आठवण (सरूची गोष्ट )

Submitted by _तृप्ती_ on 25 October, 2019 - 07:06

"आई, आई. अगं कुठे आहेस तू? अगं पटकन ये ना बाहेर." सरू शनिवारची सकाळची शाळा संपवून आली तीच मुळी आई, आई करत. अंगणात पायावर पाणी घेताना पण तिला दम निघत नव्हता. एका मागून एक नुसता हाकांचा सपाटा सुरू होता. धावत धावत ओसरीवर आली. तोपर्यन्त आजीचं आली होती ओसरीवर. "अगं, किती वेळा तुला सांगितलं, असं अंगणातून ओरडत येऊ नये ग." " पण, आई कुठे आहे?", "छान. विसरलीस नं. अगं आज सकाळीच जाणार होती नं ती भास्करमामाकडे. तू शाळेत गेलीस की मग ती तुझ्या नंतर गेली. सांगितलं होतं की तुला. नानांची तब्येत बरी नाहीये ना. म्हणून भेटायला गेली आहे. येईल उद्या." सरू विसरूनच गेली होती हे. काय हे? मला आत्ता म्हणजे आत्ता आई हवी आहे ना. नेमकी आजच कशी नाही इथे. मला आईलाच सांगायचंय हे सगळं आणि ते पण आत्ता लगेच. सरूचा चेहरा म्हणेज नुसता आरसा आहे. मनात आलं की दिसलंच चेहऱ्यावर. सरूच्या तोंडातून गेलंच, " काय हे. मला आत्ता आईला सांगायचंय न काहीतरी." "अगं, आता काय इतकी लहान आहेस का तू आई, आई करायला. आणि येणार आहे ना उद्या. तरी बरं त्या चिंत्याला घेऊन गेली. नाहीतर तुम्ही दोघांनी आई, आई करून उच्छाद आणला असतात. जा. आवरून ये. जेवायला वाढते. " म्हणजे चिंत्याला आई घेऊन गेली आणि मी इथेच. आईची नं मी लाडकीच नाहीये. चिंत्याचेच सगळे लाड. मला इथेच ठेवलं. सरूला एकदम आठवलं. ती चिंत्याला कधी कधी चिडवत असते, तुला आईबाबांनी कोंडा देऊन घेतलं आहे . तू काही त्यांचा लाडका नाहीयेस. माझं काही तसं नाहीये. आता तिला वाटलं, मलाच कोंड्यावर घेतलं की काय आईबाबांनी. म्हणून आई अशी मला इथेच सोडून गेलीये. झालीच मग सरूची मान तिरकी आणि वेणीशी खेळत लागलीच तंद्री. तिला तर दिसतच होतं, आपल्याला लहान असताना कोणाकडून तरी घेतलंच असणार. तिला खात्रीच वाटायला लागली. सरूचा चेहरा अगदी एवढासा झाला. "बाईसाहेब, आता अश्याच तंद्री लावून बसणार आहात की माडीवर जाणार आहात आवरायला. ती पाठीवरची पोतडी तरी ठेवून ये." सरूला आता आजीची पुढची सगळी वाक्य पाठ झाली होती. कधी कळणार या मुलीला. मोठी झाली तरी आईचा पदर काही सोडत नाही. हे आणि असलंच काहीतरी. सरूला ते मुळीच ऐकायचं नव्हतं. मग कान बंद करायला म्हणून ती धावतच माडीत आली. एकीकडे दप्तर फेकलं आणि जरा इकडे तिकडे केलं. मग काहीच सुचेना. आई नसली की असंच होतं. मग भूकच लागली असेल असं वाटून, सरू आजीसमोर स्वयंपाकघरात. आता आई नाही म्हणजे अगदी शहाण्यासारखं वागायला हवं. आजीचे सुद्धा पाय दुखतात उठबसकरून. मग सरूनेच पाटपाणी घेतलं तिच्यासाठी आणि आजीसाठी. आजीचं जेवण झालंच नसेल हे माहिती होतं सरूला. जेवताना आजीचं काहीतरी सुरु होतं. संध्याकाळी काय करू गं खायला. शेजारच्या लताबाईंकडून आळूची पानं आणून दे. आळूची भाजी करू. आणि मी जाणार आहे देवळात. येतेस का लक्ष्मीला? सरूच काही लक्षच नव्हतं. "अगं भात चिवडू नकोस. संध्याकाळी येतेस का माझ्याबरोबर लक्ष्मीच्या देवळात? " सरूला एकदम आठवलं. आज शनिवार. म्हणजे तिचा आणि शालूचा ठरलेला भटकण्याचा दिवस. आई नाहीये या नादात ती विसरलीच होती हे. तिला एकदम थोडं छान वाटायला लागलं. "अग आजी, मी आणि शालू जाणार आहोत खेळायला. तू जा. मी शालूकडे जाते." "नदीकडे जाऊ नकात हं फिरायला." ही आजी म्हणजे पण आजीचं आहे. आमचं नदीकडे जायचं ठरलंय हे कसं कळलं हिला. सरू आपली काहीच न बोलता जेवण संपवत होती. तिला आता एकदम उत्साह आला होता.
