कधी जरी रक्ताचा थेंब त्यातून वाहीला
तुझ्या नजरेचा बाण तेथे गुंतून राहिला
त्या कत्तलीने मी कसा मेलो ते माझे मला ठावूक
पाहिले एकवार तू अन मी जळून गेलो खाक
नको आता तरी तू वेळ लावू पुन्हा सामोरी ये ग ये
तुला पाहिले की काळजात धकधक होते

सागरामध्ये असते पाणी, पाण्याचीच वाहते नदी
मी तुझाच आहे अन तुझ्याविना राहिलो का कधी?
तुझा चेहेरा समोर जेव्हा जेव्हा येतो
समोर तू नाही दिसत म्हणून विव्हल मी होतो
लाख येवोत इतर सुंदर ललना समोर माझ्या
तुझ्या सुंदरतेसमोर काय कथा त्यांची, त्या असती
सा-या फिक्या
नाक डोळे रंग रूप चेहेरा बोलणे चालणे वेगळे ग तुझे
तुझ्या वर मी मरतो लाख वेळा केवळ एकदा नव्हे ते

तू माझी प्रेरणा तू
नदी तू जीवन तू
माझे जगणे तू
माझे तगणे तू
माझे मरणे तू
मला तारणारी तू
तू माझे आकाश अन चांदणे तू
रात्रीच्या अंधारातील प्रकाश तू
डोंगरावरील घनदाट झाडी तू
गर्द उन्हातली माझी सावली तू
तू माझा आधार तू
माझ्या जीवनाची साथीदार तू

तुच माझ्या दिलाची धडधड धडधड
तुझ्याविना राहू कसा मी, होते तडफड
तुझा हात हाती यावा हिच मनाची तगमग
वाढते ती जेव्हा जेव्हा तू समोर माझ्या येते
तुला पाहिले की काळजात धकधक होते

- पाषाणभेद
५/१२/२०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांना मनापासून धन्यवाद.
मी सहसा प्रतिसाद देत नाही. उगाच धागा वर आणण्याचा आरोप नको म्हणून.
पण मला मनापासून आनंद झाला आहे आपल्या दादींमुळे! ( अनेकवचन योग्य आहे का?!) असल्या हुरूपामुळेच आपणावर माझ्या कवीता वाचनाचा अत्याचार वेळोवेळी होत असावा!! ( उद्गारवाचक चिन्ह दिले आहे बरं का. स्मायलींच्या जगात आपण विरामचिन्हेच विसरतो की काय?)

आणि हरिहरजी, आपण चालीत वाचून म्हटले ते वाचून बरे वाटले. चाल येण्यासाठी एखादा शब्द पुढेमागे किंवा एखादा शब्द कमी केला तर खुमारी आणखीन वाढेल.
झाले काय की डोक्यात जो फ्लो होता तो बाहेर काढण्यासाठी मी लिहीत गेलो अन मग कवीता पूर्ण झाली. पण कवीतेचे गाणे व्हायचे असेल तर एखादा शब्द कमी जास्त करतात.
प्रत्यक्ष ज्ञानदेव - तुकारामांच्या (येथे कानाच्या पाळीला हात लावल्याचे स्मरावे) अभंगातल्या गाण्यात शब्द पुढेमागे केले आहेत तेथे माझी काय पाड.
पुनश्च प्रतिसादकांना आणि वाचकांना मनापासून धन्यवाद.