स्पायसी गोंगुरा चिकन

Submitted by maitreyee on 29 November, 2019 - 11:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक ते दीड पाउंड चिकन थाय पीसेस, २ मध्यम कांदे, ६-७ लसूण पाकळ्या, १ इन्च आले, १ गोंगुरा उर्फ अंबाडीची जुडी, तिखट,मीठ, हळद वगैरे.
चेट्टिनाड गरम मसाल्यासाठी:
२ चमचे धणे, १ चमचा जिरे, १ चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी दाणे, १०-१५ मिरे, ५-६ लवंगा, २ पेर दालचिनी, १ चक्रीफूल, १ इन्च दगडफूल, ३ वेलदोडे, ५-६ लाल सुक्या मिरच्या, १ जायपत्री, २-३ चमचे सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट पावडर.

क्रमवार पाककृती: 

आमच्या इथे अंजपर म्हणून चेटिनाड स्टाइल रेस्टॉरन्ट आहे. तिथे हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला आणि आवडला. तिखट, मसालेदार आणि बर्‍यापैकी आंबट रश्श्यात अगदी टेंडर शिजलेले चिकन! ऑफिस मधे एका तेलगू कलीग ला विचारले तर तिची सांगायची पद्धत म्हणजे. "आय मेक इट आल द ठैम, जस्ट फ्राय युज्वल अनियन जिंजर गार्लिक, युज्वल मसाला. अँड पुट गोंगुरा लीव्ज इन इट " मसाला काय याचे डीटेल सांग म्हटले तर " इट्स नथिंग, आय पुट माय मॉम्स गरम मसाला. यूज एनी गरम मसाला" असे काहीसे ऐकून मनात म्हटले आपणच बघू ट्राय करून. असा कसा "एनी गरम मसाला" चालेल?! मग तिला फक्त गोंगुरा कसा किती वापरायचा तेवढे विचारून घेतले.
थॅन्क्सगिव्हिंगच्या सणाचा मुहूर्त जवळच होता. अमेरिकनांचा ऑफिशियल ओवरइटिंग डे! ट्रॅडिशनल टर्क्यांऐवजी आख्ख्या कोंबड्या वगैरे अतिउत्साहाने भाजून झाल्यात पूर्वी आमच्या. आता आपले आपसूक आपल्या देसी फूड च्या लायनीवर आलो. करी, राइस, पराठा अन रायता असा मेनू!
तर गोंगुरा करी करायची ठरवली. मसाला साधारण चेटिनाड पद्धतीचा करून प्रयोग करायचा ठरला, आणि पहिल्याच फटक्यात एकदम जमूनच आला की बेत! स्वतःवरच खूष! Happy
तर कृती अशी- सगळे मसाल्याचे पदार्थ भाजून मिक्सर मधे बारीक करून घ्या. दोन पैकी एक कांदा पातळ चिरून थोड्या तेलावर ब्राउन होईपर्यन्त परतून घ्या. हा भाजलेला कांदाही मिक्सर मधे वाटून घ्या. चिकन धुवून हवे तसे तुकडे करून एका भांड्यात काढा. त्याला आधी तयार केलेला गरम मसाला, वाटलेला कांदा, तिखट, मीठ, हळद नीट लावून एकसारखे करून झाकून अर्धा तास ठेवून द्या.
तोवर इतर तयारी करता येईल. कांदा बारीक चिरून घ्या. आले लसूण वाटून घ्या. गोंगुरा निवडून, धुवून बारीक चिरून घ्या.
कढई मधे एक ते दीड डाव तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून परता, मग आले लसूण घालून कच्चा वास जाईपर्यन्त परता.
अर्धा चमचा हळद आणि १ ते दीड चमचा काश्मिरी लाल तिखट घाला. झेपत असल्यास थोडे जास्तही घातले तरी चालेल. त्यातच मसाला लावून ठेवलेले चिकन घालून परता. थोडे परतले गेले की पाणी ( हव्या त्या प्रमाणात घाला, मी दीड कप घातले. हा रस्सा फार पातळ करत नाहीत) आणि लागेल तसे मीठ घालून मध्यम आचेवर झाकण लावून ठेवा. ३-४ मिनिटांनी उकळी आली की गोंगुरा घालायचा. हे चिकन जरा आंबटच असते. तरीही शेवटी आपल्या टेस्ट वर आहे. तेलगू मैत्रिण आख्खी जुडी घालते म्हटली होती पण मी सावधपणे सुमारे अर्ध्यापेक्षा जरा जास्त - पाउण पेक्षा कमी जुडी वापरली. पाने चिरून वाटी दीड वाटी झाली असावीत. मला तेवढी परफेक्ट वाटली. तर ही बारीक चिरलेली पाने उकळत्या करी मधे घालून पुन्हा झाकण लावून ४-५ मिनिटे शिजू द्या.नीट हलवून गॅस बंद करा आणि झाकण लावून जरा ५ मिनिट वाफ जिरू द्या. गोंगुरा चिकन तय्यार! gongura.jpg
एक ऑप्शनल सिझनिंग - छोट्या पळीत २-३ चमचे तेल गरम करून त्यात २-३ लाल मिरच्या टाका आणि तो तडका वरून या भाजीला द्या! भारी लागले हे!
गरमागरम वाफाळता बासमती राइस किंवा पराठ्यांसोबत खायला द्या. मला स्वतःला भाताबरोबर खायला जास्त आवडतो हा प्रकार.
gongura2.jpg

वाढणी/प्रमाण: 
हे प्रमाण ४ जणांना भरपूर झाले.
अधिक टिपा: 

- पनीर, बटाटे इ. वापरून केलीच तर मग ती वेगळी रेसिपी म्हणून खपवावी. Happy
- पुढच्या वेळी लाल तिखट कमी करून त्याऐवजी कांदा वाटताना २-३ हिरव्या मिरच्या घालण्याचा विचार आहे. हि.मि .चा झणका चांगला लागेल असे वाटते.
- एकदा "एनी गरम मसाला" वापरून करून बघायलाही हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
तेलुगू कलीग आणी मी
Group content visibility: 
Use group defaults

रेसिपी छान आहे, नक्की करून पाहीन.

गोश्त फक्त मटणासाठी वापरतात असे वाटले होते, चिनूक्स धन्यवाद.

ते वाक्य "गोश्त म्हणजे मटण; चिकन नाही." असं वाचा म्हणजे अर्थ लागेल.
धन्यवाद स्वाती. तुम्ही लिहिलय तसेच वाक्य आहे. माझ विरामचिन्ह द्यायचं राहून गेलं होत. Lol Lol Lol

पूर्वी कोंबडी खाणं कमीपणाचं मानलं जाई. मध्ययुगीन भारतात बकरीचं आणि गायीचं मांस पसंत असे. मुघल दरबारातही कोंबडी फारशी शिजवली जात नसे. ब्रिटिश आल्यावर त्यांनी कोंबडी प्रचारात आणली. कोंबडी हे मुसलमानांचं खाणं असाही समज असल्यानं महाराष्ट्रात आणि बंगालात मांसाहारी हिंदू मटण पसंत करत. त्यामुळे मांस म्हणजे मटण म्हणजे गोशत असा वापर रूढ झाला.

Pages