तिला आणि शालूला शनिवारची शाळा सुरु झाली की मस्तच वाटायला लागायचं. शाळा सुटली की दुपारपासून घरातून बाहेर पडायचं आणि संध्याकाळपर्यंत गावभर फिरायचं. हा दोघींचा आवडता उद्योग. सरूने वेण्या सारख्या केल्या, आजीने काढून ठेवलेली वेली गुलाबाची फुलं घातली. स्वतःवरच खुश झाली आणि शालूकडे निघाली. ती आणि शालू काही झालं तरी शनिवारची संध्याकाळ चुकवत नसत. कधी कधी गणू, मागच्या वाडीतली मनी, कोपऱ्यावरचा चम्ब्या, आमच्या वर्गातली सुमी अस सगळं टोळकं पण असतं. आणि मग तर एकदम सगळं गावचं येडछाप वाटायला लागतं. काही ठरलेल्या जागा आणि कधीतरी नव्या जागा. आज शालू आणि सरुच्या आधीच सुमी आणि मनी पण आल्या होत्या. सरूने आणि शालूने येताना रस्त्यात पडलेल्या शेंगा गोळा करून आणल्या होत्या. मनी म्हणालीच, “ए, सगळ्यांना सारख्या शेंगा द्यायच्या हं. नाहीतर तू आणि शालू जास्त घेता." ही मनी पण ना. हिला काही गोळा करून आणता येत नाही पण शेंगा मात्र हव्यात. मग त्या शेंगा फोडल्या आणि आतल्या सगळ्या बिया वाटून घेतल्या. त्या बिया नं कसलातरी चिकट वास येतो. आमच्या गावात या असल्या शेंगांचं पीक सगळीकडे आलेलं असतं. मला तर आज नं त्याचं एक झाड बनवायचं होतं. नदीचा घाट अजूनही जरा गरमच होता. पण आम्ही सगळे असलो नं की आम्हाला काही गार गरम कळतंच नाही. मग आम्ही बसलो काहीतरी काहीतरी बनवत. सुमीला चार-पाच बिया जरी दिल्या तरी तिचं कसं सगळं छानच बनतं. अशी ती तंद्री लावून काहीतरी करायला लागली मग काही विचारूच नका. तो सूर्य नदीत बुडून जरी गेला नं तरी सुमी आपली काड्या घे, बिया घे, पान घे असंच करत असते. सुमीला असं पाहिलं नं की मला आईच आठवते. ती सकाळी रांगोळी काढते नं तेव्हा अशीच दिसते. छ्या. माझं हे असंच होतं. एखादी गोष्ट आठवायची नाही म्हटलं की बरोब्बर सारखी तीच आठवते. आत्ता आई भेटणार आहे का मला? पण नाही, मला तर कधी कधी स्वतःचा पण राग येतो. आजी म्हणते तशी मी कधी मोठी होणारच नाही बहुतेक. आता आईची इतकी आठवण येत होती की माझं झाड काही बनेचना.
