तिळाची कोरडी चटणी

Submitted by योकु on 21 November, 2019 - 17:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाउण ते एक वाटी तीळ
१० -१२ लसूणपाकळ्या
३-४ टीस्पून तिखट
अर्धा चमचा जिरे
मीठ साखर चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

तीळ एका पॅनमध्ये मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावेत आणि गार करत ठेवावेत
लसणी सोलून घ्याव्यात
एका मिक्सरच्या भांड्यात लाल तिखटपूड, लसूण, जिरे, मीठ आणि साखर हे घेऊन फिरवून घ्यावं.
यातच आता तीळ घालून दाणेदार पोताची चटणी वाटून घ्यावी. भांड्यात काढून एकदा हातानी सारखी करून घ्यावी. नंतर हवाबंद डब्यात ठेवावी.
मस्त झणझणीत चटणी तेल भाकरी, पिठलं/ भरीत/ भरली वांगी अश्यांबरोबर सुरेख लागते.

वाढणी/प्रमाण: 
चटणीप्रमाणे
अधिक टिपा: 

फार टिकत नाही ही चटणी. तरी दोन आठवडे जाते. अर्थात त्याच्या आधीच फुर्र होते.
तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करता येइल पण जरा तिखट चटणी जास्त चविष्ट लागते
हवं असेल तर तिळासोबत लसूण, मीठही भाजता येइल, आणि लाल तिखटाऐवजी लाल सुक्या मिरच्या घेऊन त्याही भाजून मग वाटता येइल. अर्थात ही वाली जास्तच खमंग होईल.

माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..
आम्ही मराठवाड्यात ह्याला भुरका म्हणतो, दाकू ची addition आणि सढळ तिखट वापरून करतात

छानचन्करायला हवी.

अशी आमच्याकडे सुक्या खोबर्‍याची करतात.पण त्यात चिंचेच बुटुक+गूळ/साखर असते.

मस्त आहे, टेस्टी पण साखर नाही घालणार Lol

देवकी सेम करतात सासरी पण साखर नाही घालत बहुतेक, मी केली अशी तर नाहीच घालत .

मस्त ! ही चटणी खाकर्‍यावर पसरुन चाल थेन्ब तेल टाकुन भारी लागते किवा शिळी पोळी/भाकरी कुसकरुन त्यात कान्दा, कोथिबिर, चमचा दोन चमचा तेल , तिळ चटणी कालवुन भारी लागत.

पण साखर नाही घालत. .......अंजू, अग गूळ/ साखर फक्त chimateebhar असते.गोड अजिबात होत नाही.

मला किंचित टाकली कोरड्या चटणीत तरी गोड चव पहीली पुढे येते आणि बराच वेळ येते, माहीती नाही का ते. मग मजा जाते खाण्यातली. त्या तिखट किंवा आंबट चवी सावकाश येतात मागून. त्यामुळे मी नाही घालत. ओल्या चटणीत असं होत नाही पण कोरड्या होतं. करवंद, आलं किंवा चिंच आलं, आवळा आलं वगैरे चटण्या करताना लाल तिखट, मीठ, गुळ हे घालून करते पण तेव्हा सर्व चवी एकत्र छान लागतात, एक गोड पुढे आलीय असं होत नाही. ओलं खोबरं चटणी करतानाही किंचित घातली तरी गोड चव पुढे येत नाही.

बदामी पाहायला गेलो तेव्हा खानावळीत तीळ, जवस, खोबरे, कारळे अशा चार सुक्या चटण्या ,ज्वारीच्या भाकऱ्या,भात,उसळ, आमटी ,दही,मुळापाने आणि काप दिलेले. ((कृष्णा लंच होम))

मस्त. भारी लागेल.
आई फोडणीमध्ये तीळ्+खोबरं (बहुतेक ओला नारळ)+मिरच्यांचे बारीक तुकडे अशी चटणी करायची. बर्‍यापैकी कोरडीच असते तीही. खूपच खमंग लागते.