मी उठून नदीजवळच्या माझ्या पायरीवर येऊन बसले. मला हीच पायरी आवडते आणि तिथे कुणी म्हणजे कुणी बसलेल चालतच नाही मला. ही पायरी नदीच्या सगळ्यात जवळची आहे. इथून दूरपर्यंतच सगळं दिसतं. जरा डोकावलं की काठाशी शेवाळं खायला आलेले छोटे मासे दिसतात. पाण्याचा आवाज येतो. पलीकडच्या काठावर एक मोठं झाड आहे. ते दिसतं आणि त्याच्यावर बसलेले पांढरे पक्षी पण दिसतात. आज कुठे गेले पक्षी सगळे? एकही पक्षी नाही झाडावर. उजव्या बाजूला छोटा पूल आहे. त्या पुलावरून जाणारी माणसं कशी येडछापसारखी छोटी छोटी होत जातात. मला तर फारच मजा येते हे सगळं बघत बसायला. माझा आणि शालूचा एक खेळ आहे. पलीकडच्या काठावरून चालत येणारी माणसं, इकडच्या काठावर यायच्या आधी ओळखायची. आणि गमंत म्हणजे आम्हाला दोघींना पण सगळी माणसं कुठे माहिती आहेत. पण आम्ही ठेवली आहेत नं काही काही नावं. आम्ही त्याच नावाने ओळखतो त्यांना. म्हणजे एक तिरप्या आहे. तो तर लगेच ओळखता येतो. त्याच्या हातात एक मोठी पिशवी असते खूप सामान भरलेली. इतकं सामान की आलिबाबाचा खजिना सुद्धा कमीच असेल. आणि डोकयावर एक अगदी मळलेलं, गोल गोल बांधलेलं, लाल रंगाचं पागोटं. अंगात अगदी वाऱ्यावर वाळत टाकलेला सदरा दिसावा तस काहीतरी घातलेलं असतं. त्या ओझ्याने तो इतका तिरका झालेला असतो की मला तर वाटतं अजून तिरका झाला तर पाण्यातच पडेल. तो येताना आधी त्याचं पागोटं दिसतं आणि मग तिरका मनोरा. तिरप्या लगेच ओळखता येतो. तशीच एक टिवटिव बाई पण आहे. हिच्याबरोबर दरवेळेस २-३ मुलं असतात आणि कधी कधी १-२ बायका. हिच्या डोकयावर एक टोपलं असतं आणि त्यातून काय काय वस्तू डोकावत असतात. कधी एखादा भोपळा, कधी झारा, कधी दोराची गुंडाळी आणि असलं काही नं काही. हिची एक गमंतच आहे. हिच्याबरोबर कुणीही असलं किंवा नसलं तरी हिचा आवाज आधी येतो. म्हणजे कळत काहीच नाही पण नुसती कुचकुच ऐकू येते. बाकी सगळे मुकेच आहेत असं वाटायला लागतं इतका हिचा आवाज. ह्या टिवटिव बाईला तर मी डोळे बंद करून पण ओळखू शकते. अजून एक डुल्या बाबा आहे. कसा डुलत डुलत येतो. एक आहे भयंकर बाबा. पण त्याला आजकाल आम्ही ओळखलं तरी ओळखलं नाही असंच म्हणतो. तो त्या काठावर असतो ना तेव्हा इतक्या जोरात काहीतरी ओरडत असतो जसं काही डरकाळीच फोडतो आहे. एकदा मी आणि शालू असंच खेळत बसलो होतो. ह्याची डरकाळी काही ऐकूच आली नाही. आम्ही म्हटलं हा कोण मुका? आणि आम्ही खुसखुस करत बसलो होतो. तेवढ्यात मागे बघतो तर काय हा भयंकरबाबा आमच्या मागेच उभा. त्याचे ते लाललाल डोळे, मोठे करून आमच्या मागेच लागला. पळतच सुटलो आम्ही दोघी. तेव्हापासून आम्ही तो दिसला तरी ओळखतच नाही त्याला. अजून एक पिटकूशेठ आहे. हा माणूस असेल वयाने मोठा, अगदी बाबांइतका. पण उंचीला चिंत्याएवढा. हसूच यायचं मला त्याला बघून. एकदा आईने ऐकलं मी आणि शालू बोलत असताना, पिटकूशेठला हसताना. आईने आम्हाला चांगलाच दम दिला की असं उगीच कुणाला हसायचं नाही म्हणून. तेव्हापासून आम्ही हसत नाही पिटकूशेठला. आईची कधी कधी गमंतच होते. म्हणजे ती आधी अगदी ओरडणारच असते आम्हाला पण तिला सांगितलं नं की आम्हाला आधी माहितीच नव्हतं किंवा तिला सांगितलं की पुन्हा कधी म्हणजे कधीच असं करणार नाही की मग काही आईला ओरडताच येत नाही. म्हटलं नं मी. हे असंच आहे माझं. आलीच पुन्हा आईची आठवण.
मी एक दगड उचलला आणि नदीत फिरकावुन दिला. बापरे आज काय मस्त लांब गेला माझा दगड. आणि कशी सगळी वर्तुळं तयार झाली पाण्याची. १,२,३,४.... अरेरे, पुसली की नक्षी. मला असं दगड मारताना बघून शालूपण आली. गणू आणि चम्ब्या पण आले होते. हे कधी आले? मला तर कळलंच नाही. आता माझं बघून सगळयांनीच नदीत दगड मारायचा खेळ सुरु केला. चम्ब्याचा दगड नेहमी सगळ्यात लांब जातो. चम्ब्या अगदी शोधून छोटे छोटे दगड घेतो, मग असा लांबून पळत येतो आणि जोरात नदीत दगड फिरकावुन देतो. सगळयात लांब चम्ब्याचा दगड. एकदा मनी म्हणाली, “आज मी चम्ब्यासारखं धावून दगड टाकणार म्हणजे माझाच लांब जाणार.” आली धावत धावत आणि दगड टाकणार, एवढ्यात पाय घसरला आणि जोरात नाकावर आपटली. दगड सगळ्यात लांब कुठे, नदीत सुद्धा पडला नाही. मनीचं काय पण ध्यान दिसत होतं. सगळ्या कपडयांना माती लागली होती, गुडघे फुटले होते. मनीच्या गोऱ्या गालावर ती माती इतकी चिकटली होती आणि सगळ्यात गंमतीदार दिसत होतं तीच लाल लाल झालेलं नाकं. आम्ही सगळे फसकन हसलो. मनीला इतका राग आला होता. म्हणाली, "मी आता कधी मुळी तुमच्याबरोबर खेळणारच नाहीये. मला हात सुद्धा दिला नाहीत उठायला. मग मी का खेळू तुमच्याबरोबर? " मग आम्ही सगळ्यांनी कशीबशी तिची समजूत काढली. चिडका बिब्बा झाला होता मनीचा. जेव्हा चम्ब्या म्हणाला, "मने, मी शिकवेन तुला लांब दगड मारायला आणि पडलीस तरी हसणार नाही." तेव्हा कुठे मनीच्या नाकावरचा लाल रंग कमी व्हायला लागला. मी आणि शालू कधीकधी शेंगातल्या बिया टाकतो पाण्यात. ते सुमीला अजिबात चालत नाही. तिचं आपलं वेगळंच, "ए त्या बिया नाही हं टाकायच्या. त्याची छान नक्षी बनते ना. तुम्ही दगड घ्या नं. बिया मला हव्यात." असली ही सगळी येडछाप टोळी. आता सगळे एका मागून एक नदीत दगड टाकायला लागले. एका दगडाची वर्तुळ संपायच्या आत दुसऱ्याची सुरु, ती संपायच्या आधी तिसऱ्याची नक्षी, मग चौथ्याची. आणि मग हे असलं नक्षीकाम किती वेळ सुरु राहतं ते कळतंच नाही आम्हांला. काही वेळाने हळूहळू नक्षी फिकट व्हायला लागली की समजायचं सूर्य घरी चालला म्हणून आणि मग आमची पाण्यातली नक्षी आकाशात उमटायला सुरुवात होते. पण ती पहायला काही आम्हांला नदीवर थांबता येत नाही. दिवे लागायच्या आधी घरी पोचायला म्हणजे पोचायलाच लागतं. आम्ही सगळे निघालो.
मी आणि शालू खालच्या रस्त्याने. शालूला एकदम आठवलं. "सरू, आज शाळेत म्हटलंस ते गाणं मला पण शिकवं नं. किती छान म्हटलंस. कुणी शिकवलं ग? " मी शालूकडे नुसतंच बघत बसले आणि मला खरं तर तिला सांगायचं होतं की आईने शिकवलं म्हणून. पण माझ्या तोंडातून काही शब्दच बाहेर पडेनात. "अग सरू, शिकव की मला. आता काय बाबा, तुला सांगितलंय नं बाईंनी स्नेहसंमेलनात गाणं म्हणायला. मग काय मला शिकवणारच नाहीस नं तु? तुला कसं छान येतं म्हणायला. सांग की कोणी शिकवलं?" ही शालूपण नं, सारखं आपलं असं खोटं खोटं रुसायला हिला बरोब्बर जमतं. आता हिला मी शिकवणार नाही का? उगीच आपलं, “तुला काय बाबा... आणि आम्हाला काय बाई." हसूच आलं मला तिचं. "आईने शिकवलय मला." मला एकदम भारीच वाटून गेलं की माझी आई किती म्हणजे किती छान आहे नं. कुठे जाऊन बसली आहे आता. शाळेतून आल्या आल्या हेच सांगायचं होतं नं मला आईला. "अय्या, मग काकू मला पण शिकवतील की? ए, मी उद्या येते तुमच्या घरी. काकूंना सांगशील? ए, काकूंना सांगितलंस का तू? बाईंनी तुला स्नेहसंमेलनात गाणं म्हणायला सांगितलंय ते." किती बोलते ही शालू. "काय ग सरू, अशी काय बाईनी शिक्षा केल्यासारखं तोंड केलं आहेस? अग, लक्ष कुठे आहे? ““आई, मामाकडे गेली आहे. मला भेटलीच नाहीये." आत्ता कुठे शालूला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ झाला. शालुने एकदा माझ्याकडे पाहील आणि मग म्हणाली, "सरू, कधी येणार आहेत काकू?" "उद्या" मग शालू एकदम मोठ्या माणसांसारखी म्हणाली, “मग मी नंतर येईन गाणं शिकायला. सरू, तुला घरी सोडायला येऊ का ग?" मी मानेनंच नाही म्हटलं आणि घराकडे निघाले. शालूच्या घराच्या दारात एक चाफ्याचं झाड आहे आणि त्याचा वास सगळ्या रस्त्यावर भरून राहिलेला असतो. म्हणजे मला तर कधी कधी शालू आली की चाफ्याचाच वास यायला लागतो. आत्ता पण हा वास इतका माझ्याबरोबर होता की जसं काही शालू चालत होती माझ्याबरोबर. पुढच्या वळणावरून आमचं घर दिसायला लागेपर्यंत हा वास येतच राहतो. मग पुढे कोपऱ्यावरच्या बाईआजींच्या घरातला निशिगंधाचा वास त्यात मिसळायला लागतो आणि मग आलंच आमचं घर. आमच्या घराच्या रस्त्यावर इतकी फुलांची झाडं आहेत की रात्रीच्या वाऱ्याला एक येडछाप सुंगंधी वास यायला लागतो.
घरी पोचले, तर आजी ओसरीवर वाटच बघत होती. मी पायावर पाणी घेतलं आणि आजीला सांगितलं, मी येतेच शुभांकरोति म्हणायला. घरात आले की आईची आठवण काही केल्या जाईचना. आता तर चिंत्याची पण आठवण यायला लागली होती मला. रोज शुभंकरोती म्हणताना इतका त्रास देतो. सारख्या माझ्या वेण्या ओढतो. आणि इतकी घाई असते त्याला म्हणायची. आई किती वेळा सांगते त्याला सरू बघ कशी मनापासून म्हणते. तू जरा शांत बस एका जागी. मी आणि आजीने दिवा लावला. शुभंकरोती म्हटलं. पण आईचा आवाज असला नं की काहीतरी वेगळंच वाटतं. ते काय ते काही मला सांगताच येत नाही. पण आई हवी होती घरात. पाटपाणी झालं, जेवणं झाली. बाबा, आप्पा ओसरीवर काहीतरी बोलत बसले होते. मी आणि आजी मधल्याघरात. आजीची काहीतरी बारीक बारीक कामं सुरु होती. मला काहीच काम नव्हतं म्हणून मी नुसतीच बसले होते आणि आजीच्या मध्ये मध्ये करत होते. "कुसुम, पाणी घे ग जरा" बाबा म्हणाले. मी आजीकडे पाहिलं, “आई, कधी आली आहे? मला का नाही सांगितलं?" आणि मी उठलेच स्वयंपाकघरात जायला. आजी आपली गालातल्या गालात हसायला लागली. "अगं, नाहीच आली आहे. एक दिवस तरी राहू की तिला माहेरी. जा, लोटा-भांडं ओसरीवर नेऊन दे." मी बाबांना पाणी नेऊन दिलं. “आई, मामाकडे गेली आहे नं", "हो. विसरलो मी" आमच्या घरात नं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये आईच आहे असं वाटायला लागलं मला. मग मी आपली माडीवर आले आणि पसरून दिलं स्वतःला. मला आपलं उगीच वाटायला लागलं, आईला मामाकडे अजून एक-दोन दिवस राहावसं वाटलं आणि आई उद्या आलीच नाही तर. कारण आम्ही जेव्हा जेव्हा मामाकडे जातो ना, तेव्हा तेव्हा मला आई एकदम वेगळीच वाटते. किती वेळ बोलत असते कोणाकोणाशी. आणि कधी म्हणजे कधी तिला वेळ पुरतच नाही. आता पण असंच झालं तर? खिडकीतून आमच्या सुगंधी रस्त्याचा तो येडछाप वास येत होता. त्या वासाबरोबर इतकी गुंगी आली कीं झोपच लागली.
माझ्या माडीवरच्या खोलीतून सूर्याची किरण थेट माझ्या अंगावर यायला लागली होती, अगदी माझ्या पांघरुणावरून डोळ्यात जायला लागली होती. मी एकदा या कुशीवरून त्या कुशीवर वळून पाहिलं. पण छे, सूर्य काही मला उठवल्याशिवाय माडीवरून पुढे सरकणारच नाही. सूर्य इतका आत आला म्हणजे खूपच उशीर झालाय. रविवारी कोणी मला लवकर उठवत नाही. हा सूर्यच येतो मग अगदी आतमध्ये. मी उठून तशीच बसून राहिले. उठून काय करायचं तेच ठरत नव्हतं माझं. इतक्यात माडीवर पावलं वाजली आणि चाफ्याच्या फुलांचा वास आला. शालू इतक्या सकाळी आली की काय आमच्या घरी. आणि बघते तर काय आईच आली होती. आणि हे काय आंबडयांवर मस्तपैकी चाफ्याची फुलं खोचली होती. कशी छान हसत होती. मला वाटलं आता मला आईची इतकी आठवण येते आहे की खरं म्हणजे शालूचं आली आहे चाफयाची फुलं घालून पण मला आईच वाटते आहे. मी एकदम येडछापसारखं बघत बसले. आई आली आणि म्हणाली, “आज काय उठायचं नाही का सरू? मी येऊन, माझं सगळं आवरून झालं. पहाटेच निघालो. आणि तू अशी बघत का बसणार आहेस? चल, उठ बघू." आता उठ म्हणते आहे म्हणजे आईच आली आहे. आईच पण नं आली की लगेच काही ना काही सांगायला लागते. तिला मुळी बसून राहिलेलं आवडतच नाही. आता ही नव्हती नं काल घरात मग तिला वाटतं सगळी कामं तिच्याशिवाय कोणी करणारच नाही. जरा म्हणून बसत नाही. मी तशीच बसलेली. मला किती सांगायचंय हिला आणि हिला काय त्याचं. बरोब्बर आहे हिचा तर चिंत्याच लाडका आहे. मला इथेच ठेवून गेली. मी अजून उठलेच नाही म्हटल्यावर, आई माझ्या जवळ आली, “ए सरू, काय होतंय? बरं वाटत नाही का?" असं म्हणून आईने कपाळाला हात लावून पाहिला. "आई, मी तुला आवडतं नाही का ग?" आईने अगदी मला कुशीत घेतलं आणि पाठीवरून हळूच हात फिरवला. आता आईने असं जवळ घेतल्यावर, माझा राग कसा राहणार नं आईवर. "सरू, काय झालं? तुला मामाकडे नेलं नाही म्हणून रुसलीस की काय? अगं, तुझी शाळा होती आणि एक दिवसासाठीच तर गेले होते नं." मला असं वाटत होतं आता आईनी परत कधीच मला सोडून कुठे जायचं नाही. आज आईच्या अंगाला मामाच्या घराचा वास येत होता. मग मला आठवलं चाफयाची फुलं आईने मामाकडूनच आणली असणार. "आई, मला तुला एक गमंत सांगायची आहे." मग मी आईला कालचं राहिलेलं सगळं सगळं सांगितलं. आई म्हणाली, " मला पण गप्पा मारायच्यात तुझ्याशी. पण आता उठ, आवार आणि मग जेवण झाली की गप्पा मारू. चालेल नं?" "आई, चिंत्या कुठंय?" " जा, असेल बघ कुठेतरी खाली." आता नं खिडकीतलं आभाळ कसं एकदम मस्त दिसायला लागलं. आजचा रविवार छानच जाणार मुळी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह ! मग पुढे काय झालं?
ही गोष्ट अशीच पुढे चालत रहावी असं वाटतंय

आई ग्ग!!! काय सुरेख रंगवलय सरुचं भावविश्व!!! काय सुंदर लिहीता तुम्ही तॄप्ती. अक्षरक्षः हरवुन जायला होतं. लहान मुलीचं भावविश्व, नाजूक भावनांची गुंफण. माझ्या तरी डोळ्यात पाणी तरळलं. Sad कधी आई आठवली तर कधी मुलगी. अप्रतिम-अप्रतिम!!!
निवडक ३ मध्ये Happy तेही अव्वल क्रमांकावरती.

कथा फारच गोड होती.
परंतु सारखा सारखा येडचाप शब्द वाचताना खटकत होता.

मस्तच!
सुपारीएवढा अंबाडा घातलेल्या आईच्या माथ्यावर होठ ठेवले की तोच चिरपरीचीत सुगंध येतो. आई आयुष्य व्यापून असते. तिच्यामागे बहूतेक मी रहाणार नाही.

अभिप्रायांबद्दल खूप धन्यवाद! @हर्पेन @rmd @सामो ही गोष्ट इथे संपली म्हणजे जिथे थांबावं वाटलं तिथे थांबवली Happy पण चांगलं काही सुचलं तर सरूची अजून एखादी गोष्ट नक्की Happy @शाली किती अचूक वर्णन केलंत आईचं.

खुप सुंदर!
पुढे पुढेलिहित रहा ही सरुची गोष्ट.

कित्ती कित्ती सुंदर आहे...सगळं...डोळ्यासमोर उभं राहिलं अक्षरशः. लहानपणीचं आठवलं आता त्रास दिला तर लसूणवाल्याला देऊन टाकीन असं आई म्हणायची..खुप भारी...आठवण सरूची..
पुढे काय होतं मग??...

सस्मित, मी नताशा, शुभांगी दिक्षीत, चनस, जयश्री देशकुलकर्णी, मामी, पाजू प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद !